esakal | राजकारणातलं अफेअर 
sakal

बोलून बातमी शोधा

digvijay-singh-with-wife-amrita Rai

राजकारण
एकदा एक महिला रात्रीच्या वेळी एका आमदाराला भेटायला मुंबईतील ‘आमदार निवासा’त गेली. तिथल्या रखवालदारानं तिला थांबवलं. त्यामुळे चिडलेल्या आमदारमहाशयांनी त्या रखवालदाराला मारहाण केली. रात्र उलटली. दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये ही कुजबूज एका पत्रकाराच्या कानावर गेली.

राजकारणातलं अफेअर 

sakal_logo
By
प्रकाश पाटील patilisprakash@gmail.com

एकदा एक महिला रात्रीच्या वेळी एका आमदाराला भेटायला मुंबईतील ‘आमदार निवासा’त गेली. तिथल्या रखवालदारानं तिला थांबवलं. त्यामुळे चिडलेल्या आमदारमहाशयांनी त्या रखवालदाराला मारहाण केली. रात्र उलटली. दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये ही कुजबूज एका पत्रकाराच्या कानावर गेली. त्यानं या घटनेचा पाठपुरावा करत बातमी केली आणि पुढं बरंच काही घडलं. त्या आमदाराचं तिकीट पुढं पक्षश्रेष्ठींनी कापलं. तिकीट कापण्यामागचं कारण होतं लफडं. या घटनेला आता बरीच वर्षं उलटून गेली आहेत. एक काळ असा होता की, सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीचं चारित्र्य आणि शील या गोष्टींना परमोच्च स्थान होतं. शुद्ध चारित्र्याची, निष्कलंक व्यक्तिमत्त्वं राजकारणात होऊनही गेली आहेत. नुसता आरोप जरी झाला तरी पदाचा त्याग करणारे किती तरी राजकारणी आपण पाहिले आहेत. मात्र, राजकारणात शुद्ध चारित्र्य जपणारे नेते आजच्या काळात किती याचं उत्तर शोधणं अवघड आहे. 

MeToo च्या आरोपांमुळे चर्चेत आलेले आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांना मानहानीप्रकरणात उच्च न्यायालयानं गेल्या बुधवारी (ता. १७) झटका दिला. प्रिया रमाणी यांना निर्दोष ठरवत उच्च न्यायालयानं त्यांना मोठा दिलासा दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एका महिलेनं गंभीर तक्रार केली. या तक्रारीनंतर चर्चेला उधाण आलं आणि स्वत: मुंडे यांनीच ‘जिनं तक्रार केली त्या महिलेच्या बहिणीशी आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये आहोत व तिच्यापासून आपल्याला मुलं आहेत’ असं स्पष्ट केलं. मुंडेप्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावरही सनसनाटी आरोप झाले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. विरोधी पक्ष या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहे. गेला महिनाभर या दोन्ही प्रकरणांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. 

ज्या नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले त्यांचे पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, भारतीय राजकारण हे, कुणी कितीही म्हटलं तरी शंभर टक्के शुद्ध कधीच नव्हतं. राजकारणात ज्यांच्या पुढं नतमस्तक व्हावं असे थोर राजकारणीही होऊन गेले आहेत. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

आपल्या राज्याचा विचार केल्यास, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, वि. स. पागे, रामभाऊ म्हाळगी किंवा शरद पवार, राम नाईक, मनोहर जोशी आदी नेते असतील; राजकीय आयुष्यात त्यांच्या चारित्र्यावर कुणी स्वप्नातही शंका घेतली नसेल. तो एक काळ होता. 

इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणाचा रंगही बदलत गेला. राजकारणातील अफेअरची (प्रेमप्रकरण) दोन प्रकारांत विभागणी करावी लागेल. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर केलेलं दुसरं लग्न आणि पहिली पत्नी हयात असतानाही केलेले दुसरं लग्न. 

पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर केलेलं दुसरं लग्न
पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी दुसरं लग्न केलं. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर शालिनीताई पाटील यांच्याशी लग्न केलं होतं. पत्नीच्या निधनानंतर दुसरं लग्न करणाऱ्यांना तसा कुणाचा आक्षेप नसतो. ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह आणि टीव्ही-अँकर अम्रिता राय यांचं प्रेमप्रकरणही खूप गाजलं. ते काँग्रेसचे बडे नेते होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाचं विरोधकांनी भांडवल केलं. काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न केला; पण दिग्विजयसिंह चतुर निघाले. ‘आपण जिच्यावर प्रेम करतो, तिच्याशी विवाह करणार आहोत,’ असं सांगत त्यांनी वादावर पडदा टाकला. बोलल्यानुसार पुढं लग्नही केलं. दिग्विजयसिंह यांच्याप्रमाणे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचंही प्रेमप्रकरण बरंच गाजलं. 

पहिली पत्नी हयात असताना केलेलं दुसरं लग्न 
पहिली पत्नी, मुलं-बाळं, नातवंडं असतानाही दुसरं लग्न केलं, संसार केला असेही काही नेते आहेत. कारण काय, तर पहिली पत्नी अशिक्षित होती, दिसायला सुंदर नव्हती! त्यामुळे सुंदर, उच्चशिक्षित महिलेबरोबर प्रेमाचं सूत जुळवताना या नेत्यांनी तिला अर्धांगिनी करून टाकलं. अर्थात्‌, या नेत्यांनी बिनधास्तपणे दुसरी बाई ठेवली; पण पहिलीनं त्याला कधी आक्षेप घेतला नाही. घरात वादंग निर्माण झालं असेलही; पण ते कधी चव्हाट्यावर येऊ दिलं नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना मात्र पहिलीचं स्थान अबाधितच राहिलं. अशी उदाहरणं राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणातही आहेतच. 

नेत्यांचे प्रेमविवाह 
एखाद्या नेत्याचं एखाद्या महिलेवर किंवा युवतीवर प्रेम असेल, त्यांनी विवाह केला असेल तर कुणाची तक्रार असण्याचं कारणच नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधींचं प्रेम होतं; त्यांनी लग्न केलं. त्याप्रमाणेच प्रियंका गांधी-रॉबर्ट वद्रा, सचिन पायलट-सारा अब्दुल्ला अशी उदाहरणंही आहेत. प्रेमविवाह केलेले अनेक नेते विविध पक्षांत आहेत. 

बरखाप्रकरणाचं वादळ 
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं बरखाप्रकरणही राज्यात खूपच गाजलं. त्या वेळी चोहोबाजूंनी मुंडे यांच्यावर टीका होत असताना बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मदतीला धावले खरे; पण शिवाजी पार्कवरील एका सभेत मुंडेंकडे पाहून बाळासाहेब असंही म्हणाले होते : ‘मुंडेजी, प्यार किया तो डरना क्‍या!’  बाळासाहेबांच्या या वाक्‍यानंतर मुंडेंचं काय झालं असेल!

राजकारणातला कोणताही नेता असो, त्याच्या अफेअरवर चर्चा ही होतच असते. गॉसिपिंग होतंच असतं आणि ते कानोकानी पसरत जातं. ‘आमची कामं होतात ना, मग आमचा नेता काहीही करो, आमचं त्याला समर्थन,’ हा ‘ट्रेंड’ राजकारणात सध्या दिसून येतो. असो! 

भारतीय राजकारणात ‘पती, पत्नी और वो’ हा सिलसिला चालत आला आहे. तो थांबणारही नाही. बॉलिवूडप्रमाणे राजकारणालाही ग्लॅमर आहे. एक खरं की, सत्ता आणि संपत्तीतून प्रेमप्रकरणं घडतात. आपल्यापेक्षा परदेशात अशा गोष्टींना इतकं महत्त्व दिलं जात नाही असं म्हटलं जातं; पण तसं काही नाही. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रेयसीला भेटण्यासाठी मागच्या दारानं जायचे. म्हणजेच तिथंही ‘चुपके चुपके’ प्रेम सुरू होतं. तरीही भारतात नेत्यांच्या अफेअरवर नेहमी वादंग उसळतं. राजीनाम्याची मागणी होते. पक्षाला बदनाम करण्याचं राजकारण केलं जातं आणि महिला सबलीकरण-स्त्रीस्वातंत्र्य वगैरे मुद्दे गुंडाळून ठेवले जातात हेही तितकंच खरं!

Edited By - Prashant Patil