esakal | गप्पा ‘पोष्टी’ : माझा ‘चार्वाक’ डाएट! Diet
sakal

बोलून बातमी शोधा

diet

गप्पा ‘पोष्टी’ : माझा ‘चार्वाक’ डाएट!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

माणसानं काय खावं, किती खावं, दिवसातून किती वेळा आणि किती वेळ खावं ह्याचं जोरदार लफ्फेदार कन्फ्यूजन सध्या सुरु आहे! दीक्षितकाका म्हणतात जे वाट्टेल ते खा, पण दिवसातून फक्त दोनदाच, ठराविक काळातच खा. दिवेकरबाई म्हणतात जे वाट्टेल ते खा, पण दर दोन तासांनी थोडं थोडं, ओंजळीत मावेल एवढंच खा. इंटरनेटवर तर डाएट्सचं गवत उगवलंय. ‘फक्त कोंबड्या खा’ सांगणाऱ्यांपासून ‘फक्त गवत खाऊन जगा’ सांगणाऱ्यांपर्यंत काय वाट वाट्टेल ती ‘ऑथेंटिक’ डाएट्स साईटो-सायटी दिसत आहेत. ही सगळी सगळी डाएट्स एकसारखीच वचनं देतात. आमचं डाएट केलंत की वजन कमी होईल, आमचं डाएट केलंत की मधुमेह होणार नाही किंवा आटोक्यात येईल, आमचं डाएट केलंत की रक्तदाब वाढणार नाही, आमचं डाएट केलंत की कॅन्सर होणार नाही. आमचं डाएट केलंत की डायरेक्ट पृथ्वीवरतीच स्वर्ग वगैरे!

अत्यंत गमतशीर गोष्ट म्हणजे, कोणताही एक डाएट आयुष्यभर केला म्हणून आणि फक्त म्हणूनच कधी आजारीच पडला नाही किंवा मेलाच नाही असा एकही मनुष्य कुठेच दिसत नाही! म्हणजे फायनली आपण सगळे एकाच धामाला जाणार. पन्नास, साठ, सत्तर किंवा ऐंशी अशा कोणत्यातरी वयात हृदयात एक जोरदार कळ येणार अन् खेळ खल्लास होणार. तुम्ही कंदमुळं खाऊन जगा, कोंबड्या-बकऱ्या चापून जगा, दर तासाला खाऊन जगा, दिवसातून दोनदाच खाऊन जगा, काहीही, कसंही खाऊन जगा. फायनल एक्झिट होणार म्हणजे होणार! अन् ती झाली, की पुन्हा इकडे येऊन इकडचे लै भारी पदार्थ खाता येतीलच याची काही ग्यारंटी नाही!!

म्हणून मी ‘चार्वाक डाएट’ करतो!! चार्वाक म्हणायचे तसं,

‘यावत् जीवम् सुखम जीवेत।

ऋणम् कृत्वा घृतम पीबेत।

भस्मीभूतस्य देहस्य,

पुनरागमनम कुतः!’

अर्थात, जोवर जगायचं तोवर मजेत जगा. अगदी कर्ज काढा पण तूप (म्हणजे चवदार पदार्थ) खा, कारण एकदा का देह जळून गेला की इथं परत येणं होईलच असं नाही! हा डाएट करण्याची एकमेव अट म्हणजे आपण जेव्हा, जे खातो आहोत ते अत्यंत प्रेमानं, मनापासून एन्जॉय करत खायचं. जे खातोय त्याचा आस्वाद घेत खायचं! भूक लागली की मगच खायचं आणि पोट भरेल इतकंच खायचं. बस्स. इतकंच! बाकी काही फायदे तोटे माहीत नाहीत, पण ह्या चार्वाक डाएटनी, मी दर दिवशी, दिवसातून किमान चार वेळा प्रचंड म्हणजे प्रचंड आनंद मिळवतो!!

अजून काय पाहिजे असतं आनंदानं जगण्यासाठी?

तर, आपल्या दोन्ही आज्या आणि दोन्ही आजोबे जर सत्तर-ऐंशी वर्षं जगले असतील, तर त्यांनी आयुष्यभर केलेलं डाएट हे आपल्यासाठी अत्यंत योग्य डाएट असतंय! त्यामुळं घ्या ती पुरणपोळी आणि ओता तीवर तुपाची धार!

(ता. क. : हा ललित लेख आहे, वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या आहारातील बदल योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावा ही नम्र अन् प्रेमाची विनंती!)

loading image
go to top