ते आले, त्यांनी पाहिले, ते जिंकले!

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः अनेकदा मोहिमांवर जात असत आणि मोहीम खडतर व आव्हानात्मक असल्यास महाराज उत्साहाने त्यात आवर्जून सहभागी होऊन ती यशस्वी करीत.
chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajsakal
Summary

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः अनेकदा मोहिमांवर जात असत आणि मोहीम खडतर व आव्हानात्मक असल्यास महाराज उत्साहाने त्यात आवर्जून सहभागी होऊन ती यशस्वी करीत.

- प्रसाद तारे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल समकालीन अनेक व्यक्तींनी गौरवोद्‍गार काढलेले आहेत. पराक्रमाबरोबरच राज्यकारभारासाठी आवश्यक गुणांमध्ये महाराज सरस आहेत, असेदेखील त्यांतील अनेकांनी आवर्जून नमूद केले आहे! शिवकाळामध्ये भारतात आलेल्या युरोपियनांनी महाराजांचा पराक्रम युरोपातील सीझर, अलेक्झांडर अशा यशस्वी राजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा असल्याचे म्हटले आहे. ‘ते आले, त्यांनी पाहिले, ते जिंकले,’ असेच महाराजांचे वर्णन होते...

छत्रपती शिवाजी महाराज स्वतः अनेकदा मोहिमांवर जात असत आणि मोहीम खडतर व आव्हानात्मक असल्यास महाराज उत्साहाने त्यात आवर्जून सहभागी होऊन ती यशस्वी करीत. पन्हाळगडाच्या वेढ्यात शत्रूच्या हातावर दिलेली तुरी, लाल महालावरील छापा, आग्र्याहून सुटका यांसारख्या अवघड कामगिऱ्या पाहिल्या, तर खडतर व अवघड मोहिमा महाराजांनी सहजतेने यशस्वी केल्याचे दिसून येते. याबद्दल अॅबे कॅरे या समकालीन फ्रेंच प्रवाशाने महाराजांबद्दलचे स्वराज्याच्या अधिकाऱ्यांचे गौरवोद्‍गार लिहून ठेवले आहेत. त्यानुसार, महाराजांचे ध्येय उत्तुंग असून ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची त्यांची क्षमता तर त्याहूनही अफाट आहे. ते एक महान योद्धा, कुशल राजनीतिज्ञ, कोणतीही खडतर कामगिरी स्वीकारण्याची व यशस्वी करण्याची क्षमता असलेले असून त्यांनी शारीरिक थकव्यावर देखील मात केली आहे. आळसामुळे जगभरातील पूर्वाश्रमीच्या अनेक राजांना अपयशाचा सामना करावा लागल्याची वस्तुस्थिती नजरेसमोर असताना त्या तुलनेत महाराजांचे न थकता परिश्रम करणे इतरांना प्रेरणा देणारे होते हे त्यातून लक्षात येते. मोहिमांमध्ये अविश्रांत परिश्रम करण्याची तयारी आणि एकूणच ध्येय प्राप्तीसाठी लागणारी चिकाटी महाराजांच्या ठाई उपजतच होती.

चतुर, धोरणी योद्धे

महाराजांची लढाईतील चपळता आणि तत्परता त्याबद्दलही गौरवोद्‍गारांमुळे प्रकाश पडतो. रेंगाळणे, हळूहळू काम करणे हे महाराजांच्या स्वभावात बसतच नसे. हीच चपळता महाराजांना गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीसाठी उपयोगी ठरली. तत्परतेने व झटपट हालचाली केल्याने अनेक लढाया महाराजांना सहजी जिंकता आल्या. आपल्या तत्परतेला महाराजांनी सततोद्योगीपणाची जोड दिली होती. त्यामुळे स्वराज्याच्या कामांमध्ये गतिमानता असे, ज्यायोगे अनेक मोठमोठ्या कामगिऱ्या त्यांनी सहजतेने पार पाडल्या. कारवार येथील इंग्रजांनी एका पत्रात असे म्हटले आहे, की महाराजांच्या सततोद्योगीपणामुळे शेजारी राज्यांना कायमच सावध राहावे लागते आणि तसे करूनही ती राज्ये सातत्याने पराभूत होत रहातात! दुसऱ्या एका पत्रात इंग्रज लिहितात की, महाराज एक चतुर व धोरणी योद्धे आहेत. ते युद्धात सावधगिरीने व चिकाटीने लढतात. सर्व प्रकारच्या युक्त्या योजून ते अशा प्रकारचे छापे टाकतात, की त्यामुळे शत्रूची बरीच माणसे जायबंदी होतात. इंग्रजांनी ७ नोव्हेंबर १६७३ या दिवशी लिहिलेले हे पत्र आहे. यातून इंग्रजांनी महाराजांच्या युद्धातील धोरणीपणाची दखल घेतलेली दिसून येते. जंजिऱ्याच्या सैनिकांना महाराजांनी जेरबंद केले होते त्या अनुषंगाने महाराजांच्या चातुर्य आणि धोरणीपणाचा उल्लेख उपरोक्त पत्रामध्ये आला आहे. पुढे स्वराज्यविस्तार झाल्यानंतरच्या काळातही महाराजांनी अनेक विजय धोरणीपणाच्या जोरावर सहज हस्तगत केले होते. दक्षिण भारतातील महाराजांच्या देदिप्यमान विजयानंतर इंग्रज लिहितात, की त्या यशाने महाराज आनंदी असून स्पेनमधील ज्युलियस सीझरप्रमाणे, ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले,’ असे महाराजांच्या या दक्षिण मोहिमेबद्दल म्हणता येईल. महाराजांच्या विजयामुळे इंग्रजांना थेट ज्युलियस सीझर बद्दलच्या प्रसिद्ध वाक्याची आठवण झाली!

पराक्रम्यांच्या कौतुकाची वृत्ती

महाराजांच्या वादळी पराक्रमापुढे विजापूरच्या सैनिकांची दाणादाण उडत असे. त्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागत होता. महाराजांच्या युद्धगुणांचे कौतुक करताना अॅबे कॅरे लिहितो, की महाराजांकडे ते सर्व गुण होते जे एका महान योद्ध्यामध्ये आणि सेनापतीमध्ये असावयास हवेत. एका बाजूची लढाई किंवा गाव जिंकताच ते झपाट्याने विरुद्ध बाजूच्या गावात चपळतेने आणि आश्चर्यकारकरीत्या पोहोचून प्रतिपक्षामध्ये धुमाकूळ उडवून देत असत. तसेच, महाराजांच्या आणखी एका युद्धविषयक थोर गुणांची नोंद घेत तो पुढे लिहितो, ‘या चपळतेखेरीज ज्युलियस सीझरप्रमाणे सैनिकांप्रति आणि प्रजेप्रति दयाभाव आणि त्यांना सढळ हस्ते बक्षीस देणे या गुणविशेषांमुळे त्यांच्या हातून पराभूत झालेल्यांची देखील मने त्यांनी जिंकली होती.’ महाराज पराक्रम गाजविणाऱ्या सर्वांना यथायोग्य नावाजत असत. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत वीर बाजी जेधे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून झेंड्याचे रक्षण केले, म्हणून महाराजांनी त्यांना सर्जेराव किताब दिला होता.

अखेरच्या काळातील जालन्याच्या लढाईतून परत येताना योग्य वाट दाखवून सर्वांना सुरक्षितपणे परत आणल्याबद्दल गुप्तहेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचा महाराजांनी विशेष गौरव केला होता. महाराजांनी तळकोकण स्वराज्यात सामील केल्यावर गोव्यातील पोर्तुगिजांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. महाराज आग्र्याहून निघाले त्यावेळी विरोधकांमध्ये एकच खळबळ उडाली व ते परत आल्याचे ऐकून पोर्तुगीज गव्हर्नर कोंदि द सांव्हिसेंति देखील गडबडून गेला. अस्वस्थ होऊन त्याने थेट त्याच्या पोर्तुगालच्या राजालाच एक पत्र लिहिले. त्यात महाराज आग्र्याहून परतले हे कळविले असून कोकणातील त्यांच्या यशाचा उल्लेख केला आहे. गव्हर्नर सांव्हिसेंति पत्रात लिहितो, ‘महाराज आता फोंड्यास आमचे जवळचे शेजारी झाले आहेत. त्यांचे चातुर्य, शौर्य, चपळाई व युद्धविषयक दूरदृष्टी लक्षात घेता या गुणांच्या बाबतीत ज्युलियस सीझर व अलेक्झांडर यांच्या अशा प्रकारच्या गुणांची आठवण आपल्याला होते.’ गव्हर्नर पदावरील जबाबदार अधिकाऱ्याने महाराजांचे केलेले हे गुणवर्णन आहे!

थोर योद्ध्यांत गणना

दक्षिण भारतातील स्वारीहून परत येताना महाराजांचा मुक्काम बंकापूर येथे होता. अतिशय कमी वेळात गतिमान पराक्रम गाजवून महाराजांनी अल्पावधीत फार मोठा तमिळ व कानडी भूभाग स्वतंत्र केला होता. त्यांच्या वादळी पराक्रमाने विरोधकांना पळता भुई थोडी झाली होती. महाराजांचा पराक्रम ऐकून मुंबईमध्ये असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना पूर्वी होऊन गेलेल्या अलेक्झांडरच्या गतिमान पराक्रमाचे व धाकाचे स्मरण झाले होते. त्याबद्दल धास्तावलेले इंग्रज अधिकारी त्यांच्या अहवालामध्ये महाराजांबद्दल लिहितात, की ते आता बंकापूर येथे आहेत व पूर्वी अलेक्झांडर दि ग्रेटची वाटे तशी आम्हाला त्यांची धास्ती वाटते. युरोपियन लोकांना महाराजांच्या पराक्रमामुळे पाश्चिमात्य जगतातील जुन्या राजांच्या युद्धगुणांचे एकीकडे असे स्मरण होत असताना दुसरीकडे कॅरे याने केलेल्या वर्णनामध्ये पौर्वात्य देशांचा उल्लेखही आला आहे. महाराजांचे धैर्य व मुलूख काबीज करण्याची गतिमानता याबद्दल कौतुकाचे उद्‍गार काढताना कॅरेचे एक वाक्य फार महत्त्वाचे आहे. तो म्हणतो की पौर्वात्य जगतामध्ये होऊन गेलेल्या अत्यंत थोर व्यक्तींमध्ये महाराजांची गणना होत आहे!

एकूणच महाराजांच्या पराक्रमी व्यक्तिमत्वामुळे स्वराज्यातील व परराज्यातील अनेकांच्या मनात महाराजांची आदरयुक्त प्रतिमा तयार होत होती. त्यांनी केलेल्या समकालीन वर्णनातून उमटणारे महाराजांच्या पराक्रमाचे तेज आज वर्तमानकाळात आपल्याला अखंड प्रेरणा देत आहे!

(लेखक इतिहास संशोधक व अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com