भारताचे प्रवेशद्वार

मुंबई म्हटलं की ‘गेट वे ऑफ इंडिया’ आठवतो. ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या गेट वे आॅफ इंडियाला धावती भेट न देता दुर्बीण घेऊन गेलात तर या वास्तूची कलात्मकता डोळ्यात साठवून घेता येईल.
Prashant Nanavare write One day trip Gateway of India
Prashant Nanavare write One day trip Gateway of Indiasakal
Updated on
Summary

मुंबई म्हटलं की ‘गेट वे ऑफ इंडिया’ आठवतो. ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून ख्यातकीर्त असलेल्या गेट वे आॅफ इंडियाला धावती भेट न देता दुर्बीण घेऊन गेलात तर या वास्तूची कलात्मकता डोळ्यात साठवून घेता येईल. रात्री पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ही वास्तू उजळून निघते. वास्तूला खेटून लागलेल्या बोटी आणि पलिकडे पसरलेला अथांग सागर हे दृश्य फार कमी शहरांच्या वाट्याला येते.

जगातील कोणत्याही महत्त्वाच्या शहराचे नाव घेतल्यानंतर डोळ्यांसमोर त्या शहराचे प्रतिनिधित्व करणारी वास्तू सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते. उदा. पॅरिस म्हणजे ‘आयफेल टॉवर’, न्यूयॉर्क म्हटलं की ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’, सिंगापूरच्या ‘मरलायन’ची प्रतिकृती किंवा लंडनचा ‘टॉवर ब्रीज’. तसंच मुंबई म्हटलं की ‘गेट वे ऑफ इंडिया’ आठवतो. अपोलो बंदर या मुंबईच्या पूर्वेकडील टोकावर ही वास्तू गेली नऊ दशकं दिमाखात उभी आहे. सात बेटांपासून तयार झालेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर सम्राट अशोकाच्या काळापासून बंदर होते आणि ते ‘पल्लव’ (पुढे त्याचे नाव ‘पालव’ असे झाले) या नावाने ओळखले जाई. ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी या बंदराचा विकास करून त्याचे नाव ‘अपोलो’ (ग्रीक देवता) असे केले. ब्रिटिशांनी मुंबई बेटावर बांधलेल्या किल्ल्याचा दक्षिण दरवाजा या बंदराजवळ होता. त्यामुळे त्या दरवाजाचे ‘अपोलो गेट’ असे नामकरण करण्यात आले. या अपोलो बंदराच्या पश्चिमेकडचा प्रशस्त मोकळा परिसर हे त्याकाळी लोकांचे फिरण्यासाठीचे आवडते ठिकाण होते आणि आजही मुंबईकरांची व मुंबईला भेट देणाऱ्यांची पहिली पसंती याच जागेला असते.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट किंवा मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरल्यानंतर बस किंवा टॅक्सीने ‘गेट वे ऑफ इंडिया’ला पोहोचता येते. चालण्याचा कंटाळा नसेल तर जुन्या ब्रिटिशकालीन इमारती, चौकाचौकात असलेले पुतळे आणि पाणपोई पाहतही इथे पोहचू शकता. शक्यतो सकाळी सूर्य डोक्यावर यायच्या आधी किंवा सायंकाळी सूर्य अस्ताला जाण्याआधी इथे जायला हवं. कारण हा संपूर्ण परिसर खुला असून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी क्वचितच आडोसे सापडतील. सूर्यास्तानंतर मात्र रात्री उशिरापर्यंत कितीही वेळ इथे थांबता येऊ शकेल. एखाद्या चांगल्या दिवसाचे किंवा कार्यक्रमाचे निमित्त असल्यास ‘गेट वे ऑफ इंडिया’ला केलेली आकर्षक विद्युत रोषणाईदेखील पाहता येईल.

ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ सालच्या मुंबई भेटीच्या निमित्ताने अपोलो बंदरावर कमान उभारण्याचे ठरले होते. स्वागतासाठी मुगल पद्धतीची प्लास्टर ऑफ पॅरिसची कमान उभारण्यात आली होती. हा सोहळा पार पडल्यानंतर याच ठिकाणी कायमस्वरूपी कमान उभारायचे सरकारने ठरवले. त्यांचा स्वागताचा संदेश नंतर बांधण्यात आलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे कोरलेला दिसतो. गॉथिक शैली व भारतातील विविध प्रादेशिक शैलींचे मिश्रण करून मुंबईतील अनेक इमारती बांधणारे स्कॉटिश आर्किटेक्ट जॉर्ज विटेट यांची या कामासाठी नेमणूक करण्यात आली. विटेट यांनी गेट-वेसाठी वेगवेगळी डिझाइन्स तयार करून त्यांच्या ड्रॉइंग्ज व मॉडेल्सचे प्रदर्शन भरविले व लोकांना सूचना करण्याचे आवाहन केले. सूचनांची दखल घेऊन विटेट यांनी इंडो-सारासेनिक स्थापत्य शैलीतील डिझाइन तयार केले. एक महत्त्वाची गोष्ट इथे नमूद करणे गरजेचे आहे. गेट-वेच्या बांधकामासाठी रावबहादूर यशवंतराव हरिश्चंद्र देसाई या मराठी इंजिनिअरची नेमणूक करण्यात आली होती. यशवंतराव देसाई यांनी गांवदेवी येथील त्यांच्या बंगल्याच्या आवारात गेट-वेच्या एका कमानीची प्रमाणबद्ध दगडी प्रतिकृती तयार करून घेतली होती. आजही देसाई बंगल्याच्या आवारात ती पाहायला मिळते. कधीतरी तिथेही भेट द्या. देसाई यांच्या बांधकामाचा गौरव म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताज हॉटेलच्या मागील चौकास त्यांचे नाव दिले आहे.

गेट-वेच्या बांधकामास सुरुवात करताना १९११ मध्ये उभारलेली कमान पाडून तिथेच समुद्रकिनारी भराव घालून जमीन तयार केली गेली. किनाऱ्यालगत भक्कम भिंती बांधून ३१ मार्च १९१३ रोजी गेट-वेची पायाभरणी केली गेली. राजस्थानमधील खरोडी या ठिकाणाहून मागवण्यात आलेल्या पिवळ्या बेसॉल्ट दगडापासून या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे. सॅण्डस्टोन प्रकारातील या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याने जितका हा भिजतो तितका अधिक मजबूत होत जातो. ४ डिसेंबर १९२४ साली वास्तूचे अधिकृतपणे उद्‌घाटन झाले. २१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आयताकृती आकाराच्या या वास्तूला तीन कमानी आहेत आणि तिन्हीवर घुमट आहेत, जे बाहेरून दिसत नाहीत. मधला घुमट ४८ फूट व्यासाचा असून, फरशीपासून ८३ फूट उंच आहे. वास्तूच्या बाहेरील बाजूने भिंतींवर बारीक कोरीव काम करण्यात आले आहे. दरवाजांच्या तिन्ही बाजूंना दगडात नक्षीकाम केलेली कोरीव जाळी आहेत. वास्तूवरील नक्षीकामाचे वैशिष्ट्य म्हणजे दुरूनही ते अगदी सहज लक्षात येते. अरबी समुद्राकडे जाणाऱ्या प्रवेशमार्गाच्या कमानीच्या मागे दगडी पायऱ्या आहेत. समुद्रमार्गे येणाऱ्या लोकांचे स्वागत आणि निरोप देण्यासाठी अशी रचना करण्यात आली आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तसेच जागतिक धर्म संसदेसाठी मुंबई ते शिकागो असा प्रवास केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ त्यांचाही पुतळा उभारण्यात आला आहे. ताज महाल पॅलेसची देखणी इमारत याच वास्तूच्या समोरील बाजूस आहे. एलिफंटा लेणीला जाण्यासाठी गेट-वेवरूनच बोटी सुटतात. सुरक्षिततेच्या कारणास्तव या वास्तूच्या आतमध्ये आता प्रवेश करता येत नाही. पण धावती भेट न देता आणि केवळ सेल्फीच्या प्रेमात अडकून न पडता दुर्बीण घेऊन गेलात तर भिंगाच्या साह्याने वास्तूची कलात्मकता डोळ्यात साठवून घेता येईल.

रात्री पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ही वास्तू उजळून निघते. वास्तूला खेटून लागलेल्या बोटी आणि पलिकडे पसरलेला अथांग सागर हे दृश्य फार कमी शहरांच्या वाट्याला येते. आकाशातून तर ‘गेट वे ऑफ इंडिया’ची वास्तू अधिक देखणी दिसते. त्यासाठी शक्य असल्यास ताज किंवा नजीकच्या एका रुफ टॉप रेस्टॉरंटला भेट देऊ शकता. पावसाच्या दिवसात बाजूच्या संरक्षण भिंतींना धडका देणाऱ्या लाटा आणि त्यांचा सामना करत स्थितप्रज्ञपणे उभी असलेली ही वास्तू खऱ्या अर्थाने ‘भारताचे प्रवेशद्वार’ हे आपले नाव सार्थ ठरवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com