आता आपलं राज्य

असंच एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक वाचण्यात आलं. ते अक्षरशः एका बैठकीत वाचून पूर्ण केलं. आजच्या जागतिक आणि राजकीय परिस्थितीवर चपखलपणे भाष्य करणारं हे पुस्तक आहे ‘ॲनिमल फार्म’.
Animal Farm Book
Animal Farm BookSakal

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

असंच एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक वाचण्यात आलं. ते अक्षरशः एका बैठकीत वाचून पूर्ण केलं. आजच्या जागतिक आणि राजकीय परिस्थितीवर चपखलपणे भाष्य करणारं हे पुस्तक आहे ‘ॲनिमल फार्म’. लेखक जॉर्ज ऑर्वेल. मला ते खूपच उद्‍बोधक वाटल्यानं त्यावर सविस्तर लिहीत आहे. त्याची कथा अशी :

‘माझ्या साथी बंधू-भगिनींनो, मला एक अतिशय वेगळं स्वप्न पडलं त्याबाबत आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. मी वयोवृद्ध झालो आहे...’ मेजर नावाच्या देखण्या वराहानं शेतातल्या सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून सांगायला सुरुवात केली. सर्व प्राणी त्याला मान देत असत. त्याच्यात एक रुबाब असे व बोलण्यातही आत्मविश्वास.

‘आता मी किती दिवस जगेन हे माहीत नाही. त्याआधी तुम्हा सर्वांच्या हिताचं सांगणं मला सर्वांत महत्त्वाचं कर्तव्य वाटतं. पाहा ना, आपल्या आयुष्याला काही अर्थ आहे का? आपला मालक आपल्याकडून शेती करून घेतो. आपलं दूध विकतो, अंडी विकतो, एवढंच काय; संख्या वाढली तर सरळ विकूनही टाकतो. आपण गुलाम आहोत, गुलाम.

आपण प्रत्येकी जी गोष्ट करतो त्यातली एकही गोष्ट करण्याची क्षमता किंवा लायकी माणसात, म्हणजे आपल्या मालकात, नाही. आपल्यासारखे जेवढे शेतमळे आहेत तिथं सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. जगण्यापुरतं फक्त आपल्याला खायला-प्यायला दिलं जातं ते त्याला हवं तिथपर्यंत. त्यानंतरचा काळ? कत्तलखाना किंवा विक्री. सगळी माणसं आपली शत्रू आहेत, कुणीही अपवाद नाही. फेकून देऊ या ही गुलामी. स्वतंत्र, मुक्त, आनंदी, मनासारखं आयुष्य जगू या. आणि, हे शक्य आहे...विचार करा.’

एवढं बोलल्यानंतर सभा संपली. तीन दिवसांनी मेजर वराह यांचं झोपेत निधन झालं. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी वराहसमूहातले दोन तगडे वराह ‘नेपोलियन’ आणि ‘स्नोबॉल’ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याबरोबर आणखी एक वराह ‘स्क्वीलर’ याचाही समावेश करण्यात आला. कारण, तो बोलण्यात आणि भाषणं देण्यात अत्यंत चतुर होता.

या तिघांनी सर्वांबरोबर रात्री गुप्तपणे गाठी-भेटी, चर्चा सुरू केल्या. काही साथींनी विरोध दर्शवला; कारण, त्यांचं मालकाबरोबर काहीच वैर नव्हतं. मात्र, काहीही झालं तरी आपण एकत्रच राहायचं असं त्यांनाही पटवून देण्यात आलं...‘जगू किंवा मरू. आपण सर्व समान आहोत. यासाठी आपल्याला कितीही त्याग करायची वेळ आली तरी मागं हटायचं नाही. सांगितलेल्या आज्ञांचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. कुणीही विरोध करायचा नाही किंवा प्रश्न विचारायचे नाहीत. फेकून देऊ या सर्व बंधनं, आपण सर्व समान आहोत,’ असं एकंदर ठरलं.

लवकरच एका रात्री सर्व साथी जनावरांनी त्यांच्या मालकावर आणि नोकरांवर हल्ला चढवला. गोंधळलेले आणि चकित झालेले हे सर्व मानव जिवाच्या आकांतानं शेतमळ्यातून पळून गेले. आता सर्व शेतमळे जनावरांच्या मालकीचे झाले होते. या वस्तुस्थितीवर विश्वास ठेवणं अवघड होतं; पण तसंच घडलं होतं हे खरं.

ध्यानात आलं की, मेजर वराह आणि त्याचं कुटुंबीय गेले तीन-चार महिने वाचायला-लिहायला शिकलं होतं. त्यामुळे नेतृत्व साहजिकच त्यांच्याकडे आलं. त्यांनी सातकलमी तत्त्वं ठरवली. ही तत्त्वं सर्वांनी प्राणपणानं जपायची होती. ती तत्त्वं अशी होती :

१) दोन पायांवर चालतात ते आपले शत्रू.

२) चार पायांवर चालतात किंवा पंख वापरतात ते आपले मित्र.

३) कोणताही प्राणी कपडे घालणार नाही.

४) कोणताही प्राणी बिछान्यात झोपणार नाही.

५) कोणताही प्राणी दारू पिणार नाही.

६) कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याची हत्या करणार नाही.

७) सर्व प्राणी एकसमान असतील.

ही तत्त्वं सर्वांना समजावून सांगण्यात आली. एकवाक्यता झाली. सर्वांनी ताबडतोब कामाला लागावं असे आदेश देण्यात आले.

काही गाईंनी जवळपास २४ तास दूध न दिल्यानं अस्वस्थता व्यक्त केली. मात्र, काही प्राण्यांनी ते जमवलं; परंतू संध्याकाळी सर्वजण कामावरून येईपर्यंत दूध नाहीसं झालं होतं. सर्वांच्या कामाचं वाटप, नियोजन वराहसमूह करत होता. दर रविवारी सकाळी झेंडावंदन, वराहाचं भाषण होत असे. मग वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या. उत्पादन, नियोजन अधिक होण्यासाठीचे प्रयत्न यांचा आढावा घेतला जाऊ लागला. या सर्वांमध्ये वराहसमूह कोणतंही काम करत नसे. फक्त नियोजन, मार्गदर्शन वगैरे.

‘आम्हाला दोनच पाय आहेत,’ अशी पक्ष्यांनी तक्रार केली. त्यांची समजूत काढण्यात आली. दूध, सफरचंदं गायब होत असत. ती वराहसमूहाकडे जातात असं ध्यानात आलं. स्क्वीलरनं सर्वांना आपल्या भाषणचातुर्यानं पटवलं की, ‘हे पदार्थ आवडत नसले तरी वराहसमूहाला खावे लागतात. कारण, त्यांना बौद्धिक काम करावं लागतं. ते हे काम न करू शकल्यास प्रचंड गोंधळ होईल, म्हणून ते खाण्यामागं आमचासुद्धा त्यागच आहे... आपल्या सर्वांसाठी!’

काही लोकांनी त्यांच्या शेतमळ्यावर हल्ला केला; पण नेपोलियन वराहाच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात त्या लोकांना पळ काढावा लागला. त्यामुळे, सैन्य निर्माण करण्याची आवश्यकता नेपोलियननं पटवून दिली. एका प्राण्यानं शेजारच्या मानवाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे असं वराहांच्या लक्षात आलं. त्याबद्दल त्या प्राण्याची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर तो प्राणी गायबच झाला...नंतर कधी दिसलाच नाही.

प्राण्यांच्या शेतमळ्याच्या गरजा वाढत चालल्या होत्या. त्यामुळे अधिक अंडी, अधिक दूध, आहारात थोडी बचत वगैरे गोष्टी गरजेच्या ठरू लागल्या. कुणाची कुरकुर करण्याची हिंमत नव्हती. कुणी प्रयत्न केला तर दोन-तीन कुत्रे पाठवून त्याचा बंदोबस्त केला जात असे. आपल्याकडे ‘ABCD’ चा वापर होतो तसे!

एका प्रकल्पाला स्नोबॉल वराहानं विरोध केला. तिथं लांडग्यासारखे मजबूत असे पाच-सहा कुत्रे एकदम आले आणि त्यांनी स्नोबॉलवर आक्रमण केलं. स्नोबॉल जीव खाऊन शेतमळ्याबाहेर पळाला व त्यानं आपला जीव वाचवला. आता नेपोलियन वराहाभोवती पाच-सहा अल्सेशियन कुत्र्यांचा पहारेवजा गराडा असे. त्याच्यापुढं ब्र काढण्याची कुणाची हिंमत नव्हती.

कुणी विरोध केला तरी किंवा तसा संशय आला तरी अल्सेशियन कुत्रे संबंधिताचा पूर्ण बंदोबस्त करत.

मूळ मालक जॉनच्या घराचा ताबा आता नेपोलियन कुटुंबीय, नातेवाईक यांनी घेतला. पवनचक्की बांधावी असा निर्णय नेपोलियननं घेतला. या प्रकल्पाला विरोध केलेल्या स्नोबॉलची आता फारशी कुणाला आठवणही राहिली नाही; परंतू तो प्रकल्प फसला.

‘हा प्रकल्प फसला त्याला जबाबदार कोण आहे हे माहीत आहे का? तर याला जबाबदार आहे पळ काढलेला तो स्नोबॉल...! आपल्याला यश मिळू नये म्हणून त्यानं ही गोष्ट घडवून आणली,’ असं स्क्वीलरनं सांगायला सुरुवात केली.

आपल्याकडे नाही का परकीय हाताबद्दल बोललं जातं, तसंच!

आता वराह नेपोलियननं एका मानवतज्ज्ञाबरोबर करार केला. त्यासाठी त्याला चारशे अंडी देणं गरजेचं होतं. याला कोंबड्यांनी विरोध केला. त्यांच्याभोवती सर्व अल्सेशियन कुत्र्यांनी गराडा घातला. विरोध संपला! मग शेतातल्या मालाची चोरी व्हायला लागली. म्हणजे, माल गायब होऊ लागला. ‘स्नोबॉल रात्री येऊन कशा चोऱ्या करतो,’ असं स्क्वीलरनं सांगायला सुरुवात केली.

‘स्नोबॉल शेजारच्या शत्रू-मानवाशी हातमिळवणी करून आपल्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणार आहे, तेव्हा ते आक्रमण परतवून लावण्यासाठी बराच खर्च येईल...दुसऱ्या मानवांची मदत लागेल, त्यामुळे तुम्हाला अधिक काम करणं, त्याग करणं आवश्यक आहे,’ असंही स्क्वीलरनं सांगायला सुरुवात केली.

नाही म्हणण्याची कुणाची हिंमत नव्हती. काहींनी एकत्र येऊन हिंमत केली आणि आपला विरोध दर्शवला. चीनमधल्या तिआनमेन चौकात जसे रणगाडे घालून हजारो तरुणांना यमसदनास पाठवण्यात आलं होतं तशीच गत आपल्या विरोधकांची नेपोलियन वराहानं निष्ठूरपणे केली. नेपोलियन आता बदलत चालला होता. त्याला विरोध खपेनासा होऊ लागला होता. आपल्याला कुणी विरोध करण्याची हिंमत करणार नाही याची पूर्ण व्यवस्था त्यानं केली होती. तसा नुसता संशय जरी आला तरी त्याला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आधीच्या मालकाच्या तळघरात व्हिस्कीचा मोठा साठा सापडला. शेतमळ्याकरता शत्रू-मानवाबरोबर बोलणी, संपर्क सुरू होता. त्यांनी आपला शेतमाल घ्यावा आणि आपल्या गरजेच्या गोष्टी आपल्याला द्यावात यासाठी असं करणं आवश्यक होतं. रात्री त्यांची सरबराई करण्यासाठी जेवणं, व्हिस्की देणं, पिणं गरजेचं होतं. व्यवहार म्हणून.

त्यामुळे एका मूळ तत्त्वात थोडासा बदल करण्यात आला. ‘कुठलाही प्राणी दारू पिणार नाही’ हे जे तत्त्व होतं त्यात हा बदल करण्यात आला. ‘दारू पिण्याचा अतिरेक केला जाणार नाही’ असा हा बदल होता. व्यवहारात, राजकारणात अशा तडजोडी कराव्या लागतात.

हे सर्व करताना शेतमळा चालवण्यासाठी नियमावली करणं, तिचं पालन करून घेण्यासाठी कुणाच्या तरी अध्यक्षतेखाली पूर्तता होते का ते पाहणं आवश्यक ठरू लागलं. त्यामुळे वराह नेपोलियननं घटना करून घेऊन स्वतःची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक केली. कामाच्या ओझ्यामुळे आता नेपोलियन सहकाऱ्यांना भेटेनासा झाला. वैयक्तिक चिटणीस आणि त्यांचा चमू यांच्यामार्गे सर्व व्यवहार सुरू झाले.

नेपोलियनचं काम फक्त मार्गदर्शनाचं होतं. त्याचं ऑफिस सर्व गोष्टी करत असे. यादरम्यान अनेक सहकाऱ्यांना काहीच काम राहिलं नाही. म्हटलं तर, त्यांची आता गरजच नव्हती. मानवाशी वाढत्या व्यवहारामुळे राष्ट्राध्यक्ष नेपोलियनला जाण्या-येण्यासाठी उत्तम दर्जाची टमटम गाडी, तिच्या पुढं-मागं संरक्षक कुत्रे यांची गरज निर्माण झाली.

माणसाबरोबर आपलेपणा वाढावा म्हणून काही वराह दोन पायांवर चालायला लागले. यानंतर घटनेत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. पहिला बदल : ‘चार पाय असणं चांगलं; पण दोन पाय अधिक चांगले’. दुसरा बदल : ‘सर्व प्राणी समान आहेत; पण काही इतरांपेक्षा अधिक समान आहेत.’

व्यवसायवृद्धीसाठी आणि शत्रूवर मात करता यावी यासाठी मर्यादित चांगल्या शत्रू-मानवाबरोबर आता ऊठ-बस वाढू लागली. आदान-प्रदान वाढू लागलं. बंधनं शिथिल झाली. एका रात्रीच्या भोजनावळीत दारूचे प्याले वाहत होते. रात्री बारानंतर मद्यधुंद झालेल्या वराहांना ‘वराह कोण आणि मानव कोण’ हेच समजेना. माणसांचीही स्थिती काही वेगळी नव्हती. ‘मानव कोण आणि वराह कोण’ हे त्यांनाही समजेना. सर्वजण सारखेच दिसत होते. शेतमळ्यावरील सर्व जनावरांना या सगळ्या खर्चासाठी अधिकाधिक काटकसर करणं, काम करणं आवश्‍यक होऊ लागलं.

मित्र हो...नक्षलाईट्स घ्या, कम्युनिझम घ्या, हुकूमशाही घ्या... सगळीकडे राज्य वराहांचंच असतं. याच लेखकानं, म्हणजे जॉर्ज ऑर्वेल यांनी ‘१९८४’ या शीर्षकाचं आणखी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तेही जगप्रसिद्ध आहे. या कादंबरीचं थोडक्यात सूत्र असं आहे : ‘१९८४ नंतर प्रत्येक व्यक्तीवर अदृश्‍यपणे; परंतू परिणामकारक लक्ष ठेवलं जाईल (Big brother is watching...) आणि त्या प्रत्येक व्यक्तीला वडीलबंधूंच्या (Big brother) सूचनांचं पालन करावं लागेल...न केल्यास तुरुंगवासाची किंवा देहान्ताची शिक्षा ठोठावली जाईल.’

सध्या चीनमध्ये दर दहा माणसांमागं एक माणूस सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असतो. रशियामध्येही परिस्थिती वेगळी नाही. काही लोकशाहीदेशांतही या मार्गानं अशी परिस्थिती आणली जाते.

आपण वस्तुनिष्ठ असावं, पुढाऱ्यांचं बोलणं आणि वस्तुस्थिती याचा अभ्यास करूनच आपला निर्णय घ्यावा. मुखवटा आणि त्यामागचा खरा चेहरा यांतला फरक शोधावा. अकारण कुणाचा द्वेष करू नये व त्याचबरोबर अकारण अंधभक्तही होऊ नये. आपला निर्णय चुकला तर तो लोकशाहीत पाच वर्षांनी दुरुस्त करता येतो, हे लक्षात ठेवावं. मात्र, कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीत हे शक्य नसतं. लोकशाही आणि आपलं भवितव्य आपणच ठरवणार आहोत. विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. त्याचे चांगले-वाईट परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत.

या सदरामधल्या लेखांचं पुस्तक ता. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित होईल. सवलतीत नोंदणीसाठी इच्छुकांनी ‘सकाळ’ कार्यालयाशी आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख विक्रेत्यांशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com