काही प्रथा...परंपरा...!

माझा १९७० पासून देश-विदेशांत प्रवास सुरू झाला तो आजतागायत. ‘मराठा चेंबर’नं १९७० मध्ये ‘एक्सो ओसाका’साठी जपानला जाण्यासाठी सभासदांना आवाहन केलं होतं.
Hongkong
Hongkongsakal

व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

माझा १९७० पासून देश-विदेशांत प्रवास सुरू झाला तो आजतागायत. ‘मराठा चेंबर’नं १९७० मध्ये ‘एक्सो ओसाका’साठी जपानला जाण्यासाठी सभासदांना आवाहन केलं होतं. ‘एअर इंडिया’चं विमानच घेऊन जायचं ठरवल्यानं तिकीटही स्वस्त होतं. मी त्यानं जायचं ठरवलं. खरं म्हणजे, मी जावं असा आग्रह माझे वडीलबंधू माधवराव यांनीच धरला होता.

त्यांचं बरंचसं शिक्षण इंग्लंडमध्ये झाल्यानं, मी परदेशी जावं; त्यातून एक प्रशिक्षणच होत असतं, हा त्यांचा उद्देश. माझा भारतीबरोबर नुकताच साखरपुडा झाला होता. मुंबई विमानतळावर कुटुंबीयांतील काही जण आणि भारती आली होती. कस्टममध्ये जाईपर्यंत आमचे डोळे एकमेकांनाच पाहत होते. त्या वेळी तुम्ही अखंड प्रेमात बुडालेला असता! आजही त्याची आठवण करत आम्ही एकमेकांची चेष्टा करत असतो.

हॉँगकॉँगला पहिला मुक्काम होता. सर्वजण एकमेकांना नवीन होतो. तिथं खूपच स्वस्ताई होती. त्यामुळे परंपरेनं व्यावसायिक असलेल्यांनी खरेदीचा धडाका लावला होता. आम्ही एकमेकांकडे, कोणती गोष्ट किती किमतीला घेतली, याची चौकशी करीत असू. असं ध्यानात आलं की, एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर किंमत विचारायची, मग ‘डझनभर हव्या आहेत, आता भाव सांग’ असं म्हटल्यावर किंमत ३५ ते ४० टक्क्यांवर यायची.

तरी समाधान न झाल्यास आमचे व्यावसायिक मित्र घासाघीस करत. शेवटी एकच नग घेत आणि तो मिळत असे! म्हणजे १०० रुपयांची वस्तू २० ते ३५ रुपयांपर्यंत! एका डॉलरला एक साडी. हे सर्व कल्पनेबाहेर होतं. अर्थातच काय हवं हे भारतीला विचारलं होतं. तिनं लाजत लाजत ‘एखादं छान अत्तर म्हणजे परफ्यूम आणा,’ असं सांगितलं. मी तिच्यासाठी काही साड्या, एक छानसा रेडिओ घेतला आणि परफ्यूम शोधायला सुरुवात केली. मी आयुष्यात कधी अत्तर लावलं नव्हतं.

लग्नसमारंभात मनगटावर एखादा ठिपका किंवा काही लोकांच्या, विशेषतः मुस्लिम लोकांच्या, कानांतील उग्र वासाचा फाया पाहिला होता. आता मला यातलं काही कळत नाही, हे भारतीला कसं सांगायचं हा माझ्यापुढं यक्षप्रश्न! कारण, प्रेमात बुडालेलो होतो ना! सुदैवानं, एका अत्तराचा वास मला आवडला. त्याचं नावही होतं इंटिमेट! भारतीला सर्व गोष्टी अतिशय आवडल्या. (कारण, बहुतेक तीही माझ्या प्रेमात बुडालेली होती, हेच असावं!). ती इंटिमेटची बाटली आणि तो छोटा सुबक रेडिओ तिनं आजही जपून ठेवला आहे. कारण, आमच्या पहिल्या प्रेमाची ती भेट होती.

जपानमध्ये गेल्यावर डोळेच विस्फारले. काय ती स्वच्छता, काय ती शिस्तबद्धता, काय ती कष्ट करण्याची वृत्ती आणि विनयशीलता! देशप्रेम तर ठायी ठायी दिसत होतं. सर्वत्र हिरवळ, स्वच्छता, रेल्वेच्या रुळांना खेटून भातशेती. कोणतीच गोष्ट वाया घालवायची नाही, प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग करण्याचा पराकाष्ठेचा अट्टहास दिसत होता.

सविनयता, अनेक परंपरा, बुद्धांची प्रार्थनास्थळं भारताच्या संस्कृतीशी जवळीक दर्शवत होत्या. कोणतंही खनिज तेल नसताना, तसंच सातत्यानं भूकंपांना सामोरं जावं लागत असताना आणि हिवाळ्यात बर्फाच्छादित असताना दुसऱ्या महायुद्धानंतर राखेतून उभा केलेला समृद्ध जपान त्यांना जगाला दाखवायचा होता. आम्ही यापेक्षा काय अधिक शिकू शकलो असतो? तक्रारीला वावच नव्हता. कष्टांना तिथं पर्याय नव्हता. माझे बंधू माधवराव यांचा मला जपानला पाठवण्याचा उद्देश सफल झाला होता. व्यवसायात आजतागायतची पाच दशकं कशी गेली ते समजलंही नाही!

यानंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही उभयता, तसंच मुलगी अश्र्विनी आणि जावई सचिन चीनला गेलो होतो. तिथंही भारतीय संस्कृतीचा प्रत्यय येतोच. चीनची प्रगतीही देदीप्यमान आहे. तिथल्या लोकप्रतिनिधींनी ‘आर्थिक सुबत्ता येण्यासाठी सर्व काही’ हे धोरण ठरवलं. राजकीय प्रणालीमध्ये ते भले पोलादी पकड ठेवून आहेत; परंतु त्यांच्या दृष्टीनं देशहित सर्वोच्च स्थानी असतं. देशाच्या हिताच्या आड कुणीही आला तर त्याला मृत्युदंड द्यायलाही ते कचरत नाहीत. तिआनमेन चौकात शेकडो तरुणांवर रणगाडे घालून पुन्हा असा मोर्चा निघणार नाही याची व्यवस्था तिथल्या सरकारनं केली होती. जग काय म्हणेल याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही.

चीनच्या जगप्रसिद्ध भिंतीवर आम्ही गेलो. चंद्रावरूनही दिसते इतकी मोठी लांब ही भिंत हजारो कामगारांच्या बलिदानातून उभी राहिलेली आहे. आपल्यावर मंगोलिया वा इतर देशांतून आक्रमण होऊ नये यासाठी चीनचा हा प्रपंच. आमच्यावर खैबर खिंडीतून शेकडो आक्रमणं झाली. मात्र, आपल्या कुणाला हे सुचलं नाही. त्याचे परिणाम आपण गेली हजार वर्षं भोगतो आहोत.

चीन आणि आपण यांच्यातील हा फरक त्या भिंतीवर उभं राहिल्यावर निश्चितच जाणवतो.

चीनमध्ये आम्ही एक नाटक पाहायला गेलो. बरंचसं आपल्यासारखंच. फक्त नट, नटी किंवा इतर पात्रंही (माझ्या मते) किंचाळत-गात अनेक प्रकारच्या उड्या मारत असत. विषय समजत होता; परंतु कसरतपूर्ण उड्या या नवीन होत्या. ठायी ठायी रस्त्यावर जेवणाचे ठेले होते. जेवणात गोड, तिखट, मसालेदार, तेलकट आणि दुग्धजन्य पदार्थ तिथं नसतात. सर्व उकडलेल्या प्रकारचं अन्न. मग कशाला त्यांना ढेऱ्या सुटतील? तरीपण काही गुबगुबीत माणसं दिसतही.

नेहमी चहाची पानं घालून उकळलेलं पाणी (माझ्या मते) पिणं हा एक त्यांचा उद्योगच असतो. मला असं समजलं की, पाण्यामुळे होणारे रोग चेंगीजखानच्या सैन्याला कधीही झाले नाहीत. आपल्या सैन्यदलांना युद्धावर असताना मिळेल ते पाणी प्रवासात प्यावं लागे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार आपल्या सैन्याला होत असत. त्याचा अनेकदा युद्धावर परिणाम होत असे. चेंगीजखान किंवा चिनी सैन्य हे उकळलेलं चहाचं पाणी पीत असल्यानं असले आजार त्यांना होत नसत!

चहाची आणखी एक गंमत सापडली. आम्ही हॉँगकॉँगपासून उत्तर चीनपर्यंत भटकलो. उत्तर चीनमधून चहाची निर्यात युरोपला होत असे. तिथं चहाला ‘टे’ असं म्हणतात. त्यामुळे त्याचा अपभ्रंश युरोपीय देशांत वेगवेगळ्या प्रकारे झाला. उदाहरणार्थ : इंग्लंडमध्ये चहाला ‘टी’, तर जर्मनीमध्ये ‘टे’ असं म्हणतात. दक्षिण चीनमधून हॉँगकॉँगद्वारे चहा आपल्याकडे आला. तिथं चहाला ‘चाय’ असं म्हणतात. त्याचाच आपल्याकडे हिंदीमध्ये ‘चाय’ आणि मराठीमध्ये ‘चहा’ झाला. एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीमागं काही हजार वर्षांचा इतिहास असू शकतो.

ॲलोपथी या वैद्यकीय शब्दामागं ग्रीक, लॅटिन भाषेचा मोठा परिणाम दिसतो. उदाहरणार्थ : कॅन्सर. ग्रीक भाषेतला हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ खेकडा. खेकड्याच्या नांगीमध्ये सापडलेल्या पकडीप्रमाणे कॅन्सरमध्ये वेदना होतात, हे ज्ञान ग्रीक लोकांना होतं. अर्थात्, असे अनेक शब्द आहेत. आपला आयुर्वेदसुद्धा संस्कृतमधील अनेक शब्दांनी नटलेला आहे. चीनचं आणखी एक वैशिष्ट्य ध्यानात आलं ते म्हणजे, त्यांची औषधं.

कुठंही गेलो की एक दाखवायचं ठिकाण म्हणजे त्यांची औषधं विकण्याची जागा किंवा वैद्यकीय तपासणीची जागा. बरोबरचे युरोपीय-अमेरिकी लोक ढिगानं ही चिनी औषधं घेत असत. आजही चीनची या औषधांची निर्यात अक्षरशः हजारो कोटी रुपयांची आहे. आपल्या आयुर्वेदिक औषधांची तुलना आपोआपच मनात येते.

तीच गोष्ट रेशीम किंवा त्यापासून तयार केलं गेलेलं कापड, कपडे यांची. चिनी लोकांनी यामध्ये आजतागायत संशोधनात सातत्य ठेवल्यानं ते जगाच्या खूप पुढं आहेत. आपल्याकडील रेशमी, बनारसी साड्या त्यांच्यापुढं गुणवत्तेत कुठंच नाहीत. एवढं करूनही रेशमी कापड त्यामानानं स्वस्त आहे. घासाघीस करायला भरपूर वाव. दुकानाबाहेरही अनेक विक्रेते उभे असत. त्यांच्याकडून आपण घासाघीस करून काही विकत घेतलं की लगेच दुसरा त्यापेक्षा कमी किमतीत तसलीच गोष्ट द्यायला येत असे.

आमचा व्यवहार संपेतो, कुणी लुडबूड करत नसत. यामुळे आपण ‘मूर्ख ठरलो काय’ अशी शंका येत असे. खरेदीचं समाधान मिळत नसे. अर्थात्, चिनी लोकांमधील शिस्त, कष्ट करण्याची वृत्ती, उद्योगशीलता याला दाद द्यावीच लागते. ब्रिटिशांच्या १०० वर्षांच्या करारानुसार, १९९६ मध्ये हाँगकाँग चीनच्या ताब्यात जाणार होतं. त्याच सुमारास आम्ही जाता-येताना हाँगकाँगमार्गे चीनला गेलो होतो. चिनी व्यापारांतही हुशार. आता स्वातंत्र्य संपणार...हाँगकाँगचं सर्व - म्हणजे अगदी हवासुद्धा - चीनच्या ‘कम्युनिस्ट’ राजवटीखाली गुदमरणार म्हणून हाँगकाँगमधील चिनी लोकांनी आकर्षक असे, छोटे हवाबंद डबे विकायला ठेवले होते.

नागरिक फटाफट विकत घेत होते. मला त्यांच्या कल्पकतेचं हसू येत होतं. माझ्या मुलीनंच एक डबा १० हाँगकाँग-डॉलरला विकत घेतल्यावर मी कपाळावर हात मारला. मनात म्हटलं, मानलं बुवा या चिन्यांना! आपण पाहिलं तर, संपूर्ण दक्षिण आशियामध्ये बहुतांशी चिनी हे उद्योजक, व्यापारी आहेत. हे सर्व लोक आमचेच आहेत, असं चीन मानतो. चीनबाहेरही चिनी लोकांनी कष्टानं आर्थिक सत्ता, सुबत्ता मिळवली आहे. हे आपल्यालाही अनुकरणीय आहेच. अजूनही शिकू या आपण या सर्व लोकांपासून.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com