शिक्षणाच्या नैसर्गिक वाटा

जगातील प्रत्येक देशात शिक्षण काय, कसं घ्यावं याबाबत धोरणात्मक आखणी असते. आपल्याकडे गुरुकुल पद्धतीपासून ते मेकॉलेनं निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीबद्दल आपण चर्चा करतो.
Natural shares of education
Natural shares of educationsakal

- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

जगातील प्रत्येक देशात शिक्षण काय, कसं घ्यावं याबाबत धोरणात्मक आखणी असते. आपल्याकडे गुरुकुल पद्धतीपासून ते मेकॉलेनं निर्माण केलेल्या शिक्षणपद्धतीबद्दल आपण चर्चा करतो. मेकॉलेनं कारकून निर्माण करण्यासाठी केलेल्या शिक्षणप्रणालीवर आपणही काही मोठे बदल केले नाहीत; परंतु नावं जरूर ठेवतो.

जर्मनी, तुर्की इथं आठवीपर्यंत शिक्षण सक्तीचं आहेच; परंतु नंतरची तीन वर्षं कोणतं तरी कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला जातो. यामुळे मुलं महाविद्यालयाच्या फंदात न पडता नोकरी मिळवून अर्थार्जन करू शकतात. हीच गोष्ट दक्षिण कोरियामध्येही आहे. तुम्हाला पुढं शिकावंसं वाटलं तर विद्यापीठांत जाण्याचा पर्याय उपलब्ध असतोच.

या क्षेत्रात नावीन्यानं काम करणाऱ्या दोन संस्थांचा माझा परिचय झाला तो माझा नातू या दोन्ही शाळांत शिकल्यामुळे. पहिली संस्था आहे, वॉलडॉर्फ स्कूल; जे शंभरहून अधिक देशांत आहे. याची स्थापना १९१९ मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर झाली. नरसंहार, रक्तपात, निसर्गहानी ही या महायुद्धाची ‘देणगी’. त्यामुळे आध्यात्मिक विचारांची पार्श्वभूमी असलेल्या रुडॉर्ल्फ स्टेनर या ऑस्ट्रियन माणसाच्या पुढाकारातून या शाळेचा जन्म झाला.

आपण निसर्गाबरोबर बालपण घालवावं, त्याच्याकडून जीवनाचे धडे शिकत ज्ञान मिळवावं असा प्रयत्न तिथं असतो. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक, पालक यांचा शंभर टक्के पाठिंबा आवश्‍यक असतो. वय चार ते सात वर्षं, सात ते १४ आणि नंतर वाटल्यास दोन-तीन वर्षं याच शाळेत अथवा विद्यापीठात अशी शिक्षणाची वाटणी आहे.

चार ते सात या वयात विजेचं कोणतंही उपकरण वापरायचं नाही; अगदी घरात टीव्हीसुद्धा नाही. शेत, शेळ्या, मेंढ्या वगैरे प्राण्यांसमवेत वेळ घालवायचा असतो. भाजीपाला, फळं वगैरे आहार शेतातीलच. तोही तुम्हीच तोडून आणायचा आणि शाळेतील जेवण त्यातूनच तयार केलं जातं. दूध वगैरे शेतात पाळलेल्या गाईंचं. निसर्गाबरोबर राहा, त्याच्याशी समभाव साधा.

सातव्या वर्षानंतर लेखन, वाचन, सुतारकाम, विणकाम, शिवणकाम, चित्रकला, खुरपणी, शेतीला मदत करणं वगैरे. शालेय पुस्तक नाही. शिक्षिका ही संगीत, फळा यांच्या साह्यानं शिकवणार. आईप्रमाणे प्रत्येक मुलाचा कल पाहून त्याला त्यासाठी उत्तेजन द्यायचं. विद्यार्थी लिहितील तेच पुस्तक. या पद्धतीत स्पर्धा नाही. कुणी अभ्यासात हुशार, तर कुणी खेळात, कुणी विणकामात, तर कुणी सुतारकामात तरबेज असतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या तरी कौशल्यात उत्तम असतो.

अभ्यासात कच्चा म्हणजे ‘ढ’, अभ्यासात पहिला येणारा हुशार ही भानगडच इथं नाही; तसंच यात वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत तीच शिक्षिका हे वैशिष्ट्य. त्यामुळे मुलाची जडणघडण ही आईप्रमाणे एकहाती होते.

नंतरचं शिक्षण मात्र त्या त्या विषयातील तज्ज्ञ शिक्षक देतात. मी जेव्हा माझ्या बालपणाचा विचार करतो - जे बरंचसं काटेवाडीतील वस्तीवर गेलं - तेव्हा आम्ही मुलं पालकांकडे न जाता अनेक गोष्टी सहजतेनं करत असू. उदाहरणार्थ : कुरूप झालं तर रुईच्या पानांतील चीक लावायचा...दोन दिवसांत काटा बाहेर यायचा...जखम झाली तर कुटकुटीच्या पाल्याचा रस जखमेवर लावायचा...दोन दिवसांत चांगली खपली धरलेली असायची...विहिरीत हिरव्या रंगाचे साप असले तर ते सहसा चावत नाहीत आणि ते बिनविषारी असतात...मेंढरांना बाभळीचा पाला आवडतो...झाडावर चढून कैऱ्या, पेरू, जांभळं, बोरं त्या त्या हंगामाप्रमाणे काढणं, खाणं आणि सर्वांना वाटणं... एकट्यापुरतं पाहण्याची वृत्तीच नव्हती...आहे ते सर्वांनी वाटून खायचं...या गोष्टींचा माझ्या जडणघडणीत नक्कीच वाटा आहे. या सर्व गोष्टी मित्रांबरोबर होत. अशा गोष्टी एकट्यानं जाऊन करणं हे माहीतच नव्हतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर ‘युनायटेड नेशन्स’ची स्थापना झाली तशी इंग्लंडमधील एका विद्वान व्यक्तीनं ‘युनायटेड वर्ल्ड कॉलेज’ची स्थापना केली. त्यात त्यांच्या असं ध्यानात आलं की, ही महायुद्धं अनेक कारणांनी होतात. प्रखर देशाभिमान, धर्माभिमान, संस्कृती वगैरे प्रमुख कारणं आहेत. या भिंती आपण तोडल्या तर सर्वसामान्य माणूस हा चांगल्या स्वभावाचा, द्वेष न करणारा, सौख्यानं एकत्र राहू इच्छिणारा असतो.

जगातील सर्वसामान्य माणूस चांगलाच असतो. हा अनुभव आपल्यालाही येतो; परंतु जेव्हा या भावनांवरून भडका उडवण्याची व्यवस्था होते. तेव्हा परिस्थिती पूर्ण बदलू शकते. याची शेकडो उदाहरणं आपण आपल्या आयुष्यात पाहतो. मग यासाठी काय करायचं असा विचार या विद्यापीठामागं होता. भावी पिढीत एकमेकांबाबत कधीच द्वेषभाव निर्माण होणार नाही, हे पाहायचं. एकमेकांना समजून घेणं हा त्यांचा स्थायीभाव असून तो कायम राहील, यासाठी प्रयत्न करायचा असं ठरलं.

त्यांनी असा विचार केला की, विद्यार्थी दहावी ते बारावी या वयात खूप संवेदनशील असतो. आपण जगातील सुमारे ४०० ते १००० विद्यार्थ्यांची शाळा काढायची. प्रत्येक वर्गात २० विद्यार्थी असतील आणि ते वेगवेगळ्या देशांतील असतील. ते एकत्र मोठ्या वसतिगृहात राहतील. नंतर ते जगातील कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळवू शकतील, याप्रकारचा अभ्यासक्रम असेल. हा विद्यार्थी आपल्या देशातील घरापासून परदेशातील ज्या गावात शाळा असेल तिथं एकटाच जाईल. आई-वडील अथवा इतर कुणीही त्याच्याबरोबर असणार नाही. इथूनच त्याची सर्व गोष्टींना तोंड देण्याच्या वृत्तीची सुरुवात होते.

माझा नातू वर नमूद केलेल्या दोन्ही शाळांमध्ये शिकला. अर्थात् वॉलडॉर्फ शाळेत तो तीन-चार वर्षंच होता. नंतर तो आई-वडिलांबरोबर भारतात परतला आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर ‘यूडब्ल्यूसी’ या शाळेत जाण्यासाठी कोस्टारिका या देशात गेला. तो मराठी, इंग्लिश, स्पॅनिश वगैरे भाषा उत्तम बोलतो. त्याची जगात कुठंही राहण्याची मानसिकता आहे. यानिमित्तानं आम्ही उभयता कोस्टारिकामध्ये अश्‍विनीबरोबर आमच्या नातवाला भेटायला गेलो. तिथले एक-दोन अनुभव सांगावेसे वाटतात.

आम्ही यूडब्ल्यूसी शाळेजवळ असणाऱ्या हॉटेल आल्टा इथं उतरलो होतो. अश्‍विनी दोन-तीन दिवस आधीच पोहोचली होती. हॉटेल टुमदार, अगत्यशील, स्वच्छ होतं. दोघं नवरा-बायको ते चालवत होते. तिथंच काम करत असल्यानं त्यांची व अश्‍विनीची चांगली ओळख झाली होती. आम्ही आल्यावर दुसऱ्या दिवशी त्या जोडप्याची तिनं आम्हाला ओळख करून दिली. ॲलेक्स हा देखणा, गोरापान, थोडासा धिप्पाड, तर त्याची बायको काहीशी आधुनिक कपड्यांमध्ये; परंतु सर्व रोजचे व्यवहार पाहणारी.

थोड्या गप्पा झाल्यावर आम्ही आमची व्हिजिटिंग कार्डस् एकमेकांना दिली. मी ॲलेक्सला विचारलं : ‘‘तुम्ही अमेरिकन आहात का?’’ त्यानं ‘होय’ असं उत्तर दिलं. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नचिन्ह होतं.

मी म्हटलं : ‘‘तुम्ही मला एशियन म्हणजे इराण वगैरे भागातील वाटता म्हणून विचारलं.’’

तो म्हणाला: ‘‘असं का?’

‘तुमचं आडनाव खजावी हे इराणी आहे त्यामुळे तसं वाटलं,’’ मी उत्तरलो.

त्यावर ॲलेक्सनं मला प्रश्न केला : ‘‘इराणबद्दल तुम्हाला काय माहीत आहे?’’

मी सांगितलं : ‘‘इराणमधील स्टील प्लॅँट्सबरोबर आमचा अनेक वर्षं व्यवसाय होता. त्यानिमित्तानं मी अनेकदा तेहरान आणि इराणच्या विविध भागांत फिरलो होतो.’’

त्यानं विचारलेल्या गावांपैकी मी सिराज या शहराचा उल्लेख केला. ते एक आकर्षक शहर असून तिथल्या बागा, संस्कृती आणि विशेषतः वाइन ही जगप्रसिद्ध आहे. आमचं बोलणं सुरू असताना ॲलेक्स खुर्चीतून उठला आणि त्यानं मला आवेगानं घट्ट मिठी मारली.

भारतीनं त्याच्या डोळ्यांत अश्रू पाहिले. आम्हाला कळेना एकदम त्याला काय झालं ते...अश्रू पुसत तो म्हणाला : ‘सिराजमधील माझ्या जन्मापासूनच्या आठवणी आहेत.’

४५ वर्षांपूर्वी इराणच्या शहाच्या उठावामुळे ॲलेक्सच्या आई-वडिलांनी अमेरिका गाठली ती कायमचीच. आमच्या भेटीपर्यंत ते इराणला गेलेले नव्हते. त्यांना त्यांचं बालपण आठवलं आणि साहजिकच गहिवरून आलं. आपल्या भावना मातृभूमीशी किती घट्ट रुजलेल्या असतात याचं ते प्रतीक होतं. दुसऱ्या दिवशी त्यानं शहरातील मान्यवर व्यक्तींना त्याच्या घरी आमंत्रित केलं. आम्हा तिघांनाही त्यानं भोजनासाठी आवर्जून बोलावलं. आतिथ्यात कोणतीही कमतरता ठेवली नव्हती!

कोस्टारिका या देशाच्या दोन बाजू दोन महासागरांना भिडतात. त्या दोन्ही ठिकाणांतील फरक चटकन ध्यानात येतो. एक अगदी निसर्गानं नटलेला, तर दुसरा काहीसा दुष्काळी. तिथं उत्तम दर्जाची स्वच्छता आणि निसर्गाबद्दल कमालीची जागरूकता. त्यामुळे झाडं कापण्याचा प्रश्‍नच नाही; परंतु फांद्या, पानं पडली तरी त्यांना हात लावायचा नाही, निसर्ग काळजी घेईल ही स्पष्ट भूमिका. सर्व काही सेंद्रिय. झाडं, फुलं रसरशीत. एक आनंदी वातावरण. हा निसर्ग बहरतो आहे असं ठाई ठाई जाणवतं. नागरिक खाऊन-पिऊन सुखी; परंतु अमेरिकेच्या परिणामामुळे आधुनिकतेकडे वाटचाल.

वस्तुस्थिती अशी आहे की, १९३२ मध्ये हिटलरनं ‘यूडब्ल्यूसी’ ही शाळा बंद करायला लावली. ती १९४५ मध्ये पुन्हा सुरू झाली. तीत प्रत्येक मुलगा-मुलगी कुठल्याही गोष्टीत प्रवीण असते, याची सर्वांना जाणीव होते. त्यामुळे कुणी श्रेष्ठ नाही अथवा कमी दर्जाचा नाही हे मनावर ठसतं. प्रत्येक संस्थापक, संस्था, प्रदेश या बाबी आपल्याला काहीतरी शिकवत असतात. खात्री आहे, तुम्हालाही भ्रमंती करायला आवडेल. डोळे, कान उघडे ठेवा. निसर्गशिक्षक त्याचं काम करेल. पाहा प्रयत्न करून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com