लोकशाहीतील मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Wall

सध्या आपण असं वाचतो की, चीनचा आधुनिक विकासाचा सर्व प्रवास आहे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा; आणि, आपला साधारणतः १९९१ पासूनचा.

लोकशाहीतील मोकळा श्वास

सध्या आपण असं वाचतो की, चीनचा आधुनिक विकासाचा सर्व प्रवास आहे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा; आणि, आपला साधारणतः १९९१ पासूनचा. आपल्या प्रवासाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आर्थिक आणि ज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती झालेली आहे आणि होत आहे ही वस्तुस्थिती आहे. सर्वसाधारणपणे आपण नेहमी तुलना करतो. भारताची पुरेशी प्रगती झालेली नाही असं समाजालाही वाटतं.

सर्वसाधारणपणे ही तक्रार असते आणि राजकीय दृष्टिकोनातून तिचा वापर केला जातो. भारतातील राजकारणात ही तक्रार सुरू असते. ‘भारतात जी काही प्रगती आहे ती २०१४ पासून आणि त्याआधी काहीच नव्हतं,’ असा तक्रारीचा सूर आहे. माझ्या दृष्टीनं हे म्हणणं चुकीचं आहे. आपण प्रगतीची पावलं टाकू लागलो तेव्हाची परिस्थिती काय होती, आजची काय आहे हे विचारात घेतलं पाहिजे. प्रगती करण्याचा वेग आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात त्या निर्माण करायला खूप वेळ लागतो. त्या निर्माण झाल्याशिवाय प्रगतीचा वेग वाढू शकत नाही.

हे कुठं तरी मान्य करावं लागेल की, ब्रिटिशांनी आपल्याला अक्षरक्षः नागवं करून सोडलं. शिक्षण नाही, संधी नाही, भारतात कुठं उद्योग-व्यवसाय नाही, आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशा परिस्थितीत आपण कामाला सुरुवात केल्यानंतर सर्व उभं करायला वेळ लागतो. यात अनेक वर्षं गेली. काही चुका होऊ शकतात; परंतु हे करताना चीननं काय केलं? चीनच्या माओ त्से तुंगनं ज्या पद्धतीनं धोरणं अमलात आणली, त्यात लाखो लोकांची हत्या झालेली आहे, असं इतिहास सांगतो. ते आपल्याकडे होणं शक्य नव्हतं; परंतु माओ त्से तुंग यशस्वी झाला असं नाही. त्यानं केलेल्या गोष्टी त्या काळातही चुकीच्या होत्या. चीनमध्ये १९७८ नंतर सर्व धोरण बदललं आणि परिवर्तन झालं.

चिनी माणूस हा कष्टाळू आणि व्यवहारी आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया-सिंगापूरमध्ये-थायलंड-मलेशियामध्ये जा, तिथं मोठ्या प्रमाणात चिनी लोकांचे व्यवसाय आहेत. हाँगकाँग तर आहेच. चिनी माणसाचा स्वभाव हा व्यापारीवृत्तीचा आणि कष्टाचा आहे. माझ्या मते, भारतात या दोन्ही गोष्टींची कमतरता आहे; किंवा, मर्यादित लोक व्यापारात आहेत. कष्टाळूपणात पुष्कळच लोक कमी पडतात. याचाही परिणाम होत असतो. त्यामुळे नावं ठेवण्यापेक्षा आपली परिस्थिती, संस्कार, आपले स्वभाव कसे आहेत, मानसिकता काय आहे याचाही अभ्यास करणं योग्य असतं. या परिस्थितीत काय करता येईल हा धोरणांचा प्रश्न असतो. त्या धोरणांतून जास्त परिणाम साधला जाऊ शकतो. आपल्याला सोईस्कर असं धोरण ठरवलं गेलं पाहिजे होतं.

‘तुम्ही मूर्ख आणि मी शहाणा’ आणि ‘हे सर्व माझ्यामुळे होतं,’ हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. यातून टीमवर्क साधलं जाऊ शकत नाही. उलट, विरोध करण्याची प्रवृत्ती वाढत जाते. आपल्या देशात हे वातावरण आहे. हे सातत्यानं व्यक्तिगत पातळीवरसुद्धा जात असल्याचं आपल्याला दिसतं.

याउलट, चीनमध्ये आज आर्थिक स्वातंत्र्य असलं तरी राजकीय स्वातंत्र्य नाही. म्हणजे काय, याची कुणाला फारशी माहिती नाही. माझ्या पाहण्यात आणि वाचनात आलेली गोष्टी अशा की, चीनमध्ये प्रत्येक दहा कुटुंबांमागं एक युनिट असतं. त्या युनिटवर लक्ष ठेवणारा एकजण असतो आणि तो पार्टीला (पक्षाला) माहिती देणारा असतो. अमुक एक व्यक्ती आपल्या पक्षाच्या विरोधात काम करत आहे, असं जर त्याच्याकडून समजलं तर, पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या त्या व्यक्तीला पकडलं जातं, त्याला शिक्षा होऊ शकते किंवा त्याच्या सर्व सवलती बंद होऊ शकतात. १४४ कोटींच्या देशांमध्ये तीस किंवा पन्नास व्यक्तींच्या गटापासून नियंत्रण आहे. राजकारणात तुम्ही काही करू शकत नाही, बोलू शकत नाही; आणि, केलं तर तुम्हाला जबरदस्त शिक्षा मिळेल, हे तिथं त्यांना माहीत आहे. यातून पक्षाचं समाजावरील नियंत्रण किती भक्कम आहे हे दिसून येतं. उदाहरणार्थ : तिआनमेन चौकातील आंदोलन ज्या पद्धतीनं चिरडून टाकण्यात आलं होतं, त्यातून या गोष्टीची साक्ष मिळते.

आपल्याकडे हा प्रकार नाही. कुणी वाटेल तिथं कुणालाही शिव्या देऊ शकतं. अगदी पंतप्रधानांबाबतही शेरेबाजी केली जाऊ शकते. हे स्वातंत्र्य चीनमध्ये अजिबात नाही. नागरिकांमध्ये सरकारचा प्रचंड दरारा आहे. व्यक्तिस्वात्र्यंत्र्य म्हणजे काय याचा गंधही तिथं असू शकत नाही असं जाणवतं. रशियामध्येही याचं छोटंसं उदाहरण माझ्या पाहण्यात आलं होतं. मॉस्कोमध्ये ज्ञानेश्वर मुळे अधिकारी होते. त्यांच्याशी फार परिचय नव्हता; परंतु मराठी असल्यामुळे भेटलो. एके शनिवारी सकाळी ते मला एका बगिच्यात घेऊन गेले.

तिथं शेकडो लोक चित्र काढत होते. कुणी कुणाशी काही बोलत नव्हतं. हे मला वेगळंच वाटलं. कम्युनिस्ट विचारसरणी मानणाऱ्या देशात कलेला महत्त्व कसं? मन मोकळं असेल तर कला, साहित्य, संगीत फुलतं. मुस्कटदाबी केल्यानंतर हे सर्व कसं फुलणार, असा स्वाभाविक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.

मी मुळे यांना म्हणालो : ‘मला हे विचित्र वाटत आहे.’

त्यामागचं कारण समजून घेताना काही गोष्टींचा उलगडा झाला. कम्युनिझम-सिस्टिममध्ये कुटुंबात नवरा-बायको हे कम्युनिझमच्या बाजूचे आहेत की नाहीत हे एकमेकांना माहीत नसतं. आपला मुलगा कम्युनिस्ट-विचारांचा आहे की नाही हे माहीत नसतं. कुणी विरोधात बोललं तर संबंधिताची उचलबांगडी होईल, एवढंच माहीत असतं. कुणीच कुणावर विश्वास ठेवू शकत नाही; त्यामुळे कुटुंबात संवाद नाही. मग मनमोकळं करायचं कुठं? तर, लोक चित्र काढतात. चित्र काढायला दर शनिवार-रविवार सर्वजण ओळीनं बसतात. नंतर एकमेकांना चित्रं दाखवली जातात. त्यातील चांगल्या चित्रांना मान मिळतो. समाजात काहीतरी मान्यता मिळावी...मी वेगळा आहे... वेगळं काहीतरी करतो हे सिद्ध व्हावं यासाठी आपल्याकडे व इतरही ठिकाणी पारितोषिक-पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. चांगलं काम करणाऱ्यांना त्यातून प्रोत्साहन, उत्तेजन मिळतं. तशा तिथं अशा बाकीच्या गोष्टीच नाहीत, त्यामुळे ते लोक चित्र काढतात.

अर्थात्, हा प्रकार केवळ या मुस्कटदाबीमुळे आहे, व्यक्तिस्वातंत्र्य नसल्यामुळे आहे. सामाजिक मान्यतेची व्यक्तीला एक गरज असते. कुणीतरी माझ्या पाठीवर थाप मारावी...समाजानं कौतुक करावं, अशी आस असते, इच्छा असते. ती कम्युनिझममध्ये पूर्ण होऊ शकत नाही. कारण, कायम भीतीच असते. मी काही बोललो तर काय होईल? आपल्याकडे आपण कुणावर टीका केली तर किंवा स्तुती केली तर अमक्याला काय वाटेल याबद्दल आपल्या मनात तशी भीती नसते.

आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपल्याकडे सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे. सर्वसामान्य व्यक्ती कुणावर टीकाही करू शकते, कुणाचं कौतुकही करू शकते. हे कम्युनिझम-सिस्टिममध्ये - म्हणजे रशिया असो किंवा चीन या ठिकाणी - नाही. रशियात सामाजिक न्यायाअंतर्गत प्रत्येक गोष्ट सरकारचीच असल्यानं आणि, कुणाची मालकी नसल्यानं, त्या देशात अपेक्षित आर्थिक विकास झाला नाही, आपल्याकडे जशी सरकारी बाबूंमध्ये धडाडीनं काम करण्याची मानसिकता आढळत नाही, तसंच हे.

‘मी काहीही नाही केलं तरी मला माझा पगार मिळणार आहे, निवृत्तिवेतन मिळणार आहे, मला कुणी हलवू शकणार नाही,’ अशा मानसिकतेनं काम करताना काही करायला त्यांना रसच उरत नाही. माणसाला शाश्वती, स्थैर्य दिल्यावर तो उत्तम काम करेल असं आपल्याला वाटतं; परंतु तसं काही नसतं याचं आपल्याकडची सरकारी यंत्रणा हे उत्तम उदाहरण आहे. याउलट, खासगी उद्योग-व्यवसायातला शाश्वती नसलेला कर्मचारीही चांगलं काम करत असतो. आपली नोकरी टिकवण्यासाठी प्रगती करत राहतो, नवीन शिकत राहतो. अर्थात्, हे सर्व क्रमप्राप्तच आहे. स्पर्धेमुळे या गोष्टी होतात. सुरक्षितता मिळाली की त्या वेळी काम होत नाही.

आपल्याकडे व्यवसाय करणाऱ्या बहुतांश सरकारी संस्था, महामंडळांची अशी उदाहरणं आहेत, जी कायम तोट्यात असतात. कारण, त्यांना स्पर्धेची पर्वा नसते. त्यांना पूर्णपणे सुरक्षितता असते. वेगळं काही करण्याची उमेद नसते, त्याचबरोबर काम करण्यात फारसा रसही नसतो. अर्थात्, ज्यांना काहीतरी कळकळ वाटत असते असे दोन-पाच टक्के लोक असतात. ते काम करतात.

मात्र, बहुतांश लोकांमध्ये या सिस्टिममुळे काम करण्याची इच्छा नसते. व्यक्तीचा काहीही दोष नाही. शासकीय खात्यात काम करणारा कर्मचारी हा बुद्धिमान आहे; परंतु सिस्टिममुळे तो बहुतांश नकारात्मक असतो किंवा आळशी होतो, असं मला नेहमी वाटतं. माझ्या मते, त्या व्यक्तीपेक्षा सिस्टिमचा हा दोष आहे. अमेरिकेत शासकीय कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम असण्याची शाश्वती नाही. त्यांना केव्हाही कामावरून कमी केलं जाऊ शकतं किंवा गुणवत्तेच्या आधारे वयाच्या सत्तरीपर्यंतही काम करणारे कर्मचारी तिकडे असतात. याचे काही चांगले परिणाम अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये दिसतात. आपल्याकडे अनेक कारणांमुळे वेळेवर जो बदल व्हायला पाहिजे तो राजकीयदृष्ट्या करण्याची हिंमत कुणात नाही. कुणाला नाखूष करण्याची तयारी नाही. ज्या काही सुविधा दिल्या जातात त्यासुद्धा तपासून पाहण्याची कुणाची हिंमत नाही. मात्र, लोकशाहीत विचारमंथन करून सुधारणा केल्या जाऊ शकतात.

अशीच गोष्ट मला इराणमध्येही अनुभवायला मिळाली. व्यवसायाच्या निमित्तानं तिथं माझं अनेकदा जाणं झालं. हुकूमशहा हा नेहमी देशप्रेमी, निःस्वार्थी आणि फक्त समाजाच्या प्रगतीचा ध्यास घेतलेला असतो अशी समजूत सर्वसामान्यपणे समाजात असते. एकदा सत्ता आल्यावर ती टिकवण्यासाठी तो काहीही करतो, असं इतिहास सांगतो. तुम्ही थोडं काही विरोधात बोललात तर दुसऱ्या दिवशी दिसणारच नाही... हुकूमशाहीचे मोठे परिणाम असू शकतात. लोकशाहीत लोकांना हे समजत नाही. हुकूमशाही पाहिजे असं लोकांना अजूनही वाटतं. मात्र, ती जगात कुठंही यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसत नाही.

युरोप-अमेरिकेत प्रगत लोकशाहीमुळे प्रगती झालेली आहे. आताचं चीनचं मॉडेल ‘पार्टी पॉलिटिक्स’ म्हणून वेगळं आहे आणि ‘आर्थिक धोरण’ म्हणून वेगळं आहे. काय करायला पाहिजे, काय करायला नको याबद्दल ते जागरूक आहेत. हा त्यांचा शहाणपणा आहे. आपल्याकडे एकत्रितरीत्या साकल्यानं विचार करणाऱ्या गोष्टींचा बराचसा अभाव आहे. त्यामुळे भारताची आणि चीनची प्रगती यांमध्ये फरक आहे.