पंढरीये माझे माहेर साजणी! (प्रवीण दवणे)

पंढरीये माझे माहेर साजणी! (प्रवीण दवणे)

साऱ्या सृष्टीची पावलंच जणू वारकरी झाली आहेत. ज्ञानोबा- तुकोबांचं काळीज घेऊन वारकरी ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरीकडं निघाले आहेत. देहावर तुळशीपत्र ठेवून, ‘हा देह आता माझा नाही, तुझा आहे’ असं विठुरायाला सांगत ‘विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गर्जावे’ ही ओवी अनुभवत साऱ्या चराचराचं वैकुंठ करत वातावरण भारलं आहे. ही पंढरीची वारी, हे वारकरी मन साक्षात संत तुकयांच्या दृष्टीनं कसं आहे हे पाहणं मंतरून टाकणारं आहे.

संत तुकोबांनी पंढरीच्या वारकऱ्यांना ‘मोक्षाचे अधिकारी’ असं गौरवलं आहे. वारकरी विठू माउलीची वाट पाहतातच; पण साक्षात विठू माउलीही आपल्या कष्टकरी लेकरांची वाटुली पाहत असते. ‘वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ’ या शब्दांत ते आपल्या विठू माउलीच्या मनःस्थितीचं वर्णन करतात. पंढरीच्या भेटीसाठी भक्ती, प्रेम, सुख हीच एक योग्यता. केवळ पुस्तकी पांडित्य नाही, तर पाझरणारं काळीज हवं. पुंडलिकाची निर्मळता हवी. संत चोखामेळ्याच्या हृदयाची भावपूर्ण सरलता हवी, संत सावता आणि संत नरहरी यांचा कर्मयोग जगलेला हवा. प्रत्यक्ष पंढरपुरात जाऊन विठू चरणावर स्वतःचं भाळ टेकणं हा अपूर्व योग आहेच; पण तुकोबा तर म्हणतात- ‘दुरोनि देखिली पंढरी, पापे गेली दूरच्या दुरी। दुरोनि देखिले राऊळ, हरषे नाचती गोपाळ।’ पंढरी नुसती दुरून दिसली, तरी मांगल्याची अनुभूती येते. आज त्या क्षणाचीच अनुभूती घेत संत-सज्जन ‘जय हरी विठ्ठल’च्या गजरात एक एक घाट ओलांडत, आषाढधारांनी मनं चिंब करीत भूलोकीच्या वैकुंठाला निघाले आहेत. अबीर बुक्‍याचा दरवळ मिरवणारं आषाढ मेघ-चंदनउटी आयुष्यालाच लावलेले हे वारकरी पाहणं ही सुद्धा भक्तीवाटेची पहिली चाहूल आहे.
तुकोबा म्हणतात- ‘पंढरीची वारी जयांचिये घरी। पायधुळी शिरी वंदिन त्यांची.’ ज्या घरात पंढरीच्या वारीचे संस्कार आहेत, ते घर, त्या घरातलं प्रत्येक मन संत तुकोबांना वंदनीय वाटतं.

सासरी सासुरवास झेलणाऱ्या कन्येला केव्हा एकदा माहेरी जाऊन आईच्या कुशीत विसावतो असं होतं. माहेरचं पाखरू भिरभिरलं, तरी तिला माउली भेटल्याचं सुख मिळतं. येणाऱ्या-जाणाऱ्या मुशाफिरालासुद्धा ती माहेराला निरोप पोचविण्याचा ध्यास घेते. ज्ञानोबांच्या विराणीतून अशी व्याकुळ विरहिणी दिसते. तुकोबांच्या काही ओव्यांतून अशीच व्याकुळता कन्येचं मन घेऊन व्यक्त होते. आज जिवात तीच ओढ घेऊन वारकरी पंढरीच्या जवळ पोचले आहेत. तुकाराम एकाच ओवीत साद घालतात ः ‘तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा? भेटसी केधवा पांडुरंगा?’ हा ‘भेटसी केशवा’ हा प्रश्‍न प्रत्येकाच्या डोळ्यांतून तरारतो आणि अश्रूंतून ओघळतो. वारकऱ्यांचं आणि पंढरीरायांचं हे नातं कन्या आणि माउली या रुपकांतून तुकोबा अनेकदा व्यक्त करतात. नात्यातून अनेक अभंग त्यांनी व्यक्त केले; पण शब्दामधलं वत्सल हुरहुरणं मूर्तिमंत अनुभवायचं, तर लगोलग ‘कन्या सासुऱ्याशी जाये’ हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आठवतो! पावलं सासुराकडं निघाली आहेत; पण पुनःपुन्हा मागं वळून आईचं मुख पाहण्याची अधीरता लेकीच्या मनाला आहे. वारीतून परतताना हीच मनःस्थिती प्रत्येक हरिभक्ताची होते. पुन्हा केव्हा भेट घडेल, याचा अंदाज नाही. आता त्या भेटीच्या आठवणीवर किती काळ निभणार, असं या जिवाला झालं आहे-
कन्या सासुऱ्याशी जाये। मागे परतोनि पाहे।।
तैसे जाले माझ्या जीवा। केव्हा भेटसी केशवा।।

जिवाची घनव्याकुळ अवस्था संत तुकोबा किती प्रत्ययकारी शब्दांत मांडतात. याही शब्दांत त्यांचं समाधान होत नाही. मनाची तळमळ ते सांगतात ः ‘जीवनावेगळी मासोळी। तैसा तुका तळमळी’ याहून वेगळी तळमळ असूच शकत नाही.

‘जीवना’वेगळी या शब्दातून पाणी आणि जीवन असा जो श्‍लेष संत तुकोबा साधतात, ते पाहिलं की वाटतं, हे कवित्व खरंच कोणती पुण्याई घेऊन प्रगटतं? त्याचं श्रेयही तुकोबा विठ्ठलालाच देतात. ‘करितो कवित्व, म्हणाल हे कोणी। नव्हे माझी वाणी पदरीची।’ खरोखर, कुठल्या अरूपाचा अमृतमय घट यांच्या लेखणी-वाणीतून पाझरतो, ते समजणं आणि नंतर उमजणं या जन्मापलीकडचीच गोष्ट आहे.

शब्दांच्या रूपानं हे संतच पिढ्या-पिढ्यांचे सांगाती झाले आहेत. अटळ कृतज्ञता आणि चराचरांतील श्‍वास, निःश्‍वासाचं कारण केवळ विठू माउली आहे, ही अढळश्रद्धा. या श्रद्धेतच युगायुगांना ओलांडून पाझरणाऱ्या अमृतानुभवाचं रहस्य दडलं आहे. असे लक्षावधी श्रद्धामेघ टाळ-मृदंगांच्या गजरात नाचत-गात पंढरीकडं निघण्याचा हा भक्तिऋतू. भीमेची चंद्रभागा होऊन, वाळवंटाचीही मखमली हिरवळ करून झपूर्झा जगण्याचा हा दिंडीक्षण. आषाढी सोहळ्याला आपल्या नादमयी व चित्रमयी दृष्टीनं तुकोबाराय शब्दबद्ध करतात, तेव्हा अवघं पंढरपूर समोर उभं ठाकतं. आषाढीचा हा भक्तीचा महोत्सव हाच एक अजर-अमर अभंग होतो. काय नाहीये या अभंगांत? आषाढी सोहळ्यासाठी दाटून आलेली वैष्णवांची मांदियाळी तर आहेच; पण शब्द, स्पर्श, रूप, रस, रंग, गंध या साऱ्या संवेदनांचा महोत्सव तुकोबांनी व्यक्त केला आहे.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।


अशी टिपेची टिपरघाई नादावून टाकत, एकमेकांच्या भावचरणी लीन होणारे वैष्णवजन त्यांनी शब्दरूप केले आहेत. बरं वैष्णवांचं देखणेपण तरी काय वर्णावं? त्यांना झालेला विठुदर्शनाचा परमानंद तरी कसा सामावून घ्यावा? ओंजळीत सागर मावेल? इंद्रधनू घरी नेऊन तोरण म्हणून बांधता येईल? अवघा वसंतऋतू केसांत माळता येईल? तसाच हा विठाईदर्शनाचा अमृतानंद! परंतु संत तुकोबांच्या वाणीची वीणा श्री सरस्वतीची होते. ते वर्णन करतात ः
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा।
हार मिरवती गळां रे।
टाळ मृदुंग घाई पुष्पांचा वरुषाव
अनुपम्य सुख सोहळा रे।


यातलं ‘हार मिरवती गळां रे’ डोळ्यापुढे उभं करावं. चंदनउटीही, गोपीचंदनउटी होते. चंदन नि केशरानं गंधीत भाळ डोळ्यापुढं येतं, गळ्यातल्या तुळशीच्या माळाही आपण समजू शकतो; पण हार ‘मिरवणं’ हे औरच आहे. यात एक रत्नजडित डौल आहे. सुलीनता असूनही अत्यानंदाचा तोरा आहे. तो तोरा फार गोड आहे. शब्दांपलीकडचा आहे. संत तुकोबाच म्हणतात, त्याप्रमाणं जाती-वर्णाचे सामान्य, बाह्य, लौकिक अभिमान विसरून प्रत्येकजण दुसऱ्यांपुढं लोटांगण घालतो आहे. या सोहळ्यानं प्रत्येकाचं चित्त निर्मळ झालंय, लोण्याहून मऊ झालंय; अरे पाषाणही पाझरून हिरवळून जाईल, असं हे नाचणारं, गाणारं, भक्तिरसात डुंबणारं अध्यात्म आपण जणू तुकोबांच्यासह अनुभवतो. ही शक्ती लेखणीची आहे. विठ्ठलच होऊन जगणाऱ्या वाणीची आहे.

संतांचं काव्य हे आपोआपच साहित्यगुणांनी ओतप्रोत होतं. कारण स्फूर्तीतून साधलेल्या समाधीतून ते आलं होतं. आपण वरवरच्या शब्दकळेचा विचार करतो. त्यातल्या उपमा, अलंकारांचं गणित करून माहितीवंत होतो; पण त्यातून ‘अगणित’ हरवतं. त्या ‘अगणिता’तच जो वसलेला आहे, त्या माहेरी संत आपल्याला त्यांच्या शब्दांतून घेऊन जातात. प्रत्येक संत आकाश होऊन सोबतीला आहेत. शब्दांच्या रूपानं त्या आकाशाची पावलं आपल्या सोबतीला उरली, हे आपलं भाग्य!
ते उमजलेले लक्षावधी विठ्ठलभक्त आता लवकरच पंढरपुरात दाखल होतील. मन केव्हाच पोचलं आहे, उत्सुकता आहे- ‘याचि देही- याचि डोळां’ त्या माउलीला दृढालिंगन देण्याची! तुकोबाच म्हणतात ना-
‘पंढरीये माझे माहेर साजणी।
ओविया कांडणी गाऊ गीती।।
आनंदे ओविया गाईन मी त्यांसी।
जाती पंढरीसी वारकरी।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com