प्रेम लाभे प्रेमळाला...!

pravin davane's article image
pravin davane's article image

प्रेम...या ‘ढाई आखर’मध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. कोमेजलेल्याला फुलविण्याची, उदास असणाऱ्याला हसविण्याची, खचून गेलेल्याला उभारी देण्याची, मुळातच फुलून आलेल्याचं फुलणं अधिक खुलविण्याची जादू या अडीच अक्षरांतच तर असते. प्रेम म्हटलं की डोळ्यांपुढं तरळतं ते प्रियकर-प्रेयसीचंच प्रेम...पण ही उत्तुंग भावना तेवढ्यापुरतीच सीमित कधीही नसते. प्रेमभावनेच्या नाना परी असतात, नाना तऱ्हा असतात, नाना रीती असतात... आणि या सगळ्यातून भरभरून व्यक्त होऊनही ते पुन्हा वर उरतंच. याच प्रेमाचे वेगवेगळे रंग उलगडून दाखवत आहेत प्रसिद्ध कवी-गीतकार-ललित लेखक प्रा. प्रवीण दवणे. निमित्त आहे परवाच्या (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डेचं.

पुन्हा एक कोरी सांज
पायाशी फेकून
निघून गेलास, सवयीनं-
मी
शाईत विरघळत राहिले
आकाश होईपर्यंत !

जिवलगाची वाट पाहण्याचा हा प्रवास... अथक... सुदूर... अथांगात विलीन होईपर्यंतचा. अगदी अलीकडच्या माझ्या या ओळी नि वाटलं, अरे, जडविलेल्या जिवाशी जीव उगाळून आपण अजून बोलू शकतो? या संवादाला देश-कलाची मर्यादा नाही. आपलं ‘प्रेम’ समोर असण्याची अट नाही. हे वाट पाहणं, झुरत राहणं, त्या प्रदीर्घ प्रतीक्षेचीच एक अरूप कविता होणं नि त्या कवितेला क्षितिजाचं बंधन नसणं...! हे सगळं संवेदन आपल्यात आलं कुठून? ते रुजलं केव्हा? आणि या अनाम व्याकुळतेनं जगण्याला आगळं परिमाण दिलं केव्हा? हे ‘प्रेम’ आयुष्यात आलंच नसतं तर...! तर व्यवहाराचं ‘पोटगणित’ कदाचित्‌ सुटलं असतं... पण त्यापलीकडचं अगणित कधी कवेत आलंच नसतं...

कधी पुरुषोत्तम भास्कर भावे अर्थात पु. भा. भावे यांच्या ‘सतरावं वर्ष मधून ते झोपाळ्यावरून झुलत आलं, तर कधी अरविंद गोखले यांचा ‘कातरवेळ’मधल्या अक्काच्या डोळ्यातून ते पाझरत आलं. आयुष्याचा किनाराच सुटलेल्या आणि दोन वेगळ्या संदर्भांच्या; पण जगण्यातलं महायुद्ध झेलणाऱ्या प्रेमिकांच्या चिरविरहातून ते वाघिणीचा चावा होऊन कायमच भळभळत राहिलं...

विश्राम बेडेकर यांच्या काव्यात्म ‘रणांगण’नं घडवलेलं हे प्रेमाचं वेगळंच दर्शन.
कथा-कादंबरीतून आत उमलणाऱ्या एका सुकोमल मधुर कवितेला साद दिली. वय परिकथेच्या पाऊलवाटेवर इंद्रधनूचे रंग झेलण्यात दंग असतानाच प्रीतीचे दंशही जगण्याचं कसं भेदक रूप व्यक्त करतात ते प्रतिभावंतांनीच दाखवलं. म्हणून गो. गं. लिमये यांच्या ‘मेकॅनो’ कथेनं न जुळणाऱ्या मेकॅनो-संसाराचा डाव कसा मांडावा लागतो ते सांगितलं आणि हसण्या-हसविण्याच्या भरतकामाचा मोर नाचताना कसा जखमेत गुंतत जातो ते मागील उलट्या टाक्‍यांवरून कळत गेलं. एका साध्या पत्रसंवादाच्या चुकामुकीनं महानंदा नि बाबूलनाथचा डाव कसा उधळला जातो, ते जयवंत दळवी यांनी कोकणातल्या निळ्या पाण्याच्या नि सळसळत्या माडांच्या साक्षीनं दाखवलं. ती...एकाकी महानंदा, तो...जगण्याचं भयाण वाळवंट झालेल्या बाबूलनाथ दोन्ही रक्तात मिसळत गेले नि प्रेम आणि प्रीती यातल्या मिटल्या रेषा उमगत गेल्या.
मरत जाणारा माझ्यातला तरुण वाचक आणि त्याच मरत जाण्यानं पोषण होणारा माझ्यातला लेखक-कवी यातला कोण कुणाला परस्परपूरक ठरला, ते कधी कळलंच नाही. मुळात कवितेचं संवेदन असलेले हे विविध कलावंत जवळचे वाटत गेल्यानं प्रीतीचे असंख्य उभे-आडवे धागे जाणवत गेले, याचा बोध झाला नाही. ही सगळी प्रक्रियाच इतकी उगविणाऱ्या पहिल्या कोंबाइतकी हळुवार, की श्‍वास घेतानाही तो थरार सोसणार नाही- असंच सगळं घडत गेलं.

...अरुणपणातून तरुणपणाकडं निघताना मनात कल्लोळ, रक्तात आवेग भरत गेला. रात्री डोळे मिटल्यावर एखादाच चेहरा पुनःपुन्हा त्या बंद दरवाजाआड का येतो, याचं रहस्य कळेनासं होई. आपल्यापुरताच भोवतीचा काळोख निळा का भासतो हेही कळत नसे आणि पहाटेच्या पहिल्या किरणाची लोकर धरून दिवस धरायला निघालेल्या जिवाला तो पापणीआडचा चेहरा दिसेपर्यंत चैन नसे. चुकून भेटल्यासारखं मुद्दामहून भेटणं, दुर्लक्षच करण्यातून ‘लक्ष्य’ गाठणं आणि मग आभाळात ढग असोत-नसोत, पहिल्या पावसाच्या अत्तरधारांचा प्रत्त्यय घेत हेच हेच ते जीवनाचे सौंदर्य असं भाबडेपण दाटून येणं ! आयुष्यात प्रीतीचे पहिले चाहूलठसे उमटले ते असे...!
कुणाच्या प्रेमात गुंतण्याहून आपण कुणावर तरी प्रेम करीत आहोत, या जाणिवेवरच प्रेम करण्यात आयुष्य धन्य होई ! शब्द हे केवळ नाइलाजाचे दूत ! पण डोळेच डोळ्यांना विचारत-
‘सारंच भान सुटावं
गारुड असं काय केलंय?’
मग डोळ्यांनीच उत्तर द्यावं ः
‘खरं सांगू?
मी फक्त-मी फक्त
प्रेम केलंय!’

खरंच, या मुग्ध मौनातून सतारणारं प्रेम फक्त धुक्‍याआडच लहरत राहिलं. -‘त्याचवेळी सगळं व्यक्त करता आलं असतं तर...

संकोचाचं धूसर धुकं मध्येच आलं नसतं तर...?-असं ‘जर... तर...’च्या रुपेरी तारेवरच हे वेडं फुलपाखरू अडखळत राहिलं... आधाराला रफीचं ‘चौदवी का चाँद हो’ गुणगुणत राहिलं आणि नंतर ‘चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनों’ म्हणत- एक असफल मनोगताला ‘खूबसूरत मोड’वर सोडून देत पुढं जात राहिलं... मग कधी वहिदाच्या लडिवाळतेचा ‘तसबीर-आधार’ घेत, कधी ‘नूतनचेहऱ्या’च्या दवारल्या प्राजक्ताचा कल्पनास्पर्श झेलत हे प्रेम व्यवहाराच्या रूप-रंगात मिसळून गेलं... हे कधी घडलं हे त्या प्रेमालाही कळलं नाही!

आता प्रेमाला भाबड्या प्रीतीचा स्वप्नाळू रंग नव्हता. जणू त्या नवथर प्रेमालाही, प्रेमानं कुणी समजावून सांगितलेलं असतं- ‘मन पिसाट माझे अडले रे...थांब जरासा’ असं अदृश्‍यातून कुणी थांबवलेलं असतं... इंदिरा संत यांच्या ‘मनातल्या आजीबाईने नाकावर बोट ठेवून’ वात्सल्य नि धाक यांच्या मिश्रणाने दटावून म्हटलेलं असतं- ‘पुन्हा असं वाटेत थांबायचं नाही !’

मग प्रेमाच्याच यापुढच्या वळणावर, प्रेमालाच पडू लागलेल्या प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचं हा प्रश्‍न पडू लागलेला असतो. जडलं ते नातं कुठलं होतं? एवढ्या महासागरी अफाट गर्दीत तो एकच चेहरा असा कोणत्या ओढीनं जवळ आला...? आणि मुख्य म्हणजे, तो आपल्याच जवळ का आला? ओळखदेख नसताना त्या चेहऱ्याबद्दल ममत्व का वाटू लागलं? आयुष्यातली सगळी सुखं लाभतील ती फक्त हेच ‘मन’ सोबतीला असेल तर...! असं वेडेपण खोल खोल का होत गेलं? अनावर आवेगाला आवर घालणारंही हेच ‘मन’ होतं आणि आता पुन्हा नातं न जुळणाऱ्या वाटेवर आपण उद्‌ध्वस्त होत असताना हेच मन-पापण्या टिपून सुचवतंय- ‘सावर रे !’
काय म्हणावं या प्रीतीला?
कुठली ती लाट? कुठला तो भोवरा?
आणि- आणि कुठला हा किनारा?
बदलताना कूस
रात्र सारी
पेलत राहतो !
वाट चुकल्या जन्माचा
हिशेब फक्त तोलत राहतो !

हे एकट्याचं तळमळणं म्हणजेच प्रेम का? हे वाट चुकल्या जन्माचा हिशेब फक्त एकट्यानंच तोलत राहणं म्हणजेच प्रेम का...?
का? प्रेमाला मीलनाचं हे एवढं पथ्य का? प्रेमानं फक्त अंकुरायचं, मोहरायचं; पण फुलून आल्यावर त्याला फळाचं वरदान का नाही? निष्प्रेमांना व्यवहारी धाग्यात घट्ट गुंफायचं नि जिवलगांना मात्र विजेच्या कुंपणाची रेघ रेखून अंतरावर ठेवायचं... हा खेळ खरंच कोण करत असेल?
जखमा मिटू मिटू पाहतात; पण मिटत नाहीत. अचानक भिरभिरत्या जखमी चातकासारखं निनावी पत्र हाती येतं... नावाची गरजच काय?

अक्षरातून बोटांचा सुगंध येतोच की! आणि फक्त तुटक ओळी... पुढं-
ओसंडून वाहणारं
शांत रितेपण
चातकचोचीला
आगीचे कोंदण!
दे रे जहर
कडेलोटावर...
नाव तुझे येण्याआधी
आर्त ओठावर...!

का बरं हे लिहिलं असेल? आगीच्या कोंदणात ही चातकचोच कुठलं चांदणं वेचत असेल आणि तिचं आयुष्य आता इतकं कडेलोटावर का आलं आहे? आणि अजूनही आपलं नाव ओठाबाहेर येऊ न द्यायची तिची धडपड... संवेदनांची पडझड सुरूच आहे? खरंच-
एका होकाराच्या शोधात
शब्दाची वणवण;
अर्थ त्यातून निसटलेला
पुन्हा एक
कोरा क्षण !

अशा कोऱ्या क्षणांची कोरी वही म्हणजे आयुष्य होताना प्रेमाचं एक शिशिररूपही उभं ठाकतं. संपूर्ण पर्ण झडलेल्या तरुडहाळीवर बर्फफुलांनीच रेंगाळावं तसं आयुष्य...हेही प्रेमाचंच एक रूप का?

विरहाच्या धगीनं प्रेम परिपक्व होतं. आरंभीचं उचंबळलेपण मागं पडतं; नसनसांतले वादळाचे आवेग शांतावतात आणि एक धीमा, लयदार प्रवास सुरू होतो. आता या प्रवासात स्पर्शाची सोबत आवश्‍यक नसते; अनुभवलेले क्षण, ती स्मरणे यांचीही एक सोबत होते...त्या कातरएकांतातही धुंदीचा अनुभव येत राहतो.
तगमगणारं क्षितिज
हेच जेव्हा होतं ना
आयुष्य
तेव्हा त्याला
चेहरा नसतो
नियतीच
बदलत राहते नाव
कधी कुब्जा !
कधी मीरा !


आता कुब्जेची कुरूपताही सुंदर भासते आणि मीरेचं दिवाणेपणही ! आता सुंदरतेला स्थूलाची गरज नसते; प्रेमविरही मनाची तगमगही सुंदरतेचं चांदणं शिंपत येते. आपली कक्षा जपत सूर्यावर जीव ओवाळून युगे युगे प्रेम करणारी वसुंधरा ही कुसुमाग्रजांच्या शब्दातून आर्ततेनं जेव्हा विचारते ‘कितीदा करू प्रीतिची याचना?’ तेव्हा या प्रश्‍नाला सूर्याकडं उत्तर नसतं आणि ‘गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनि गळा घालुनिया गळा’ ही स्वतःची नियती पृथ्वी जाणून असते.
- फुलं होण्यातलं प्रेम समजता समजता राख होतानाची प्रीतीही उमजू लागते!
एकानं वाट पाहणं
एकानं वाटच पाहणं
क्षितिज
कवेत घेत घेत
आत
आत
विरून जाणं!

हे अंतराळात विरून जाणं हा या प्रवासाचा, म्हटलं तर करुण, म्हटलं तर अटळ टप्पा असतो.

कागदावर वाचताना न कळलेल्या ओळी आयुष्य शिकवून जातं... आरती प्रभू यांची ओळ त्या इंद्ररंगी वयात कळली नव्हती. खूप वेळ त्या ओळींकडंच बघत राहिलो होतो. केव्हा तरी ती ओळ आपल्याकडं बघेल म्हणून! पण कवितासुद्धा प्रेमपूर्वक; पण ठामपणे थांबते. मनात म्हणते ः ‘बेट्या थांब, आयुष्याचं शिकवेल तुला. काळाचा सावळा महापूर रोंरावत निघून जातो. मग कुठं ती आरती प्रभूंची ओळ जाणवू लागते ः
शब्दाआधीची शांतता ः त्यात तू
शब्दानंतरची शांतता ः त्यातही तू

या ‘आधी’ आणि ‘नंतर’च्या विस्तीर्णतेत भरूनही जे उरतं तीच प्रीती का? की केवळ मौनाचं एक ‘मोनालिसास्मित’ म्हणजे प्रीती?
प्रेम आता द्वैतातून अद्वैताकडं निघालेलं असतं. रूपाकडून अरूपाकडं मनाचा विस्तार करण्याचं केवढं अजोड सामर्थ्य या ‘प्रेमा’त आहे, हे प्रेमात पडल्याशिवाय नाही कळणार. मात्र हे मन जडणं आत्म्याशी इमान राखणारं हवं; तरच ते आपला ‘तिळा उघड’ हा मंत्र हाती देतं आणि रत्नजडित गुहेत प्रवेश देतं.

‘मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’ असा हा सृजनप्रवास असतो. देहाचं एक निमित्त झालं; पण निमित्तातच जे गुंतून राहतं ते प्रेम नाही. प्रेमासारखं भासणारं; पण प्रेम नसलेलं. म्हणूनच ‘पहा पहा परसात हरीच्या रुमडाला सुम आले गं’ ही हर्षभरित अनुभूती येण्यासाठी - ‘आलिंगन-चुंबनाविना सखि मीलन अपुले झाले गं’ ही साधना सहजपणे व्हायला हवी- बा. भ. बोरकरांचं रससाम्राज्य हीच साधना सुचवते. ती देहष्टीकडून सृष्टिदेहाकडं वळते. ‘लाजण झाली धरती गं नि साजण काठावरती गं’
असा तो आकाश-मृत्तिकेचा अस्पर्श शृंगार असतो. ‘भ्रमर परागु नेती’ हे खरं असलं तरी ‘परागु हे नेणती’ इतकं ते हळुवार असतं. संत वसंताची ही तरलता ही प्रीतीची पूर्वतयारी आहे; खरंतर ‘अपूर्व’तयारी ! प्रेमरस असा संतदृष्टीच्या करुणेतून ओसंडू लागला, की तो भक्तीच्या काठावर केव्हा जाऊन पोचतो, ते प्रेमालाही कळत नसावं. संतहृदयाच्या अथांगतेच्या आसपासही आपली प्रीती ठरू शकत नाही इतकी ती लौकिक असते; तरीही दूरच्या नात्यातही उत्कट संवेदनेचा एक हळुवार धागा लखलखत असावा, त्याप्रमाणे ही भक्तिमय प्रीती वा प्रीतिमय भक्ती समजून घेण्यासाठी आता आपलं मन सज्ज झालेलं असतं. ‘आज हृदय मम विशाल झाले’ ही कवी शंकर वैद्य यांची अनुभूती काही प्रमाणात प्रीतीच्या या परिपक्व होऊ पाहणाऱ्या पायरीवर येऊ लागते.

प्रीतीचं हे इतकं सुमंगल रूप जगावं तर संतवसंतानंच! आणि ते उकलून दावावं तेही त्यांच्याच प्रतिभेनं. अतिहळुवारपण चित्ताला आणून ही विरहिणीची आर्तता रुजवून घ्यावी लागते.

अवतारक कान्हाच्या दर्शनासाठी, केवळ एकेका निळ्या भासासाठी आंतर्बाह्य वेडावलेलं हे मन संत स्वतः होतात. त्यासाठी मनानं विरहिणी गवळण होऊन आपल्या अमृताच्या लेखणीला मयूरपिसांचे निळे तुरे येऊ देतात. ज्ञानेश्‍वर महाराजांच्या सगळ्याच विराण्यांमधून अद्वैताकडं निघालेल्या साधक प्रीतीचं जे भावोत्कट रूप दिसतं, ते समजून घेताना डोळ्यांतून धारा वाहू लागतात.
काय म्हणावं या आर्ततेला?
काय म्हणावं प्रीतीच्या या रोमारोमांतून सर्वस्व ओतलेल्या समर्पणाला? विरहव्याकुळ गवळणींचं व्याकुळ मन व्यक्त करताना केवळ स्व-रूपाकार होणारी ही विरहोत्कंठिताच फक्त आतुर नाही, तर सगळं वातावरणच सघन, पर्युत्सुक आहे. मनाचा रुणझुणाट वाऱ्यात नादावतो आहे; तर रोमारोमांत गुणगुणणारं गाणं आता भरून आलेल्या; पण न बरसणाऱ्या, ओझावलेल्या आभाळातून ऐकू येऊ लागलं आहे..
आता या आर्ततेला फक्त एक तो भवतारकु कान्हाच भेटी हवा आहे. त्याच्यावाचून कुठलंही स्वर्गसुख समोर आणून ठेवलं तरी तिला ते नको आहे...

कान्होवनमाळीवाचून अंगाची जी विरहलाही होते आहे, ती तगमग केवळ ती एकच असू शकते. त्या आंतर्सादेला दुसरी उपमाच नाही. चंदनाची शीतलता लेपली तरी तीही पोळू लागली; फुलांची शेजही आता ‘तो’ नाही तर निखारा वाटते आहे... बाहेरच्या जगातलं
स्पर्श-रूप-रस-रंग-गंध यातलं काहीही या प्रेयसीला नको आहे...फक्त तो तो एक देवकीनंदन! त्यावाचून कुणीच नको आहे... संत ज्ञानोबांचा या विरहिणीपलीकडं अजून दुसरं कुठले भावार्त मन असू शकेल?
ज्यांनी घनाचा, वारियाचा स्वर टिपला ती ही प्रतिभा !
घनु वाजे घुणुघुणा । वारा वाहे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा । वेगी भेटवा कां ।।

हे अद्वैतोत्सुक द्वैत कसं परमात्म्याशी एकरूप होतं, याचं हे मूर्तिमंत चित्रण आहे.
प्रेमाचं रूप हे असं  इतकं विकसित होणं ही जन्मोजन्मीची साधना आहे; पण ती या जन्मापासून सुरू होण्यासाठीसुद्धा आधीही काही साधना होणं आवश्‍यक असावं, नाहीतर-
‘दर्पणी पाहता रूप । न दिसे आपुले।
ही भावस्थिती कळणार तरी कशी? विरहभावनेतून घातलेल्या आंतर्बाह्य सादेनं विलक्षण किमया केली आहे. जिवलगाचं अविरत चिंतन करून करून आता ती इतकी स्मरणरूप झाली आहे, की त्याच्या भेटीसाठी केलेला शृंगार या अश्रुव्याकुळतेनं जरा हलला तर नाही ना? या काळजीनं प्रेयसी-मनानं सहज आरशात पाहिलं तर... तर... काय? चमत्कारच !
मी- मी साक्षात ‘तो’ झाले होते ! कुणी किमया केली ही?-
बाप रखुमादेवीवरे विठ्ठले मज ऐसे केले

जिवलगाशी इतकं एकरूप होण्याची करुणा तो एकच विठ्ठल करू शकतो... ही केवढी कृतज्ञता!

प्रीतीचीच ही रूप... ! प्रेमाचंच हे बीजातून आकाशापर्यंत बहरत जाणारं संवेदन! स्थूल ते सूक्ष्म अशा या प्रवासासाठी तेवढी तितिक्षाही हवी ! पावलोपावली विराटापासून दूर नेणाऱ्या प्रलोभनांना दूर ठेवण्याची धीटाई हवी!
खरंच आपण ज्याच्यावर जीव ओवाळून प्रेम करतो, त्याबद्दल तेवढा सुमंगल भाव हवा. प्रेम...अडीच अक्षरं! पण मंत्रभारली! ही मोकळ्या वेळची करमणूक नाही... प्रेम सिद्ध करण्यासाठी इथं कुठलीही अडवणूक नाही!

प्रेम एक महोत्सव... मिटल्या पाकळ्यांचा! संवेदनांच्या उमलू पाहणाऱ्या ज्योतींचा. मग प्रकाशमान होत जाणाऱ्या आंतरिक अवकाशाचा. केवळ एका दिवसाचा हा खेळ नाही, की वस्तूतून व्यक्त होणारा हृदयांचा मेळ नाही. प्रेम... एक प्रतिज्ञा... शब्दाविना आतून उच्चारलेली. एकमेकांच्या सोबतीनं शिखरावर घेऊन जाणारी. आत्मबळ देणारी. समजूतदार वाटेवर... डोळ्यांनीच सावरणारी. कधी ती मीलनच्या बेटावर नेईल, तर कधी चिरंतन वाळवंटाच्या निखाऱ्यावरही घेऊन जाईल!
प्रेमात दोन्ही सुंदर होतं! त्या सुंदरतेची आराधना म्हणजे प्रेम!
सगळं कळूनही न कळणारं एक कोडं!
तरीही नव्या आशेनं चालत राहायला प्रेमच शिकवतं ! शिशिराची एखादी झुळुक...काही पिवळी पानं म्हणजे काही ऋतूअखेर नाही; तेही शिशिरवारं निघून जातं...फांदीतून चैत्र पुन्हा धुमारतो... पुन्हा आत काही प्रकाशतं... हे सगळे झोके जाणणं...कधी थांबणं, कधी अधीर होणं... कधी सर्वस्व समर्पित करणं...हीच तर प्रेमाची किमया..
‘झुळूक पुन्हा ओलावते
माती पुन्हा धुमारते
एका खोल आशेवर
थोडे आत प्रकाशते!


हे असं आतलं प्रकाशगाणं घेऊन ‘प्रेम’ आज दारात आलं आहे नि आयुष्य आज यौवनाच्या नव्हाळीला म्हणतं आहे ः ना अता फुलण्यास जागा, तू तशा फांदीपरी
पाकळी हातात देशी, गंध दडल्यासारखी!
पाहशी अन्‌ लाजशी, प्रेमात पडल्यासारखी
चालशी मग थांबशी, काही न घडल्यासारखी
जिवाचा जिवलगाची भेट होईपर्यंतचा हा प्रवास!
शब्दातून- निःशब्दाचा !
शाईतून विरघळून...आकाश होईपर्यंतचा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com