नाट्यबीजाची 'पेरणी' (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

आमची उंब्रजमधल्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्‍टिस सुरू झाली. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत पद्धतीनं संवाद म्हणत होती. नाटककाराला काय अभिप्रेत आहे ते दिग्दर्शकानं सांगायच्या आधीच त्यांच्या अभिनयातून देत होती. असं समजून उमजून काम करणारे कलाकार क्वचितच भेटतात. त्या शेतकरी मुलांना ना शेक्‍सपिअर माहीत होता ना सार्त्र. ना इब्सेन माहीत होता, ना जॉर्ज ऑर्वेल. त्यांना एवढंच माहीत होतं, की दसऱ्याच्या आदल्या रात्री आपल्या गावातल्या मंदिरासमोर आपल्याच गावकऱ्यांसमोर आपल्याला प्रयोग करायचाय...

नाटक म्हटलं, की बहुतेकांना पुणे-मुंबईपलीकडं काहीच दिसत नाही. फार तर सोलापूर, नागपूर, नाशिकपर्यंत आपली विचारशक्ती जाते. खरं तर एवढ्याच शहरांच्या जीवावर आपण म्हणतो, की नाटक महाराष्ट्राचा श्‍वास आहे किंवा नाटकाशिवाय मराठी माणूस जगूच शकत नाही... पण खरंच असं आहे का..? कारण असं असतं, तर मराठी नाट्य व्यवसाय हा सर्वांत श्रीमंत व्यवसाय असायला हवा होता; पण तसं नाहीये. प्रेक्षकांचा चेहरा पाहण्यासाठी आजही मराठी निर्माते झटतच आहेत की!... आणि हे असं कटू सत्य अवतीभवती दिसत असतानादेखील चांगल्या पगाराची नोकरी सोडून 2002 मध्ये मी नाटकाला वाहून घ्यायचा निर्णय घेतला आणि एकदाची प्राज कंपनीमधली नोकरी सोडलीच. खरंतर सोडली म्हटल्यापेक्षा मला काढलंच होतं कंपनीतून. कारण महिन्यातून पाच-सहा वेळा नाटकासाठी रजा होत होती. मग कंपनीनं मला दिला नारळ आणि म्हटलं ः "जा बाबा इथून आणि तुझं नाटकच कर.' अशा तऱ्हेनं मी पूर्णवेळ नाटकवाला म्हणुन पुण्यात मिरवू लागलो. मिरवू लागलो हाच शब्द मला जास्त योग्य वाटतोय- कारण एक रुपयाही न कमवता मी वर्षभर नुसताच नाटकवाला म्हणून मिरवत राहिलो. नंतर घरच्यांच्या बोलण्याला कंटाळून एक दिवस मी निर्णय घेतला, की चला व्यवसायिक नाटक नाही जमलं, निदान जसं जमेल तसं जिथं नाटक नाही तिथं ते पोचवण्याचा प्रयत्न तरी करू!
म्हणूनच पुण्यापासून शंभर-दीडशे किलोमीटरच्या परिघात जी कुठली गावं आहेत तिकडं जाऊन एकांकिकावाचनापासून सुरवात करायची असं ठरलं. पहिलंच ठिकाण निवडलं पंढरपूरजवळचं सांगोला. सागर भजनावळे नावाच्या एका नाटकवेड्याला हाताशी धरून मी सांगोल्यात माझ्या या कामाचा श्रीगणेशा केला. दर शनिवारी पुण्यावरून नितीन लोखंडे नावाच्या माझ्या मित्राला घेऊन मी सांगोल्याला टू-व्हीलरवर जायचो आणि दिवसभरात एक-दोन सीन बसवून रात्री पुण्याला परत यायचो. दोन महिन्यांनंतर अनेक स्पर्धांमधून आणि यूथ फेस्टिव्हल्समधून त्या एकांकिकेचे अनेक प्रयोग झाले. माझं काम झालं होतं, त्यामुळं मी परत कधी सांगोल्याला गेलो नाही; पण सागर भजनावळे मात्र सांगोल्यात नाटकांचे प्रयोग करतच राहिला. मध्ये खूप वर्षं गेली आणि इतक्‍या वर्षांनंतर परवा सांगोल्यातून सागरचा अचानक फोन आला. मकरंद साठे यांच्या नाटकावरच्या अभ्यासासाठी त्याला पीएचडी मिळाली होती. मी मनाशीच हसलो, कारण त्या दिवशी नाटक खऱ्या अर्थानं पुणे-मुंबईच्या बाहेर पोचलं होतं- अगदी सांगोल्यापर्यंत!

सांगोल्याच्या सागर भजनावळेनंतर कल्याणचा अभिजित झुंजारराव (जो सध्या एक जबरदस्त नाटकवाला म्हणून कार्यरत आहे), नगरचा ऍड. अभिजीत दळवी, लातूरचा ऍड. शैलेश गोजमगुंडे, ठाण्याचा प्रमोद शेलार, महाडचा प्रदीप गायकवाड, डोंबिवलीचा लक्ष्मीकांत संझगिरी, औरंगाबादचा अभिजित शिरसाट, सोलापूरचा आमिर तडवळकर, पुण्यातून दिग्पाल लांजेकर यांनी माझ्या एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रात पोचवल्या, रुजवल्या आणि आपापल्या गावात मराठी नाटकाचा प्रेक्षकसुद्धा वाढवला. आज अनेक बक्षीस समारंभांमध्ये आम्ही सगळे एकत्र भेटतो, तेव्हा वीस वर्षांपूर्वीच्या त्या चळवळीचा खूप अभिमान वाटतो.

मात्र, या सर्व मित्रांच्या शहरांना नाटकाची तशी बरी जाण होती. त्यामुळं मी अजून ग्रामीण भागापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला... आणि तेव्हाच मला एक मोठा आश्‍चर्याचा धक्का बसला- मी खेड-मंचरच्या पुढं उंब्रज नावाच्या गावात नाटक बसवण्यासाठी गेलो तेव्हा! हे उंब्रज म्हणजे "महाराष्ट्राची लोकधारा'चे जनक अशोक हांडे यांचं गाव. माझा मित्र बाळकृष्ण घंगाळे याच्या सांगण्यावरून मी तिथं गेलो, तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण आळेफाट्याजवळच्या उंब्रज नावाच्या त्या गावात गेली शंभर ते सव्वाशे वर्षं नाटकाचे प्रयोग होतायेत. त्या गावात परंपरा आहे, की दसऱ्याच्या आदल्या दिवशी गावातल्या लोकांनीच रात्री गावातल्या मंदिराच्या आवारात नाटक करायचं. ज्या घरातल्या एका तरी व्यक्तीनं नाटकात काम केलं नाही, असं त्या गावात एकही घर नाही. विचार करा- नाटक करणारे आणि समोर नाटक पाहणारे सगळेच नाटकवाले! कित्येकदा संहिता ही कुठल्या तरी नामवंत लेखकाची असते आणि दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या सध्याच्या नाट्य चळवळीतला कोणी तरी तरुण असतो. म्हणूनच या समृद्ध परंपरेतली 2006, 7, 8 अशी सलग तीन वर्षं माझ्या वाट्याला आली.

माझा पुन्हा तोच प्रवास सुरू झाला. आता सांगोल्याऐवजी ठिकाण होतं उंब्रज. नाटक होतं दिलीप परदेशी यांचं "थेंब थेंब आभाळ!' हातात दिवस होते फक्त वीस. नाटकात पुरुष कलाकार होते दहा आणि एक स्त्री पात्र. गावात पुरूष कलाकार मिळायचे; पण स्त्री कलाकार मिळणं अवघड म्हणून माझी मैत्रीण स्नेहल घायाळ हिला (जी सध्या माझी पत्नी आहे) तयार केलं. खरं तर याच नाटकामुळं आम्ही जास्त जवळ आलो आणि पुढं आमचं लग्न झालं. तर स्नेहलला घेऊन आमची त्या मुलांबरोबर नाटकाची प्रॅक्‍टिस सुरू झाली. गावातले उमेश दांगट आणि विवेक हांडे पुढाकार घेऊन सगळं करायचे. खरं सांगतो, बाह्य नाट्य क्षेत्राशी कुठलाही संबंध नसलेली ती शेतकरी मुलं अतिशय सराईत पद्धतीनं संवाद म्हणत होती. नाटककाराला काय अभिप्रेत आहे ते दिग्दर्शकानं सांगायच्या आधीच त्यांच्या अभिनयातून देत होती. असं समजून उमजून काम करणारे कलाकार क्वचितच भेटतात. त्या शेतकरी मुलांना ना शेक्‍सपिअर माहीत होता ना सार्त्र. ना इब्सेन माहीत होता, ना जॉर्ज ऑर्वेल. त्यांना एवढंच माहीत होतं, की दसऱ्याच्या आदल्या रात्री आपल्या गावातल्या मंदिरासमोर आपल्याच गावकऱ्यांसमोर आपल्याला प्रयोग करायचाय.

त्या काळात माझ्या परीनं ग्रामीण भागातल्या मुलांना नाटक शिकवणारा मी पहिल्यांदाच त्यांच्याकडून काही तरी शिकत होतो. कमीत कमी तांत्रिक गोष्टी ठेवून जास्तीत जास्त भावनांच्या माध्यमातून नाटक करता येतं हेसुद्धा त्यांनीच मला शिकवलं. विचार करा- कुठलीच प्रायोगिक नाट्य चळवळ त्या वेळीही त्यांच्या गावात पोचली नव्हती, किंवा आजही पोचलेली नाहीये; तरीही ते मात्र नाटकाजवळ केव्हाच पोचलेत... अगदी शंभर वर्षांपूर्वीच. दसऱ्याच्या त्या रात्री केलेला तो "थेंब थेंब आभाळ'चा प्रयोग माझ्या आजही लक्षात आहे. पुण्यातून अशोक काळे, गजाभाऊ वाटाणे, प्राची घोटकर हे माझ्या मदतीला तिथं होतेच. प्रयोगानंतर आम्ही सगळेच थक्क झालो होतो. त्या मंदिरासमोर प्रेक्षक झालेलं अख्खं गाव ते नाटक कुठली तरी चळवळ किंवा गरज म्हणून नाही, तर शंभर वर्षांचा संस्कार म्हणून बघत होतं. पुढं मी "काळोख देत हुंकार' आणि "देवनवरी' अशी दोन नाटकं तिथं बसवली. उंब्रजबरोबरच आम्ही आजूबाजूच्या गावांमध्येसुद्धा त्या नाटकाचे प्रयोग केले. त्यानंतर मी तिथं कधी नाटक बसवायला गेलो नाही; पण आजही माझ्या आणि स्नेहलच्या मनात आलं, तर आम्ही त्या गावातल्या त्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला मात्र आवर्जून जातो. गेल्या वर्षीच योगेश कुलकर्णीनं त्याच गावातल्या नव्या मुलांना घेऊन "वस्त्रहरण'चा प्रयोग केला. म्हणजे बघा ना, नाटकाचा संस्कार अजून सुरूच आहे.

आजपर्यंत कुठल्याच माध्यमानं किंवा नाट्य चळवळीतल्या दिग्गजांनी पुण्याच्या आसपास घडणाऱ्या या नाट्यसंस्कारांची दखल घेतली नाही- कारण आपण आपल्या शहरात जे घडतं त्याचंच कौतुक करण्यात रमून गेलोय. आजूबाजूचा ग्रामीण महाराष्ट्रसुद्धा स्वत:चं असं एक नाटक घेऊन जगतोयच की! उमेश, विवेक, मनोज आणि बाळकृष्णच्या रूपानं कित्येक कलाकार नाटकाची जाण समृद्ध करतायत. त्याच मातीतून आलेले अशोक हांडे लोककलेला सातासमुद्रापार घेऊन जातायत. तेसुद्धा स्वत:ची शेतकरी असलेली ओळख सांभाळून.

आज "चित्रसंवाद'मुळं मनात दडलेलं हे उंब्रज, सांगोल्यातलं ग्रामीण नाटक मराठी वाचकांपर्यंत पोचवता आलं, याचा खूप आनंद आहे... खरंच अजून कुठल्या अनोळखी गावी असं काही होत असेल आणि ते मला कळलं, तर आजही मी सगळं सोडून त्यांना भेटायला नक्कीच जाईन. कारण मला त्यांना काही शिकवायचं नाहीये, तर त्यांच्याकडून काहीतरी शिकायचंय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com