अस्तिक बनण्याची गोष्ट (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

निर्मात्यांचा फोन येईपर्यंत डोक्‍यात चित्रपटाचा कुठलाच विषय नव्हता. कारण बाकीच्या कामांच्या व्यापात मी हे काम विसरून गेलो होतो. अचानक त्यांचा फोन आल्यामुळं मी प्रणीत कुलकर्णीला घेऊन घाईगडबडीतच तिकडं गेलो. मिळालेलं पहिलंच काम हातून जाईल, या भीतीनं त्यांच्यासमोर "गोष्ट तयार आहे,' असं सांगून जी सुचेल ती गोष्ट सांगायला सुरवात केली. गोष्टीचं पहिलंच वाक्‍य होतं ः ""राघव शास्त्री नावाचा एक नास्तिक शास्त्रज्ञ असतो- जो अमेरिकेत राहत असतो....''

"तुम्ही नक्की कोण आहात? नास्तिक का आस्तिक..?' सतत विचारल्या जाणाऱ्या या प्रश्‍नाचा गुंता सोडवणारा प्रवास म्हणजे "देऊळ बंद.' हा अस्तिक प्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचं अवघड काम माझ्यासारख्या नास्तिक माणसाच्या खांद्यावर येऊन पडलं. आशेचा किरण एकच, की सोबत प्रणीत कुलकर्णी होता- जो खरंच स्वामींना खूप मानायचा- आजही मानतो.

"देऊळ बंद' हे आमचं म्हणजे माझं आणि प्रणीतचं पहिलचं दिग्दर्शन. खरंतर पहिल्या दिग्दर्शनामध्ये कमी खर्चात होईल असा सोपा चित्रपट निवडायचा असतो. आमचासुद्धा तोच प्रयत्न होता आणि तशी धडपडही चालू होती. त्याच दरम्यान एक दिवस नीलेश कोंढाळकर नावाच्या माझ्या मित्रानं कैलास वाणी या एका स्वामीभक्ताशी आमची भेट घालून दिली. त्यांना स्वामी समर्थांवर एक डॉक्‍युमेंटरी करायची होती. वाणी यांच्याबरोबर झालेल्या पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांचा आम्हाला प्रश्‍न होता ः "स्वामींना मानता का..?' माझ्यावर विश्‍वास ठेवा- तोपर्यंत मला स्वामी समर्थांबद्दल काहीच माहीत नव्हतं; पण हाताशी आलेलं काम जाईल या भीतीनं वाणी यांच्या पाठीमागं असणारा फोटो स्वामी समर्थांचाच असणार हे गृहीत धरून त्या फोटोला नमस्कार करत मी म्हणालो ः ""हा काय प्रश्‍न झाला सर..? यांना मानणार नाही तो माणूसच कसला?'' साहजिकच स्वामीभक्त असलेले वाणी यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि आम्हाला दिग्दर्शनाचं पहिलं काम मिळालं. माझ्या शेजारी बसलेला प्रणीत माझ्याकडं पाहतच राहिला- कारण "देऊळ बंद'मधला नास्तिक राघव शास्त्री म्हणजे जवळजवळ मीच हे त्याला ठाऊक होतं. उठताना वाणी म्हणाले ः ""मला ही डॉक्‍युमेंटरी दोन आठवड्यांत तयार हवीये- त्यामुळं उद्या काहीतरी छान गोष्ट ऐकवा, म्हणजे त्वरीत पुढच्या कामाला लागू.''

दुसऱ्या दिवशी वाणी यांचा फोन येईपर्यंत डोक्‍यात चित्रपटाचा कुठलाच विषय नव्हता. कारण बाकीच्या कामांच्या व्यापात मी हे काम विसरून गेलो होतो. अचानक वाणी यांचा फोन आल्यामुळं मी प्रणीतला घेऊन घाईगडबडीतच तिकडं गेलो. मिळालेलं पहिलंच काम हातून जाईल, या भीतीनं त्यांच्यासमोर "गोष्ट तयार आहे,' असं सांगून जी सुचेल ती गोष्ट सांगायला सुरवात केली. गोष्टीचं पहिलंच वाक्‍य होतं ः ""राघव शास्त्री नावाचा एक नास्तिक शास्त्रज्ञ असतो- जो अमेरिकेत राहत असतो. तो आपले समुद्रकिनारे सुरक्षित व्हावेत म्हणून आपली मदत करायला भारतात येतो... आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याला मोठ्या हॉटेलऐवजी एका सामान्य सोसायटीत ठेवतात- जिथं नेमकं स्वामींचं मंदिर असतं. ते मंदिर तो बंद करतो आणि मग स्वतः स्वामीच त्याला बाहेर येऊन जाब विचारतात देऊळ बंद का केलंस?'' एवढं बोलून मी थांबलो. खूप शांतता आणि मग वाणी टाळ्या वाजवत म्हणाले ः ""व्वा क्‍या बात है!'' आता त्यावेळी मला राघव शास्त्री हेच नाव का सुचलं? तो शास्त्रज्ञच का असतो? देऊळ का बंद करतो? खरंच आजही मला माहीत नाही हे सगळं का आणि कसं सुचत गेलं; पण अचानक सुचलेल्या या दोन ओळींच्या गोष्टीनं प्रभाव साधला होता आम्हाला कामं मिळालं होतं... आणि आता एका नास्तिकाच्या हातून एक आस्तिक गोष्ट घडण्याचा प्रवास सुरू झाला. पाहतापाहता छोट्या डॉक्‍युमेंटरीचा "देऊळ बंद' नावाचा मोठा चित्रपट माझ्या हातून लिहून झाला- जो मराठी रसिक प्रेक्षक गेली चार वर्षं टीव्हीवर आठवड्यातून दोन वेळा तरी पाहतायत.

मला माहीत नाही नक्की कुठली शक्ती माझ्याकडून त्या कथेला पूर्णत्वाला घेऊन चालली होती; पण एकामागून एक सगळंच जसं हवं तसंच घडत होतं. चित्रपटाचं लिखाण पूर्ण झाल्यावर गाडी येऊन थांबली ती या स्वामी समर्थांची भूमिका कोण करणार या प्रश्‍नावर! माझी एकच अट होती, ती म्हणजे मला स्वामींसारखा दिसणारा माणूस नको होता. मला असा अभिनेता हवा होता जो त्याच्या अभिनयाच्या ताकदीनं स्वामींना घराघरात पोचवेल. असा ताकदीचा अभिनेता मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत एकच होता- आजही आहे- ते म्हणजे मोहन जोशी! आम्ही सरळ जाऊन त्यांना गळ घातली. भूमिका कोणती हे कळल्यावर ते भडकलेच. नकार मिळाला; पण बहुदा त्यांच्यातल्या अभिनेत्याला ही अवघड भूमिका सतत खुणावत होती... आणि आधी चिडून नकार दिलेल्या मोहन जोशी यांनीच नंतर खऱ्या अर्थानं स्वामींच्या भूमिकेला न्याय दिला.

आता निवड करायची होती नास्तिक राघव शास्त्रीची. थोडाही विचार न करता मी गश्‍मीर महाजनीची निवड केली- कारण पूर्वी माझ्या "पुरुषार्थ' या एकांकिकेत गश्‍मीरनं अप्रतिम अभिनय करून अभिनयाची बक्षिसंही घेतली होती. दोन मुख्य अभिनेते झाल्यानं पन्नास टक्के ओझं हलकं झालं होतं. त्यानंतर आपोआपच माणसं जोडत गेली आणि योगायोगानं सगळेच स्वामीभक्त. गिरिजा जोशी, निवेदिता सराफ, महेश मांजरेकर, सुनील बर्वे, सुशांत शेलार, रवींद्र महाजनी, प्रमोद पवार, आदेश बांदेकर, संदीप पाठक, प्रसाद ओक, सुनील अभ्यंकर, देवेंद्र गायकवाड, हृषिकेश देशपांडे, किरण यज्ञोपवित, आर्या घारे, पिट्या म्हणजे रमेश परदेशी आणि स्नेहल तरडे सगळ्यांनीच भूमिकेला असा काही न्याय दिला, की जणू काही त्या त्या भूमिका त्यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या होत्या..

प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली, तेव्हा माझ्या लक्षात आलं ः ""अरे बाप रे! आपण नक्की काय काय लिहून ठेवलंय.'' कारण हा एकमेव असा मराठी चित्रपट होता, ज्याचं शूटिंग भारतातल्या चार राज्यांमध्ये होणार होतं. महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. सव्वाशेपेक्षा जास्त कलाकार आणि तंत्रज्ञांची टीम साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास न थांबता करणार होती. सलग साठ दिवस न थांबता न थकता आम्ही शूटिंग पूर्ण केलं. अक्कलकोट, गाणगापूर, पीठापूर, कुरवपूर, नरसोबाची वाडी, दिंडोरी या ठिकाणांवर शूटिंग करताकरता कळत नकळत माझ्यासारख्या नास्तिकाचीसुद्धा परिक्रमा पूर्ण झाली. कुरवपूरला भल्या पहाटे कृष्णेच्या पात्रात आम्ही वीस छोट्या होड्यांमधून दोनशे लोक उतरवले होते. गाणगापूरला संपूर्ण टीमनं गुरुचरित्राचं पारायण केलं. अक्कलकोटमधली ती महाआरती भारावून टाकणारी होती. खरंच या सगळ्या प्रवासात नास्तिक राघव शास्त्रीला अस्तिक करताकरता नास्तिक प्रवीण तरडेचा अस्तिक प्रवीण कधी झाला हे त्या स्वामींनाच माहीत. तेव्हापासून माझ्या मनात आणि घरातल्या देव्हाऱ्यात स्वामी जे आले ते कायमचेच.

चित्रपटाच्या यशात माझ्याइतकाच प्रणीत कुलकर्णीचासुद्धा वाटा आहे. संगीतकार नरेंद्र भिडे आणि रोहित नागभिडेच्या संगीत दिग्दर्शनानं तर कमालच केली. प्रेक्षकांच्या मनात घर केलेली गीतं स्वत: प्रणीतनं लिहिलीयेत. उमेश जाधवचं नृत्यदिग्दर्शन ही खूप जमेची बाजू. प्रशांत मिसळेचं छायाचित्रण, मयूर हरदासचं संकलन, महेश बराटेनं केलेली स्वामींची रंगभूषा, सोनिया सहस्रबुद्धेनं केलेली वेशभूषा, राम खाटमोडे आणि विनोद वनवेचं दिग्दर्शन साह्य, विशाल चांदणेनं सांभाळलेली निर्मितीव्यवस्था या गोष्टी आजही प्रेक्षकांना या चित्रपटाच्या प्रेमात पडायला भाग पाडतात. इंडियन मॅजिक आयच्या टीमनं प्रसिद्धीसाठी घेतलेले कष्ट चित्रपटाला जगभर घेऊन गेले. गणेश निभे यांचं प्रस्तुतकर्ता म्हणून लाभलेलं योगदानसुद्धा लाखमोलाचं ठरलं. नाशिकच्या गुरुमाऊलींच्या गुरुपीठात शेवटचा सीन चित्रीत केला, तेव्हा दहा हजार स्वामीभक्त तिथं उपस्थित होते. तिथं प्रत्येकाच्या मनात जे स्वामीप्रेम होतं, तेच त्यांच्या चेहऱ्यावर आलं म्हणून हे सगळं इतकं खरं वाटतंय.
या चित्रपटाच्या निमित्तानं चार राज्यांमधे फिरताना लक्षात आलं, की चित्रपट नावाच्या प्रकारानं आपला अख्खा देश किती घट्ट बांधून ठेवलाय! आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये तर आम्ही काय म्हणतोय ते त्यांना आणि ते काय म्हणतायेत हे आम्हाला काहीच कळत नव्हतं... तरीही चित्रपट पूर्ण झाला तो फक्त चित्रपट या एका एकसंध भावनेमुळंच.

चित्रपट जितका लेखक-दिग्दर्शकाचा असतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट तो निर्मात्याचा असतो. त्यामुळं तुमचा निर्माता किती खंबीर यावरच त्या चित्रपटाचं यशापयश अवलंबून असतं. निर्माता मनानं आणि शरीरानंसुद्धा त्या निर्मितीत सहभागी असला पाहिजे. कैलास वाणी यांच्यासारखा निर्माता आम्हाला मिळाला. आम्हाला जे जे हवं ते ते शेवटपर्यंत मिळत गेलं, म्हणून 24 फेब्रुवारी 2015 ला चित्रपटाचं काम सुरू झालं आणि तो 31 जुलै 2015 ला प्रदर्शित झाला. अवघ्या पाच महिन्यांत चित्रपट लिहून, दिग्दर्शित करून प्रदर्शितसुद्धा झाला. आमचा पहिलाच चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हाऊसफुल ठरला. "बाहुबली', "बजरंगी भाईजान' आणि "दृश्‍यम'सारखे तगडे हिंदी चित्रपट असतानाही "देऊळ बंद' नऊ आठवडे चित्रपटगृहात पाय रोवून उभा होता. महाराष्ट्राबरोबरच जगातल्या अनेक देशांतही तो प्रदर्शित झाला. संपूर्ण चित्रपटात कुठंही देव देवपणाचा बाऊ केला गेलेला नाही. अध्यात्म आणि विज्ञानाची जास्तीत जास्त सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला, असं मला अणि प्रणीतला नेहमी वाटतं..

आपल्या प्रत्येकाच्याच मनात अस्तिक आणि नास्तिकतेचा लढा सतत सुरू असतो. दोन्हींचा मेळ साधता आला पाहिजे. श्रद्धा चुकून अंधश्रद्धा झाली, तर मग याहून वाईट दुसरं काही नाही. दोन्हींचा मेळ साधता आला, तर तुम्हीसुद्धा त्या अनादी अनंत ब्रह्मांडनायकाचे एक अंश होऊन जाता.. "देऊळ बंद'नं मला खूप काही दिलं. आज माझ्या "मुळशी पॅटर्न'ला जे काही भरघोस यश मिळालंय, त्याचा पाया "देऊळ बंद'च्या प्रामाणिक प्रयत्नात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com