असा घडला 'फर्जंद'चा मरत्या रामोशी (प्रवीण तरडे)

प्रवीण तरडे pravin.writer@gmail.com
रविवार, 31 मार्च 2019

एक दिवस या शंभर किलो वजनाच्या लेखकाला दिग्पाल लांजेकर नावाच्या दुसऱ्या एका लेखकाचा फोन आला ः ""अरे प्रवीण, मी "फर्जंद' नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट लिहिलाय. त्यात मी खास तुझ्यासाठी एक पात्र लिहिलंय मरत्या रामोशी नावाचं.'' फोन ठेवल्यानंतर मी उठलो आणि तयारीला लागायचं ठरवलं. पूर्वी कोल्हापूरला तालमीत असताना एका दमात एक हजार जोर मारायचो मी, मग त्याच अनुभवाच्या जोरावर मी जोर मारायला सुरवात केली... एका दमात एक जोर गेला... तसाच उठलो आणि दिग्पालला नकार देण्यासाठी फोन उचलला. फोन करणार, तेवढ्यात मला आठवला माझा जुना मित्र "मिस्टर इंडिया' महेश हगवणे!

एक दिवस या शंभर किलो वजनाच्या लेखकाला दिग्पाल लांजेकर नावाच्या दुसऱ्या एका लेखकाचा फोन आला ः ""अरे प्रवीण, मी "फर्जंद' नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट लिहिलाय. त्यात मी खास तुझ्यासाठी एक पात्र लिहिलंय मरत्या रामोशी नावाचं.'' फोन ठेवल्यानंतर मी उठलो आणि तयारीला लागायचं ठरवलं. पूर्वी कोल्हापूरला तालमीत असताना एका दमात एक हजार जोर मारायचो मी, मग त्याच अनुभवाच्या जोरावर मी जोर मारायला सुरवात केली... एका दमात एक जोर गेला... तसाच उठलो आणि दिग्पालला नकार देण्यासाठी फोन उचलला. फोन करणार, तेवढ्यात मला आठवला माझा जुना मित्र "मिस्टर इंडिया' महेश हगवणे! फोन उचलला होताच मी; पण अचानक दिग्पालऐवजी महेशला लावला...

खरं तर राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळं माझी शरीरयष्टी तशी उत्तमच होती; परंतु "कुंकू', "पिंजरा', "तुझं माझं जमेना', "अनुपमा', "असे हे कन्यादान' आणि अशा कितीतरी सिरियल्सचे चार एक हजार एपिसोड आणि नंतर सहा-सात चित्रपट, शिवाय कित्येक इव्हेंट्‌स यांचं लेखन एका जागी बसून करताकरता माझं शरीर जवळजवळ चुरमुऱ्याचं पोतं झालं होतं. वजन झालं होतं शंभर किलो. यशवंतराव मोहिते महाविद्यालयात असताना कबड्डी आणि सॉफ्टबॉलचा राष्ट्रीय खेळाडू होतो मी. आमचे क्रीडा विभागाचे सुनील पवार सर बांबू तासावा तसे मैदानावर तासायचे आम्हाला. त्यामुळं कमावलेली शरीरयष्टी दिसायचीसुद्धा. मात्र, पुढं नंतर पोटापाण्याचा प्रश्‍न सांभाळण्यासाठी मला रोज पंधरा-सोळा तास लिखाण करणं गरजेचंच होतं. सलग सात वर्षं मी हेच करत होतो आणि या जगण्याचीसुद्धा इतकी सवय झाली होती, की याच्या पलीकडं पण काहीतरी असतं, हे मी पूर्ण विसरून गेलो होतो. त्यावेळी स्नेहल म्हणजे माझी पत्नी उठता बसता मला टोमणे मारायची ः ""अरे, तुझी व्यायामाची आवड आणि चारचौघांत उठून दिसणारी शरीरयष्टी बघून "हो' म्हणाले होते मी तुला आणि आता हा असला ढेरपोट्या नवरा नशिबात आलाय माझ्या. माझे सगळे नातेवाईक हसतात मला..'' बरं, हे सगळं गमतीत नाही, तर खरंच वैतागून बोलायची ती. मी तिच्या या टोमण्यांकडं सरळ दुर्लक्ष करायचो आणि माझं लिखाण खाली मुंडी घालून चालूच ठेवायचो. कारण महिन्याची एक तारीख आली, की हीच सगळे हिशेब माझ्यासमोर ठेवून बसायची. त्यामुळं, अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसायचा तसे मला दिवसाला तीन एपिसोड्‌स दिसायचे. त्यामुळं वजन आता शंभरवरून एकशे पाचच्या दिशेनं सरकू लागलं होतं; पण मला त्याची फिकीर नव्हती... आणि का असावी? मी अभिनेता थोडाच होतो?- मी तर सिरियलचा लेखक होतो- ज्याला कुठल्याही भावना नसतात..त्याच्याकडं असतात फक्त वेदना. त्यासुद्धा स्वत:वर न घेता तो त्या प्रेक्षकांच्या माथी मारत असतो. मीसुद्धा तेच करत होतो- अगदी इमानेइतबारे.

...आणि एक दिवस या शंभर किलो वजनाच्या लेखकाला दिग्पाल लांजेकर नावाच्या दुसऱ्या एका लेखकाचा फोन आला ः ""अरे प्रवीण, मी "फर्जंद' नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट लिहिलाय. त्यात मी खास तुझ्यासाठी एक पात्र लिहिलंय मरत्या रामोशी नावाचं.'' मी केलेल्या काही तरी विनोदावर तो हसला; पण त्याच्या हसण्यात एक प्रकारचा आत्मविश्‍वास होता, की फक्त मीच ते पात्र उत्तम साकारू शकतो. कारण त्याला सात-आठ वर्षांपूर्वीचा प्रवीण तरडे आठवत होता. मधल्या काळात आम्ही एकमेकांना भेटलोसुद्धा नव्हतो. मी फोनवर त्याला माझ्या वजनाबद्दल काही जाणवूसुद्धा दिलं नाही. फक्त त्याला थोडं विश्‍वासात घेत मी म्हणालो ः ""काय करतो हा मरत्या रामोशी त्या चित्रपटात?'' तो म्हणाला ः ""धमाल करतो. घोडा चालवतो, दोन हातांनी कुऱ्हाडी फिरवतो, उंच उंच उड्या मारतो, शत्रूच्या मागं जोरात पळतो...'' हे सगळं तो फोनवर बोलत असतानासुद्धा मला बसल्या जागी धाप लागल्यासारखं झालं... पण दाखवणार कसं ना? कारण इतक्‍या वर्षांत पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी लिहिलं होतं. त्यामुळं उसनं अवसान आणून मी त्याला एवढंच विचारलं ः ""किती दिवस आहेत अजून शूटिंगला?'' तो म्हणाला ः ""चार महिने.'' मी त्याला ""हो'' म्हणालो आणि त्यानं फोन ठेवला.

फोन ठेवल्यानंतर मी विचार करू लागलो ः "जर शंभर किलोचं ओझं एखाद्या घोड्याच्या पाठीवर ठेवलं, तर ते फेकून देण्यासाठी तो घोडा काय काय प्रयत्न करेल?' या भीतीनंच मी उठलो आणि तयारीला लागायचं ठरवलं. पूर्वी कोल्हापूरला तालमीत असताना एका दमात एक हजार जोर मारायचो मी, मग त्याच अनुभवाच्या जोरावर मी जोर मारायला सुरवात केली... एका दमात एक जोर गेला... तसाच उठलो आणि दिग्पालला नकार देण्यासाठी फोन उचलला. फोन करणार, तेवढ्यात मला आठवला माझा जुना मित्र मिस्टर इंडिया महेश हगवणे! एक अत्यंत शिस्तबद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीनं व्यायाम शिकवणारा माणूस. फोन उचलला होताच मी; पण अचानक दिग्पालऐवजी महेशला लावला ः ""महेश, मला उद्यापासून व्यायामाला सुरवात करायचीय. चार महिन्यांनी एका चित्रपटाचं शूटिंग आहे.'' तो म्हणाला ः ""व्यायाम उद्यापासून कधीच सुरू होत नाही- व्यायाम फक्त आजपासूनच सुरू होतो.. त्यामुळं दुपारी चार वाजता सातारा रोड गोल्ड जिमला हजर राहा...''

मी जिममध्ये होतो आणि समोर उभा महेश माझ्या त्या "कमनीय' देहाकडं पाहून फक्त हसत होता. तो म्हणाला ः ""फक्त व्यायामाच्या जीवावर चार महिने नाही- चार वर्षं लागतील. रिझल्ट चार महिन्यांत हवा असेल, तर व्यायामाबरोबर आहार बदलावा लागेल, झोपण्या-उठण्याच्या वेळा बदलाव्या लागतील..'' आणि मग महेशनं बोलवून घेतलं व्यायामाच्या दुनियेतल्या आणखी एका जादूगाराला- ज्याचं नाव होतं श्रीपाद चव्हाण. तुमचा आहार कसा असावा हे ठरवणारा डाएटिशियन. महिन्याला पाच किलो कमी करणं आणि त्याचबरोबर ऐतिहासिक काळाला शोभेल असं शरीर तयार करणं हे ध्येय होतं आमच्या तिघांसमोर आणि हातात होते अवघे चार महिने. खूप वर्षांनी समोर काहीतरी ध्येय आलं होतं. शिवाय पत्नीच्या टोमण्यांना उत्तर देण्याची नामी संधीसुद्धा चालून आली होती. सर्वप्रथम ठरलं, की रोज आठ तास झोपायचंच- जे सिरियल्सच्या लेखकाला शक्‍य नसतं. नंतर ठरलं, की मीठ, साखर, भात, भाकरी, तेलकट, तूपकट सगळं बंद! "देऊळबंद' साकार करताना मला जेवढा त्रास नव्हता झाला, तेवढा हे सगळं बंद करताना झाला. जमेची बाजू एकच होती, की मला कुठलंही व्यसन नसल्यामुळं हे सगळं कमी त्रासांत पार पडलं.

सुरवातीला मला झेपेल तसं सुरू झालेलं हे व्यायामाचं प्रकरण नंतर महेश आणि श्रीपादला पाहिजे तसं पुढं जाऊ लागलं. व्यायाम आता एक तासावरून दोन तास झाला. दिवसातून पाच वेळा खाणं सुरू झालं. त्यात अंडी आणि मांसाहाराचा समावेश होता. याला म्हणतात "दुष्काळात तेरावा महिना' कारण स्नेहलला मांसाहार अजिबातच चालत नाही, त्यामुळं घरात काही करण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यामुळं रोज माझं सगळं जेवण मी स्वत:च ऑफिसवर बनवू लागलो. जेवणात मीठ नाही- त्यात ते मी बनवलेलं... एकंदरीतच सगळं भयंकर चालू होतं. श्रीपाद रोज काय खाल्लं याचा फोटो पाठवायला सांगायचा. महेश त्याच्यापेक्षा भयंकर होता- तो म्हणायचा ः ""फोटो नको, खातानाचा व्हिडिओ पाठव..'' नंतर म्हणू लागला ः ""लाइव्ह व्हिडिओ पाठव.''... एकंदरीत कशालाच "चव' राहिली नव्हती..
पहिल्या महिन्यात खरंच माझं वजन पाच किलो कमी झालं होतं. ते व्यायामामुळं का मी स्वतः बनवलेलं खाल्ल्यामुळं हे काही मला कळत नव्हतं.

दुसऱ्या महिन्यात व्यायामाचे आणखी भयंकर प्रकार सुरू झाले. त्याला "सुपरसेट' असं म्हणतात. "मिस्टर इंडिया' महेश हगवणे मला किमान "मिस्टर पुणे' तरी करून सोडणार असंच मला वाटू लागलं. त्यात हे दोघं कमी की काय म्हणून आणखी एक तिसरा राक्षस माझ्या मागं लागला. त्याचं नाव निखिल लांजेकर- दिग्पालचा लहान भाऊ- "फर्जंद' सिनेमाचा फाईटमास्टर. दोन तास व्यायाम झाला, की पुढचे दोन तास हा कुऱ्हाड चालवायला शिकवायचा. लहानपणीच्या लाकूडतोड्याच्या गोष्टीतली कुऱ्हाड पुढं इतका त्रास देईल असा विचारसुद्धा कधी मनात आला नव्हता. मी, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर कोणालाच सुट्टी नव्हती. दोन तास प्रॅक्‍टिस म्हणजे प्रॅक्‍टिस! "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'च्या सुद्धा पुढं जाऊन काहीतरी भयंकर माझ्याबाबतीत चालू होतं. एवढं सगळं घामरूपी तेल गाळल्यानंतर घरी येउन "मराठी सिरियल्सचा गाळीव इतिहास' मला लिहावा लागतच होता. सिरियल्समधल्या महिला आता भांडणं करण्याऐवजी व्यायाम करू लागतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; पण खूप त्रास होणारं हे सगळं आता मला आवडू लागलं होतं! चार महिने पूर्ण झाले होते आणि शंभर किलो वजनाचा प्रवीण तरडे ऐंशी किलो वजनाचा झाला होता. दिग्पालला पाहिजे तसं शरीर आणि अपेक्षित चपळाई देण्यात मी यशस्वी झालो होतो. खरंतर मी नाही, तर महेश आणि श्रीपाद यशस्वी झाले होते.

जर कोणाच्या मनात "मी उद्यापासून व्यायाम सुरू करू का?' असा विचार असेल, तर लक्षात ठेवा ः व्यायाम कधीच "उद्या'पासून सुरू होत नाही. तो फक्त "आज'पासूनच सुरू होतो. "फर्जंद'चा मरत्या रामोशी पाहिल्यानंतर हे नक्कीच तुमच्या लक्षात येइल. फक्त ध्येय देणारा कोणीतरी दिग्पाल लागतो आणि ते पूर्ण करून घेणारे महेश आणि श्रीपादसारखे मित्र...आपण फक्त ते सांगतील ते करत राहायचं इतकंच!

Web Title: pravin tarde write entertainment movie article in saptarang