'फकिरा'चं स्वप्न... (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. माझ्या खिशात पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात उभं राहण्याचं बळ दिलं, लढण्याची जिद्द दिली.

एक छान नातं तयार झालं होतं माझं "सप्तरंग'च्या वाचकांशी आणि ते पुढंही तसंच राहील यात शंका नाही. हा आजचा शेवटचा लेख. कळत नकळत का होईना, मी तुमचा झालोय. माझ्या मालिका, चित्रपटांवर तुम्ही प्रेम केलंच आहे; पण वर्तमानपत्रात असं काही तरी लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ. तिलादेखील तुम्ही स्वीकारलंत. लेख वाचून मला येणाऱ्या फोनवरून तरी असंच वाटतंय. त्यामुळं शेवटचा लेख काय असावा याबद्दल मी बराच विचार करत होतो. माझ्या यशस्वी झालेल्या कलाकृतींबद्दल आपण भरभरून बोललोच आहे; पण आज सांगणार आहे माझ्या अर्धवट राहिलेल्या एका स्वप्नाविषयी. मला खूप प्रेरणा देणारं हे स्वप्न म्हणजे अण्णा भाऊ साठे यांची "फकिरा' कांदबरी.

सन 2007 मध्ये किरण यज्ञोपवितचं "मनोमिलन' नावाचं नाटक करत होतो मी. त्यातली माझी रांगडी भूमिका खूपच आवडायची लोकांना. त्याच नाटकाच्या दरम्यान किरण अण्णा भाऊ साठे यांच्या "फकिरा' कादंबरीवर चित्रपट लिहीत होता. साहजिकच "फकिरा' कांदबरीवर चित्रपट येणार म्हणजे एकच उत्सुकता होती- फकिरा कोण असणार? हजारो मुलांच्या ऑडिशन झाल्या त्या चित्रपटासाठी. कुठून तरी उडतउडत ही बातमी माझ्या कानावर आली आणि मी थेट दिग्दर्शक सुनील नाईक यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. सांगितलं ते ते सगळं केलं. सुनील नाईक यांच्याकडं दिग्दर्शनाचं कसब अप्रतिम होते. तांत्रिक हुकमतसुद्धा चांगली होती. त्यानं मला सांगितलं ः फकिरा म्हणजे कुरळे केस तुला केस वाढवावे लागतील. हे आत्ताचे जे कुरळे केस माझ्या डोक्‍यावर दिसत आहेत आणि जी माझी ओळखसुद्धा झालीये, ती या "फकिरा' चित्रपटाची देणगी आहे. कारण त्याआधी मी कधीच केस वाढवले नव्हते. मिलिटरी कट असायचा माझा; पण मी "फकिरा'साठी ऑडिशन दिली, तेव्हाच मला माहीत होतं, की आपणच या भूमिकेसाठी निवडले जाणार- कारण फकिरा मी फक्त वाचला नव्हता, तर मी फकिरा जगला होता. एक तर अण्णा भाऊ साठे यांच्या सगळ्याच कादंबऱ्या मी झपाटल्यासारख्या वाचल्यात. त्यातला हा फकिरा नेहमीच मला आकर्षित करायचा. जगाला रॉबिनहूडचं कितीही कौतुक असलं, तरी त्या रॉबिनहूडलाही मागं टाकेल असं कर्तृत्व आपल्या फकिराचं. प्रत्येक प्रसंग अंगावर काटा आणणारा आणि शेवट तर डोळ्यांतून घळाघळा पाणी काढणारा. अजून काय हवं असतं एका यशस्वी चित्रपटाला? किरण यज्ञोपवितनं कथेची ताकद ओळखली होती आणि म्हणूनच मूळ कथेला कुठंही धक्का न लावता त्यानं एक अप्रतिम चित्रपट लिहिला होता..

ज्यांचं नुकतंच निधन झाले ते चारूदत्त दुखंडे छायाचित्रणाची जबाबदारी संभाळत होते. मला पाहताच क्षणी ते म्हणाले ः ""अरे, हा तर खरंच फकिरा वाटतोय.'' कारण फकिरासाठी मी शरीरही तसंच कमावलं होतं. बारा वर्षं झाली या घटनेला. आत्ता "फर्जंद'साठी शरीर कमवायचं होतं, तेव्हा वाट्टेल तेवढा खर्च करायची माझी तयारी होती आणि मी केलासुद्धा. मात्र, बारा वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. आर्थिक अवस्था खूपच बिकट होती माझी. तेव्हा मी एसपी कॉलेजसमोर कोकाटे बिल्डिंगमध्ये कॉट बेसिसवर राहत होतो. कसंबसं भाडं जमवण्यासाठी माझी कसरत चालायची. सदशिव पेठेतल्या शेडगेआळीमध्ये तेव्हा मी एक वेळच मेस लावली होती- कारण तेवढेच पैसे असायचे माझ्याकडं. माझ्या दृष्टीनं दुष्काळात तेरावा महिना उजाडला होता. कारन शरीरयष्टी कमवायची म्हणजे प्रचंड खर्च आला. सिटी क्‍लब नावाच्या जिममध्ये होते तेवढे पैसे भरून प्रवेश घेतला. त्या वेळचे जिमचे मार्गदर्शक सचिन सावंत यांच्याकडून सांगण्यात आलं, की दिवसाला बारा-पंधरा अंडी आणि ते महागडे प्रोटिनचे डबे हे सगळं करावं लागेल. बाकी सगळं प्रशिक्षण सचिन सावंत मला मोफत द्यायला तयार झाले; पण लागणाऱ्या या महागड्या आहाराचं काय? खिशात पैसे नाही आणि महिन्याला कमीत कमी आठ-दहा हजार रुपये खर्च येणार होता. अण्णा भाऊंचा "फकिरा' अत्यंत देखण्या शरीरयष्टीचा होता. त्याच्या दिसण्याचं वर्णन वाचतानाही अंगावर काटा येतो. मला तर तो प्रत्यक्षात आणायचा होता. त्या काळी जेवढं काम करायचो, त्याच्या दुप्पट करू लागलो तरी हातात म्हणावं तसे पैसे येत नव्हते. मी तेव्हा थिएटर ऍकेडमीमध्ये काम करायचो. थिएटर ऍकेडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी मला बरीच आर्थिक मदत त्या काळात केली. शिवाय न्युक्‍लिअस प्रोटिनचे संस्थापक विजय चव्हाण यांनी प्रोटिनसारख्या महागड्या प्रकारात मला संपूर्ण सहकार्य केलं.

या सगळ्या भल्या माणसांमुळं आता आर्थिक अडचणी दूर झाल्या होत्या आणि मला आता फक्त मेहनत घ्यायची होती. मी साताऱ्याला फकिराचे सध्याचे जे नातेवाईक आहेत, त्यांना जाऊन भेटलो. हे कुटुंब अजूनही लोककला जिवंत ठेवून आहे. त्यांच्यात राहून त्यांच्याकडून फकिरा समजावून घेतला. व्यायामानं मी शरीर कमावलं; पण घोडेस्वारीचं काय? कारण फकिरा जेवढा प्रसिद्ध, तेवढाच त्याचा घोडाही प्रसिद्ध. गबऱ्या त्याचं नाव. मग व्यायामाच्या आधी पहाटे घोडेस्वारी सुरू केली. कोथरूडच्या निंबाळकर बागेत मी घोडेस्वारीसाठी जाऊ लागलो. निर्माता विवेक वाघ आणि प्रवीण लावंडनं त्या काळात मला एक घोडाच घेऊन दिला होता. मी रोज त्याचं सगळं करायचो. त्याला खायला घालण्यापासून त्याचा खरारा करण्यापर्यंत सगळं. उद्देश एकच, की माझी आणि त्याची चांगली मैत्री व्हावी आणि तशी त्या गबऱ्याशी माझी मैत्री झालीसुद्धा.

पुण्याजवळच्या किरकटवाडीजवळ भव्य सेट उभा करण्यात आला होता. पाहतापाहता शूटिंगला सुरवात झाली. अप्रतिम शूटिंग सुरू होतं. सगळ्यांनाच माझं काम आवडत होतं. सगळ्यांकडूनच माझ्या अभिनयाचं कौतुक चालू होतं. या चित्रपटानंतर आपले या क्षेत्रातले कष्टाचे दिवस संपणार आणि काही तरी चांगलं सुरू होणार अशी स्वप्नं मी रंगवत होतो. माझ्यासाठी आता आभाळ फक्त दोन बोटं दूर राहिलं होतं.
मात्र, सगळं छान चालू असतानाच अचानक 14 एप्रिल 2007 ला खूप पाऊस झाला- ज्यामधे आमचा अख्खा सेट वाहून गेला. खूप खर्च करून चार-पाच दिवसांनी सेट पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. यावेळी तो पाऊस सेटवर नाही, तर माझ्या स्वप्नांवर पडला. त्यानंतर शूटिंग थांबलं ते कायमचंच. निर्मात्याला खूप आर्थिक अडचणी आल्या आणि शेवटी चित्रपट कायमचाच थांबवण्याच त्यानं निर्णय घेतला..

चित्रपट थांबला; पण मी पूर्णपणे फकिरा झालो होतो. फक्त शरीरानं नाही, तर मनानंही. अण्णा भाऊंचा हा फकिरा काहीही झालं, तरी कधी हार मानायचा नाही. जे पाहिजे त्यासाठी लढायचा. जिंकत नाही तोपर्यंत लढायचा. अण्णा भाऊंच्या सगळ्याच कांदबऱ्या तुम्हाला शून्यातून उभं राहण्याचं बळ देतात. "वारणेच्या खोऱ्यात', "चित्रा', "माकडीचा माळ', "वैजंयता', "आवडी', "चंदन' या सगळ्याच कांदबऱ्या माणूस म्हणून तुम्हाला समृद्ध करतात. मलाही केलं. फकिरा पूर्ण झाला नाही; पण मी मात्र फकिरामुळं परिपूर्ण झालो. कष्टांची सवय लागली. टोकाच्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळ मिळालं.

आज अनेक पुरस्कार मिळतात, तेव्हा मला वाटतं, की "फकिरा'साठी मला अभिनयाचा पुरस्कार नक्कीच मिळाला असता. मी किरण यज्ञोपवितला जेव्हा भेटतो, तेव्हा आमच्यात "फकिरा'वर किमान पाच मिनिटं तरी गप्पा होतात. सध्या या कादंबरीचे हक्क विवेक वाघकडंच आहेत. कधी त्यानं इच्छा दाखवली, तर आता या चित्रपटासाठी लागेल तो खर्च करण्याची माझी तयारी आहे- कारण माझ्या खिशात बारा अंडी घेण्याएवढेसुद्धा पैसे नव्हते, तेव्हा या चित्रपटानं मला समाजात उभं राहण्याचं बळ दिलं, लढण्याची जिद्द दिली.

"रेगे', "देऊळबंद', "मुळशी पॅटर्न' या माझ्या चित्रपटांनी मला खूप यश दिलं, पैसा आणि प्रसिद्धीसुद्धा दिली; पण "फकिरा'नं मला हे चित्रपट करण्याचं बळ दिलं. चित्रपट नावाच्या सुंदर गोष्टीशी माझी जवळीक फकिरामुळं झाली. म्हणूनच फकिरा मला आजही खुणावतो. किरण आणि विवेकला मी सांगितलंयसुद्धा- तुम्ही हा चित्रपट कधीही करा; पण फकिरा मीच पाहिजे... कारण फकिरा माझ्यासाठी पुस्तकातलं एक पात्रं नाहीये. फकिरा माझ्यासाठी एक अर्धवट राहिलेलं स्वप्नं आहे. रोज सकाळी आरशासमोर माझे हे कुरळे केस पाहतो, तेव्हा क्षणभरासाठी का होईना मला फकिरा माझ्यात दिसतोच. तो माझ्याकडं पाहून हसतो आणि म्हणतो ः "यंदा तरी जत्रेतली जोगीण आपण आणायचीच.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com