एका गाण्याची 'खतरनाक' कथा (प्रवीण तरडे)

प्रवीण तरडे pravin.writer@gmail.com
रविवार, 7 एप्रिल 2019

गाणं जवळजवळ तयार झालं होतं; पण बजेटअभावी कुठलीही महागडी हिरॉईन आम्हाला परवडू शकत नव्हती. म्हणून शेवटी ज्याचा "बड्डे' आहे तोच भाई नाचेल असा निर्णय झाला. अर्थात तो भाई स्वत: मीच होतो- कारण फुकटात येईल असा एकटा मीच राहिलो होतो... आणि ज्या क्षणी मी या चित्रपटात नाचणार हे आमच्या बुद्धिमान संगीतकाराला कळलं, तसं त्याच्या सुपीक डोक्‍यातून विचार आला ः ""अरे, प्रवीण अनायसे गाण्यात आहेच, तर सुरवातीला त्याचीच "खतरनाक' ही लाईन वापरू की?'' आणि अशा तऱ्हेनं "अरा रा रा रा खतरनाक ऽऽऽऽऽऽ' अशा एका "हिट' गाण्याचा जन्म झाला...

गाणं जवळजवळ तयार झालं होतं; पण बजेटअभावी कुठलीही महागडी हिरॉईन आम्हाला परवडू शकत नव्हती. म्हणून शेवटी ज्याचा "बड्डे' आहे तोच भाई नाचेल असा निर्णय झाला. अर्थात तो भाई स्वत: मीच होतो- कारण फुकटात येईल असा एकटा मीच राहिलो होतो... आणि ज्या क्षणी मी या चित्रपटात नाचणार हे आमच्या बुद्धिमान संगीतकाराला कळलं, तसं त्याच्या सुपीक डोक्‍यातून विचार आला ः ""अरे, प्रवीण अनायसे गाण्यात आहेच, तर सुरवातीला त्याचीच "खतरनाक' ही लाईन वापरू की?'' आणि अशा तऱ्हेनं "अरा रा रा रा खतरनाक ऽऽऽऽऽऽ' अशा एका "हिट' गाण्याचा जन्म झाला...

आज सकाळीच आश्‍विनी तेरणीकरचा मेसेज आला ः ""प्रवीण, "मुळशी पॅटर्न'मधल्या आपल्या खतरनाक गाण्याला युट्युबवर 2.1 कोटी (21 मिलिअन) व्ह्यूज मिळाले.'' एखाद्या मराठी चित्रपटाचं गाणं इतक्‍या लोकांनी पाहावं, ही खूप मोठी गोष्ट. खरंतर जास्त लोकांनीसुद्धा पाहिलं असेल; पण नोंद घ्यावी असा खराखुरा आकडा 21 मिलियन नक्की आहे. खात्री नसेल, तर चिकित्सक वाचकांनी तो यूट्युबवर जाऊन पाहावा. सकाळी सकाळी आलेल्या आश्‍विनीच्या या एका मेसेजमुळं मी थेट दहा वर्षं मागं गेलो. नव्या पुस्तकाची पानं उलटताना काळ मागं जातो, तसा मी दहा वर्षं मागं गेलो..

"खतरनाक' शब्दाचा शब्दकोशातला नक्की अर्थ काय ते मला आजही माहीत नाही. माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचं एक जबरदस्त माध्यम म्हणजे हा शब्द. काही आवडलं तर ते "खतरनाक भारी' असतं, नाही आवडलं, तर "खतरनाक फालतू.' बायकोकडे पाहून "तू सुंदर आहेस' म्हटल्याचं मला आठवत नाही- ती "खतरनाक सुंदर' असते. आईच्या कटाच्या आमटीला "खतरनाक चव' असते, तर पिट्या, दया, एक्‍क्‍या, राया, सुक्‍या, अभ्या, हृष्या- आमची दोस्ती "खतरनाक घट्ट' आहे... असा हा खतरनाक शब्द. दह्यात साखर विरघळून त्याचं तीर्थ व्हावं, तसा माझ्या तोंडात विरघळून तो माझाच एक अंश झालाय. अर्थात तो माझ्या आणि या माझ्या जवळच्या माणसांव्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हता. त्याला सार्वजनिक करण्याचं श्रेय आमचे मित्रवर्य डॉ. नीलेश साबळे यांना जातं. आम्ही एकत्र राहायचो, त्या काळात या अवलिया कलाकारानं तो "खतरनाक' पद्धतीनं टिपला आणि "खतरनाक व्हायरल' केला.

या सगळ्या "खतरनाक' प्रकरणानं प्रसिद्धीचा किंवा कुप्रसिद्धीचा कळस तेव्हा गाठला- जेव्हा मी माझ्या मुलाच्या अभ्यासाच्या वहीवर "परार्ध खतरनाक प्रवीण तरडे' असं पूर्ण नाव वाचलं. देवाशपथ सांगतो, ते वाचून क्षणभरासाठी मी अक्षरश: अवाक्‌ झालो होतो. मात्र, ना मी मुलावर चिडू शकत होतो, ना डॉ. साबळेवर. आता जे जे घडतंय ते ते पाहत राहण्यापलीकडं मज पामराच्या हातात काहीही राहिलं नव्हतं. व्यायामाला चाललो असेन, तर बसमधून मुलं "खतरनाक' म्हणून ओरडतात. एखादी आज्जी किंवा आजोबा प्रेमानं "काय रे खतरनाक कसा आहेस?' अशी विचारपूस करतात. एका चॅनेलकडून तर "प्रवीणजी, तुम्हाला घेऊन आपण "अरारारा खतरनाक' नावाचा रियॅलिटी शो करू,' अशी ऑफरसुद्धा आलीये. आता फक्त जन्मदात्या आईनं चेहऱ्यावरून हात फिरवत "माझं खतरनाक लेकरू गं ते' एवढंच म्हणायचं राहिलंय!! गेली दहा वर्षं माझ्या आयुष्यात चाललेलं असं हे खतरनाक पुराण.. दोन वर्षांपूर्वी ही "खतरनाक साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण' होणार आणि संपणार एकदाची असं मला वाटत असतानाच "मुळशी पॅटर्न'च्या निर्मितीला मी हात घातला. मुळात "मुळशी पॅटर्न' हे एक थरारक प्रकरण आहे ज्यावर पुढच्या लेखात आपण सविस्तर बोलूच; पण सध्या त्या सिनेमातल्या खतरनाक गाण्याचा जन्म कसा झाला ते समजून घेऊ.
संगीतकार नरेंद्र भिडे, गीतकार प्रणित कुलकर्णी आणि मी एकत्र बसून माझ्या प्रत्येक चित्रपटाची गाणी तयार करतो. म्हणजे मी अमुक एका प्रसंगाची चित्रपटातली पार्श्‍वभूमी सांगतो- मग प्रणित त्यावर गाणं लिहितो आणि नरेंद्र ते गाणं संगीतबद्ध करतो. 21 मिलियन व्ह्यूज मिळालेल्या "अरारारा खतरनाक' गाण्याचे आम्ही तिघं ब्रह्मा-विष्णू आणि महेश! चित्रपटात प्रसंग होता एका भाईचा वाढदिवस. मी म्हणालो ः ""काहीतरी धमाका हवा!'' मग काय प्रणित कुलकर्णींची लेखणी सळसळली आणि "जीएसटीचा आलाय फेरा, काळा पैसा भी होईना गोरा, अन्‌ बिल्डरच्या गाडीमध्ये कचकन्‌ घुसलाय रेरा.. अरारारा अरारारा..' असे काही "सात्त्विक शब्द' बाहेर पडले. इथपर्यंत तरी खतरनाक शब्दाचा काडीचाही संबंध या गाण्याशी नव्हता. गाणं जवळजवळ तयार झालं होतं; पण बजेटअभावी कुठलीही महागडी हिरॉईन आम्हाला परवडू शकत नव्हती. म्हणून शेवटी ज्याचा "बड्डे' आहे तोच भाई नाचेल असा निर्णय झाला. अर्थात तो भाई स्वत: मीच होतो... कारण फुकटात येईल असा एकटा मीच राहिलो होतो... आणि ज्या क्षणी मी या चित्रपटात नाचणार हे आमच्या बुद्धिमान संगीतकाराला कळलं, तसं त्याच्या सुपीक डोक्‍यातून विचार आला ः ""अरे, प्रवीण अनायसे गाण्यात आहेच, तर सुरवातीला त्याचीच "खतरनाक' ही लाईन वापरू की?'' आणि अशा तऱ्हेनं "अरा रा रा रा खतरनाक ऽऽऽऽऽऽ' अशा एका "हिट' गाण्याचा जन्म झाला. गाणं एकदाचं पूर्ण झालं. भिडेंच्या जबरदस्त संगीतसंयोजनामुळं ते श्रवणीय तर झालंच होतं; पण प्रणितच्या तिरकस शब्दरचनेमुळंही ते जास्त चर्चेत आलं. आता गरज होती एका अशा आवाजाची जो संपूर्ण महाराष्ट्राला आपला वाटेल. साहजिकच चर्चा झालीच नाही- आपोआप आदर्श शिंदेच्या नावावर एकमत झालं आणि आदर्शनंसुद्धा कुठंच कसूर म्हणून सोडली नाही. गाण्याच्या सुरवात आणि शेवटाच्या ओळी मी म्हटल्यात- बाकी आदर्श गायलाय.

माझ्या अवास्तव अपेक्षांमुळं गाण्याचा खर्च वाजवीपेक्षा जास्तच झाला. त्यात माझ्या अपुऱ्या संगीतज्ञानामुळे मी दहा-बारा वेळा नरेंद्र भिडेशी टोकाचा वादसुद्धा घातला. (जो नेहमी मीच घालतो, असं त्याचं म्हणणं आहे..) कारण त्याला वाटतं मला संगीतातलं काही कळत नाही (जे खरंच आहे..) आणि मला वाटतं त्याला कथेतलं काही कळत नाही (हेही तितकच खरं आहे..) त्यामुळं आजही कट्टी-बट्टी करतच आमचा संसार चालतो. मुक्ता भिडे, तुषार पंडित आणि संकेत धोटकर हे त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. भांडणातला अधिक थरार आणि मनोरंजन जाणून घेण्यासाठी तुम्ही त्यांना फोन करू शकता..

हळूहळू "खतरनाक' गाण्यानं मूर्त स्वरूप धारण केलं आणि आता साक्षात चित्रीकरणाची घटिका जवळ आली होती. रंभा, उर्वशी, मेनकेलाही भुरळ पडेल अशी पोज घेऊन मी नृत्यदिग्दर्शक उमेश जाधवसमोर उभा होतो. पहिल्या दहा सेकंदांतच त्याला माझ्या अचाट नृत्यज्ञानाचा अंदाज आला आणि तो हळूच माझ्या कानाजवळ येत म्हणाला ः ""अरे, किती सुंदर लेखक-दिग्दर्शक आहेस रे तू. ही नाचण्याची अवदसा तुला कुठून सुचली..?'' मग मी त्याच्या कानाजवळ जात हळूच चित्रपटाच्या बजेट प्रकरणाबद्दल सांगितलं. परिस्थितीचं गांभीर्य चाणाक्ष उमेशच्या चटकन्‌ लक्षात आलं आणि नृत्यविश्‍वातल्या सगळ्यात सोप्या स्टेप्स तो मला शिकवू लागला. गमतीचा भाग सोडा; पण खरंच मी सलाम करतो उमेश जाधवला- कारण नाचताना कोणाकडून काय आणि कसं काढून घ्यायचं हे त्याच्याइतकं दुसऱ्या कोणालाच कळत नाही. उमेश जाधवच्या रूपानं त्या दिवशी साक्षात नटराजच माझं बोट धरून मला गरागरा फिरवत होता. तो जे सांगेल ते जमत होतं. माझा तो पदन्यास पाहून आजूबाजूला नाचणारे दया, पिट्या आणि अमोल धावडे तर भारावून गेले होते. गाणं अफलातून गाजलं. कामशेतच्या एका फार्महाऊसमध्ये चारशे ते पाचशे जण दोन रात्री जवळजवळ थयथयाटच करत होते. अशक्‍य वाटणारं काहीतरी शक्‍य झालं होतं. त्यात महेश लिमयेच्या कॅमेऱ्याचा आणि मयूर हरदासच्या अचूक संकलनाचाही खूप मोठा वाटा आहे.

खरंतर गाणं त्याच्या निर्मितीपासूनच अनेक कारणांमुळे गाजलं. जीएसटी, रेरा अशा शब्दांमुळं मोदीप्रेमींना आम्ही विरोधक वाटलो, तर मोदीविरोधकांना आम्ही जवळचे! पण खरंच त्यात कोणालाच दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. शब्दांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याचा व्यावसायिक लाभ आम्ही उचलला इतकंच; पण काही असो- आज या गाण्यानं आणि चित्रपटानं खूप काही दिलं मला. कुठंही वाढदिवस असो- "अरारारा खतरनाक' हे गाणं वाजलंच पाहिजे अशी प्रथाच सुरू झालीये. वय वर्ष तीनपासून साठीपर्यंत कोणालाही हे गाणं ठेका धरायला भाग पाडतं. याचं सगळं श्रेय प्रणित, नरेंद्र, उमेश आणि महेश लिमयेचं. "भाईचा बड्डे, भाईचा बड्डे' करत प्रत्येक जण एकमेकाला "खतरनाक' शुभेच्छा देतो, तेव्हा मन भरून येतं. फक्त यातला तलवारीनं केक कापणं हा प्रसंग चित्रपटातल्या त्या पात्राला शोभून दिसायचा- तुम्हा-आम्हाला नाही!! एक-दोन वेळा पोलिसांचा फोन आला, की "तरडे, तुमच्या गाण्यामुळं ग्रुप-ग्रुपनं केक कापायला सुरवात झाली.' मग मी हळूच त्यांना काही पोलिस मित्रांनीसुद्धा वाढदिवसाला ते गाणं लावून केक कापल्याचे किस्से सांगितले. मग दोघंही हसलो. तर मित्रांनो, खतरनाक गाणं लावून केक कापा आणि दणकून नाचा- फक्त तेवढ्यासाठी तलवारीची गरज नाही, कारण केकबरोबर आलेली एक फुकटची प्लॅस्टिकची सुरीसुद्धा त्या नाजूक केकसाठी खूप झाली. तर अशा प्रकारे "खतरनाक' गाण्याची ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण' व्हावी एवढीच नटराजाच्या चरणी "खतरनाक' प्रार्थना!

Web Title: pravin tarde write movie song article in saptarang