प्रवास एका ध्यासाचा (प्रवीण तरडे)

pravin tarde
pravin tarde

नाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून टाकलं. "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये पूर्ण झाला. "पुरुषार्थ' या एकांकिकेमुळं वर्तुळ पूर्ण झालं. मात्र, हा प्रवास इतका साधा आणि सोपा नव्हता. खूप ठेचा खातखात मला तिथपर्यंत पोचावं लागलं.

माझा आणि नाटकाचा खरंतर काहीच संबध नव्हता. म्हणजे सन 1995 पर्यंत तरी नव्हता... अपवाद शाळेतल्या गॅदरिंगचा- कारण शाळेत असताना सगळेच नाटकात काम करतात किंवा करावंच लागतं. त्याचा तुमच्या आवडीनिवडीशी काहीही संबंध नसतो.. तर 1995 पर्यंत मी कधी कुठलं नाटक पाहणं तर सोडाच, साधं कुठलं नाट्यगृह आतमध्ये जाऊन पाहिलंसुद्धा नव्हतं. बालगंधर्व रंगमंदिर असलेल्या चौकात सिग्नलला थांबल्यावर बाहेरूनच झाडीत लपलेलं बालगंधर्व रंगमंदिर दिसायचं तोच काय तो अपघाती योगायोग! पण 1995 मध्ये यशवंतराव मोहिते महाविद्यालयात शिकत असताना प्रलोभन कुलकर्णी नावाच्या माझ्या वर्गमित्रानं मला पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्रॅक्‍टिसला बोलावलं आणि माझा हा नाटकाचा प्रवास सुरू झाला. बरं, त्या काळात कॉलेजमधल्या बऱ्या दिसणाऱ्या मुली या सहसा नाटकाच्या ग्रुपमधेच असायच्या- जिथं आमच्यासारख्या टग्या मुलांना प्रवेश निषिद्ध असायचा; पण त्या दिवशी प्रलोभन मुलांना प्राणी दाखवायला नेतात, तसं मला बळेबळे नाटकाची प्रॅक्‍टिस दाखवायला घेऊन गेला. मात्र, झालं उलटंच! मी त्यांना पाहण्याऐवजी ते सगळे नाटकवाले एखादा प्राणी पाहावा तसे मला पाहत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्‍न ः "हा इथं काय करतोय?' "प्रवीण आजपासून आपल्या नाटकाचं बॅकस्टेज करेल,' असं प्रलोभननं त्यांना सांगितलं, तेव्हा तर हलकल्लोळ माजला. मग प्रचंड नाराजी, रुसवेफुगवे, थोडी वादावादी आणि सरतेशेवटी कमालीच्या नाराजीच्या सुरात मला नाटकाच्या ग्रुपमध्ये घ्यायला बाकीचे तयार झाले... आणि अशा पद्धतीनं मनात काहीही इच्छा नसताना फक्त मित्राच्या इच्छेखातर माझा नाटक नावाच्या प्रांतात शिरकाव झाला. आज ज्या अनोळखी क्षेत्रात, इतरांची इच्छा नसताना आपण आलोय, तेच क्षेत्र पुढं माझी ओळख होणार आहे, असं मला त्या दिवशी जाणवलंसुद्धा नाही. खरंतर तोपर्यंत मी कबड्डी आणि सॉफ्टबॉलचा राष्ट्रीय खेळाडू होतो; पण त्या दिवशी राष्ट्रीय खेळाडू प्रवीण तरडेचा लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे झाला तो कायमचाच.

त्या वर्षी माझ्या त्या पहिल्यावहिल्या नाटकाला स्पर्धेत एकही बक्षीस मिळालं नाही; पण नाटक नावाच्या प्रकारानं मला इतकं झपाटून टाकलं, की आता पुढची एकांकिका कधी याची मी वाट पाहू लागलो. तेव्हा मला कळलं, की ही स्पर्धा वर्षातून फक्त एकदाच असते. सन 1995 मध्ये सुरू झालेला "पुरुषोत्तम करंडक जिंकायचाच' या स्वप्नाचा हा प्रवास पुढं सन 1999 मध्ये एकदाचा पूर्ण झालाच. मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली "पुरुषार्थ' ही एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली तेव्हा. खरं सांगतो, तेव्हा जो आनंद झाला होता तसा आनंद नंतर कुठलंच पारितोषिक मिळाल्यावर झाला नाही. मात्र, हा प्रवास इतका साधा आणि सोपा नव्हता. खूप ठेचा खातखात मला तिथपर्यंत पोचावं लागलं..

त्याचं असं झालं, की 1998 मध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्यामुळं नाईलाजानं मला यशवंतराव मोहिते महाविद्यालय सोडावं लागणार होतं; पण अजून पुरुषोत्तम करंडक जिंकला नव्हता त्याचं काय?- कारण "पुरुषोत्तम करंडक जिंकल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही,' अशी माझ्या मनाची पक्की धारणा झाली होती. म्हणूनच मी सन 1999 मध्ये आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. फक्त आणि फक्त पुरुषोत्तम जिंकण्यासाठी मी एक नवी पदवी घ्यायला निघालो होतो. माझ्या आधीच्या महाविद्यालयात माझा नाटकाचा संघ होता, तसाच या महाविद्यालयातसुद्धा त्यांचा संघ होताच की! त्या टीममध्ये स्थान मिळवण्यापासून धडपड सुरू केली. राजकीय पक्षात आमदारकी किंवा खासदारकीसाठीची उमेदवारी मिळवायला जेवढे कष्ट पडतात आणि त्यासाठी जेवढी जुळवाजुळव करावी लागते ना, त्यापेक्षा थोडी जास्तच तुम्हाला "पुरुषोत्तम'साठीच्या टीममध्ये जाण्यासाठी करावी लागते. त्यासाठी जे जे करावं लागतं, ते ते सर्व केलं आणि महत्प्रयासानं शेवटी आयएलएस महाविद्यालयातून मला त्या वर्षी एकांकिका करण्याची संधी मिळाली. संधी तर मिळाली; पण आता जबाबदारी होती त्या संधीचं सोनं करणारा संघ निवडण्याची!

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यावर त्यांना गरज एकापेक्षा एक बलाढ्य सरदारांची होती, तशीच मलाही हा करंडक जिंकण्यासाठी चांगल्या कलाकारांची गरज होती. पहिल्या प्रयत्नातच अभिजित मोने, केदार सोमण, नीता साठे, अमृता हर्डीकर, विशाखा साने, अश्‍विनी गोगटे, अभिषेक लागू, महेश्‍वर पाटणकर, कपिल जोशी, भानुदास नेटके असे एकापेक्षा एक दर्जेदार शिलेदार मला मिळाले आणि माझा संघ पूर्ण झाला. आता गरज होती करंडक जिंकू शकेल अशा एकांकिकेची...

पुढच्या एका आठवड्यात "सिक्वेन्स' नावाची नवी कोरी एकांकिका लिहून त्याची प्रॅक्‍टिसदेखील मी सुरू केली. सगळं छान चाललं होतं; पण नेमकं त्याच वेळी कारगिल युद्ध सुरू झालं आणि देशभर देशभक्तीची लाट आली. मी त्याचाच फायदा घेतला आणि स्पर्धेला पंधरा दिवस राहिलेले असताना "सिक्वेन्स'ची प्रॅक्‍टिस थांबवून एका रात्रीत "पुरुषार्थ' ही नवी एकांकिका लिहून पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी पातूरकर मॅडमना वाचून दाखवली. विषयाची ताकद लक्षात घेऊन त्यांनी त्वरित मान्यता दिली आणि पुन्हा नव्या दमानं एका नव्या दमदार एकांकिकेची प्रॅक्‍टिस सुरू झाली.
दोन भारतीय जवानांना बॉर्डरवर एक अतिशय देखणी पाकिस्तानी गुप्तहेर सापडते आणि त्या दोघांमध्ये संघर्ष सुरू होतो. मेजरचं म्हणणं असतं, की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. शत्रूच्या सुनेलासुद्धा साडी-चोळी देऊन परत पाठवण्याची आपली परंपरा. कॅप्टन म्हणत असतो ः "गेली कित्येक वर्षं इथं स्त्री आपल्या नजरेलासुद्धा पडलेली नाही. त्यात ही शत्रू. पाहिजे ते करू आणि नंतर हिला मारून टाकू. कोणाला कळणारसुद्धा नाही.' मेजर म्हणतो ः "मग हिच्याकडं असलेल्या गुप्त माहितीचं काय?' कॅप्टनला याच्याशी काहीच देणंघेणं नसतं. त्याला ती हवी असते आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. एका बाजूला देशनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गरज असा हा संघर्ष वाढत जातो... आणि शेवटी तिला मिळवण्यासाठी पाशवी झालेल्या कॅप्टनला संस्कारांची चाड असणारा मेजर गोळ्या घालून मारून टाकतो. त्या पाकिस्तानी महिलेला हे सगळं पाहून धक्का बसतो. शत्रूची अब्रू वाचवण्यासाठी मित्राला गोळ्या घालणारा मेजर तिला आदर्श वाटतो आणि ती स्वत:जवळची सर्व गुप्त माहिती मेजरला देते. सगळी माहिती मिळाल्यावर गोळ्या लागून पडलेला कॅप्टन उठतो आणि लक्षात येतं, की तिच्याजवळची महिती मिळवण्यासाठी या दोघांनी केलेलं हे नाटक असतं..

ता. 5 सप्टेंबर 1999 ला संध्याकाळी "पुरुषार्थ'चा प्रयोग झाल्यावर भरत नाट्य मंदिरात घुमलेला टाळ्यांचा कडकडाट आजही मला ऐकू येतो. सन 1995 मध्ये कसाबसा नाटकाच्या संघात प्रवेश मिळवलेल्या प्रवीण तरडेनं सर्वांत मानाचा करंडक जिंकला होता. त्या वर्षी लेखन-दिग्दर्शन आणि वाचिक अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं होतं. त्या विजयात माझ्या त्या दहा शिलेदारांचाही खूप मोठा वाटा होता. अभिजित मोनेचा अभिनय, केदार सोमणची प्रकाशयोजना, अमृता हर्डीकरचं ध्वनीसंयोजन; विशाखा, अश्‍विनी, अभिषेकबरोबरच इतरांचं बॅकस्टेजचं काम, शिवाय पातूरकर मॅडम आणि आयएलएस महाविद्यालयाचा पाठिंबा..

योगायोग बघा, त्याच वर्षी "सकाळ'मध्ये यंदाचा पुरुषोत्तम जिंकणारा प्रवीण भविष्यात नक्कीच नाटक-चित्रपट क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करेल, असं म्हटलं होतं. ती कौतुकाची थाप मला आजही प्रेरणा देते. ज्या एकांकिकेनं मला ओळख दिली, त्या "पुरुषार्थ'वर लवकरच मी खूप मोठा चित्रपट करतोय. कदाचित हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे कलाकार रसिक प्रेक्षकांना त्यात पाहायला मिळतील.
आज मागं वळून पाहताना लक्षात येतंय, की पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा त्या वेळी जितक्‍या तरुण होत्या, तितक्‍याच आजही आहेत. जिंकण्याची स्वप्नं आजही तितकीच अधाशी आहेत. संघात स्थान मिळवण्याची लढाई तितकीच बिकट आहे; पण जो या लढाईत जिंकतो, तो चार पायांवर पडणाऱ्या मांजरासारखा असतो. त्याला कुठंही फेका- तो उभाच रहातो. एकांकिका स्पर्धेच्या या वारीत जे जे वारकरी एकांकिकेची पताका आपल्या खांद्यावर मिरवतायत, ते ते सारे मला माझेच वाटतात. स्पर्धेच्या या साऱ्या समृद्ध प्रवासात मी खरंच धन्य झालोय... कारण मला सन 1999 चा पुरुषोत्तम करंडक मिळालाय आणि साहजिकच आता माझ्या मुक्तीचा मार्गही मोकळा झालाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com