मी 'मालिका'वीर (प्रवीण तरडे)

प्रवीण तरडे pravin.writer@gmail.com
रविवार, 21 एप्रिल 2019

"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू व्हायच्या पाच मिनिटं आधीपर्यंत मी एपिसोड लिहून देत होतो...

"कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू व्हायच्या पाच मिनिटं आधीपर्यंत मी एपिसोड लिहून देत होतो...

टीव्हीवरच्या मालिका म्हणजे रोज तुमच्या वाट्याला येणारा असा गोड पदार्थ आहे- जो खाल्ल्यानं तुम्हाला मधुमेह होणार हे शंभर टक्के माहीत असतानाही तुम्ही तो खाताच! उपमा थोडीशी भयंकर वाटत असली, तरी योग्य आहे हे तुम्हालाही पटलं असेलच. मालिका माध्यमाला मी "मधुमेह निर्माण करणारा गोड पदार्थ' म्हणत असीन, तर मीच स्वतः असा बल्लवाचार्य होतो जो हा पदार्थ कैक वर्षं बनवत होता! हो. पाच हजारांच्या आसपास असे पदार्थ मी बनवलेत आणि तुमच्या घरात, तुमच्या ताटात आणून वाढलेत. कारण मालिका हा अत्यंत गोड पदार्थ म्हटला, तर लेखक हा आपोआपच "आचारी' ठरतो- कारण त्याच्या लॅपटॉप नावाच्या कढईत हे सगळे पदार्थ शिजवले जातात.

आजपर्यंत कित्येक मराठी मालिकांनी तुम्हाला अक्षरश: भुरळ घातलेली आहे. तुम्हाला हसवलंय, रडवलंय आणि तुमचं पित्त खवळवलंयदेखील.
मालिका माध्यम तीन टप्प्यांत प्रवास करत असतं. सुरवातीला लोकप्रियतेचा कळस, नंतर अधोगतीचा पहिला टप्पा आणि शेवटी प्रचंड त्रासात "कधी एकदा बंद होणार हे सगळं' असं म्हणण्याची वेळ. आयुष्यात एकदा तरी मराठी मालिकेचा एक तरी एपिसोड पाहिला नाही, असा माणूस सापडणं अवघडच. काही जण आवडीनं पाहतात, काही नाक मुरडत पाहतात, काहींना पत्नी टीव्ही लावूनच बसते म्हणून मालिका पाहावी लागते, तर पन्नास टक्के "काय हा मूर्खपणा चाललाय' म्हणून शिव्या घालत पाहत असतात- पण पाहतात हे नक्की.

चला, आज आपण या माध्यमाला थोडं समजून घेऊ. कारण सलग सात वर्षं मी दिवस-रात्र या माध्यमाच्या लाटेवर स्वार झालेला प्रवासी होतो. एकांकिका प्रकारात जवळजवळ "पीएचडी' मिळवल्यानंतर आता पोटापाण्याचं काय असा प्रश्‍न निर्माण झाला, तेव्हा मला या माध्यमानं खुणावलं. मात्र, प्रचंड अटीतटीची स्पर्धा असलेल्या या प्रकारात प्रवेश मिळवणं तेवढं काही सोपं नव्हतं. पुण्यातली "इंडियन मॅजिक आय' ही श्रीरंग गोडबोले यांची संस्था हा एकमेव मार्ग तेव्हा प्रत्येक कलाकारासमोर असायचा. मीही त्याच मार्गावरचा वारकरी झालो आणि पहिल्याच प्रयत्नात "अग्निहोत्र' या अतिशय गाजलेल्या मालिकेचे शेवटच्या काही भागांचे संवाद लिहिण्यासाठी मी सहायक म्हणून अभय परांजपे यांच्याकडं रुजू झालो. मी त्या मालिकेमध्ये एक छोटी भूमिकासुद्धा करत होतो. मला या माध्यमातल्या लिखाणाची ओळख "अग्निहोत्र'नं करून दिली. त्यानंतर स्मिता तळवळकर यांच्या "अनुपमा' मालिकेचं संवादलेखन करायला मिळालं. खऱ्या अर्थानं या माध्यमात मला नाव आणि पैसा दिला तो "कुंकू' या मालिकेनं. चिन्मय मांडलेकरनं माझं नाव राकेश सारंग यांना सुचवलं. मुंबईतल्या त्यांच्याच ऑफिसमध्ये एक छोटी परीक्षा झाल्यानंतर माझी निवड झाली. राकेश सारंग या माणसाची मालिका या क्षेत्रावर प्रचंड हुकूमत आहे. कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांचे चिरंजीव असलेले राकेश स्वत: अप्रतिम लेखक-दिग्दर्शक आणि कॅमेरामन आहेत. त्यांनी मला मालिकालेखनाची एका वाक्‍यात ओळख करून देताना सांगितलं होतं ः "एखादं भिजवलेलं कापड पिळत पिळत गेल्यानंतर शेवटी जेव्हा त्याचा एक थेंब राहतो, तेव्हा मालिका संपली पाहिजे.'
माझ्या मते सर्वात शिस्तबद्ध आणि घडयाळाच्या काट्यावर चालणारं कुठलं क्षेत्रं असेल तर ते मालिका आहे. इथं कुठल्याच गोष्टीला उशीर म्हणजे काही लाखांचं नुकसान असतं. "कामाची वेळ काय, किती' असं तुम्ही या माध्यमात काम करणाऱ्या कुठल्याही लेखक-दिग्दर्शकाला किंवा अभिनेता-अभिनेत्रीला विचारू शकत नाही. कवी ग्रेस यांच्या घराच्या दारावर एक पाटी आहे ः "या बेटावर यायला होड्या उपलब्ध आहेत- परतीच्या प्रवासाची श्‍वाश्‍वती नाही.' हा मजकूर पाटी मालिका माध्यमासाठी तंतोतंत जुळतो. कुठल्याही यशस्वी मालिकेचं जेमतेम आयुष्य हे दोन-तीन वर्षांचं असतं आणि सुदैवानं माझ्या वाट्याला सर्व यशस्वी मालिकाच आल्या. "कुंकू', "पिंजरा', "तुझं माझं जमेना' अशी किती तरी नावं त्यात आहेत. हृषिकेश जोशी या अभिनेत्यानं मालिका माध्यमाची तुलना सीताफळ खाण्याशी केलीये. सीताफळ हे असं फळ आहे, ज्यामध्ये खाण्यापेक्षा फेकून देण्याचाच भाग जास्त असतो आणि कितीही खाल्लं तरी पोट भरतच नाही. सीताफळाला आंबा किंवा सफरचंदासारख्या फळाचा दर्जा कधीच मिळत नाही. म्हणून चित्रपट क्षेत्र आंबा आहे आणि मालिका माध्यम सीताफळ! मात्र, याच सीताफळानं आमचं घर उभं केलं. सुरवातीच्या काळात कित्येक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते या माध्यमामुळंच या जीवघेणी स्पर्धा असलेल्या क्षेत्रात टिकून राहतात. मागच्या पंधरा-वीस वर्षांत प्रत्येक कलाकाराला याच माध्यमानं ओळख मिळवून दिलीय.

"कुंकू' लिहितानाचा एक किस्सा आठवतोय. त्यावेळी त्या मालिकेमधलं नरसिंह हे पात्र म्हणजे सुनील बर्वे हा खूप आजारी असतो. इतका आजारी, की त्याचं काहीही बरं-वाईट होऊ शकतं. अर्थात हे सगळंच खोटं असतं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे; पण त्या काळात मला एका रुग्णाच्या नातेवाईकाचा फोन आला होता ः ""एक आज्जी अत्यवस्थ आहेत. म्हणजे येत्या काही दिवसांत त्यांना काहीही होऊ शकतं. प्लीज, तुम्ही त्यांना एवढंच सांगा, की नरसिंह किल्लेदारला काहीही होणार नाही म्हणून.' या फोननंतर मी अक्षरश: उडालो होतो. आपण व्यवसाय म्हणून जे काम करतोय, त्याचा प्रेक्षक मात्र त्याच्याकडं व्यवसाय म्हणून बघत नाही. त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो प्रत्येक एपिसोड. विश्‍वास ठेवा, त्यानंतर कुठलाच एपिसोड किंवा कुठलाही संवाद हा मी केवळ लिहायचा म्हणून लिहिला नाही. अशा प्रत्येक प्रेक्षकाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला. त्यांची ओढ, त्यांची तळमळ मला जाणवू लागली. जेव्हा मालिकेमध्ये एखादं नातं तुटतं किंवा एखादी चांगली-वाईट घटना घडते, तेव्हा ती एकाच वेळी हजारो कुटुंबामध्ये घडत असते, याचं भान आम्हाला आणि आमच्या या उद्योगक्षेत्राला असायलाच हवं.

"तुझं माझं जमेना' मालिकेमध्ये सुहास जोशी यांनी साकारलेल्या पात्राचा मुलगा अचानक अपघातामध्ये जातो, असा एक प्रसंग होता. तो लिहिला, तेव्हा अक्षरश: माझ्याच अंगावर काटा आला होता. ज्या दिवशी तो एपिसोड प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांनी आम्हाला अक्षरशः जोडे मारायचेच बाकी ठेवले होते. शेवटी फक्त लोकांच्या आग्रहामुळं तसंच दिसणारं एक पात्र पुन्हा सुहास जोशी यांनी साकारलेल्या त्या पात्राच्या आयुष्यात येतं असं दाखवून आम्ही त्या मालिकेचा शेवट गोड केला. साहजिकच आहे म्हणा- जसं तुमचं जगणं पुढं जात असतं, अगदी तसंच त्या त्या मालिकेमधलं कुटुंब पुढं जात असतं. तुमच्या घरात सण असेल, तर तिथंही गोडधोडच केलं जातं. ऐन दिवाळीच्या तोंडावर कुठल्या तरी मालिकेमधलं कुठलं तरी पात्रं गेलंय असं आम्ही कधीच दाखवत नाही- कारण तुमची दिवाळी कडू करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही.

मी "कुंकू' आणि "पिंजरा' अशा दोन मालिका एकत्र लिहीत होतो, तो काळ हा माझ्या आयुष्यातला सर्वांत कठीण काळ होता. कठीण यासाठी, की तेव्हाच माझं नुकतंच लग्नं झालं होतं. सुखी संसाराची स्वप्नं पाहायचा काळ असताना मी मालिकेमधल्या तुटलेल्या संसारांच्या कहाण्या लिहीत होतो. स्नेहल खूप समजून घ्यायची. तिनंच मला लॅपटॉपवर कसं लिहायचं हे शिकवलं. अहो, एवढंच काय माझ्या लग्नात मंगलाष्टक सुरू व्हायच्या पाच मिनिटं आधीपर्यंत मी एपिसोड लिहून देत होतो. गुरुजी शेवटी म्हणाले ः ""अहो, "कुंकू'मधल्या जानकी-नरसिंहचं सोडा. आधी स्वत:च्या लग्नाचं बघा.'' तेव्हा कार्यालयात खूप मोठा हशा पिकला होता.
थोडक्‍यात काय, तर कुठल्याही मालिकेला आपण पटकन नावं ठेवून टाकतो आणि हे विसरून जातो, की कधी काळी याच मालिकेनं आपल्याला खूप हसवलं होतं, रडवलंसुद्धा होतं. आज जी चव तुम्हाला आवडलीयं, तशीच चव कायम तीन तीन वर्षं देत राहणं हे कुठल्याच आचाऱ्याला शक्‍य नसतं. कधी तरी आपल्या घरच्याही गृहिणीच्या हातची चवसुद्धा बिघडतेच की! आपण तिला समजून घेतोच की. आता जर कोणी मला मालिका लिहायला सांगितली, तर माझा पेन कदाचित धजावणार नाही; पण एक काळ असा होता, की याच माध्यमाच्या लाटेवर स्वार होऊन मी तुम्हाला कित्येक स्वप्नं दाखलीयेत आणि तुमच्याबरोबर मी स्वत:सुद्धा ती स्वप्नं जगलोय..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tarde write tv episode article in saptarang