झुंज! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 3 जून 2018

स्वीडनचा सुपरसितारा बियॉं बोर्ग आणि अमेरिकन सुपरब्रॅट जॉन मॅकेन्रो यांच्यात सन 1980 मध्ये लढली गेलेली विम्बल्डनची ती अंतिम झुंज कित्येकांच्या स्मरणात अजूनही घोटाळत असेल.
या लढतीवर आधारित एक चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी येऊन गेला ः बोर्ग व्हर्सेस मॅकेन्रो. चित्रपट स्वीडिश होता; पण त्याला हॉलिवुडी तडका मात्र जरूर होता. थोडीशी आपल्या हिंदी सिनेमाची डूबही होती. चित्रपट लोकांना बऱ्यापैकी आवडला, तो त्यात निभावलेल्या जोरदार व्यक्‍तिरेखांमुळं.

स्वीडनचा सुपरसितारा बियॉं बोर्ग आणि अमेरिकन सुपरब्रॅट जॉन मॅकेन्रो यांच्यात सन 1980 मध्ये लढली गेलेली विम्बल्डनची ती अंतिम झुंज कित्येकांच्या स्मरणात अजूनही घोटाळत असेल.
या लढतीवर आधारित एक चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी येऊन गेला ः बोर्ग व्हर्सेस मॅकेन्रो. चित्रपट स्वीडिश होता; पण त्याला हॉलिवुडी तडका मात्र जरूर होता. थोडीशी आपल्या हिंदी सिनेमाची डूबही होती. चित्रपट लोकांना बऱ्यापैकी आवडला, तो त्यात निभावलेल्या जोरदार व्यक्‍तिरेखांमुळं.

जून महिना उजाडला की विम्बल्डनच्या हिरव्यागार सेंटर कोर्टवर निराळी लकाकी चढते. टेनिसच्या चाहत्यांमध्ये चलबिचल सुरू होते. बीबीसीवर टेनिसमधल्या घडामोडींचा रतीब वाढतो. क्रीडावाहिन्यांवर जुन्या-पुराण्या लढतींची क्षणचित्रं दाखवली जातात. कधीकधी आख्खी लढत दाखवली जाते. इतिहासात बखरबंद झालेले विक्रम, फटके, किस्से-कहाण्यांना ऊत येतो. टेनिसवाल्या मंडळींना दिवाळी जवळ आल्याचा भास होऊ लागतो. विम्बल्डनचा महिमा आहेच तसा.

टेनिसजगतात चार टेनिस स्पर्धांचा डंका सदोदित वाजत असतो. जानेवारीच्या मध्यात मेलबर्नला होणारी ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा, मग मे-जूनमध्ये पॅरिसच्या रोलां गारो टेनिस संकुलात रंगणारी फ्रेंच ओपन, पाठोपाठ जून-जुलैत येणारी विम्बल्डन आणि ऑगस्ट-सप्टेंबरात न्यूयॉर्कच्या बिली जीन किंग टेनिस संकुलात होणारी अमेरिकन खुली स्पर्धा. टेनिसभक्‍तांसाठीची ही चारधाम यात्राच.
सर्वाधिक बक्षीसरक्‍कम, सर्वाधिक रॅंकिंग गुण आणि सर्वाधिक कीर्ती बहाल करणाऱ्या या स्पर्धांमध्ये उतरण्यासाठी भले भले टेनिसपटू धडपडत असतात. एकदा इथं बुडी मारून आलं की चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून मुक्‍ती मिळाल्याची भावना होते. या चारधामातली ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन स्पर्धा हार्डकोर्टवर होणारी, तर फ्रेंच ओपन मातीच्या कोर्टावर...विम्बल्डनच्या लढती मात्र नैसर्गिक हिरवळीवर होतात. सन 1877 पासून विम्बल्डनवर टेनिस खेळलं जातंय. म्हणून ती टेनिसविश्वाची काशीनगरी.

इथं भले भले अतिरथी-महारथी आपापली कारकीर्द पणाला लावतात. जिवाच्या करारानं खेळतात. सन 2008 मध्ये रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या तडफदार प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेली विम्बल्डनची अंतिम झुंज नव्या पिढीला ठाऊक असेल. तब्बल चार तास 48 मिनिटं चाललेली ही ऐतिहासिक लढत अनेकांना धड बघवलीही नव्हती. मानवी क्षमतेचा, खिलाडू वृत्तीचा, दिलेरीचा अक्षरश: अंत पाहणारी ही लढत शतकातली सगळ्यात रोमहर्षक लढत मानली जाते.
..अशीच एक भयंकर झुंज 1980 मध्ये झाली होती.
विम्बल्डनची अंतिम लढत होती ती. स्वीडनचा सुपरसितारा बियॉं बोर्ग आणि अमेरिकन सुपरब्रॅट जॉन मॅकेन्रो यांच्यात लढली गेलेली ही झुंज कित्येकांच्या स्मरणात अजूनही घोटाळत असेल. "जणु जिंकाया गगनाचे स्वामित्व, आषाढघनांशी झुंजे वादळवात' या ओळींतल्या वर्णनासारखं दोघं लढले.
एक थंडगार हिमशिखरासारखा धीरगंभीर, तर दुसरा उफाळत्या ज्वालमुखीसारखा दाहक. एक धीरोदात्तपणे एकेक पॉइंट सर करत जाणारा धोरणी खेळाडू, तर दुसरा घमेल्यातल्या लाहीसारखा फुफाटणारा उतावळा गडी. एक पत्थरदिल, दुसरा रंगीला...दोन टोकं जणू.

दोघांच्याही खेळाची शैली भिन्न. एक बेसलाइनवर वावरत जोरकस फटके अचूक पेरणारा. दुसरा रांगड्या लढवय्यासारखा सतत नेटकडं धाव घेत कल्पक व्हॉलीज्‌चा खेळ फुलवणारा. अर्थात ही लढत हिमशिखर ऊर्फ बोर्ग जिंकला. त्यानं पाचवं विम्बल्डन जेतेपद पटकावलं; पण उतावळ्या मॅकेन्रोनं त्याच्या नाकात दम आणला होता हे खरं.
या लढतीवर आधारित एक चित्रपट दोनेक वर्षांपूर्वी येऊन गेला. बोर्ग व्हर्सेस मॅकेन्रो. चित्रपट स्वीडिश होता; पण त्याला हॉलिवुडी तडका मात्र जरूर होता. थोडीशी आपल्या हिंदी सिनेमाची डूबही होती. चित्रपट लोकांना बऱ्यापैकी आवडला, तो त्यात निभावलेल्या जोरदार व्यक्‍तिरेखांमुळं. मात्र, टेनिसच्या जाणकारांनी मात्र हा चित्रपट पाहून हसू आवरत एकमेकांकडं पाहिलं असेल! कारण, त्यात टेनिस कमी होतं, आविर्भावच जास्त होता.

"हमजोली'मध्ये "ढल गया दिन, हो गई रात'म्हणत खुळ्यासारखं बॅडमिंटन खेळताना आपण जितेंद्र आणि लीना चंदावरकरला पाहिलंय. गाण्याच्या तालावरचं हे "फूलब्याट प्रेमगीत' बॅडमिंटन या खेळाची यथेच्छ विटंबना होती; पण गाणं दिलखेचक होतं. नखशिखान्त पांढरे टाइट कपडे घालून जम्पिंग जॅक जितू आणि लाल-गुलाबी परी लीना चंदावरकर ही जोडी बॅडमिंटन खेळतेय की आणखी काही, त्याची कुणाला काय पडली होती? तसंच या चित्रपटाचं झालं. आपल्या हिंदी सिनेमाला चटावलेल्या भावभीन्या मनाला हा चित्रपट आवडण्याची घनदाट शक्‍यता आहे. बघा बुवा!
* * *

तो सन 1980 मधला उन्हाळा होता. विम्बल्डन स्पर्धा ऐन भरात आलेली. माजी विजेता आणि पहिलं सीडिंग असलेला स्वीडनचा बियॉं बोर्ग यंदाही हमखास जिंकणार अशी अटकळ होती. त्याला आव्हान होतं अमेरिकेच्या जॉन मॅकेन्रोचं. हे वीर कुणाचे फारसे आवडते नव्हते. म्हणजे त्याचा खेळ अफलातून होता. आक्रमक आणि देखणा होता; पण डोकं कधी भिरमिटेल, याचा भरोसा नसे. उपांत्य लढतीत जिमी कॉनर्सचा पाडाव करताना त्यानं केलेला तमाशा लोकांच्या लक्षात होता.

कधी पंचांवर तोंडसुख घे, कधी लाइनमनच्या कॉलवर प्रक्षुब्ध होऊन रॅकेट फेक, कधी प्रेक्षकांकडं तोंड करून त्यांच्याशी वाद घाल...असले त्याचे उद्योग टेनिसजगताला ओळखीचे झाले होते. प्रेक्षक त्याची यथेच्छ हुर्यो उडवत. अनेकदा त्याला तंबीदेखील मिळे. दंड होई...पण पठ्ठ्याचा येळकोट काही जात नव्हता. जॉन मॅकेन्रोची आख्खी कारकीर्द एकाच ध्येयाला धरून उभी होती ः बियॉं बोर्गची बादशाही खालसा करणं.
बोर्ग पहिल्यांदा विम्बल्डन खेळला तेव्हा अवघा 17 वर्षांचा होता आणि मॅकेन्रो तेव्हा पोरसवदा बॉलबॉय होता. टेनिसपटूंचे फटके कोर्टाबाहेर गेले की चपळाईनं बॉल ताब्यात घेऊन तो पुन्हा गेममध्ये आणणं हे बॉलबॉयचं काम असतं. एक प्रकारे हे प्रशिक्षणच असतं. बोर्गचा खेळ, त्याची कीर्ती पाहून असूयेनं पछाडलेल्या त्या बॉलबॉयनं मनाशी ठरवलं होतं- याचा नक्षा उतरवला पाहिजे.

अथक्‌, अहर्निश मेहनत हे बोर्गच्या यशाचं गमक होतं. थंडगार वृत्तीच्या या विख्यात टेनिसपटूमध्ये कणाचाही मनोरंजनभाव नव्हता. प्रेक्षकांना खूश करावं म्हणून तो कधी खेळला नाही की वागला नाही. कधी कुठल्या पबमध्ये पोरींच्या कोंडाळ्यात रमला नाही. हातात मद्याचा गिलास घेऊन नृत्य केलं नाही की सार्वजनिक ठिकाणी आपले स्टारी नखरे दाखवले नाहीत.

स्टॉकहोमनजीकच्याच उपनगरात जन्मलेल्या बियॉं बोर्गनं लहानपणीच आपला टेनिसचा हुन्नर दाखवायला सुरवात केली होती. त्याचे वडील टेबलटेनिस खेळायचे. एका अजिंक्‍यपदासह त्यांना मिळालेली सोनेरी टेनिस रॅकेट छोट्या बियॉंला आवडली.
""तूसुद्धा टेनिस खेळ की...'' वडील म्हणाले. बियॉं टेनिस खेळायला जाऊ लागला. त्याची प्रगती प्रचंड वेगानं झाली. वयाच्या तेराव्या वर्षीच स्वीडनचा डेव्हिस चषकाचा कर्णधार लेनार्ट बर्गलिन याला त्यानं हरवून दाखवलं. स्थानिक पेपरात त्याचं नाव छापून आलं. स्वत: लेनार्ट स्तिमित झाला होता. हे पोरगं विलक्षण आहे, हे त्याच्या रत्नपारखी नजरेला दिसलं होतं. वारंवार नेटकडं धावत आक्रमक खेळ करणाऱ्या बियॉंच्या खेळात त्याला प्रतिभेची चुणूक दिसली होती, थोडा हिशेबीपणा येण्याची मात्र गरज होती. लेनार्टनं त्याला आपल्या पंखाखाली घेतलं आणि सणसणती सर्व्हिस सोडण्याची तालीम करायला लावली. रोज शेकडो, हजारो सर्व्हिसेस. इथंच कुठंतरी बियॉं बोर्गच्या त्या बेजोड, बिनतोड सर्व्हिसचा जन्म झाला असावा.
प्रतिस्पर्ध्यांच्या भांडणामुळं बियॉं बोर्ग एकदा गोत्यात आला. डोकं फिरलं की फटके चुकतात. गुण जातात. बाहेरच्या भांडणात निम्मी ऊर्जा खतम करून मग कोर्टावर उतरलं की उरलेला जोर कुचकामाचा ठरतो. लेनार्टनं त्याला समजावलं.
""मला वचन दे, बियॉं,'' लेनार्ट म्हणाला.
""दिलं...'' भावनावश झालेला पोरसवदा बोर्ग म्हणाला.
""तुझ्या भावना, विकार सगळं काही मनातल्या मनात खोल दडपून टाक. डोळ्यांत काही उतरता कामा नये. तुझा आवेग, राग, संताप, दु:ख याला वाट करून द्यायची नाही कधीच...ती वाफ टेनिसच्या कोर्टात तुझ्या फटक्‍यात उतरू दे. तुझा प्रत्येक फटका विषारी होऊ दे...करशील?'' लेनार्टनं अवघड काम सांगितलं.
...त्यानंतर जगाला दिसलेला बियॉं बोर्ग वेगळा होता. लेनार्टनं त्याला आणखी एक कानमंत्र दिला होता :
""हे बघ बियॉं, मॅच पॉइंट, सेट पॉइंट असं काही नसतं. प्रत्येक पॉइंट ही एक झुंज असते. आपण त्या त्या पॉइंटचा तेवढा विचार करायचा आणि तो वसूल करत जायचं...ऍट द एंड यू विन!''
* * *

याउलट जॉन मॅकेन्रोचं करिअर घडलं. त्याचा जन्म जर्मनीत झालेला असला तरी आई-वडील अमेरिकी होते. न्यूयॉर्कमध्ये टेनिसचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या मॅकेन्रोला आयुष्यात जे काही मिळालं ते झगडतच मिळवावं लागलं होतं. मॅकेन्रो रॉकस्टार-संस्कृतीचा पाईक होता. खास अमेरिकी पद्धतीनं व्यक्‍त होण्याची त्याची पद्धत होती. जीवनाला भिडायचं तर आडपडद्यानं नव्हे, थेट! रडायला आलं तर माणसानं बिनधास्त रडावं. हसायला आलं तर खळखळून हसावं. चिडायचं असेल तर तडकून चिडावं...जॉनीच्या स्वभावातच अशी अमेरिका होती. त्याचा खेळ मात्र भन्नाट होता. एखाद्या दिलफेक रॉक गाण्यासारखा. विटास गेरुलायटिस नावाचा एक अव्वल आणि थोडा सीनिअर खेळाडू त्याचा मित्र झाला होता. गेरुलायटिससोबत तो पब्जमध्ये जाई. मित्र-मैत्रिणींबरोबर मजा लुटे. बोर्गबद्दल मनात असलेली खदखद त्यानं गेरुलायटिसला सांगितली होती. गेरुलायटिस मूळचा लिथुआनियाचा होता; पण जन्मा-कर्मानं अमेरिकीच. त्याला "लिथुआनियन लायन' असं कौतुकानं म्हटलं जायचं. एक दिवस विटासनं मॅकेन्रोला छेडलं...

"जॉनी, माझं ऐक...मी बियॉंबरोबर खेळलोय. मी त्याचा प्रॅक्‍टिस-पार्टनर होतो. तो हिमनग वगैरे काही नाही. तुझ्यासारखाच आग्यावेताळ आहे. तुला माहितीये, तो विशिष्ट हॉटेलात विशिष्ट खोलीतच उतरतो. त्याच्या हृदयाची स्पंदनं मिनिटाला 50 च्या वर जाऊ नयेत म्हणून तो हॉटेलची खोली कमालीची थंड ठेवतो. त्याच्या कोचनं बांधून आणलेल्या रॅकेटचे गट्‌स पायानं चेपून बघतो. आई-वडिलांनी लढत बघायला येताना जुनेच लकी कपडे घालून यावेत असं त्यांना सांगतो. स्वत: दोन टॉवेल वापरतो. एक किंवा तीन नाही! त्याच ठराविक खुर्चीवर बसतो...कमालीचा अंधश्रद्ध माणूस आहे तो. फक्‍त त्याच्या मनातली आग ही त्याच्या फटक्‍यांतून दिसते...''
-मॅकेन्रोनं आपल्या खेळात थोडी सुधारणा केली. अखेर तो दिवस उजाडला. विम्बल्डनच्या अंतिम झुंजीचा.
* * *

सेंटरकोर्ट खचाखच भरलेलं होतं. बियॉं बोर्ग सहज मॅकेन्रोचा फन्ना उडवेल, ही अटकळ झटक्‍यात खोटी ठरली. पहिला सेट मॅकेन्रोनं 6-1 असा आरामात घेतला. सेंटरकोर्टवर चुळबुळ सुरू झाली. दुसऱ्या सेटला बोर्गनं आपल्या सणाणत जाणाऱ्या सर्व्हिसेस सोडत 7-6 अशी बरोबरी साधली. तिसरा सेटही 6-3 असा घेऊन टाकला. चौथ्या सेटला मात्र युद्ध अशा थराला गेलं की आभाळात सारे देव ती लढत बघायला एकवटले असतील. तब्बल 17 सेट पॉइंट जिंकत मॅकेन्रोनं हा सेट घेतला आणि लढतीचं पारडं फिरवलं. बोर्गला यंदा आपलं जेतेपद राखता येणं कठीण आहे, हे दिसत होतं. अखेरच्या पाचव्या सेटमध्येही तुंबळ सर्व्ह आणि व्हॉलीचा खेळ झाला. कुणीही मागं हटत नव्हतं. अखेर हा सेट बोर्गनं 8-6 असा जिंकला आणि कसंबसं आपलं जेतेपद बरकरार ठेवलं.
बोर्ग हिमनग नव्हता. ज्वालामुखीच होता. मॅकेन्रो लाव्हा नव्हता. त्याच्यातही पाण्याचा अंश होता. दोघंही प्रतिस्पर्धी जवळपास सारखेच होते. ही लढत शतकातली सर्वोत्तम म्हणून गाजली. अजूनही तिची पारायणं होतात.
* * *

स्वेरीर गुडनासन नावाच्या स्वीडिश अभिनेत्यानं बियॉं बोर्गची भूमिका केली आहे, तर मॅकेन्रोच्या सणकी भूमिकेत दिसतो शिया लेबूफ. दोघांच्या व्यक्‍तिरेखा अप्रतिम उतरल्या आहेत. दोघंही दिसतात डिट्टो मूळ नायकांसारखेच. बोर्गच्या लहानपणाची भूमिका बोर्गचा खराखुरा मुलगा लिओ बोर्ग यानंच साकारली आहे. अर्थात या चित्रपटात बोर्गच्या व्यक्‍तिरेखेचं पारडं इतकं जड झालं आहे की मॅकेन्रोचं पात्र साइड हीरो वाटावं! डॅनिश डॉक्‍युमेंटरीकार जॅनुझ मेट्‌झ पेडेरसन यांनी मनावर घेऊन हा चित्रपट बनवला. बोर्गच्या कोचची भूमिका करणारे अनुभवी स्टेलन स्कार्सगार्ड यांनी मात्र चांगलीच छाप पाडली आहे. -मॅकेन्रोला उथळ आणि उठवळ दाखवण्यापेक्षा त्याच्या खेळाची खासियत दाखवली असती तर बरं झालं असतं, असा सूर लावत अमेरिकी समीक्षकांनी पिक्‍चरला जाम झोडून काढलं. ज्यांना टेनिस थोडंफार कळतं, त्यांनीही चित्रपटाची हुर्यो उडवली. या सिनेमात टेनिस कुठं आहे, असा सवाल आला. टेनिसमध्ये अचूकता, एकाग्रता आणि मुख्य म्हणजे चपळाई यांचा कस लागतो. स्वेरीर गुडनासन किंवा शिया लेबूफ हे अभिनेते होते; पण ही चपळाई त्यांनी कुठून आणावी? शेवटी चतुर संकलनाची मदत घ्यावी लागलीच. त्यात चित्रपटातला टेनिसचा आत्मा हरवला. उरला एक इमोशनल ड्रामावाला तद्दन सिनेमा.

बियॉं बोर्ग आणि मॅकेन्रो हे कोर्टात प्रतिस्पर्धी असले तरी प्रत्यक्षात एकमेकांचे चांगले मित्र होते आणि आहेत. दोघंही साठीच्या जवळ आलेले. आपापल्या उद्योग-धंद्यात नि संसारात रमलेले. या चित्रपटावर दोघांनीही काहीही भाष्य केलं नाही. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत बोर्गचं नाव आहे; पण मॅकेन्रोचे साधे आभारदेखील मानलेले नाहीत. काय कारण असेल?
...आणखी तीन दिवसांनी, म्हणजेच 6 जूनला, बियॉं बोर्ग बासष्टीचा होईल. त्याचा हा वाढदिवस! बोर्ग आठवला की त्याची ही झुंज आठवतेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pravin tokekar write article in saptarang