एक होता खेळिया... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar

"द ग्रेटेस्ट शोमन' म्हणून पी. टी. बार्नम यांचं नाव आज अजरामर झालं आहे. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊन गेला. "द ग्रेटेस्ट शोमन' याच नावाचा. हा चित्रपट बार्नम यांचं बायोपिक म्हणता येणार नाही. त्यांच्या जीवनातल्या एका काल्पनिक कालखंडावर बेतलेली ती एक सर्वांगसुंदर संगीतिका होती. या चित्रपटातली गाणी इतकी अप्रतिम आहेत, की दहादा ऐकली तरी मन भरत नाही. व्यक्‍तिरेखा शानदार आहेतच; पण त्यातलं संगीत आणि नृत्यदिग्दर्शन तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. मनाला खरोखर श्रीमंत करणारा हा अनुभव.

लोखंडी आडव्या खांबांच्या पलीकडची गर्दी बेभान होते. समोरच्या अंधाऱ्या पोकळीत झपकन्‌ एक प्रखर दिवा झगझगतो. शेकडो वॉट्‌स क्षमतेचे स्पीकर्स ड्रमबीटची एक गगनभेदी लगड आसमंतात उधळतात. इलेक्‍ट्रॉनिक वाद्यांची दिलखेचक सुरावट लहरत जाते. मन-मेंदू बधीर करणाऱ्या त्या आवाजानं भुई थरथरते. त्या तालावरच दिलखेचक नर्तकांचा चमू अतिविशाल रंगमंचावर प्रविष्ट होतो. रंगीत दिवेझोतांचा चमचमाट आणि संगीत यांचं असं काही गारुड होतं की बस्स. चुम्मे फेकले जातात. आरोळ्यांचे फव्वारे उडतात. शॅंपेनच्या बाटलीचं झाकण उडून त्यातलं मद्य फसफसून उसळावी, तशी गर्दी जागच्या जागी उसळते..."वी विल वी विल रॉक यू....वी विल वी विल रॉक यू....'

...धिस इज अमेरिकन वे...दोस्तों, ये अमरिका है, और इस अमरिका में...सगळं काही भव्य. चकचकीत. चित्तचक्षुचमत्कारिक आणि डोक्‍याची खिट्‌टी उडवणारं आहे. वास्तवाची किक्‍क इथं फारशी येत नाही. सगळं लार्जर दॅन लाइफ...हल्लीचे दिवस इव्हेंटचे आहेत. इव्हेंट म्हटलं, की चमकदमक, दणकेबाज माहौल हवाच. ती फटाक्‍यांची आतषबाजी, रंगीत दिव्यांचे झोत, अफाट क्षमतेनं गर्दीवर येणारे सुरावटींचे धबधबे...प्रगत तंत्रज्ञानानं ही उत्तेजना निर्माण करता येते. मनोरंजनाच्या दुनियेत या भव्यदिव्य "अमेरिकन वे'ची सुरवात झाली, तेव्हा ग्राफिक्‍स, लेझर दिवे वगैरे काही अर्थातच नव्हतं. या भावनेचा उगम एका अंतर्बाह्य अमेरिकन वल्लीच्या फक्‍त मेंदूत झाला होता. त्याचं नाव होतं फिनियस टेलर बार्नम...ऊर्फ पी. टी. बार्नम.
"द ग्रेटेस्ट शोमन' म्हणून या गृहस्थाचं नाव आज अजरामर झालं आहे. गेल्या वर्षीच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊन गेला. "द ग्रेटेस्ट शोमन' याच नावाचा. अर्थात हा चित्रपट बार्नम यांचं बायोपिक म्हणता येणार नाही. त्यांच्या जीवनातल्या एका काल्पनिक कालखंडावर बेतलेली ती एक सर्वांगसुंदर संगीतिका होती. या चित्रपटातली गाणी इतकी अप्रतिम आहेत, की दहादा ऐकली तरी मन भरत नाही. व्यक्‍तिरेखा शानदार आहेतच; पण त्यातलं संगीत आणि नृत्यदिग्दर्शन तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. गाणीसुद्धा सोप्या इंग्रजीतली. सहज ओठांवर रुळणारी. त्यावरची नृत्यं तर लाजबाब. मनाला खरोखर श्रीमंत करणारा हा अनुभव आहे.
* * *

कथानक वेगवान असलं, तरी बरंच त्रोटक आहे. हे अमेरिकन बर्गरसारखंच. दोन्ही हातात घेऊन ओठ बरबटवत लपकायचा. त्यामुळं पोट भरतं; पण मन नाही भरत. बार्नम हे प्रकरण एकोणिसाव्या शतकात होऊन गेलं. म्हणजे इकडं दुसऱ्या बाजीरावाची रवानगी ब्रिटिशांनी बिठूरच्या कैदखान्यात केली, त्याच सुमारास तिकडं बार्नम पैदा होऊन कल्पनेच्या भराऱ्या मारायला लागला होता. प्रारंभी पेपर टाकणारा पोऱ्या, वेटर, शिपाई अशी किरकोळ कामं करत घराला हातभार लावणाऱ्या फिनियसनं अगदी थोडा काळ कारकुनीही केली. नंतर मात्र या पोरानं अक्षरश: झेंडे गाडले.
लॉटरीचा धंदेवाला, सर्कसवाला, इव्हेंटवाला, बिझनेसमन, फर्डा वक्‍ता, राजकारणी, प्रशासक, उत्तम लेखक, पत्रकार, नट, गायक, संगीतकार, चित्रकार, हुशार मेकॅनिक...पी. टी. बार्नमला जणू कुठलंच क्षेत्र मना नव्हतं. अष्टपैलू प्रतिभेच्या या कलावंतानं आयुष्यभरात अफाट पैसा जमवला, आणि तितकाच दोन्ही हातांनी वाटून टाकला. उणीपुरी ऐंशी वर्षं जगलेला हा जिनियस बराचसा काळ बदनाम म्हणूनच वावरला. धंदेवाला, घोटाळेबाज, फसव्या, ठग अशा अनेक विशेषणांची त्याच्यावर खैरात होत असे. त्याच्या नृत्यनाट्यांची रेलचेल असलेल्या "सर्कस'ला अभिजन नाकं मुरडत. त्याला "शेंगदाणेवाला'सुद्धा म्हणत. वास्तविक बार्नमची "सर्कस' ही लौकिकार्थानं सर्कस नव्हती. ते एक "अजायबघर' किंवा "विचित्रघर' होतं. अत्यंत कल्पकतेनं उभं केलेलं.

अर्थात अत्यंत अत्रंगी उद्योग करून बार्नमही आपल्या टीकाकारांना भरपूर संधी देत राहिला. उदाहरणार्थ, "बॅंकांना गंडवून कर्ज कसं मिळवावं?' यावर तो गावोगाव बेधडक व्याख्यानं देत असे. आपल्या धंद्याची सुरवात त्यानं असल्या आचरट पद्धातीनं कर्ज मिळवूनच केली होती. तो ज्या व्यापारी कंपनीत कारकून होता, त्या कंपनीची जहाजं दक्षिण चीनच्या समुद्रात बुडाली, आणि त्याबरोबरच कंपनीही बुडाली. या बुडित जहाजांची कागदपत्रं तो घरी घेऊन आला! आपलं जहाज दक्षिण चीनच्या समुद्रात असल्याची बतावणी करुन त्यानं तारण म्हणून चक्‍क एक बुडित जहाज ठेवलं आणि एका बॅंकेकडून दहा हजार डॉलर्स कर्ज मिळवलं.

बार्नमचं "अजायब घर' सुरवातीला चाललं नाही. एक रिकामी इमारत घेऊन त्यानं मोठमोठाले हत्ती, जिराफ, उंट वगैरे कचकड्याचे प्राणी ठेवले होते तिथं. लोक कशाला जातील? मग विचित्र माणसं शोधून त्यानं ती तिथं आणून ठेवली. तीन पायाचा जिवंत माणूस, जॉर्ज वॉशिंग्टनची दाई असलेली 161 वर्षांची जिवंत म्हातारी, फिजी बेटातून पकडून आणलेली जलपरी, भरदार दाढी असलेली स्त्री, जगातला सर्वांत बुटका माणूस, जगातला सर्वांत उंच माणूस...असली "वेडीविद्री ध्यानं' जमा करून त्यानं त्याचं "अजायबघर' सजवलं. यातले बहुतेक नमुने धादांत खोटे, बनवाबनवीचे होते, हे उघड होतं. आता जॉर्ज वॉशिंग्टन होऊन गेले अठराव्या शतकात. त्यांची दाई जिवंत कशी असणार? जॉर्ज वॉशिंग्टन यांची 161 वर्षांची दाई म्हणून बार्नमनं ज्या जॉइस हेथ या ज्येष्ठ महिलेला पेश केलं होतं, ती वस्तुत: त्यानं विकत घेतलेली एक गुलाम होती. (त्या काळात गुलामी प्रथा अमेरिकेत प्रचलित होती. 1865 च्या सुमारास ती कायद्याद्वारे संपूर्णत: नष्ट झाली.) ती वारल्यानंतर त्यानं तिचं शवविच्छेदनही जाहीर करायला लावलं. त्यालाही आणा-दीड आणा तिकीट लावलं. शेकडो लोकांच्या समोर झालेल्या त्या भयंकर शवविच्छेदनानंतर त्यानं कबूल केलं, की जॉइस हेथ ऐंशी वर्षांची होती. पण त्यानं तिचा "मृत्यू'देखील विकला, हे खरं!

व्यवसायात त्यानं काही अशक्‍य धोकादायक निर्णय घेतले. ते तडीलाही नेले. जेनी लिंड नावाची एक स्वीडिश ऑपेरा गायिका होती. युरोपमध्ये तिचा बोलबाला होता. तिला स्वीडिश नायटिंगेलच म्हणायचे. मोठमोठे राजे-महाराजे, उमराव तिचं गाणं आवर्जून ठेवत. उच्च दर्जा, अभिरुची आणि श्रीमंतीचं ते एक लक्षण मानलं जाई. एक हजार डॉलर्स प्रति मैफल अशी काहीच्या काहीच रक्‍कम देऊन बार्नमनं तिचे दीडशे प्रयोग घेतले आणि तिला अमेरिकेत आणलं. लिंडच्या बाहुल्या, चॉकलेट्‌स, पोशाख, म्युझिकल खेळणी लगोलग बाजारात आणून दामदुप्पटीनं पैसा कमावला; पण जेनी लिंडशी कंत्राट करताना त्याच्याकडचं सगळं काही गहाण टाकून वर त्यानं कर्ज घेतलं होतं.

जेनी लिंडसोबत दौऱ्यावर अमेरिकाभर फिरतानाच बार्नम आणि लिंडचं अनोखं, हळुवार नातं निर्माण झालं, असं म्हणतात. अर्थात याला पुरावा नाही. खुद्द बार्नमच्या आत्मचरित्रातही त्याचं सूचनदेखील नाही; पण "द ग्रेटेस्ट शोमन' हा संगीतपट नेमक्‍या याच प्रेमपाशाशी संबंधित आहे.

बार्नमनं त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्याची लाडकी सर्कस दंगलीत जळाली. कर्ज झालं. घरावर जप्ती आली; पण बार्नम डगमगला नाही. पुन्हा सारं काही शून्यातून उभं करून त्यानं साठीच्या उंबरठ्यावर पुन्हा खरीखुरी सर्कस सुरू केली. विशाल तंबूत सर्कस सुरू करण्याची आयडिया त्याचीच! हवी कशाला इमारत आणि हॉल? उलट वाघ, हत्ती, सिंह असे प्राणी आणून त्यानं आणखी प्रेक्षक ओढले. राणी व्हिक्‍टोरियानं त्याला महालात बोलावलं, तेव्हापासून काही टीकाकार थोडे सौम्य झाले. बार्नमवर आणखी एक प्रतिभावंत कायम खूश होता. त्याचं नाव सुविख्यात लेखक मार्क ट्‌वेन!

आयुष्यभर जंटलमन लोकांच्या यथेच्छ शिव्या खाणाऱ्या या माणसानं धनाढ्यांना लाज वाटेल, इतका पैसा समाजकार्यासाठी वाटला. शेकडो एकर जमीन दान दिली. पूल बांधून दिले. ब्रिजस्पोर्ट इथं आज त्याचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. तिथल्या नागरिकांनी त्याच्याबद्दल व्यक्‍त केलेली ही एक कृतज्ञता आहे, कारण इथली जमीन त्यानंच दान केलेली होती. पी. टी. बार्नम हे नाव अमेरिकन मनोरंजनाचा मूळपुरुष म्हणून आज प्रतिष्ठापित आहे.
* * *

तो साधारण सन 1818 चा सुमार असेल. टेलर बार्नम आपल्या हाताबुडी आलेल्या पोराला- फिनियसला- घेऊन हॉलेटसाहेबांची मापं घ्यायला त्यांच्या घरी गेला, तिथं ते घडलं. हॉलेटसाहेबांची मुलगी चॅरिटी टेबल मॅनर्स शिकत होती, तेव्हा फिनियसनं उगीचच तिला हसवलं आणि हॉलेटसाहेबांकडून मुस्कटात खाल्ली. चॅरिटीचं आणि त्याचं मेतकूट जमलं ते तिथंच. तिला बोर्डिंगच्या शाळेत धाडलं, तरीही त्यांची मैत्री पत्राद्वारे फुलत राहिली. तरुण झाल्यावर त्यानं रितसर मागणी घालून चॅरिटीशी विवाह केला. बापाचा कडवा विरोध मोडून, माहेरचं ऐश्‍वर्य सोडून तीसुद्धा उत्साहानं या धडपड्या फिनियसच्या स्वप्नात सामील झाली. यथावकाश कॅरलिन आणि हेलन या दोन गोग्गोड मुली झाल्या. फिनियसचा त्यांच्यावर भलताच जीव होता. डोक्‍यात कल्पना होत्या, हातात कला होती आणि डोळ्यात स्वप्नं होती. कुठल्याही बेजोड धंद्याचं हे बेसिक भांडवल.
एका इमारतीच्या गच्चीवरती त्याचा चंद्रमौळी संसार चाले. रात्री आभाळातले तारे बघून तो चॅरिटीशी स्वप्नांबद्दल बोले.
""मी तुला या गच्चीत राहायला घेऊन आलेलो नाही चॅरिटी. सुंदर आयुष्याची हमी दिलीये मी तुला...,'' भावनाविवश होऊन तो एकदा म्हणाला.
"'तुझ्या प्रत्येक स्वप्नातली एक छोटीशी जागासुद्धा मला पुरणार आहे, फिन!'' तिनं सांगितलं.
...रोज रात्री असंच होतं. अंथरुणाला पाठ लागली, की उघड्या डोळ्यांमध्ये हजारो स्वप्नं भिरभिरत येतात.
* * *

कचकड्याच्या बाहुल्यांचं प्रदर्शन मांडलेलं बघून फिनियसच्या पोरी खूश झाल्या; पण लोक फिरकले नाहीत. पोरगी म्हणाली ः ""डॅड, नकली बाहुल्या बघून कोणालाही काही वाटत नाही. त्या चालणाऱ्या, बोलणाऱ्या हव्यात...''
मग फिनियसला आयडिया सुचली "अजायबघरा'ची. चित्रविचित्र माणसांचे नमुने गोळा करून त्यानं प्रदर्शन मांडलं. चार्ल्स स्ट्रॅटन हा डेडफुट्या त्यानं हुडकून काढला. त्याला "जनरल टॉम थंब' बनवलं. लेट्टी लुट्‌झ नावाची एक दुय्यम गायिका होती. आवाज चांगला होता; पण तिला भरदार दाढी होती! एक जगातला सर्वांत लठ्ठ माणूस शोधला. त्याला "लॉर्ड ऑफ लीड्‌स' अशी ओळख दिली. एका अंगभर केसाळ तरुणाला "डॉग बॉय' म्हणून पेश केलं. तेव्हा रिंगलिंग ब्रदर्स ही सर्कस जोरात होती. त्या सर्कशीत ऍल व्हीलर नावाची कमनीय ट्रॅपिझ आर्टिस्ट होती. भरभक्‍कम पगार देऊन त्यानं तिला फोडलं. ह्या गोतावळ्याला तालासुरांची, नृत्याची झकास जोड दिली. गरिबांसाठी ते नवं होतं. साहजिकच पब्लिकची झुंबड उडाली.
अभिजनांमध्ये मात्र या प्रकाराची शिसारी होती. भद्र दुनियेत बार्नम हा घोटाळेबाज, खोटारडा ठरला. आपल्या खेळांना दर्जा मिळावा म्हणून बार्नमनं फिलिप कार्लाइल नावाच्या तेव्हाच्या नामवंत नाटककाराला ओढलं. त्याला दहा टक्‍के भागीदारी देऊ केली. अर्थात त्यामुळं कार्लाइल तेवढा बदनाम झाला! जेम्स गॉर्डन बेनेट नावाच्या पत्रकारानं मात्र शिंगं रोखून बार्नमच्या बोगस धंद्याच्या चिंध्या केल्या. "पी. टी. बार्नम ऍम्युझमेंट अँड म्युझियम' या गोंडस नावाखाली चालणाऱ्या या उद्योगाला "सर्कस" म्हणणारा तो पहिला होता.
* * *

कार्लाइलनं काही चक्रं फिरवून बार्नम कंपनीला इंग्लंडच्या राणीचं निमंत्रण मिळेल अशी व्यवस्था केली. तशी ती भेट झालीही. जनरल टॉम थंबचा अवतार बघून राणी खोखो हसत सुटली आणि अभिजनांचे चेहरे उतरले. त्याच महालात बार्नमला भेटली युरोपची गानकोकिळा जेनी लिंड...
जेनीचा आवाज स्वर्गीय होता. तिच्या मैफलींना जाणं, हा एक प्रतिष्ठेचा भाग असे. तिकीटही जबर असे. मिळालेला पैसा जेनी दानधर्मात वाटून टाके. तिथंच बार्नमनं तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला.
""मिस जेनी लिंड, तुम्ही अमेरिकेत या. जगातल्या सर्वोत्कृष्ट रंगमंचावर, सर्वोत्कृष्ट वाद्यवृंदासोबत आणि सर्वोत्कृष्ट श्रोत्यांसमोर गाण्याची संधी मी तुम्हाला देईन...'' तो म्हणाला.
""मला त्याची गरज वाटत नाही...तुम्ही ऐकलंय माझं गाणं?'' ती म्हणाली.
""एकदाही नाही...पण तुमचा लौकिक मला पुरेसा आहे...'' बार्नम म्हणाला.
""मीच का? मी ऐकलंय की तुमच्या सर्कशीचा प्रेक्षक फार...अं...वेगळा आहे!'' काहीसं अडखळत तिनं म्हटलं.
""खरंय...माझ्या कार्यक्रमाला लोक येतात ते स्वत:ला गंडवून घ्यायला...त्यांना अस्सल म्हणजे काय असतं, हे दाखवायची इच्छा आहे..'' फिनियस बार्नमनं थेट सांगितलं.
प्रत्येक खेळाला हजार डॉलर्स ही बिदागी त्या काळात महाप्रचंड होती. बार्नमनं जेनी लिंडला अमेरिकेत आणलं, तेव्हा तिच्या स्वागताला तीस हजार लोक जमले होते. ही होती बार्नमच्या जाहिरातबाजीची कमाल. जेनी लिंडचा गोळीबंद, भावविभोर आवाज ऐकून अमेरिकन रसिक पार खुळावून गेले. असलं काही त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं. तिचा अमेरिका दौरा अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी ठरला. दरम्यान, तिच्यासोबत दौऱ्यावर गेलेल्या बार्नमचं घराकडं अंमळ दुर्लक्षच झालं होतं. तो तिच्या आहारी गेल्याची चर्चा बार्नम सर्कशीत होऊ लागली. सर्कसधंदा कार्लाइल सांभाळत होता म्हणून ठीक...
""आपली ओळख होणं हा नियतीचा संकेत असणार...'' शॅंपेनचा चषक हातात देत जेनी हळुवारपणे बार्नमला म्हणाली.
"" अर्थात...अर्थात...'' तो.
""या नात्याला दृष्ट लागू नये. किंबहुना ते अधिक घट्ट व्हावं...अं?'' ती म्हणाली.
""आपल्याला थांबावं लागेल जेनी...उरलेला दौरा तू एकटीनं कर. मला घरी जावं लागेल...'' बार्नम म्हणाला. जेनीचा मूड गेला. आजची मैफल ही दौऱ्याची अखेरची असेल, असं सांगून तिनं त्याला तिथल्या तिथं झटकलं.
...घरी परतलेल्या बार्नमला दोन गोष्टी पाहाव्या लागल्या. घरावर जप्ती आली होती. चॅरिटी आपल्या मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. भरीसभर म्हणून त्याच्या सर्कशीची इमारत हुल्लडबाजांनी जाळून टाकली. त्यात कार्लाइल जखमी झाला. सारं काही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं.
पुढं काय झालं? बार्नम त्यातून कसा सावरला? चॅरिटी त्याच्याकडं परत आली? त्याची लाडकी सर्कस उभी राहिली...हे सारं पडद्यावर पाहावं आणि ऐकावंही.
* * *

"एक्‍समेन' चित्रपट मालिकेतला "लोगान' म्हणून तरुणांमध्ये ओळखीचा असलेला ह्यू जॅकमन इथं पी. टी. बार्नमच्या भूमिकेत रंग भरतो. हाताच्या पंज्यातून सुऱ्यांची पाती काढणारा हा एक्‍समन इथं हळुवार भूमिकेत आपला खरा दर्जा दाखवून जातो. बार्नमच्या जीवनावर चित्रपट करण्याची कल्पना त्याचीच होती. त्यानंच दिग्दर्शक मायकेल ग्रेसीला पहिल्यांदा ही संहिता धाडली. ग्रेसी खरंतर नावाजलेला ऍनिमेशनकार आणि ग्राफिक कलावंत. दिग्दर्शनाचा त्याला अनुभव नव्हता; पण त्यानं या संगीतिकेचं सोनं केलं. अर्थात त्याला कारणीभूत ठरल्या जॉन डेब्नी आणि जोसेफ ट्रांपानेझ या संगीतकार जोडगोळीनं दिलेल्या अफलातून चाली. "द ग्रेटेस्ट शो', "अ मिलियन ड्रीम्स', "नेव्हर इनफ...', "धिस इज मी...', "कम अलाइव्ह...' अशी एकसे बढकर एक गाणी या चित्रपटात आहेत आणि नृत्यांनी तर बहार आणली आहे. या चित्रपटाचं संगीत हा खरा हिरो आहे, असं म्हटलं तरी चालेल.
बार्नम हा खरा अमेरिकन टेस्टमेकर होता. वॉल्ट डिस्नीसारखे अधिक थोर प्रतिभेचे कलावंत त्याच्यानंतरही होऊन गेले; पण बार्नम म्हणजे...यासम हाच!
...येत्या गुरुवारी, पाच जुलैला पी. टी. बार्नमची जयंती. म्हणजे दोनशे वर्षांहून अधिक काळ हा खेळिया जगाला अजून रिझवतोच आहे. चित्रपट संपताना तर खुर्चीतल्या खुर्चीत बसून टाळ्या वाजवत मन थेट अमेरिकन पद्धतीनं म्हणतं ः "बार्नम, यू रॉक, मॅन! खरंच, गड्या...तुला मरण नाही!''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com