esakal | लाखाची गोष्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Shivsena Politics

लाखाची गोष्ट!

sakal_logo
By
प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

‘सिंहासन’ या चित्रपटातला बिलंदर वार्ताहर दिगू टिपणीस हा ना कधी ‘प्रेसरूम’मध्ये बसलेला बघायला मिळाला, ना तो कधी शिवाजी पार्कवरील लाखांची सभा ‘कव्हर’ करताना दिसला! तरीही, राज्याचे प्रश्न आणि नेत्यांची कुवत यांविषयीची त्याची जाण ही विलक्षणच होती. मात्र, खऱ्या अर्थानं राज्य समजून घेता येतं ते जाहीर मैदानी सभा, तसंच नेत्यांचे राज्यभरातील दौरे यांना ‘आम आदमी’ कशा प्रकारे प्रतिसाद देतो, त्यातूनच. मात्र, जाहीर सभा असो की आखीव-रेखीव दौरे असोत, तुम्ही नेत्यांच्या साचेबंद गराड्यातून बाहेर पडून, त्यासाठी याच दौऱ्यात वा सभांच्या वेळीही तिथं जमलेल्या तळाच्या पातळीवरील माणसाशी संवाद साधावा लागतो...

महाराष्ट्रात लाखोंची गर्दी होणारी पहिली सभा ही अर्थातच, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनकाळात झाली असणार. तेव्हा हुतात्मा चौकातून निघालेल्या उत्स्फूर्त मोर्चाचं रूपांतर गिरगाव चौपाटीवर अशाच जाहीर सभेत झालं होतं आणि नंतर अशा सभा दादरच्या ‘शिवाजी पार्क’वर (ज्याचा उल्लेख आचार्य अत्रे नेहमीच ‘शिवतीर्थ’ असा करायचे!) होऊ लागल्या. मराठीभाषकांच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती १९६० मध्ये झाली आणि लगोलग, त्याच हेतूनं स्थापन झालेल्या ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’त फूट पडली. त्यानंतर लाखालाखांच्या सभांचा सिलसिला हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून सुरू केला आणि त्यासाठी शिवाजी पार्क हे त्यांचं ‘होम ग्राउंड’ बनून गेलं. दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरामेळाव्याच्या निमित्तानं तर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं मोठंच उधाण येत असे. पुढं १९८७ मध्ये मुंबईत विलेपार्ले इथं झालेल्या एका पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी ‘हिंदुत्वाची भगवी शाल’ खांद्यावर घेतली आणि मग त्यानंतर त्यांचा राज्यभरातील संचार सुरू झाला तोही अशाच लाखालाखांच्या सभांमधून.

मात्र, या काळात मुंबईत वा राज्यातही अन्यत्र कुठं काँग्रेसजनांनी लाखाची गर्दी जमवल्याचं फारसं आढळून येत नाही. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सात-आठ वर्षांनी सोनिया गांधी या काँग्रेस नेत्यांच्या आग्रहावरून राजकारणात उतरल्या तेव्हा, शरद पवार यांनी नंदुरबार परिसरात आयोजिलेल्या सोनियांच्या सभेला मात्र लाखाहून अधिक लोकांनी गर्दी केल्याचं आठवतं. पुढं मुंबईत सोनियांची शिवाजी पार्कवरच एक जंगी सभा झाली होती आणि त्या सभेची नोंदही काँग्रेसच्या इतिहासात ‘लाखाची गोष्ट’ अशीच झाली होती. मात्र, त्यानंतर शिवसैनिक चवताळून उठले आणि नंतरच्या चार-सहा दिवसांतच बाळासाहेबांचीही शिवाजी पार्कवरच सभा झाली. त्या सभेला जमलेल्या गर्दीनं सोनियांची ती सभा पार कुठच्या कुठं फेकून दिली होती!

बाळासाहेब हे आपल्या पहिल्यावहिल्या मराठवाडादौऱ्यावर १९८९ मध्ये सोलापूरमार्गे-व्हाया-तुळजापूर रवाना झाले. तेव्हा त्या दौऱ्यात प्रमोद महाजन यांच्या आवतणावरून जायला मिळालं होतं. त्या दौऱ्यात सोलापूरच्या ‘होम मैदाना’वर झालेल्या पहिल्याच सभेत लाखोंनी हजेरी लावली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती मग उस्मानाबाद, तसंच लातूर येथील सभांमध्ये बघायला मिळाली होती. मात्र, बाळासाहेब अशा लाखांच्या सभांनी मैदान मारत असताना, पवार यांचा खाक्या मात्र अगदीच वेगळा असे. ते दिवसाकाठी आठ-दहा सभा सहज घेत आणि त्या सभांना मग अर्थातच गर्दीही पाच-सात हजारांचीच जमत असे.

पुढं १९९५ मध्ये पवार यांच्या अशाच एका झंझावाती दौऱ्यात सहभागी व्हायची संधी मिळाली. औरंगाबादहून नांदेडला हेलिकॉप्टरनं जाताना दरम्यान पवारांनी अशाच काही हजारांच्या पाच-सात सभा घेतल्या होत्या. त्याच दौऱ्यात पवारांना मग एकदा यासंबंधात थेट प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या एकंदरच आयुष्यभराच्या रणनीतीचं दर्शन घडवणारं होतं.

पवार म्हणाले होते : ‘लाखाची एक सभा भरवण्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. त्यासाठी आसपासच्या किमान दोन-चार मतदारसंघांतील रोजचा प्रचार थांबवून ही ‘लाखाची गोष्ट’ सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांना गुंतून पडावं लागतं आणि ते परवडणारं नसतं.’ मात्र, यापलीकडचाही आणखी एक मुद्दा हा अधिक महत्त्वाचा होता.

‘लाखाची एक सभा झाली की मग त्या संपूर्ण परिसरातले कार्यकर्ते पुढचे आणखी दोन-चार दिवस त्या सभेचा शिणवठा घालवण्यात व्यतीत करतात आणि प्रचार थांबून राहतो. त्यापेक्षा लहान लहान गावांतील छोट्या सभांमुळे त्या त्या गावातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद तर साधता येतोच; शिवाय तिथल्या सर्वसामान्य जनतेलाही, ‘नेता आपल्या गावात येऊन गेला,’ याचं समाधान लाभतं,’ असं तेव्हा पवारांनी सांगितलं होतं.

पवारांच्या या विश्लेषणात निश्चितच तथ्य होतं. ‘गावागावातल्या असंख्य कार्यकर्त्यांना आजही थेट नावानं ओळखणारा नेता,’ ही पवारांची खासियत आहे आणि त्याचा त्यांना कसा फायदा होतो हे आपण महाराष्ट्रात झालेल्या २०१९ मधील निवडणुकीत पाहिलंच आहे. मात्र, याच पवारांनी एकदा थेट मुंबईत लाखाची गर्दी उभी करून दाखवली होती. १९९९ मध्ये सोनियांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरून पवारांना काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. ता. १० जून १९९९ रोजी मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात सकाळी बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेला अवघा महाराष्ट्र उपस्थित असल्याचं चित्र उभं राहिलं होतं. त्याचं कारण, राज्याच्या प्रत्येक भागातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये होतं. ती गर्दी खरं तर शिवाजी पार्कवरच्या अनेक विक्रमी सभांचा विक्रम मोडणारी होती; पण पवारांच्या राजकीय प्रवासातील ही ‘लाखाची गोष्ट’ बहुधा एकमेव असावी.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या दोन्ही पक्षांची स्थापना याच जून महिन्यातील. त्यामुळेच बाळासाहेबांच्या लाखालाखांच्या, तर पवारांच्या काही हजारांच्या सभांचा हा ‘आँखो देखा सिलसिला’!

तळटीप : शिवाजी पार्क मैदानावर नेमके किती लोक जमा होऊ शकतात, हाच खरं तर लाखमोलाचा प्रश्न आहे. १९६० च्या दशकात हा प्रश्न अनेकदा विचारला गेला होता. तेव्हा मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले इमॅन्युएल मोडक यांनी, मैदानात अगदी मांडीला मांडी लावून लोक बसले तरी किती जागेत किती माणसं मावतात, याचं गणित मांडलं होतं. त्यानुसार तेव्हाचं शिवाजी पार्कचं क्षेत्रफळ ध्यानात घेता, तिथं केवळ ८९ हजार लोक मावू शकतात असा मोडक यांचा निष्कर्ष आहे. त्यानंतर या मैदानावर चहूबाजूंनी आक्रमण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता तिथं किती लोक जमा होऊ शकतील, याचा अंदाज ज्यानं त्यानंच लावायचा आहे!