#MokaleVha : पती आणि सासू माझी बदनामी करतात

Talking-on-problem
Talking-on-problem

पती आणि सासू माझी बदनामी करतात
मी ३५ वर्षांची गृहिणी आहे. माझे लग्न दहा वर्षांपूर्वी झाले आहे. मला मूल झालेले नाही. माझ्या व पतीच्या सर्व आरोग्य तपासण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये माझ्या पतीमध्ये दोष असल्याचे दिसून आले. माझे पती व सासू ही बाब स्वीकारत नाही. सतत मलाच दोष देतात. सर्व नातेवाइकांमध्ये टोमणे मारतात व बदनामी करतात. ‘‘हिला मूल होणार नाही,’’ असे म्हणतात. या वाक्‍याचा अर्थ असा होतो, की माझ्यात दोष आहे. त्यामुळे मला खूप वाईट वाटते. मलासुद्धा आई व्हावेसे वाटते. मागील दोन महिन्यांपूर्वी पतीने मला भांडण करून घरातून हाकलून दिले. त्यामुळे नाइलाजास्तव मला माहेरी यावे लागले. मला नांदण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी सासरी जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पतीने, माझी मानसिक स्थिती ठीक नाही, तू सध्या येथे राहू नको, असे सांगितले. माझा काहीही दोष नसताना मी माहेरी का राहावे? दहा वर्षे संसार केला. आज ना उद्या परिस्थिती बदलेल असा विचार केला अन्‌ आज सासरचे लोक इतक्‍या सहजपणे मला घराबाहेर काढतात, हे मला खूप त्रासदायक आहे.

- तुम्हाला मूल झाले नाही, हा तुमचा दोष असूच शकत नाही. वैद्यकीय चाचण्यांमधूनही ते सिद्ध झाले आहे, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. ते तुम्ही स्वीकारलेही आहे. वैद्यकीय चाचण्या करून घेणे सोपे आहे. परंतु समाजाची जी मानसिकता आहे, ती समजून घेणे तुमच्यासाठी अवघड जाते आहे. तुमच्या सासरच्या लोकांना सत्यापासून दूर पळायचे आहे, वास्तवता स्वीकारायची नाही, म्हणून दुटप्पीपणे तुम्हाला टोमणे मारून, टोचून बोलून ते त्रास देत आहेत. समाजामध्ये एका पुरुषामध्ये दोष असेल तर कधीही ‘याला मूल होणार नाही,’ असे वाक्‍य वापरत नाही, उलट ‘हिला मूल होणार नाही’ असे वाक्‍य वापरतात. अशा दुटप्पी, ढोंगी समाजाचा विचार करू नका. आज आरोग्यशास्त्र, विज्ञान एवढे पुढे गेले आहे, की मूल होण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. टेस्ट ट्यूब बेबी आदींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेता येतो. मूल दत्तक घेता येते. तुमच्या सासरच्या लोकांना याबाबत समुपदेशनदेखील केले जाईल. तुम्हाला वरील कोणतीही उपाययोजना तुमच्या आनंदासाठी करता येईल. गरज आहे, ती पतीला समजावून सांगण्याची. ते तुम्हाला अशा पद्धतीने माहेरी ठेवू शकत नाहीत. सासरचे घर हे तुमचे हक्काचे घर आहे. त्यामुळे ठामपणे, निर्भीडपणे सासरी राहण्यास जा. तुमची मते स्पष्टपणे न भांडता मांडा. जर सासरच्या लोकांनी ऐकलेच नाही, तर कौटुंबिक न्यायालय पुणे येथील ‘चला बोलू या’ या संकल्पनेचा फायदा घ्या. येथे अर्ज देऊन समुपदेशन करून घ्या.

सासरचे माहेराहून पैसे आणायला सांगतात
मी ३२ वर्षांची विवाहित स्त्री आहे. माझे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले. माझ्या पतीचा बांधकाम व्यवसाय आहे. माझे एम.बी.ए. झाले आहे. पतीचा व्यवसाय असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, त्यामुळे त्यांनी मला मी उच्चशिक्षित असूनही नोकरी करू दिली नाही. मला दैनंदिन गरजांसाठी माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागते. माझ्या सासरचे लोक सर्व गोष्टी मला माहेराहून आणायला सांगतात. मी जर नोकरी करायचे म्हटले तर सासरचे लोक नोकरी करू देत नाही. सतत स्वतःच्या श्रीमंतीच्या प्रतिष्ठेच्या गप्पा मारतात. ‘‘आमच्या घरात स्त्रिया नोकरी करत नाहीत, स्त्रियांच्या पैशांवर आम्ही अवलंबून नाही,’’ अशा एकीकडे गप्पा; दुसरीकडे माझ्या माहेराहून सतत मदतीची अपेक्षा करतात. माझी स्थिती खूप वाईट आहे. कारण मला कोणत्याही स्वरूपाचे स्वातंत्र्य नाही. मला माझे आयुष्य स्वतंत्रपणे जगायचे आहे. मला माझ्या दैनंदिन गरजांसाठी माहेराच्या लोकांवर अवलंबून राहायचे नाही.

- तुम्ही स्वतः उच्चशिक्षित आहात. तुम्हाला तुमचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. तुम्हाला घरी राहायचे, की नोकरी करायची, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. याबाबत सासरचे लोक तुमच्यावर सक्ती करू शकत नाहीत. सासरच्या लोकांना तुम्ही नोकरी करू नये असे वाटत असेल तर त्यांनी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करावयास पाहिजेत. परंतु ते तसेही करत नाहीत. ते स्वतःला खूप श्रीमंत, प्रतिष्ठित समजत असतील तर त्यांनी त्यांच्या राहणीमानानुसार तुम्हाला ठेवले पाहिजे, तुम्हाला सांभाळले पाहिजे. परंतु त्यांच्या एकूण वागण्यावरून खरोखरच ते दुटप्पी वागत आहेत.

तुम्ही तुमच्या पतींबरोबर स्पष्टपणे याबाबत बोला. नोकरी करायची मनापासून इच्छा असेल दर त्याविषयीदेखील स्पष्टपणे भूमिका मांडा. तुम्ही तुमच्या करिअरविषयी निर्णय घेऊ शकता. सासरचे लोक, पती हे तुमच्यावर त्यांचे निर्णय लादू शकत नाहीत. तुम्ही माहेराहून मदत घेणार नाही, हेदेखील स्पष्टपणे सांगा. माहेरची मदत घेणे ताबडतोब थांबवा. तुम्ही सासरच्या लोकांना कशा पद्धतीने नोकरीसाठी तयार करता किंवा त्यांना त्यांच्या चुका दाखवून देता हे सर्वस्वी तुमचे कौशल्य आहे. अत्यंत संयमाने, निर्भीडपणे तुमच्या सासरच्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत त्या त्यांच्यासमोर मांडा. येथे कुठेतरी तुम्ही सासरच्या लोकांना त्यांच्या चुका दाखवण्यास कमी पडत आहात, त्यामुळे ‘मला काय हवे आहे, माझ्या समस्या काय आहेत, मला समोरच्याचे कोणते वागणे खटकले,’ माझ्या भवितव्याच्या कल्पना काय आहेत हे स्वतःला विचारा. तुमची उत्तरे तुम्हाला मिळाली की समोरच्या व्यक्तीला मनविणे सोपे जाईल.

पत्नी कमावती असूनही पोटगी मागते 
मी ३५ वर्षांचा विवाहित पुरुष आहे. माझे सात वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मला पाच वर्षांचा मुलगा आहे. मी आयटी कंपनीत नोकरी करत आहे. माझी पत्नीसुद्धा आयटी कंपनीत नोकरी करत आहे. दोघांना सारखा पगार आहे. माझी पत्नी अत्यंत घमेंडी, स्वार्थी वृत्तीची आहे. तिने एकत्र राहत असताना कधीही घरात स्वतःच्या कमाईतून खर्च केला नाही. ती तिचा सर्व पगार बचत करत असे. गेल्या दीड वर्षापासून ती माझ्यापासून विभक्त राहत आहे. मला मुलाला भेटू देत नाही. सध्या तिने माझ्याविरुद्ध घरगुती हिंसाचार कायदा अन्वये केस दाखल केली आहे. आमच्या दोघांच्या नावावर मी एक फ्लॅट घेतला आहे. त्यात तिने एक रुपयाही भरलेला नाही. परंतु तिने या केसमध्ये तिचा व मुलाचा खर्च, निवासाचा अधिकार म्हणून फ्लॅट व नुकसानभरपाई असे सर्व मागितले आहे. तिला काहीही द्यायची माझी इच्छा नाही.

- तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही आयटी कंपनीत नोकरी करत आहात. दोघांनाही समान वेतन आहे, म्हणून पत्नीला पोटगी मागण्याचा अधिकार नाही. परंतु तुमच्या मुलासाठी तुम्हाला खर्चासाठी, शिक्षणासाठी काही रक्कम द्यावी लागेल. कोर्टामध्ये दोघांचेही उत्पन्नाचे पुरावे, दोघांवरील जबाबदाऱ्या, हे सर्व तपासले जाते. त्याचप्रमाणे कोणी स्वतःहून त्याग केला हेदेखील बघितले जाते. त्याचप्रमाणे दोघांच्या नावावरील फ्लॅटमध्ये कोणी सर्वात जास्त रक्कम भरली आहे हेदेखील पुराव्यानुसार तपासले जाते. आणि त्या पद्धतीने कोर्टामध्ये हुकूम केले जातात. तुमची पत्नी मुलाला भेटण्यास तुम्हाला मनाई करू शकत नाही. तुम्ही तिने दाखल केलेल्या अर्जामध्ये मुलाच्या भेटीचा अर्ज द्या. जन्मदात्याला कधीही कायदा मुलांना भेटण्यावाचून वंचित करत नाही. तुम्ही रीतसर योग्य पुरावे देऊन तुमची बाजू भक्कमपणे मांडा. घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या केसेसमध्ये समुपदेशन करून घेता येते. त्याचा फायदा जरूर घ्या. समुपदेशनादरम्यान बऱ्याच केसेसमध्ये समझोता झालेला बघावयास मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com