सावधानः व्हॉट्सअॅपवरच्या फसव्या मेसेजमध्ये आलेली लिंक उघडू नका !

प्रा योगेश हांडगे 
बुधवार, 19 जुलै 2017

जगभरातील व्हॉट्सअॅप यूजर्सची संख्या कोटींच्या घरात असल्यानं हॅकर्सने आपला मोर्चा व्हॉट्सअॅपकडे वळवला आहे. बँक खात्यांची माहिती सहज मिळवून त्यावर डल्ला मारण्याकरिता  हॅकर्स मोठ्या खुबीने  व्हॉट्सअॅपचा वापर करत आहे.

एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर फ्री सर्व्हिस दिल्यानंतर लोकांना पैसे द्यावे लागतील अशी घोषणा व्हॉट्सअॅपने केली होती. परंतु जानेवारी २०१६ मध्ये ही घोषणा व्हॉट्सअॅपकडून रद्द करण्यात आलेली होती. पण तरीही व्हॉट्सअॅपवर लोकांना एक मेसेज येत असून ज्यात लिहिले आहे की, तुमचे एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन संपणार आहे. पुढील सेवा सुरू ठेवण्यासाठी पेमेंट करा, असा हा मेसेज आहे. या मेसेजखाली एक लिंकही दिली आहे. ज्यावर क्लिक केल्यावर एक पेमेंट पेज उघडले जाते.

या पेमेंट पेजवर तुमची बँक डिटेल्सची माहिती भरण्यास सांगितली जाते. पुढे आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले, की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या भामट्याने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते. तिथे ‘तुमचा पासवर्ड  टाईप केल्यावर तो भामट्याच्या हाती लागण्याची शक्यता असते. मग तो भामटा ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पैसे स्वत:च्या खात्यात वळवतो. लिंक उघडून माहिती भरल्यास तुमची बँक खात्याची माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते.तेव्हा सावध राहा.

जगभरातील व्हॉट्सअॅप यूजर्सची संख्या कोटींच्या घरात असल्यानं हॅकर्सने आपला मोर्चा व्हॉट्सअॅपकडे वळवला आहे. बँक खात्यांची माहिती सहज मिळवून त्यावर डल्ला मारण्याकरिता  हॅकर्स मोठ्या खुबीने व्हॉट्सअॅपचा वापर करत आहे. सध्याच्या जगात कॉम्प्युटर्स तसेच इंटरनेट या तंत्रज्ञानावर जगभरातले अनेक व्यवहार अवलंबून असल्यामुळे या तंत्रज्ञानावर केलेले हल्ले खूपच धोकादायक ठरू शकतात. पेमेंटच्या नावाखाली तुमच्या बँक खात्यातील माहिती चोरण्यासाठी हॅकर्सने नवा फंडा अवलंबिलेला आहे. 

सध्या हे मेसेज 'यूके'च्या लोकांनाच येत आहेत. परंतु असे मेसेज भारतातील लोकांनाही येवू शकतात. त्यामुळे अशा फसव्या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि लिंक उघडू नका. 

सायबर गुन्हेगारीवर उपाय

  • आर्थिक गोष्टींची विचारणा सतत झाल्यास सायबरतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • अननोन नंबरहून आलेली कोणतीही लिंक ओपन करू नका.
  • फसवणूक झाल्यास तत्काळ पोलिसांच्या सायबर क्राईम सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prof. Yogesh Handge writes about whatsapp and cyber crime