
जनमत
पुण्यात पोटनिवडणूक पार पडली. इथे मतदारांना काय वाटतं याबद्दल अनेकांनी अनेक पद्धतीने मांडणी केली. माध्यमांतून- समाजमाध्यमांतून नागरिकांनीही उत्स्फूर्त मांडणी केली. कुठे जातीबद्दल चर्चा झाली, तर कुठे धर्माबद्दल. कुठे नेत्यांबद्दल चांगलं-वाईट बोलले गेले, तर कुठे स्थानिक प्रश्नांवर. नेमके लोकांना वाटतेय तरी काय?
लोकांच्या भावनेचा निवडणुकीवर नेमका कसा आणि किती परिणाम होतो? सध्या महाराष्ट्रात जी राजकीय घुसळण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न आज प्रत्येक राजकारण्याच्या मनात आहेत.
लोकशाही पद्धतीत मतदारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे- कारण, लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा सर्व अधिकार मतदारांना असतो. त्यामुळे मतदारांच्या भावनांचा कल समजून घेणे, तो आपल्या बाजूने वळविण्यासाठी वेगवेगळी प्रचारतंत्रे वापरण्याचे काम निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार करत असतात.
मतदार नेमके कसे मतदान करतात यावर अनेक संशोधने सातत्याने होत आहेत. यामधील एक प्रमुख मांडणी अशी, की भारतात श्रीमंतांपेक्षा दुर्बल आणि मध्यम आर्थिक गटातील नागरिक अधिक संख्येने मतदान करतात.
दुर्बल आर्थिक गटातील नागरिकांचे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि त्यांचे लाभ यावरचे अवलंबित्व सर्वाधिक असते. सरकारच्या सामाजिक आणि कल्याणकारी धोरणांचा त्यांच्या जीवनमानावर थेट परिणाम होत असतो.
सरकारच्या अशा ध्येयधोरणांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे सरकारची प्रतिमा, लाभ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची लाभाभोवतीची संपर्क यंत्रणा याचा परिणाम मतदान निकषांवर होतो.
समाजातील आर्थिक सक्षम आणि तुलनेने अधिक साक्षर गटाच्या बाबतीत सरकारची कामगिरी, कायदा-सुव्यवस्था आणि त्यातून शहरात/परिसरात तयार होणारे वातावरण असे मुद्दे परिणामकारक ठरतात. या स्तरातील शहरी मतदारांवर बदलत्या माध्यमांचा परिणाम होतो आहे, असे अलीकडच्या संशोधनातून समोर येत आहे.
याशिवाय मतदारसंघाच्या रचनेनुसार पक्ष, विचारधारा, उमेदवार आणि त्याची प्रतिमा, जात आणि इतर मुद्दे जनभावनेवर परिणाम करणारे ठरतात; पण या मुद्द्यांचा परिणाम बहुमतात बदलण्यासाठी ‘रेटा’ आवश्यक असतो. असा रेटा कधी मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने समोर येतो, तर कधी कसब्यात एका मौलवींच्या व्हायरल क्लिपने.
जनमत चाचणीचे शास्त्र
निवडणुकीत ‘सर्व्हे’ म्हणजेच ‘जनमत चाचणी’ याबद्दलही बरीच चर्चा ऐकायला मिळते. लोकांचा कल काय असतो? निवडणुकीत तो अजमावून बघण्याचं शास्त्र आहे का? त्याचे अंदाज अचूक असतात का? याबद्दलही अनेक तर्क-वितर्क मांडले जातात.
राजकीय सर्वेक्षणात लोकप्रिय असलेल्या ‘ॲक्सिस माय इंडिया’चे संस्थापक प्रदीप गुप्ता आपल्या How India Votes पुस्तकात लिहितात, ‘Human Psychology + Sociology = Psephology.’ आकडेवारी आणि कल यांना समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि राजकीय आकलनाची जोड दिली, तर जनमताचा कौल समजून घेणे शक्य होते. असे संशोधनातूनही समोर येते आहे. अर्थात कोणत्या परिस्थितीत कोणत्या मॅथडोलॉजीचा उपयोग केला जातोय यावर संशोधनाचे परिणाम अवलंबून असतात.