
एक तरुणी आणि एक तरुण अशा बहीण-भावाची ही कथा. तशी व्यथाच. तरुणी उत्तम शिकलेली. सध्या ती हैदराबाद येथील एका "न्यूज चॅनेल'मध्ये पत्रकार म्हणून काम करते. हुशार, देखणी. सतत चेहऱ्यावर हसू असलेली. एक दिवस तिला अचानक गावी बोलावण्यात आले. तिचा भाऊ काश्मीरमध्ये एक मोठा सरकारी अधिकारी. त्यालाही बोलविण्यात आले. ते दोघेही घरी पोहोचले. तरुणीला सांगण्यात आले की, तुझी "बिदाई' आता चार दिवसांत करायची आहे. तिच्या भावाला सांगितले की, तुझी "लुगाई' घरी येणार आहे. या बहीण-भावाला वाटले की, आपली थट्टा तर करत नाही ना? परंतु त्यांना पुढे जे सांगण्यात आले ते त्यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होते.
दोघांचेही लग्न त्यांच्या बालपणीच झाले. आता त्यांना फक्त रीतिरिवाजानुसार "नांदा सौख्य भरे' करायचे होते. ते दोघेही हादरले. माझ्या ऑफिसमध्ये मी त्यांचे दुखणे ऐकले, तेव्हा मलाही गरगरायला आले.
लहानपणीच त्यांची दोघांचीही लग्ने उरकली होती. मोठी झाल्यावर नांदायला जायचे असे ठरले होते. त्या मुलीला म्हटले, ""तू का नाही जात मग नांदायला?'' तर ती म्हणाली, ""अहो सर तो काही शिकलेला नाही. गायी सांभाळतो. दुधाची गाडी चालवतो. मला आम्ही लहान असताना, कोणतीही समज नसताना आमचे लग्न लावून दिले. त्यावेळी आमचे विरोध करण्याचे वय नव्हते आणि कारणही नव्हते. आमच्यासाठी तो भातुकलीचा खेळ होता. आम्ही तर ती घटना केव्हाच विसरलो होतो. आता माझी स्वप्ने आहेत. मला पुढे शिकायचेही आहे. उत्तम रिपोर्टर म्हणून नाव कमवायचे आहे. मी त्यांच्याकडे नांदायला गेले तर मला शेण-पोहोटाच करावा लागणार आहे. सांगा मी खरेच करू का?'' तिचा भाऊ म्हणाला, ""सर, जिससे मेरी शादी बचपन मे करायी गयी थी, वो एकदम अनपढ है. 24 घंटे घुंघटे में रहने वाली है. मी तिच्यासोबत संसार करायचाही म्हटला तर लग्न टिकेल का? टिकले तर किती दिवस? तुम्ही आमच्या आई-बाबांना समजून सांगा सर. तुमचे ऐकतील ते. त्यांच्यासोबत पटते तुमचे.'' त्या दोघांचेही दुखडे मी ऐकून घेतले.
त्यांचे आई-वडील गायी पाळणाऱ्या समाजाचे. गायीच्या दुधाची विक्री करून चरितार्थ चालविणारे. ते शिकले नव्हते. परंतु त्यांनी त्यांच्या चारही मुलांना शिकविले. हे दोघे नोकरीवर लागले. दोघे भाऊ गावात चांगला व्यवसाय करायला लागले. स्थायिक झाल्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांना शिकविता आले. परंतु, त्या समाजात शिक्षणाच्या बाबतीत सगळा आनंदी आनंद आहे. गायीच्या चाऱ्याच्या शोधात सतत भटकंती करावी लागते. त्यामुळे शिकू शकत नाहीत. आता विजोड जोडी टिकले कशी, असा प्रश्नच त्यांच्यापुढे निर्माण झाला. बालविवाहामुळे एक वेगळाच पेच या दोघांसमोर निर्माण झाला. मी पुढे त्यांच्या आईवडिलांना भेटलो. त्यांना समजावून सांगितले. परंतु, या प्रक्रियेत मला अनेक बालविवाह आठवले.
बालविवाह झालेल्या अनेक मुलामुलींना मी भेटलो आहे. आपण वावरतो, उठतो-बसतो त्या समाजात बालविवाहाची घटना बहुतेक होताना दिसत नाही. परंतु, आपल्या भोवताल वावरणारा असा एक वर्ग आहे, जिथे बालविवाह सर्रास होतात. लॉकडाउनच्या काळात असे अनेक बालविवाह झाले. अनेक जुळलेही आहेत. "युनिसेफ'च्या एका आकेडवारीनुसार भारतात मुलींचे कमी वयात लग्न होण्याचे अर्थात बालविवाहाचे प्रमाण 49 टक्के आहे. परंतु, भटके-विमुक्त आणि अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींमधील असे अनेक समाज आहेत, ज्यांच्यात बालविवाहाची परंपरा 99 टक्के आहे. लॉकडाउनच्या काळात तर आपल्या भोवताल असलेल्या अशा अनेक वस्त्यांवर धडाधड बालविवाह उरकले जात आहेत. त्याची कारणेही व्यक्तिपरत्वे भिन्न आहेत. नागपूरनजीक हिंगणा तालुक्यातील एका वस्तीत सात बालविवाह उरकले. आणखी सात-आठ बालविवाह होणार आहेत. येथील बागाबाईने तिच्या दोन अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिले. बागाबाईला पाच मुली. तीन मुलींचे लग्नही त्या अल्पवयीन असतानाच झाले. त्या तिन्ही मुलींच्या तीन स्वतंत्र चित्तरकथा आहेत. मोठीचा नवरा एक मूल पदरात सोडून दोन वर्षांत मेला. आता ती विधवेचं जीवन जगते. दुसरीला नवऱ्याने टाकून दिले. तर तिसरीची लग्नानंतर लगेच दुसऱ्या वर्षी सोडचिठ्ठी झाली. ज्या दोन मुलींचे लग्न तिने लॉकडाउनमध्ये उरकले त्यापैकी एक सातवीत होती, तर दुसरी दहावीची परीक्षा देणार होती. ही एकच वस्ती नाही, तर रोज कुठल्या ना कुठल्या वस्तीवर बालविवाह सुरूच आहेत. बालविवाहविरोधी कठोर कायदे आहेत. परंतु, वस्त्यावंर, बेड्यांवर राहणारा एक मोठा वर्ग आहे, जिथे हा कायदाही पोहोचला नाही किंवा बालविवाह विरोधात काम करणारे कार्यकर्तेही पोहोचले नाहीत. त्या त्या समाजातील, त्याच वस्तीतील कुणी बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो. मग त्याचे भयंकर सामाजिक दुष्परिणाम त्या कुटुंबाच्या वाट्याला येताम. खामगावच्या फोटूबाईच्या कुटुंबाने तसा प्रयत्न करून पाहिला. मुलींना शिकवायचे, असा विचार केला. मुलींना शिकविले. तोवर त्या 20-21 वर्षांच्या झाल्या होत्या. मग त्यांना नवरे मुलगे मिळेनासे झाले. मुलांचेही लग्न 16-17 वर्षांत होऊन जाते. मग 20-21 वर्षांच्या मुलींसोबत लग्न करणार तरी कोण? फोटूबाईपुढे मुलींच्या लग्नाचा भीषण तिढा उभा झाला आहे. असा प्रयत्न एका तरुणानेही करून पाहिला. तो शिकला. बीए, डीएड, बीएड, एमए, झाला. स्पर्धा परीक्षेची तयारीही करू लागला. दरम्यान, निवडणुका लागल्या आणि तो सरपंचही झाला. त्याचे वय आता 30 वर्षे आहे. 13-14 वर्षांचे असताना मुलीचे लग्न उरकले जाते, त्या समाजात त्याला आता मुलगी मिळेनाशी झाली. पत्रकार तरुणीच्या आई-वडिलांही चर्चा करताना, त्यांच्यापुढेही हाच सामाजिक प्रश्न होता. ""हमारे समाज मे ऐसेही शादी होती है. अगर मैने मेरे दोनो बच्चों की शादी तोडी, तो इनके साथ कोई शादी नहीं करेगा. मेरे और दो लडके है. इनकी भी शादी नहीं होगी. हम हमारे बच्चों का भलाही चाहते है. लेकिन हमको समाज का भी सोचना पडता है सर.'' त्यांच्या या युक्तिवादापुढे माझ्याकडे उत्तर नव्हते. तुमच्याकडे आहे का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.