Rag Ani Rang Book Review : मराठी भाषेच्या समृद्धीचा वेध घेणारे पुस्तक; डॉ. नीलिमा गुंडी यांनी उलगडले भाषेचे अनेक अनोखे पैलू

Marathi Language and Literature : डॉ. नीलिमा गुंडी लिखित ‘रग आणि रंग’ या पुस्तकातून मराठी भाषेची शब्दसंपत्ती, बोलीवैविध्य, साहित्यपरंपरा, विनोद आणि ज्ञानभाषा म्हणून तिची क्षमता यांचे बहुरंगी दर्शन घडते.
Rag Ani Rang Book Review

Rag Ani Rang Book Review

esakal

Updated on: 

निरंजन आगाशे - niranjan.agashe@esakal.com

मराठी भाषासंस्कृतीचा पैस इतका व्यापक आणि विविधतेने नटलेला आहे, की त्याचा संपूर्ण परामर्श घेणे हे आव्हानच वाटेल. मात्र, कुतूहल जागे ठेवून मधुकरवृत्तीने त्यातील जे जे चांगले आहे, ते ते टिपण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून किती सहजपणे मराठीच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणारा बहुरंगी गोफ विणता येतो, याचे उदाहरण म्हणजे ‘रग आणि रंग’ हे पुस्तक. मराठीच्या प्राध्यापक, कवयित्री आणि समीक्षक असलेल्या डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘सकाळ’मधून ‘रग आणि रंग’ या सदरातून भाषेचा एकेक पैलू उलगडून दाखवला. मराठीवर उमटलेली ‘अभिजात’ची मोहर हे त्या सदराचे निमित्त होते. त्यात काही भर घालून हे पुस्तक सिद्ध झाले आहे.

लेखिकेने मराठी भाषा आणि वाङ्‍मयाचा व्यासंग केला आहे, तो केवळ अध्यापनासाठीच नव्हे, तर उत्कट भाषाप्रेमापोटी, याच्या खुणा पुस्तकात जागोजागी आढळतात. मायमराठीच्या अंगणातील बहर न्याहाळताना आपल्याला झालेल्या आनंदात वाचकांनाही सहभागी करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न या पुस्तकातून जाणवतो. मराठी भाषा-साहित्याविषयी कितीतरी पैलू लेखिकेने लेखांमधून प्रकाशमान केले आहेत. कधी त्या मराठीच्या शब्दसंपत्तीकडे लक्ष वेधतात, कधी बोलींच्या गजबजलेल्या विश्वात फेरफटका घडवतात, कधी शब्दनिष्ठ विनोदांनी उडवलेली धमाल सांगून मजा आणतात, तर कधी ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याच्या मराठीच्या क्षमतेकडे निर्देश करतात. अगदी मराठी लेखकांच्या टोपणनावांच्या त्यांनी सांगितलेल्या ‘गोष्टी’ही रंजक आहेत. सर्वच साहित्यप्रवाहांविषयीची स्वागतशील वृत्ती हे त्यांच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य.

Rag Ani Rang Book Review
Premium|Online Gaming : ऑनलाइन गेमिंग, कर्ज आणि टोकाचं पाऊल! हा विळखा सोडवायचा कसा?

भाषाचळवळीतून निर्माण होणाऱ्या सांस्कृतिक ऊर्जचे महत्त्व जसे त्यांच्या नजरेतून निसटत नाही, तसेच डिजिटल युगाने भाषक व्यवहारांपुढे निर्माण केलेल्या आव्हानाला तोंड देण्याची आवश्यकताही. पुस्तकातील कोणतेही प्रकरण काढून वाचले, तरी काही ना काही कसदार हाती लागतेच. त्यातही कवितेच्या संदर्भातील त्यांचे लेखन मनाला भिडते. कविता किती प्रकारांनी आपली भाषिक, सांस्कृतिक जाण वाढवत, संपन्न करीत असते, याची जाणीव लेखिका या पुस्तकातून करून देतात. ‘शब्दांमध्ये अणुशक्ती असते’, हे नुसतेच एक चमकदार वचन नाही, हे त्या दाखवून देतात. कवितेने एकदा का दंश केला की, भाषाप्रेमाचे अमृत रसिकाच्या तनामनात भिनायला वेळ लागत नाही.

मराठी भाषाविषयक प्रश्नांची चर्चा सुरू झाली की, ती कधी वितंडाच्या रस्त्याला लागते, हे कळत नाही. पण डॉ. गुंडी यांचे लेखन याला अपवाद आहे. अशा प्रश्नांची दखल घेताना त्या काही विधायक सूचना करतात. एकीकडे मराठीचा वैभवशाली वारसा आणि दुसरीकडे अनेक क्षेत्रांत जाणवत असलेली मराठीची परवड यांतील दरी त्यांना अस्वस्थ करते. त्यांनी म्हटले आहे, ‘‘मराठीच्या वटवृक्षाच्या पारंब्या जगभर पसरल्या असल्या तरी तिची मुळे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत.

मराठी आधुनिक भाषा म्हणून मान्यताप्राप्त राहील, यासाठी तिचे ठसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आधी उमटले पाहिजेत. केवळ प्रशासनच नव्हे तर न्यायालये, रुग्णालये, सार्वजनिक सेवा, विमानतळ, बॅंका, जाहिराती इत्यादी क्षेत्रांसह सर्वत्र मराठीलाही स्थान असलेच पाहिजे. मुळात प्रादेशिक भाषा या ज्ञान व माहिती यांचे सर्वसामान्यांपर्यंत वितरण व्हावे, या लोकशाहीच्या तत्त्वाला धरून काम करतात....’’ रांगडेपणा आणि सौंदर्य यांमुळे मराठीला लाभलेली श्रीमंती वाचकांच्या लक्षात आणून देतानाच भाषेच्या विकासासाठी मराठीजनांची जबाबदारीही आहे, याचीही जाणीव त्या करून देतात. मराठीतील कोशकारांच्या कर्तृत्वाची नोंद त्या आवर्जून घेतात, मात्र त्याचवेळी शब्दसंपत्तीला कोशांचे कोंदण लाभूनही आजच्या संवादव्यवहारातील तिची उपेक्षा ही गंभीर बाब आहे, असेही त्या म्हणतात.

यासंदर्भात ख्यातकीर्त भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर यांनी अनुवादित केलेल्या कवितेच्या त्यांनी उद्‍धृत केलेल्या ओळी येथेही देण्याचा मोह होतो. त्या म्हणजे -भणंग आणि गुलाम होतो तो समाज जेव्हा शब्दापासून शब्द निपजत नाहीत.

  • पुस्तक : मराठी भाषा - रग आणि रंग

  • लेखिका : डॉ. नीलिमा गुंडी

  • प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक

  • पृष्ठे : २४८ मूल्य : ३५० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.