धर्मभ्रष्टांचे संस्कारवर्ग

अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक जण स्वत:ची वेगळी व्याख्या तयार करायला लागला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Summary

अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक जण स्वत:ची वेगळी व्याख्या तयार करायला लागला आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक जण स्वत:ची वेगळी व्याख्या तयार करायला लागला आहे. भाजपचे हिंदुत्‍व, सावरकरांचे हिंदुत्व, बाळासाहेबांचे हिंदुत्व अशा गल्लोगल्ली हिंदुत्वाच्या शाखा तयार केल्या जात आहेत, मात्र नेमके हिंदुत्व म्हणजे काय हे कुणीच सांगायला तयार नाही. कारण त्यावर कुणी सर्वसमावेशक विचारच करत नाही. आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटाचे नवे ‘ईडी’पीडा टाळणारे हिंदुत्व उदयाला आले आहे. त्यातून आज कदाचित त्यांच्या हाती फायद्याची मलई लागेलही, पण अडीच वर्षांनंतर मतदारांना सामोरे जाताना मात्र या बंडखोरांची मोठी पंचाईत होणार आहे. या बंडखोरीला आज जरी त्यांनी हिंदुत्ववादाचे गोंडस नाव दिलेले असले, तरी त्यामागचे खरे कारण ‘ईडी’पीडा टाळणे हेच आहे.

सत्ता लोकशाहीवादी असो किंवा सरंजामशाही, सत्ताकारण हे मात्र कायम नैतिकतेला धरूनच असायला हवे. सत्तेच्या अधिष्ठानाशी केंद्रभूत विचारांच्या प्रेरणेतून लोकशाहीच्या मंदिरांचे घुमट तयार होत असतात. या विचारांची गुंफण जेवढी सहज आणि सोपी असेल, तेवढा सत्तेचा लोकजीवनातील प्रवास सोपा होत असतो. विचारांच्या माळेला फाटे फुटायला लागले की सत्तेतल्या गुंतागुंती वाढतात. मंदिरांच्या घुमटावर लोभाचे कळस चढायला लागतात आणि देवालयांनाही राजसत्तेच्या कोंडवाड्यात अडकवले जाते. लोकशाही विचारांच्या प्रेरणेचा डंका वाजवणाऱ्या भारतासारख्या देशातही जेव्हा सत्तेसाठी लोकशाहीच्या आणि धर्माच्या मंदिरांची स्पर्धा व्हायला लागते, तेव्हा सर्वप्रथम नैतिकतेचा मुडदा पडतो आणि त्यातून अघोरी समीकरणे तयार होतात. अशी समीकरणे व्यक्ती आणि समाजाच्या नैतिक स्थैर्यालाच घातक ठरतात. त्या सूक्ष्माग्राही वैचारिक प्रमेयांचे विश्लेषण करण्याची, चिकित्सा करण्याची खरी गरज असते.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर अविश्वासाचे ढग दाटले आहेत. ढगांच्या गडगडाटातून होणारा आवाजच इतका भेसूर आहे की होणारी वृष्टी किती विखारी असेल, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या हवेतले सामाजिक प्रदूषण दाबण्याचा प्रयत्न होताना दिसतोय, पण महाराष्ट्राच्या मातीला मराठी भाषेचा सुगंध आहे. ही भाषा कुणाची जात, धर्म, पंथ आणि प्रदेश पाहत नाही. आलेल्या प्रत्येकाला ती आपलंसं करते. म्हणूनच जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जो कलह सुरू आहे, त्याचा आणि मराठी या विषयाचा थेट संबंध आहे. कारण शिवसेना हा पक्ष जरी हिंदुत्वाची दोरी घेऊन सत्तेच्या पायऱ्या चढताना आपण पाहिलेला असला, तरीही या पक्षाचा हिंदुत्वापेक्षाही अधिक गडद संबंध मराठी भाषा आणि मराठी भाषकांशी राहिलेला आहे. या पक्षात दरी निर्माण होत असताना दोन गटांत विखुरल्या गेलेल्यांनी या गोष्टीचा विचार केलेला दिसत नाही. किंबहुना केवळ हिंदुत्वाच्या अस्पष्ट वलयाखाली आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा हा अत्यंत स्वहितवादी डाव दिसतोय. त्यातून आज कदाचित त्यांच्या हाती फायद्याची मलई लागेलही, पण अडीच वर्षांनंतर मतदारांना सामोरे जाताना मात्र या बंडखोरांची मोठी पंचाईत होणार आहे. या बंडखोरीला आज जरी त्यांनी हिंदुत्ववादाचे गोंडस नाव दिलेले असले, तरी त्यामागचे खरे कारण ‘ईडी’पीडा टाळणे हेच आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या सत्तालालसेपोटी बरेच मोठे संस्थात्मक नुकसान या बंडखोरांना आणि त्यांच्यासोबत शिवसेनेलाही भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिंदुत्व हा जरी शिवसेनेचा मूळ अजेंडा असला तरीदेखील मराठीपण हा शिवसेनेचा स्वभाव आहे. मुंबईतील माणूस आजही शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, कारण त्यांच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेला बळ मिळाले. मुंबई ही सर्वांसाठी कायम सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे बाहेरच्यांसह देशातील इतर राज्यांनाही मुंबईचा कायम हेवा वाटतो. विशेषतः शेजारच्या गुजरातचा कायम मुंबईच्या सत्तेवर डोळा असतो. तशी ही मुंबईदेखील महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही, त्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली आहे. प्रादेशिक अस्मितांच्या राजकारणात मराठी विरुद्ध गुजराती हा संघर्ष कायम पाहायला मिळाला आहे. दिल्लीवर स्वारी करण्याचे मराठी माणसाचे एक सुप्तस्वप्न आहे. त्यामुळे दिल्लीनेदेखील कायम मराठी माणसाला सापत्न वागणूक दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या अनेक घटनांमधून त्याचे दाखले देता येऊ शकतील. साहजिकच मुंबईतील मराठी माणूस गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये स्वत:ला अत्यंत असुरक्षित समजत होता. त्या माणसाला आधार देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने केले. मुंबईतील नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य देण्यापासून ते त्याला रस्त्यावर उतरून उत्तर आणि दक्षिण भारतीयांसोबत व्यावसायिक स्पर्धेत उतरायला बाळासाहेबांनी भाग पाडले. त्यासाठी त्यांना राजकीय संरक्षण दिले. मुंबईत साधा मराठी चित्रपट लावण्यासाठीदेखील शिवसेनेला रस्त्यावर उतरायला लागले. यावरून मुंबईतील मराठी माणसासाठी शिवसेना का महत्त्वाची आहे, याची प्रचीती येते. आजही मराठी माणूस शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान करतो आणि विशिष्ट पट्ट्यांमधील गुजराती समाज हा कायम भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे.

मराठी माणूस जसा भाबडा आहे, तसेच शिवसेनेचे मराठीबाबतचे धोरणही कायम भाबडेच राहिले. त्यामुळेच सामान्यांतील सामान्य माणसाला अगदी रिक्षाचालक आणि पानटपऱ्या चालवणाऱ्या लोकांनाही शिवसेनेने नेतेपद बहाल केले. समाजातील प्रत्येकाला संधी देण्याचे हे शिवसेनेचे धोरण पाहून मराठी माणूस शिवसेनेच्या अधिक जवळ गेला आणि लोकांमध्ये या पक्षाबद्दल आपलेपणाची भावना निर्माण झाली. अनेक वर्षे शिवसेनेने भाजपसोबत सत्तेत आणि विरोधी पक्षात भागीदारी केली; पण तरीही शिवसेनेचे प्रादेशिक अस्मितेशी नाते तुटले नाही. कारण हिंदुत्वाची भूमिका आणि प्रादेशिक अस्मिता यांची कधी बाळासाहेबांनी गुंतागुंत होऊ दिली नाही. परिणामी बाळासाहेब देशातील हिंदुत्वाचा ब्रॅंड झाले आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक वादाचाही त्यांनी चांगला फायदा करून घेतला. २०१४ नंतर मात्र परिस्थितीमध्ये सातत्याने बदल होत असल्याचे जाणवायला लागले. विशेषतः हिंदुत्वाविषयीच्या भाजपच्या धोरणांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि सेनेला फरफटत त्यामागे ओढत जावे लागले. तसे असले तरीदेखील राज्यातील सेनेच्या परंपरागत मतदारांवर त्याचा फार परिणाम जाणवला नाही, मात्र आज अवघी शिवसेनाच फुटीच्या उंबरठ्यावर असताना या गोष्टीचा ऊहापोह करण्याची गरज आहे. कारण आज ना उद्या या फुटीर शिवसैनिकांनादेखील त्याच मराठी माणसाच्या दारात मत मागण्यासाठी जावे लागणार आहे. तेव्हा तो मराठी मतदार त्यावर कसा व्यक्त होईल, हे नेमक्या शब्दांत सांगणे कठीण आहे. एकंदरीतच काय, तर आज जो विजय त्यांना वाटतोय तो टिकवणे त्यापेक्षा कितीतरी कठीण असणार आहे.

दुसरीकडे संपूर्ण भारतावर एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपच्या स्वप्नांना महाराष्ट्रातील परिस्थितीने ग्रहण लावले होते. महाराष्ट्रासारख्या राज्यात होणाऱ्या घटना आणि घडामोडींचे पडसाद जगभर उमटत असतात. त्यातच सोन्याची अंडी देणारी मुंबई महापालिका मिळविण्याचे स्वप्न कुणाला पडणार नाही. त्यामुळे साहजिकच स्वत:च्या पक्षाच्या विस्तारासाठी आणि महाराष्ट्र काबीज करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भाजप नेते कसून मेहनत घेताना दिसतात. इतर कुठल्याही पक्षापेक्षा भाजपचे नेते सर्वाधिक लोकांमध्ये वावरताना दिसतात. अगदी कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीतही त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. एवढे करूनही निवडणुकीपर्यंत वेळ काढण्यापेक्षा त्याआधी काहीही करून सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेली सर्व आयुधं वापरायला काढली आहेत. सरकारी संस्थांचा असा वापर करणे नैतिकतेला धरून नाही, हे भाजपला कळत नाही असे नाही, पण सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. सत्तेच्या सारीपाटावर अनाग्रही सौजन्य दाखविण्याच्या फंदात ते फारसे पडत नाहीत. काहीही करून ‘शत-प्रतिशत भाजप’ या एकाच धोरणावर भाजपने आपले लक्ष केंद्रित केलेले दिसते. अशा वेळी दुश्मनांचा दुश्मन तो आपला दोस्त मानून ते कुणालाही आपल्यासोबत भागीदार करायला तयार होतात. मग त्यांनीच आरोप करून चौकशीच्या जाळ्यात अडकवलेल्यांचीही भाजपच्या धुलाईयंत्रात आत्मशुद्धी होते. एकदा का तो भाजपच्या गोटात सामील झाला की धुतल्या तांदळासारखा लख्ख चकाकायला लागतो. शिंदे आणि गटाचंही शुद्धीकरण होईलच, किंबहुना गुवाहाटीच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांच्यावर सात्त्विकतेचा पाऊसही पाडण्यात येत असेल, पण ही झाली भाजपची शुद्धीकरण मोहीम. मतदारांच्या मनात हे बंडखोर ‘ईडी’पीडा टाळण्यासाठी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची एक शंका उपस्थित झाली आहे, त्यांचे निरसन कोण आणि कसे करणार?

लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कायम आदर्श राज्यव्यवस्थेवर चर्चा केली जाते. या चर्चा केवळ निर्भय बुद्धिवादाच्या सिद्धांतावर आधारलेल्या असतात. त्यातही या चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती केवळ साधकबाधक विचारप्रबोधनावर बोलताना दिसतात. राजकीय व्यवस्थेतील नैतिकतेच्या प्रबोधनावर मात्र कुणीही व्यक्त होत नाही. किंबहुना त्याकडे फारसे कुणी लक्षही द्यायला तयार नसते, कारण मुळात ही केवळ विचार अनुभूती आहे, असा अनेकांचा समज आहे. आपल्या समाजव्यवस्थेतला दृष्टपणा मान्य करण्यासाठी कुणीच मोकळेपणाने तयार होत नाही. त्याचा आणि आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचा जणूकाही संबंधच नाही, असे सर्वांना वाटत असते. विशिष्ट (सो कॉल्ड) समाजगटातील लोक आदर्श राज्याच्या संकल्पनेकडे अत्यंत तुच्छपणे पाहतात. परिणामी राजकीय आणि सामाजिक जीवनातील नैतिकतेला अलीकडे अवकळा आलेली दिसते. आपल्या भोवतालचे सामाजिक वास्तव आणि राजकीय परिस्थिती या दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी असल्याचे भास आपल्याला होत असतात, मात्र त्यातही कृत्रिमता आहे. तसे भास आणि वैचारिक फास हे ठरवून तयार केले जातात. समाजजीवनाचा पोत बदलतो तो या अशाच प्रयत्नांमधून! अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक जण स्वत:ची वेगळी व्याख्या तयार करायला लागला आहे. भाजपचे हिंदुत्‍व, सावरकरांचे हिंदुत्व, बाळासाहेबांचे हिंदुत्व अशा गल्लोगल्ली हिंदुत्वाच्या शाखा तयार केल्या जात आहेत, मात्र नेमके हिंदुत्व म्हणजे काय हे कुणीच सांगायला तयार नाही. कारण त्यावर कुणी सर्वसमावेशक विचारच करत नाही. आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गटाचे नवे ‘ईडी’पीडा टाळणारे हिंदुत्व उदयाला आले आहे. उद्या या सत्तानाट्याचा समारोप कसा होईल, हे कुणीच सांगू शकत नाही, मात्र यातून भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या धर्मभ्रष्टतेवर कुणी बोलणार आहे का? की मतदारांशी अप्रामाणिकपणा करू पाहणाऱ्या धर्मभ्रष्टांचे संस्कारवर्ग भरवून त्यांचे शुद्धीकरण केल्यानेच भागणार आहे.

rahulgadpale@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com