एलोकेशी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलोकेशी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत...

ब्रिटिशकालीन कलकत्त्यापासून (कोलकता) ७० किलोमीटरवरच्या कुरमुल नावाच्या गावात नीलकमल मुखोपाध्याय नावाचे गृहस्थ राहत होते.

एलोकेशी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत...

- राहुल हांडे handerahul85@gmail.com

ब्रिटिशकालीन कलकत्त्यापासून (कोलकता) ७० किलोमीटरवरच्या कुरमुल नावाच्या गावात नीलकमल मुखोपाध्याय नावाचे गृहस्थ राहत होते. त्यांची दहा-अकरा वर्षांची मुलगी एलोकेशी बालविवाहाच्या प्रथेनुसार आता उपवर झाली होती. नीलकमल यांनी एलोकेशीचा विवाह ब्राह्मण घराण्यातील नवीनचंद्र बॅनर्जी नावाच्या मुलाशी करून दिला. नवीनचंद्र कोलकत्याच्या सरकारी मिल्ट्री प्रेसमध्ये नोकरीला होता. तत्कालीन ब्रिटिशराजवटीत बंगालमधील गरिबीनं टोक गाठलेलं असताना असा जावई मिळणं नीलकमल यांचं भाग्यच होतं. बालविवाहाची आणि बहुविवाहाची प्रथा असणाऱ्या बंगालमध्ये त्या काळात श्रीमंत ब्राह्मण लोकांनी मुलींच्या वडिलांच्या गरिबीचा-हतबलतेचा फायदा उठवण्याचा उद्योग सुरू केला होता. ते गावोगावी फिरून गरीब पित्याच्या मुलींशी विवाह करून त्यांना उपकृत करत. असं सांगितलं जातं की, अनेकदा एखाद्या श्रीमंत ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यास त्याची चिता अनेक दिवस थंड होत नसे. कारण; त्याच्या सरणावर सती जाण्यासाठी त्याच्या अनेक विधवांची रांग लागलेली असे.

एलोकेशीचं नशीब मात्र बलवत्तर होतं. नवीनचंद्र असा नव्हता. त्याचं एलोकेशीवर नितांत प्रेम होतं. आपल्या अल्पवयीन व अशिक्षित बालवधूला कोलकत्यासारख्या शहरात नेणं योग्य नाही, असा विचार करून त्यानं तिला माहेरीच ठेवलं. सुटी असेल तेव्हा नवीनचंद्र सासुरवाडीला एलोकेशीला भेटायला येत असे. त्यांच्या प्रपंच आनंदी व सुखी होता. विवाहाला चार वर्षं होत आली होती व एलोकेशी आता १६ वर्षांची झाली होती. अद्याप या जोडप्याला अपत्य झालेलं नव्हतं. तत्कालीन समाजमानस विचारात घेता, अपत्यप्राप्ती लांबली होती. नवीनचंद्र यामुळे अस्वस्थ व उदास राहू लागला.

‘अपत्यप्राप्तीसाठी मी सर्व व्रतवैकल्य-उपासना करण्यात काहीच कसर ठेवणार नाही,’ असं एलोकेशीनं पतीला आश्वस्त केलं. गावाजवळच असलेल्या तारकेश्वरमंदिराचा महंत माधवचंद्र गिरी याच्या औषधानं अपत्यहीन स्त्रियांचे दोष दूर होतात आणि त्यांना अपत्यप्राप्ती होते, असं समजलं जायचं. एलोकेशी या महंताकडे गेली. महंतानं मात्र तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारात एलोकेशीच्या सावत्र आई-वडिलांचादेखील हात होता. या घटनेनंतर एलोकेशीला अनेक वेळा महंताकडे पाठवण्यात आलं. काही दिवसांनी नवीनचंद्र जेव्हा एलोकेशीला भेटायला आला तेव्हा त्याला एलोकेशी व महंत यांच्यातील ‘अनैतिक संबंधां’ची माहिती मिळाली. कदाचित्, सामाजिक प्रवृत्तीनुसार, माहिती देणाऱ्यानं एलोकेशीची बाजू न सांगता ‘अनैतिक संबंध’ या मुद्द्यावरच भर दिला असावा. निर्दोष एलोकेशीनं न केलेला अपराध स्वीकारला व पतीची माफी मागितली. नवीनचंद्र सुस्वभावी होता. त्यानं एलोकेशीला स्वीकारलं. मात्र, मनात कुठं तरी विश्वासघाताच्या भावनेनं दग्ध असलेल्या आणि गावातील लोकांच्या टवाळीनं त्रस्त असलेल्या नवीनचंद्रनं एलोकेशीसह गाव सोडण्याचा निर्णय घेतला. महंताच्या हस्तकांनी त्यांना गावाबाहेर पडू दिलं नाही. एलोकेशीच या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे, असं वैफल्यग्रस्त नवीनचंद्रला वाटू लागलं. अखेर, ता.२७ मे १८७३ रोजी नवीनचंद्रनं मासे कापण्याच्या बोटीनं (कोयता) एलोकेशीचा गळा कापून तिची हत्या केली. त्यानंतर पश्चात्तापदग्ध नवीनचंद्र हातात ती बोटी घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला.‘माझं म्हणून जगात आता काहीच शिल्लक नाही,’ असं सांगत ‘मला तत्काळ फाशी द्यावी; जेणेकरून मला एलोकेशीला लवकरात लवकर भेटता येईल,’ असं तो पोलिसांना म्हणाला.

मात्र, कायद्यात भावनांना व अशा पश्चात्तापाला स्थान नसतं.‘तारेकश्वर हत्याकांड-१८७३’ या नावानं सेरामपूर-हुगळी सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. नवीनचंद्रचं वकीलपत्र प्रख्यात वकील आणि काँग्रेसचे मोठे नेते उमेशचंद्र बॅनर्जी यांनी विनाशुल्क घेतलं होतं. त्यांनी आपल्या अशिलाची बाजू न्यायालयात अत्यंत प्रभावीपणे मांडली. एव्हाना, एलोकेशी हत्याकांड उभ्या बंगालमध्ये गाजू लागलं होतं. खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी व्हायची. जनमानस नवीनचंद्रच्या बाजूनं होऊ लागलं.

तत्कालीन लोकप्रिय वृत्तपत्र ‘बंगाली’मध्ये खटल्याचं वर्णन करताना लिहिलं होतं की ‘लोक जणू काही ‘ऑथेल्लो’ नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी ‘लेविस’ थिएटरमध्ये आल्यासारखे न्यायालयात येतात.’ महंत आणि त्याचा ब्रिटिश वकील यांच्यावर लोकांनी न्यायालयाबाहेर हल्लादेखील केला. गर्दीला आवर घालण्यासाठी न्यायालयात प्रवेशासाठी शुल्क ठेवण्यात आलं. भारतीय ज्यूरींनी नवीनचंद्र निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला तरी न्यायाधीश फील्ड यांनी तो फेटाळला आणि खटला कलकत्ता उच्च न्यायालयात वर्ग केला.

एलोकेशीचे आणि महंताचे अनैतिक संबंध होते, म्हणजे या संबंधांना तिची मान्यता होती, हे महंताच्या ब्रिटिश वकिलानं उच्च न्यायालयात सिद्ध केलं. न्यायाधीश मार्कबे यांनी मात्र नवीनचंद्र आणि महंत या दोघांना दोषी ठरवलं. नवीनचंद्रला आजीवन कारावास आणि महंताला तीन वर्षं सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला.

विविध स्तरांवर हा खटला चर्चेचा विषय ठरला. खटल्यातील विविध पैलूंवर वाद-विवाद होऊ लागले. स्थानिक वृत्तपत्रांनी खटल्याचं सविस्तर वार्तांकन केलं. या खटल्यानं संपूर्ण बंगाली समाज ढवळून निघाला होता. धार्मिकतेपासून ते ब्रिटिश शासनाच्या धोरणापर्यंत लोक विचार व्यक्त करत होते. अशात उद्योजक-व्यापारी यांनी स्वतःचं हित साधून घेतलं. त्यांनी एलोकेशीच्या नावानं साडी, मासे कापण्याचा कोयता, खेळण्याच्या पत्त्यांचा बॉक्स इत्यादी उत्पादनं बाजारात आणली. ही उत्पादनं अत्यंत लोकप्रिय ठरली.

सन १८९४ पर्यंत त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. एवढंच नव्हे तर, डोकेदुखीवरचा बाम तयार करणाऱ्या एका कंपनीनं ‘आमच्या बामसाठी वापरण्यात आलेलं तेल तारकेश्वरमंदिराच्या त्या महंतानं कारागृहात तयार केलं आहे,’ अशी जाहिरात करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, नवीनचंद्रला अंदमानच्या कारागृहात पाठवण्यात आलं. त्याच्यासाठी दहा हजार स्वाक्षऱ्या असलेली याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये कोलकत्यातील प्रतिष्ठित लोक, स्थानिक राजघराण्यातील लोक आणि विविध नेते होते. मात्र, अंदमानला पाठवण्यात आलेला नवीनचंद्र पुन्हा कुणाला दिसला नाही. असं म्हणतात की, त्याला नंतर मुक्त करण्यात आलं आणि नंतर त्यानं अज्ञातवासात जीवन व्यतीत केलं. महंत तीन वर्षांची शिक्षा पूर्ण करून आल्यानंतर त्याला पुन्हा तारकेश्वरमंदिराचा महंत करण्यात आलं. हयात असेपर्यंत तो त्या पदावर होता. सन १८७३ ते १८७६ या कालखंडात एलोकेशीवर बंगाली साहित्यात काव्य, कथा, नाटक, निबंध असं विविध साहित्य लिहिलं गेलं. त्याच वेळी बंगालमधील कालीघाट चित्रशैली विकसित होत होती. एलोकेशीची कथा या चित्रांमध्ये चितारण्यात आली, त्यात महंताला दोषी ठरवण्यात आलं. प्रत्येकानं स्वतःचा सार्थ साधला. मात्र, १६ वर्षांच्या एलोकेशीला अनंतकाळासाठी लज्जास्पद शिक्षा मिळाली. ती आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे...

(सदराचे लेखक धर्म, इतिहास व साहित्य यांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Rahul Hande Writes Elokeshi Girl Justice

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top