esakal | फरक स्टार्टअप आणि बिझनेसमधला... 

बोलून बातमी शोधा

Startup-and-Business}

स्टार्टअपविश्व
आपल्याकडं नव्यानं काही सुरू करायचं असेल, तर आंत्रप्रेन्यूअरशिप किंवा स्टार्टअप या शब्दांचा वापर केला जातो. या दोन शब्दांमध्ये फारसा फरकही नाही. बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. यासाठी स्टार्टअप ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

saptarang
फरक स्टार्टअप आणि बिझनेसमधला... 
sakal_logo
By
राहुल नार्वेकर saptrang@esakal.com

आपल्याकडं नव्यानं काही सुरू करायचं असेल, तर आंत्रप्रेन्यूअरशिप किंवा स्टार्टअप या शब्दांचा वापर केला जातो. या दोन शब्दांमध्ये फारसा फरकही नाही. बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. यासाठी स्टार्टअप ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. स्टार्टअप हे आव्हान आहे. यामध्ये जोखीम घेण्यास घाबरून चालत नाही. वेळप्रसंगी अपयश स्वीकारण्याची तयारी लागते. अपयश मिळाल्यानंतर न थांबता सातत्यानं प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं. ज्यांच्याकडे संयम असतो, तोच इथे टिकू शकतो. कारण स्टार्टअपमध्ये नफा मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते व तो नफा मिळेलच याचीही खात्री नसते! तर बिझनेस अर्थात कोणताही लघुउद्योग लवकरात लवकर नफा कमविण्याचे उद्दिष्ट ठेवून सुरु केलेला असतो. असा उद्योग बाजारपेठेत फार प्रबळ, वर्चस्ववादी नसतो, कारण त्याचा मुख्य उद्देश हा स्थानिक बाजारपेठ काबीज करणे नसून तिच्यात स्थिर होणे हा असतो.

स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना बरीच जुनी आहे. आपल्याकडे अलीकडच्या काही वर्षात स्टार्टअप शब्दाला ग्लॅमर मिळालेे. मात्र अनेकांची स्टार्टअप व बिझनेस यात मोठी गल्लत होते.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांनाच स्टार्टअप म्हणायचं याचं उत्तर अर्थात ‘नाही’ असंच आहे. मूळातच स्टार्टअप म्हणजे अशाप्रकारचा व्यवसाय की जो एका विशिष्ट कल्पनेवर आधारीत असतो आणि ती कल्पना यापूर्वी कधीही प्रत्यक्षात आलेली नाही. जसे पुणे किंवा मुंबईत वडापाव विकणारे अनेकजण आहेत. यामुळे वडापाव विकण्यासाठी कुणी नव्याने हॉटेल किंवा रेस्तराँ उघडले तर त्यास स्टार्टअप म्हणता येणार नाही मात्र कुणी मोबाइल अ‍ॅप बनवले, की ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार्‍या वडापावची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल आणि ऑर्डरही देता येईल, अशाप्रकारच्या सेवा पुरविणार्‍या कंपनीला ‘स्टार्टअप’ म्हणता येईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्टार्टअप हे पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळे असतात. पारंपरिक व्यवसाय पहिल्या दिवसापासून कमाई करतो. दुसरीकडे स्टार्टअप कंपनी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करतात. या कंपन्या त्यामुळेच फारच जलद प्रगती करतात.

यासाठी आपण काही उदाहरणे पाहुया...स्टार्टअप सुरु करु इच्छिणार्‍यांनी इलॉन मस्कचा आदर्श घ्यावा. २००२ मध्ये इलॉनने पहिले स्टार्टअप पे-पाल सुरु केले. अल्पावधीत ते यशोशिखरावर नेले व त्याची विक्री करुन तब्बल १८० मिलीयन यूएस डॉलर्स कमावले. पे पाल विकून आलेल्या रक्केमेपैकी त्याने १०० मिलीयन स्पेसएक्स, ७० मिलीयन टेस्ला व १० मिलीयन डॉलर्स सोलर सीटीमध्ये गुंतवले. आलेला सर्व पैसा इलॉनने नवीन संकल्पनांमध्ये गुंतविल्यामुळे त्याला घरभाड्यासह अन्य खर्चांसाठी दुसर्‍यांकडून पैसे उधार घ्यावे लागले होते, यावर कुणी विश्‍वास ठेवणार नाही. कारण आज १९० बिलीयन डॉलर्सची मालमत्ता असलेला इलॉन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला आहे. याला म्हणतात जिद्द, चिकाटी आणि रिस्क घेण्याची क्षमता...म्हणतात ना, रिस्क है तो इश्क है ! 

यानंतर पाहुया उबेरचे उदाहरण उबेरचा आयपीओ जेंव्हा लाँच झाला होता तेंव्हा त्यात म्हटले होते की आम्ही प्रॉफिट कमावू की नाही, हे आम्हाला माहित नाही, तरीही या आयपीओने रेकॉर्डब्रेक निधी उभा केला. उबेरसाठी अमेरिकेनंतर भारत हे भौगोलिकदृष्ट्या जगातले दुसर्‍या क्रमांकाचे मार्केट बनले आहे. उबेरची प्रतिस्पर्धी कंपनी ओला ची सुरुवात भाविश अग्रवाल यांनी २०१० मध्ये केली. ओला येण्यापूर्वी कॅब इतक्या सोप्याप्रकारे बुक करता येत नव्हती. आज स्वतःच्या मालकीची एकही टॅक्सी नसताना ओला रोज लाखो प्रवाशांची ने-आण करत आहे. विशेष म्हणजे ओला आणि उबेर या दोन्ही स्टार्टअप कंपन्यांकडे सुरुवातीला स्वत:चे एकही वाहन नव्हते, हे विशेष! रेडबस या स्टार्टअपचा प्रवास देखील प्रचंड कौतुकास्पद आहे. ऑनलाइन तिकिटांचा प्लेटफॉर्म असलेल्या ‘रेडबस’ने ८ दशलक्ष डॉलरचे फंडिंग उभारले आहे. सध्या मलेशिया आणि सिंगापूरमध्ये ‘रेडबस’ जोरदार आहे. एकूणच दक्षिण-पूर्व आशियावर आता ‘रेडबस’च्या नजरा खिळलेल्या आहेत.

रेड बस ही कंपनी सुरू होण्यामागे फारच मजेशीर घटना आहे. फणींद्रसमा, सुधाकर पसुपुनरी आणि चरण पद्मराजू यांनी २००६ साली याची सुरुवात केली. त्यांनी ऑनलाईन बस आणि हॉटेल बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली. या नावीन्यपूर्ण कल्पनेमुळे सामान्य लोकांना बसचे तिकीटमिळणे फारच सोपे झाले. फणींद्र यांना दिवाळी सणासाठी घरी जायचे होते. त्यांना बसचे तिकीट मिळाले नाही. त्यावेळी त्यांना ही कल्पना सुचली. प्रचंड मेहनत घेवून त्यांनी एका छोट्याशा स्टार्टअपचे मोठ्या कंपनीत रुपांतर केले. ‘मेक माय ट्रीप’ सुरु करणार्‍या दीप कारला यांचा प्रवास देखील असाच आहे. पेटीएमची सुरुवात कॅशबॅक या कल्पनेतून झाली. या कल्पनेचे जनक होते दिल्लीचे विजय शेखर शर्मा. या नवीन कल्पनेमुळे ऑनलाईन खरेदीमध्ये क्रांतिकारक बदल घडवला. 

इनमोबी मोबाईल अ‍ॅप आता मल्टिनॅशनल कंपनी झाले आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी नवीन तिवारी यांनी मोबाईलमधील अ‍ॅडव्हरटाईजचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांना फारसे यश मिळाले नाही मात्र त्यांनी न हारता प्रयत्न चालू ठेवले. वेगवेगळ्या कल्पनांचा त्यांनी उपयोग केला आणि या कंपनीची मल्टिनॅशनल कंपनीपर्यंतची वाटचाल सोपी करून टाकली. 

ऑनलाईन शॉपिंगसाठी आपल्यापैकी अनेकजण अ‍ॅमेझॉनचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे का? अ‍ॅमेझॉन हे पारंपरिक पद्धतीने पुस्तक विकणार होते, मात्र संस्थापक जेफ बेझोस यांनी त्यास नावीन्यपूर्ण जोड दिली. त्यांनी पुस्तके दुकानातून न विकता ऑनलाईन विकली. अ‍ॅमेझॉनने व्यवसाय सुरू केल्यानंतर पाचच वर्षांत यश संपादन केले. कारण त्यांनी ऑनलाईन पुस्तके विकण्यासोबत ग्राहकोपयोगी इतरांची उत्पादने ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून इंटरनेट शॉपिंगमध्ये लोकप्रिय व्यवसाय प्रस्थापित केला. आज अ‍ॅमेझॉनचे जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन शॉपिंग व्यावसायिकांमध्ये नाव आहे. फ्लिपकार्टचा प्रवास देखील यापेक्षा वेगळा नाही.

या सर्वांमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत:
१) हे सर्व स्टार्टअप पारंपारिक बिझनेसपेक्षा वेगळे होते मात्र आता ते एका मोठ्या कंपनीत रूपांतरित झाले आहेत
२) हे स्टार्टअप सुरु करतांना प्रत्येकाने लगेच यश मिळविण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करुन त्या-त्या क्षेत्रात स्वत:चा मापदंड स्थापन केला
३) सुरुवातीच्या टप्प्यात सर्वांना अपयशाचा सामना करावा लागला, मात्र हार न मानता जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले. 
मित्रहों तुम्ही देखील स्टार्टअप सुरू करू इच्छित असाल तर बिझनेस ही संकल्पना तूर्त बाजूला ठेवून काही तरी वेगळे करुन दाखवा, यश तुमचेच आहे...

Edited By - Prashant Patil