‘कोरोना’चे संधीत रुपांतर!

StartUp
StartUp

आपल्यासमोर २०२० नं ठेवलेल्या कोरोनाच्या संकटातून जगानं शिकलेलं धडे, त्यातून उभ्या राहिलेल्या स्टार्टअपनं अनेकांना जगण्याची नवी दिशा दिली. अलीकडच्या काळात नवे स्टार्टअप सुरू होण्याची अनेक कारणे आहेत. या क्षेत्रात तीन दशकांपासून मी कार्यरत असल्याने अनेक चढ-उतार पाहिलेत. त्यातील काही अनुभवले देखील. मात्र कोरोना व लॉकडाऊनच्या काळात झालेल्या बदलांकडे मी भविष्याची पायाभरणी म्हणून पाहतोय. देशात यापूर्वी कधीही नव्हत्या एवढ्या उद्योगांच्या संधी आता निर्माण झाल्या आहेत, असे म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झाले असताना भारतात गेल्या चार महिन्यात तब्बल पाच हजाराहून स्टार्टअपची नोंद झालीय, हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.

अनेकांनी कोरोनाचे आव्हान संधीत बदलल्यानं ई-कॉमर्स, आरोग्य आणि त्यासंबंधी निगडीत विभाग, कृषी, शिक्षण, फिनटेक, डिजिटल टेक्नॉलॉजी, ऊर्जा, वित्त, अंतर्गत सुरक्षा, अंतराळ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. याशिवाय पर्यटन आणि शहरी सेवा, प्राचीन भारतीय जीवन पद्धती यांसारख्या अन्य काही क्षेत्रातही स्टार्टअप सुरू झालेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या स्टार्टअप्स व इन्क्युबेशन समितीने केलेल्या पाहणीत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात जवळपास २० हजाराच्या आसपास स्टार्टअप्स आहेत. यातील निम्म्याहून अधिक म्हणजे दहा हजार स्टार्टअप्स पुणे-मुंबई या पट्ट्यात आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया मोहिमेअंतर्गत मान्यता दिलेले ५,६०० स्टार्टअप्स पुण्यात आहेत. पुण्यामध्ये काही युनिकॉर्न स्टार्टअप्स (एक अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक बाजारमूल्य) आहेत. त्यांच्यासह अन्य काही स्टार्टअप्सनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळवला आहे. याला शुभसंकेतच म्हणावे लागेल. मात्र ही तर केवळ सुरुवात आहे, ‘अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त...’ कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटांचा सामना करतयं तेव्हा भारतात अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा व्यवसाय मात्र या काळात तेजीत आला. या कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतलाय. 

तुम्हाला घर भाड्याने किंवा विकत घ्यायचे असेल तर तुम्ही सहाजिकच नो-ब्रोकर डॉट कॉमवर कधीतरी गेलाच असाल. याच कंपनीने आता १०० नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती दिलीय. केविन भारती मित्तल यांनी स्थापन केलेल्या ‘हाईक’ या घरगुती इंटरनेट स्टार्टअप कंपनीने देखील पुढच्या काही आठवड्यांमध्ये बाहेरुन काम करू शकणार्‍या २० पेक्षा अधिक नवीन जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. कोरोना महामारीच्या काळात डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागलीय हे सिध्द करण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहेत. ते म्हणजे जीएसटी संकलनाचे! डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी महसूल १ लाख १५ हजार १७४ कोटी इतका झाला आहे. 

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून एखाद्या महिन्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक संकलन आहे. गेल्या २१ महिन्यांतील ही सर्वाधिक मासिक महसूल वाढ आहे. यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ८६६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. डिसेंबर २०२० मधील एकूण महसूल संकलन डिसेंबर २०१९ च्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. जीएसटी संकलनाची उच्चांकाची पातळी ही अर्थव्यवस्थेतील सुधार दर्शवते.

स्टार्टअप म्हणजे नवकल्पना आणि तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग. पाश्चिमात्य देशांमध्ये ही संकल्पना खूप आधी सुरु झाली, रुजली व आता संपूर्ण जगानं त्याची दखल घेतली आहे. फेसबूक, ओला, उबेर ही त्याचीच उदाहरणे आहेत. भारतात यासारख्या संकल्पनेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच फ्लिपकार्ट, स्विगी, लेट्सअप सारख्या स्टार्टअपचा जन्म झालाय. स्टार्टअप प्रत्यक्षात आणण्यावर गांभीर्याने विचार करीत असाल, तर तुमच्याकडे कल्पनेची स्पष्टता आवश्यक आहे. केवळ कल्पनेवर लक्ष केंद्रित न करणे हेच बहुतांश स्टार्टअप अपयशी होण्यामागील प्राथमिक कारण आहे.

(सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक व विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com