यश : सकारात्मक दृष्टिकोन

कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी किंवा ते यशस्वी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची किंवा वयाची अट नसते या बद्दल आपण आधीच माहिती घेतली आहे.
Positive Thinking
Positive ThinkingSaptarang

कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी किंवा ते यशस्वी करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची किंवा वयाची अट नसते या बद्दल आपण आधीच माहिती घेतली आहे. आजच्या या भागात कोणतेही स्टार्टअप कसे यशस्वी होते, असे म्हणण्यापेक्षा यशस्वी होण्याआधी ते जिवंत कसे राहते व काहींचा प्रवास मध्येच कसा संपतो? हे जाणून घेणार आहोत. सतत प्रयत्न आणि प्रयोग करत राहणारा, अडचणीवर सकारात्मक पर्याय शोधून काढणाराच यशस्वी होतो हे मी माझ्या अनुभवावरून ठामपणे सांगू शकतो.

माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही स्टार्टअप सुरू करण्याची स्वप्न पाहत असाल किंवा त्याची तयारी करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. साधारणतः मनुष्याला जे काम आवडते, त्या क्षेत्रात काम केले तर प्रगती लवकर होते. कारण आवडत्या कामात एकाग्रता साधली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर कामामधील सखोल माहिती मिळते, यश मिळते.

उद्योजकाच्या विचारसरणीवर स्टार्टअप यशस्वी किंवा अयशस्वी होते यासाठी जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही तुमचे विचार सकारात्मक करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एक भन्नाट गोष्ट सांगतो, १९५२ पर्यंत जगात सर्वांना असे वाटायचे की, एक मनुष्य एका दमात चार मैल धावू शकत नाही. तसे केल्यास त्याचा मृत्यू होईल, त्याच्या शरीराला मोठा अपाय होईल, वगैरे वगैरे. मात्र त्यानंतर रॉजर बॅनिस्ट या व्यक्तीने हा रेकॉर्ड तोडला, ही बातमी प्रसिद्ध झाल्याबरोबर महिनाभराच्या आत हजारो लोकांनी हा रेकॉर्ड तोडला. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे माईंडसेट ! कुणीही चार मैल धावूच शकत नाही असा प्रत्येकाचा माईंडसेट झाला होता मात्र त्याला तडा गेल्यानंतर अनेकांनी ती कामगिरी करुन दाखविली. स्टार्टअपमध्येही असेच असते, अमुक एखादी गोष्ट होवू शकत नाही; असा माईंडसेट झाल्यास ती गोष्ट खरचं होत नाही.

जर तुम्ही जगातील कोणताही यशस्वी स्टार्टअप पाहिल्यास असे जाणवते की, त्यांच्या आयडिया खूप वेगळ्या नसतात मात्र त्या स्टार्टअपच्या फाऊंडर किंवा को-फाऊंडरचा माईंडसेट नक्कीच वेगळा असतो. त्यांना कधी अपयश आले तरी ते त्यात संधी शोधतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, स्टीव्ह जॉब्ज्. मी स्टीव्ह जॉब्ज्चा खूप मोठा चाहता आहे. कारण त्याने अ‍ॅपल उभी केली मात्र काही कालावधीनंतर त्याच्या को-फाऊंडर्सने स्टीव्ह जॉब्जलाच कंपनीतून काढून टाकले. मात्र त्याने गिव्हअप केले नाही. अ‍ॅपलमधून बाहेर पडल्यानंतर त्याने हॉलीवूडमधील पिक्सर या अ‍ॅनिमेशन बनविणार्‍या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली.

थोड्याच कालावधीत पिक्सरला बिलेनिअर कंपनी बनविले व कालांतराने त्या कंपनीला अ‍ॅपललाच विकले. त्यानंतरच्या काळात अ‍ॅपल अडचणीत आल्यामुळे तीन महिन्याच्या आत दिवाळखोरीत निघेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना स्टीव्ह जॉब्जला पुन्हा अ‍ॅपलमध्ये बोलवून अ‍ॅपलची सूत्रे त्याच्या हाती देण्यात आली. त्यानंतरचा इतिहास व आता अ‍ॅपलची स्थिती सर्वांना माहितच आहे. स्टीव्ह जॉब्ज सारखं आपल्यापैकी अनेकजण अशक्यप्राय वाटणार्‍या गोष्टी शक्य करण्याची ताकद ठेवतात. त्यासाठी स्वत:मध्ये इन्व्हेस्ट करायला शिका. वाचन करा, चांगल्या लोकांना भेटा, सोशल मीडियापासून दूर रहा व स्वत:चा पॉझिटिव्ह माईंडसेट तयार करा.

यशस्वी माणसे नकारात्मक विचारांमध्ये अडकून वेळ फुकट घालवत नाहीत. कोणतेही काम हाती घेताना त्याचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार आहे ना याचा विचार करा. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे साठ हजार विचार करतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. असे म्हणतात की, ज्या लोकांसोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता, त्यांच्या स्वभावांची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो. त्यामुळे तुम्हाला सर्वोकृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये वावरा, नकारात्मक विचार, माणसे, तसेच नकारात्मक कामांपासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा. यशस्वी होणे चुका न करणे नव्हे तर चुकांची पुनरावृत्ती न करणे, जेव्हा तुम्ही चुकाल, तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा, कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आताही रडत बसू शकत नाही. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. तुमच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा.नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. मन आणि विचारांचे सामर्थ्य माहीत नसल्यामुळे आजचा तरुण कळत अथवा नकळत सतत नकारात्मक विचार करत असल्याचे मला माझ्या अनुभवावरुन दिसून आले आहे.

याबाबतीत माझ्या एका सहकाऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. साधारणत: सहा-सात वर्षांपूर्वी दिल्लीच्या माझ्या एका ऑफिसमध्ये सौनिया खुराणा नावाची तरुणी ज्यूनिअर म्हणून काम करण्यास रुजू झाली. कालांतराने मी ती कंपनी सोडली, काही दिवसांनंतर तिने देखील कंपनी सोडली मात्र ती सातत्याने माझ्या संपर्कात होती. ती म्हणायची मला पगार देवू नका पण शिकण्यासाठी तुमच्या सोबत राहु द्या. याळात तिनं स्वत:चा पॉझिटिव्ह असा माईंडसेट तयार केला. एका दिवशी पॉडकास्ट संदर्भात एका वर्कशॉपला मी तिलाही घेवून गेलो. तेथे विजय गौतमसोबत भेट झाली. दोघांनी माझ्याशी चर्चा करुन स्वत:चा पॉडकास्ट स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या ‘डब्लूवायएन’ स्टुडियो या स्टार्टअपने अवघ्या सहा महिन्यात अडीच कोटींचा फंड उभा केला आहे. हे त्यांच्या पॉझिटिव्ह माईंडसेटमुळेच शक्य झाले. यासाठी स्टार्टअप सुरु करु इच्छिणार्‍या किंवा त्यात काम करणार्‍याला सकारात्मक विचार आणि मनाचे सामर्थ्य माहीत असायलाच हवे. सतत प्रयत्नपूर्वक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये नक्कीच यश मिळवू शकता. मात्र त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह थिंकीक अथवा सकारात्मक विचार कसे करायचे हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ती तुम्हाला निश्‍चितच फायदेशीर ठरेल, आयुष्यात दोन्ही प्रकारच्या परिस्थिती येतात, कधी दुःखाचे, वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं असतचं. फक्त तेवढं शोधून काढायचं. त्या प्रसंगातून बोध घ्यायचा. सकारात्मक विचार हे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे कोणतेही संकट आले तरी नकारात्मक विचारांनी मन खट्टू करू नका, यश तुमचेच आहे

(सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक आणि विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com