Rahul Ranalkar writes about Discover world beyond mobile
Rahul Ranalkar writes about Discover world beyond mobileesakal

शोधा मोबाईल पलीकडचे जग

मोबाईल कसा वापरावा, किती वापरावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे

घटना क्र. १ : मोबाईल हरवल्यानंतर आई-वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने नाशिकमधील तरुणाची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या.

घटना क्र. २ : मोठा भाऊ आपला मोबाईल ट्रॅक करतो, हे समजल्यावर नाशिकमधील तरुण मुलीने घर सोडले.

मोबाईलमुळे आत्महत्या केल्याच्या, खून झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. किंबहुना आता हे प्रमाण वाढत आहे. घटनांची स्थळं वेगवेगळी असली तर त्याचे निमित्त मात्र मोबाईलच आहे. मोबाईलच्या आहारी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे लहानांसह तरुण मुलं-मुली मोबाईलच्या आहारी जात आहेत. मध्यमवयीन, आबालवृद्धही त्याला अपवाद नाहीत. ऑनलाईन फसवणूक होणाऱ्यांमध्ये मध्यमवयीन आणि ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.

मोबाईल कसा वापरावा, किती वापरावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. मनोविकार तज्ज्ञांच्या मते, मोबाईलमुळे जडणाऱ्या मनोविकारांची यादी लांबतच चालली आहे. सेल्फी हा आजार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच जाहीर केले आहे. वर उल्लेख केलेल्या घटना प्रातिनिधिक असल्यातरी मोबाईलच्या आहारी गेल्याने होणारे भीषण प्रकार समाजाला अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

‘मोबाईल डिटॉक्स’ म्हणजे मोबाईलचा काही काळ वापर थांबवायचा, ही कल्पना त्यामुळेच आता रुजत आहे. मोबाईल पलीकडेही जग असते, हे या पिढीला समजावून सांगण्याची जबाबदारी समाजाची आहे. सध्याची घडी आणि नजिकचा भविष्यातही ‘मोबाईल डिटॉक्स’ हा सर्वांत प्रमुख विषय असेल. कोरोना काळात मोबाईलमुळे शिक्षणाशी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-शिक्षक अधिक जोडले गेले. त्याने ऑनलाईन विश्वाची चटक उगवत्या पिढीला लागली. त्यामुळे आता मोबाईल हातात घेऊन मुलं जन्माला येतात, असे गंमतीने म्हटले जाते. तान्हुल्या मुलांच्या हाती मोबाईल सर्रास दिला जातो. जी लहान मुलं मोबाईल हाताळतात, त्यांचे तोंडभरून कौतुकही होते. पण असे करताना आपणच त्यांना मोबाईलच्या जंजाळात ढकलत आहोत, हे पालकांच्या लक्षात येत नाही.

जसं हल्ली डायपर मुलांना लावले म्हणजे पाच-सात तास त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज पडत नाही; तसंच मुलांना मोबाईल दिला म्हणजे आपण मोकळे होतो, ही पालकांची मानसिकता आहे. ‘नातू अवघ्या दोन वर्षांचा आहे, पण सगळे मोबाईल गेम्स सराईतपणे खेळतो,’ हे सांगताना आजी-आजोबांना अभिमान वाटतो. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी ज्या पालक, आजी-आजोबांवर आहे, तेच मोबाईलच्या वापराला उत्तेजन देतात, हे चित्र बदलण्याची गरज आहे.

मोबाईल हरवल्यावर किंवा नवा मोबाईल हवा असताना पालकांनी जर थोडं थांबायला सांगितलं तर तेवढाही संयम आता शालेय आणि तरुण मुला-मुलींमध्ये उरलेला नाही, याला मग कोणाला जबाबदार धरायचं? हल्ली जे मोबाईलचा अधिकाधिक वापर करतात, त्यांच्यासाठी ‘मोबाईल डिटॉक्स’ प्राधान्याने दिले जाते. अशा काही जागा मुद्दाम राखून ठेवल्या जातात जिथे मोबाईलची रेंज मिळत नाही. मोबाईलची रेंज नसलेली ठिकाणे भविष्यात खूप महत्त्वाची ठरतील. किंबहुना आताच गरजेची वाटू लागली आहेत. मोबाईलच्या अतिआहारी गेलेल्यांना काही दिवस मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला देत त्यासाठी खास उपचारही मनोविकारतज्ज्ञ देतात. मोबाईलचा कमीतकमी वापर कसा करावा, याचे सेमिनार होऊ लागले आहेत. मोबाईल शिवायही जीवन जगता येऊ शकते किंवा मोबाईलशिवाय दर्जेदार जीवन कसे जगावे, यासंदर्भात आता विचार मंथन होऊ लागले आहे. मोबाईलच्या विळख्यामुळे खेळाची मैदाने आता पूर्वीसारखी ओसंडून वाहत नाहीत, ही खेदाची आणि चिंतेची बाब आहे.

मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी काही शिक्षक देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. योग, प्राणायाम, ध्यानधारणा या नित्यक्रमाची गोडी शाळा, महाविद्यालयांतून आणि कॉर्पोरेट्समध्ये निर्माण केल्यास पुढच्या काही वर्षांमध्ये नक्कीच त्याचे चांगले दृश्य परिणाम मिळतील.

मोबाईलमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यांची शिक्षणातील गोडी कमी होत आहे. शालेय वयात अती धाकात ठेवलेल्या मुला-मुलींचा महाविद्यालयीन जीवनात ओढा मोबाईल आणि अन्य आकर्षणांकडे अधिक असतो, असे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जी मुलं दहावीपर्यंत खूप चांगला अभ्यास करतात, मार्क मिळवतात, ती मुलं महाविद्यालयीन जीवनात बिघडतात. दहावीला ९० टक्के गुण मिळवणारी मुलं-मुली बारावीला ५० टक्क्यांपर्यंत घसरतात, पुढे त्यांचा शैक्षणिक विकास जणू खुंटतो. या विषयाच्या खोलात गेल्यानंतर मोबाईल आणि मोबाईलमुळे होणारे मित्र-मैत्रिणी आणि अन्य वाईट सवयी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जबाबदार पालकत्व अधिक संयमित पद्धतीने पेलावे लागणार आहे. मात्र जिथे पालकच मोबाईलच्या मोहजालात अडकले असतील, त्यांचे काय हाही प्रश्न आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com