बाप'माणसा'च्या गोष्टी (राज जाधव)

raj jadhav
raj jadhav

वडील हे अजब रसायन असतं. जीव लावण्याची, काळजी करण्याची त्याची एक वेगळीच पद्धत असते. वडील आणि मुलांच्या नात्यांवर आधारित "ड्राय डे', "ऍन इन्व्हिटेशन' आणि "अरे बाबा' या तीन शॉर्टफिल्म्स. बाप"माणसा'चं नातं त्या उलगडून दाखवणाऱ्या आणि एक वेगळा अनुभव देणाऱ्या या शॉर्टफिल्म्सविषयी.

बाप हे एक अजब रसायन आहे, जे आजवर बहुदा संपूर्णतः "डिकोड' झालेलंच नसावं. आई जन्मदाती, नऊ महिने तुम्हाला पोटात वाढवणारी, तुम्हाला दुखलं खुपलेलं तुमच्यापेक्षा जास्त ती काळजी करणारी, रात्री जागणारी. आईचा मुलांवर प्रचंड जीव, वेळोवेळी ते तिला दाखवताही येतं; पण हे वडिलांना नाही जमत. वडिलांचा मुलांवर जीव नसतो का?- असतोच! म्हणतात ना, आई ही मुलांच्या आजच्या जेवणाची काळजी करते, तर बाप आयुष्यभराच्या जेवणाच्या तरतुदीसाठी धडपडत राहतो. जीव लावण्याची, काळजी करण्याची त्याची पद्धतच वेगळी असते. आपलं आयुष्य सुरळीत चालावं म्हणून हा माणूस दिनरात मेहनत घेत राहतो. वडिलांच्या प्रेमाची वेगळी बाजू दाखवणाऱ्या तीन अशाच शॉर्ट फिल्म्सबद्दल बोलूयात.

पहिली शॉर्टफिल्म आहे "ड्राय डे.' एका "ड्राय डे'ची संध्याकाळ. घरात वडील आणि मुलगा दोघंच आहेत. मुलगा "ड्राय डे'मुळं मित्रांसोबत घराबाहेर पडू शकत नसल्यामुळं स्वतःच्या रूममध्ये वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय. कधी बॉल खेळतोय, कधी गिटार वाजवतोय, कधी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतोय, कधी बेडवर लोळतोय, झोपतोय. अर्थात, बाहेर जाऊन वडिलांसोबत बसावं, गप्पा माराव्यात हे असे पर्यायच नसावेत बहुदा त्याच्याकडे. त्याचीही चूक नाहीच यात. याच रूटिनची सवय झाली असावी त्याला. तिकडं वडिलांचा वेगळाच प्लॅन आहे. वेळ त्यांचाही जात नाहीये; पण काय करायचं आहे, हे मात्र त्यांनी ठरवलं आहे. "ड्राय डे'ची कल्पना असल्यानं त्यांनी आधीच वाइन आणून ठेवली आहे आणि ते मुलाला बर्फ आणायला पाठवायला म्हणून त्याच्या रूममध्ये येतात. मुलगा त्याचा हा प्लॅन पाहून चक्रावतो. नंतर हे वडील मुलाला सोबत बसण्याचीही ऑफर देतात. त्यांच्या संवादातून काही गोष्टी अलगदपणे उलगडत जातात, ज्यामुळे त्यांचं नातं म्हणजे फक्त एक औपचारिकता म्हणून राहिली आहे, याची जाणीव होते. आयुष्यभर आपल्या कामात व्यस्त असणारे वडील, आता कदाचित रिटायर झाले असावेत. आता त्यांना उमगलं असावं, की या सर्व प्रवासात आपण आपल्या मुलाला वेळ देऊ शकलो नाहीये. मुलगा लहान असताना त्यांनी एकत्र व्यतीत केलेला वेळ सध्या फक्त आठवणींच्या बंद कुपितच बंद राहिला असल्यानं वडील, मुलाच्या लाइफस्टाइलनुसार जुळवून घेऊन पुन्हा एका मित्राची भूमिका निभावू पाहतायत. हे सर्व या फिल्ममध्ये खूप साधेपणानं, तरीही प्रभावीपणे दिसतं.

"टेरिबली टाईनी टॉकीज' कमी वेळात अधिक परिणामकारक शॉर्टफिल्म्स देण्यात अग्रेसर आहे. करण शर्मा यानं लिहिलेली, हर्ष देढिया यानं दिग्दर्शित केलेली ही सहा मिनिटांची शॉर्टफिल्म यूट्युबवर पाहता येईल. फक्त सहा मिनिटांत एका छोट्याशा, तरीही महत्त्वाच्या नाजूक विषयावर ही शॉर्टफिल्म हळूवारपणे; पण नेमकेपणानं भाष्य करते. विविध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आणि नुकतेच "राझी' चित्रपटात दिसलेले शिशिर शर्मा यांनी भावनिक, तरीही मजेशीर वडिलांची, तर "तितली'मुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शशांक अरोरानं मुलाची भूमिका केली आहे.

दुसरी शॉर्टफिल्म आहे "ऍन इन्व्हिटेशन.' टिपिकल बारचं वातावरण. एका टेबलवर एक साधारण पन्नाशीतला मनुष्य दारू पित बसलाय. केस विस्कटलेले, दाढी वाढलेली, अगदीच साधारण कपडे आणि चेहऱ्यावर विषण्णतेचे भाव. इतक्‍यात त्या टेबलवर एक युवक येतो. दिसायला सभ्य घरातला, कपडे व्यवस्थित, एकंदर त्या जागेला "मिसफिट' वाटावा असा. तो वयस्कर मनुष्य त्या युवकाशी जुजबी बोलून त्याला ड्रिंक्‍स ऑफर करतो. तो तरुण दारू सोडल्याचं सांगतो. शिवाय "ज्या गोष्टींमुळं आपण दुरावलो तुम्ही मला तीच ऑफर करताय?,' असा प्रश्नही विचारतो. सुरवातीला साशंक असणारे आपण हा एक वडील आणि मुलामधला संवाद आहे, हे ओळखतो.
दोघांच्या बोलण्यातून हळूहळू भूतकाळ समोर येत राहतो. काही कौटुंबिक कारणांमुळे (मुख्यत्वे दारू) सतीश वर्मा (रजत कपूर) आपल्या बायकोपासून आणि मुलापासून (विक्रम एस.) वेगळा राहतोय. त्याला त्याचं दुःख नाही असं नाहीये; पण तो या भावनिक जाणिवेच्या पलीकडे गेला असावा. बापाची नेहमीचीच बसण्याची जागा असावी, म्हणून मुलगा बापाला त्या बारमध्ये भेटायला आलाय. कारणही तसंच आहे, त्याचं लग्न, आणि लग्नाला वडिलांनी यावं या इच्छेपोटी तो त्याला निमंत्रण द्यायला आलाय. होणाऱ्या संवादातून बऱ्याच गोष्टी समोर येतात. दोघांच्या हळव्या बाजू, एकमेकांबद्दलची आत्मीयता कळत राहते. मुलगा भेटत नसला, तरी त्याच्या लग्नाची तारीख फेसबुकवरून कळल्याचं वडील सांगतात. आनंदात एक ग्लास भरून मुलाला ऑफर करतात; पण ज्या दारूमुळं मुलगा वडिलांपासून वेगळा झाला त्याच्याबद्दल त्याला कसलीच आत्मीयता राहिलेली नसते. वडिलांना निमंत्रण देऊन मुलगा तिथून निघतो खरा; पण वडिलांना सोबत नेण्याची त्याची जिद्द तशीच असते. शॉर्टफिल्म संपल्यावर "बात ये इतनी सी' हे गाणं रुणझुणत राहतं. रजत कपूर एक कमालीचा सशक्त अभिनेता आहे, यात शंकाच नाही. बारा मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्येही तो त्याच्या केवळ असण्यानं मजा आणतो. मुलाच्या भूमिकेत विक्रमनंही चांगली साथ दिली आहे.

तिसरी शॉर्टफिल्म आहे "अरे बाबा.' ही शॉर्टफिल्म वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे. मुलगा मोठा होत गेला, की वडिलांपासून दुरावतो, मुलगी मात्र आयुष्यभर वडिलांची लाडकी लेकच राहते. त्यांचं नातं उत्तरोत्तर खुलतच जातं आणि जर ती आईविना असेल तर, नेहमीपेक्षा जरा जास्तच काळजी घेतली जाते. इथंही तीच कहाणी आहे. शाळा सुटून बऱ्यापैकी वेळ झालाय. वॉचमनही मेन गेट बंद करून निघालाय. बाहेर अगदीच मोजकी गर्दी. बंद गेटच्या बाहेर काही अंतरावर शाळेतल्या गणवेशात, पाठीवर बॅग लटकावून एक मुलगी, रस्त्याकडे डोळे लावून बापाची वाट पाहत बसली आहे. इतक्‍यात तो येतो. त्याची आणि सायकलची अवस्था जवळपास दयनीयच; पण चेहऱ्यावर मात्र अमाप आनंद. सायकलला अडकवलेला डबा पाहिला, तर एखाद्या कारखान्यात वगैरे असण्याची शक्‍यता, म्हणजे परिस्थिती जेमतेमच; पण त्याचा लवलेशही चेहऱ्यावर नाही.

आल्यानंतर तो मुलीला सायकलवर बसायला सांगतो. मुलगी, त्याला उशीर झाला म्हणून चिडते. तो माफी मागतो. "हवं तर उठाबशा काढतो,' असंही म्हणतो. मुलगी सायकलवर न बसता समोर चालू लागते. "ऑफिस म्हटलं, की उशीर होणार,' वगैरे गोष्टी तिला सांगून बघतो, ती काही ऐकत नाही. अखेरीस तो सायकलवरून उतरून तिच्यासोबत चालू लागतो. "मैत्रिणीशी भांडण झालं का? बाहेरचं काही खाल्लं का?' वगैरे सगळं विचारून होतं; पण खराब मूडचं कारण मात्र ती सांगेपर्यंत त्याला कळत नाही.

मुलगी मोठी होत असताना खरं तर तिला सर्वांत जास्त आईची गरज असते; पण इथं गिरीश कुलकर्णीनं रंगवलेला बाप, त्या काळजीवाहू आईपेक्षा कुठेही कमी वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी तिला दिलासा देत तो एका अर्थी तिची आईच बनून जातो. गौरी देशपांडेनंही मुलीचा रोल त्याच सफाईनं निभावला आहे. सूर्या बालकृष्णन यांनी दिग्दर्शित केलेली "टेरिबली टाईनी टॉकीज'ची ही पाच मिनिटांची फिल्म यूट्युबवर पाहता येईल.

या तिन्ही फिल्म्स अगदी साध्या घटनांच्या भोवती विणलेल्या आहेत, तरीही खूप मोठी गोष्ट अधोरेखित करतात. म्हणतात ना, रोज अंधाऱ्या खोलीत प्रकाश देणाऱ्या दिव्याकडं आपलं कधीच लक्ष जात नाही, त्याचं अस्तित्व असूनही आपल्याला ते जाणवत नाही; पण एका दिवशी जेव्हा बटन लावल्यावर तो पेटत नाही, तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते. अर्थात, दिव्याला पर्याय आहे बापाला नसतो. गझलकार सदानंद बेंद्रे यांचा एक सुंदर शेर आहे, ज्याच्याशिवाय बापाबद्दल लिहिणं व्यर्थ आहे ः
"बाप असताना मिठी मारून घ्या रे
आठवण आभास देते, स्पर्श नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com