‘घाशीराम’ची रंगकिमया

१६ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकामुळं मोठी वादळं उठली आणि जगभरात हे नाटक नावाजलंही गेलं.
Ghashiram Kotwal Drama
Ghashiram Kotwal DramaSakal
Summary

१६ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकामुळं मोठी वादळं उठली आणि जगभरात हे नाटक नावाजलंही गेलं.

१६ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकामुळं मोठी वादळं उठली आणि जगभरात हे नाटक नावाजलंही गेलं. रंगमंचावरच्या या नाटकाइतक्याच पडद्यामागच्या अनेक हकिकती तितक्याच वेधक आणि नाट्यपूर्ण आहेत. या नाटकाला ५० वर्षं पूर्ण होताहेत, या निमित्तानं या घडामोडींत सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या ‘घाशीराम’च्या पहिल्या परदेश दौऱ्याबद्दल या नाटकाचे नायक व या दौऱ्याचे मुख्य सूत्रधार डॉ. मोहन आगाशे यांच्याशी झालेल्या गप्पांमधून उलगडलेला हा आठवणींचा पट...

२३ सप्टेंबर १९८०... पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात ‘चंद्रलेखा’ची बस सज्ज होती. बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाची थिएटर अकॅडमीची संपूर्ण टीम यातून मुंबईला रवाना होणार होती. या मंडळीला निरोप व शुभेच्छा देण्यासाठी तिथं जमलेल्या स्नेहीमित्रांच्या गर्दीच्या अनेक पटीने त्यांना रोखण्यासाठी व ‘राडा’ करण्यासाठी आलेली झुंड आसपास विखुरलेली होती... आसपास त्याच सुमारास तिथून काही किलोमीटर दूर लोहगावच्या विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका विमानातून ‘ए. मोहन अँड कंपनी’च्या पंचवीस लोकांची एक टीम मुंबईच्या दिशेने निघाली होती. हे विमान मुंबईला लँड झालं तेव्हा विमानाला सशस्त्र पोलिसांचा गराडा पडलेला होता. उतरणाऱ्या प्रवाशांमधून ‘ए. मोहन’ अर्थात मोहन आगाशे अँड कंपनीच्या लोकांना बाजूला काढत पोलिसांनी जवळच्या व्हॅनमध्ये बसवलं. व्हॅन तिथून थेट ‘इमिग्रेशन’ला. पुण्यातून निघालेल्या आणखी दहा जणांनाही दोन वाहनांमधून सामानाच्या एका टेम्पोसकट एव्हाना तिथं पोहोचवण्यात आलेलं होतं! फ्लाईट मुंबई दिल्ली फ्रॅंकफर्ट अशी होती. विमानानं दिल्ली सोडलं तेव्हा कुठं पायलटनं प्रवाशांसाठी उद्‍घोषणा केली की, ‘‘जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेली पुण्याच्या ‘थिएटर अकॅडमी’ची टीम आपल्यासोबत आहे. त्यांचं स्वागत आहे, त्यांना शुभेच्छा देऊयात...’’ विमानात टाळ्यांच्या कडकडाटासह जल्लोष झाला! डॉ. जब्बार पटेल व डॉ. मोहन आगाशेंना फुलांचे मोठे बुके दिले गेले तेव्हा ‘घाशीराम’ची समस्त टीम उभं राहून शुभेच्छा स्वीकारत होती...

एखाददोन वर्षांपूर्वीच पुण्यातल्या एका प्रयोगानंतर टाळ्यांच्या कडकडाटात ही मंडळी प्रेक्षकांना असंच अभिवादन करत होती तेव्हा प्रेक्षकांत मॅक्सम्युलर भवनचे मॅर्केल महोदयही होते... ‘घाशीराम’चा प्रयोग पाहून भारावलेल्या डॉ. मॅर्केल यांनी बर्लिनच्या महोत्सवात हे नाटक व्हावं, ही कल्पना आगाशेंपुढं मांडली. बर्लिन फेस्टिवल कमिटीसाठी शिफारशीचं पत्रही देऊ केलं... ‘घाशीराम’ला भाषेचा अडसर येत नाही, हे याआधीच सन १९७७ मध्ये अर्नाकुलमला झालेल्या संगीत नाटक अकादमीच्या महोत्सवातील प्रयोगाला प्रत्ययास आलं होतं. दिल्ली आणि कोलकात्याच्या प्रयोगांचाही अनुभव हाच होता... भाषेच्या सीमा ओलांडून ‘घाशीराम’नं आपली रंगकिमया सिद्ध केली होती, आता देशांच्या सीमा ओलांडून बर्लिनच्या रूपानं वैश्विक मंच ‘घाशीराम’ला साद घालत होता.

ही संधी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही, हा निर्धार झाला. ‘अकॅडमी’नं तिकीट देऊ केलं आणि मोहन आगाशे बर्लिन फेस्टिवलचा अंदाज घ्यायला बर्लिनला निघाले...

मुंबई- वॉर्सा- ईस्ट बर्लिन व मग पुढं वेस्ट बर्लिन असा मार्ग होता. दिल्लीहून पोलंडचा व्हिसा घ्यावा लागणार होता म्हणून एक दिवस आधी मुंबईला पोहोचल्यावर बाकी बॅगेज तिथंच ठेवून एक छोटी बॅग घेऊन रात्री माघारी येण्यासाठी आगाशे दिल्लीला पोहोचले आणि इकडं मुंबईला सहार विमानतळाला आग लागण्याचा प्रकार घडला. पुढचे पंधरा दिवस आता तिकडून फ्लाईट्स येणार नव्हत्या. आगाशेंचं तिकीट मुंबईपासूनचं... आता काय? या प्रश्नाचं उत्तर एअरलाईन्सकडंही नव्हतं; पण नंतर त्यांच्याकडून फोन आला कॉन्टॅक्ट नंबरच्या लँडलाईनवर, ती फ्लाईट चेन्नईहून निघून दिल्लीवरून जाणार आहे – हवं तर तुम्ही यातून जाऊ शकता… पण कसं?.. सगळं बॅगेज आणि पैसे मुंबईत. शेवटी दिल्लीच्या नाटकवाल्या काही मित्रांचे कपडे, एकाची बॅग आणि एका मैत्रिणीनं दिलेले (‘अराउंड द वर्ल्ड’मधल्या राजकपूरपेक्षा तब्बल एक जास्त म्हणजे) नऊ डॉलर्स घेऊन डॉ. मोहन आगाशे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये आपल्या नाटकाचा प्रयोग मिळवायला बर्लिनच्या विमानात बसले!

आगाशेंना बर्लिन म्हणजे जगाची फेस्टिवल सिटीच भासली. चित्रपट, नृत्य, संगीत, साहित्य, विविध कला.. आणि नाटक.. सगळ्यांच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांची कार्यालयं एका परिसरात. डॉ. मॅर्केलचं पत्र आणि आगाशेंची वाणी यामुळे पुढच्या वर्षीच्या महोत्सवाचं निमंत्रण घेऊनच विजयी मुद्रेनं आगाशे माघारी परतले.

पण खरा ‘ड्रामा’ पुढंच होता!... तत्कालीन केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री वसंत साठेंनी ‘घाशीराम’च्या परदेशवारीला विरोध दर्शवला. इतिहासाचा विपर्यास करणारं हे नाटक जगाच्या मंचावर पोहोचता कामा नये.. शिवसेना आधीपासून विरोधात होतीच. राज्य पातळीचा विरोध केंद्रीय पातळीवर पोहोचला; पण ‘थिएटर अकॅडमी’चे हौसले बुलंद होते. एवीतेवी संधी मिळते आहे युरोपात ग्रुप न्यायची तर बर्लिन फेस्टिवलचे तीनच प्रयोग का, असा विचार करून आगाशे कामाला लागले व त्यांनी बघता बघता हॉलंड, लंडन, पॅरिस, युनेस्कोचे प्रयोग मिळवले. तीन प्रयोगांची संख्या २३ वर नेली... इकडं विरोध करणाऱ्यांच्या बरोबरीनं पाठिंबा देणारे, बळ देणारेही पुढं येऊ लागले... विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, निळू फुलेंपासून गावोगावीचे रंगकर्मी, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची एक फळीच उभी राहिली. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे शरद पवार भक्कमपणे पाठीशी उभे राहिले. निधी उभा करण्यापासून पुढे ‘घाशीराम’ टीमला मोठ्या हिकमतीनं मुंबईला विमानात बसवण्यापर्यंत पवारांनी पूर्ण साथ दिली. ‘ए. मोहन अँड कंपनी’च्या नावाने काढलेली पुणे-मुंबई विमानाची तिकिटं निळकंठ कल्याणी यांच्या बंगल्यात त्यांनीच मोहन आगाशे आणि विद्याधर वाटवेंच्या हातात ठेवली होती- नेमक्या एक्झिट प्लॅनसकट!

‘ए. मोहन अँड कंपनी’ अर्थात थिएटर अकॅडमीनं प्रखर संघर्षातून हाती आलेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. बर्लिन फेस्टिवलच्या प्रयोगाला तिथल्या माध्यमांनी उचलून धरलं. युरोपभर ‘घाशीराम’ची चर्चा व प्रशंसा सुरू झाली. पीटर ब्रुक्सपासून रिचर्ड अटेंबरोपर्यंतच्या दिग्गजांनी ‘घाशीराम’वर पसंतीची मोहोर उमटवली. ‘पाश्चात्त्य रंगभूमीला प्रेरणा ठरू शकणारा प्रयोग’ अशा शब्दात ‘घाशीराम’चं श्रेष्ठत्व अवघ्या युरोप खंडानं जणू मान्य केलं! परतीच्या वाटेवर ऐनवेळी ‘ऑफर’ झालेले रोम व मिलॉनचे प्रयोगही ‘अकॅडमी’नं खणखणीत गाजवले. मूळच्या तीन प्रयोगांसह २३ प्रयोग करून यात या दोनची भर टाकत परदेशातल्या प्रयोगांचा रौप्यमहोत्सव साजरा करूनच ‘घाशीराम’ परतला!

‘थिएटर अकॅडमी’ची ‘घाशीराम’ टीम मुंबई विमानतळावर उतरली तेव्हा स्वागताला शेकडो रंगकर्मी व रसिक हजर होते. शरद पवार, दिलीपकुमार, स्मिता पाटील व तिचे वडील मंत्री शिवाजीराव पाटील... या सगळ्यांना विमानतळावर पाहून कष्टांचं सार्थक वाटलं तर नवल ते काय!... म्हणूनच कदाचित डॉ. मोहन आगाशे म्हणतात ते खरंच.. ‘‘चोरांसारखे गेलो अन्‌ राजासारखे परतलो!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com