राजा त्रिशंकूचं स्वर्गारोहण

राजा हरिश्चंद्राची कथा मी मागील काही लेखांमध्ये सांगितली. हरिश्चंद्र हा लोकप्रिय राजा होता. बहुतेकांना त्याच्याबद्दल माहिती आहे.
raja harishchandra story history significance trishanku
raja harishchandra story history significance trishankuSakal

- विवेक देबरॉय

राजा हरिश्चंद्राची कथा मी मागील काही लेखांमध्ये सांगितली. हरिश्चंद्र हा लोकप्रिय राजा होता. बहुतेकांना त्याच्याबद्दल माहिती आहे. हरिश्चंद्राचा पिताही लोकप्रिय राजा होता. अनेकांनी त्याच्याबद्दलही ऐकलं आहे.

इक्ष्वाकु वंशातील हा राजा म्हणजे त्रिशंकू. हरिश्चंद्र आणि त्रिशंकू या दोघांच्या कथा लोकांना माहिती असल्या, तरी त्यांच्यात पिता-पुत्राचं नातं होतं, हे मात्र कदाचित काही लोकांना माहिती नसेल. त्रिशंकूची कथा वाल्मिकी रामायण आणि हरिवंशात सापडते.

महर्षि वसिष्ठ हे इक्ष्वाकु कुळाचे राजपुरोहित होते. सदेह स्वर्गात जाता येईल, असा यज्ञ त्रिशंकूला करायचा होता. हा यज्ञ संपन्न करण्यासाठी त्रिशंकू राजानं राजपुरोहित असलेल्या वसिष्ठांना निमंत्रण दिलं. त्या वेळी वसिष्ठ इतर कामांमध्ये व्यग्र होते, त्यांनी त्रिशंकूला वाट पाहण्यास सांगितलं. वसिष्ठांना शंभर पुत्र होते.

रामायणातील कथेनुसार ते सर्व जण दक्षिण दिशेला तपस्या करत होते. त्रिशंकू तिथं गेला आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याची त्यांना विनंती केली. मात्र, वसिष्ठांनी नकार दिला असल्यानं, त्यांच्या पुत्रांनीही नकार दिला. यामुळं त्रिशंकूनं त्यांच्यावर संतापानं आगपाखड केली.

त्याच्या या पवित्र्यामुळं वसिष्ठपुत्र संतप्त झाले आणि त्यांनी शाप दिला - ‘तू चांडाळ बनशील.’ (चांडाळ या शब्दाला वेगवेगळ्या छटा आहेत. त्याचा अर्थ प्रत्येक वेळी शूद्र असेलच, असं नाही. शूद्र पिता आणि ब्राह्मण मातेमुळं वर्णसंकर झालेल्या अपत्यांनाही त्या काळी चांडाळ म्हटलं जात असे. सर्वसाधारणपणे, चांडाळ हे जातिबाह्य असतात,

तर शूद्रांचा समावेश जातीरचनेत असतो.) तो चांडाळ बनताच, त्याचं रूपही पालटलं. त्याची त्वचा खडबडीत झाली आणि केस राठ झाले. त्वचेचा रंगही काळवंडला आणि अंगावरील कपडे मळले. त्याच्या अंगावर लोखंडाचे दागिने आले आणि गळ्यातही चितेवरील फुलांपासून बनलेली माळ आली. सर्व नागरिकांनी आणि मंत्र्यांनी राजाचा त्याग केला.

वसिष्ठ आणि विश्‍वामित्रांमध्ये शत्रुत्व होतं. राजा त्रिशंकू विश्वामित्रांकडं गेला. त्याची स्थिती पाहून विश्वामित्रांचं हृदय करुणेनं भरून गेलं. त्रिशंकू त्यांना म्हणाला, ‘‘माझ्या मार्गदर्शकाकडून आणि त्याच्या पुत्रांकडून मी नाकारला गेलो आहे.

माझी इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही आणि आता तर माझ्यावर ही आपत्ती कोसळली आहे. सदेह स्वर्गात जावं, ही माझी इच्छा आहे. मी आतापर्यंत शंभर यज्ञ केले आहेत, पण त्यांचं फळ मला मिळालेलं नाही. मी माझ्या आयुष्यात कधीही असत्य बोललो नाही किंवा चुकीचं काही सांगितलं नाही.

क्षत्रियधर्माचं पालन मी करत आलो आहे, आणि मला वाटतं हेच माझ्यावर आलेल्या आपत्तीमागील कारण आहे. यात चुकीचं काही असेल, तर मला शाप द्यावा. मी अनेक प्रकारचे यज्ञ केले आहेत. धर्माचं पालन करत प्रजेचं पालनपोषण केलं आहे. योग्य वर्तणूक राखत मी आमच्या महान पुरोहितांनाही समाधान दिलंय.

यज्ञाबाबतची माझी इच्छा आणि तो संपन्न करण्याची मागणी, ही धर्मानुसारच आहे. मात्र आता मला वाटतं की नियती हीच सर्व शक्तिमान असून मानवी प्रयत्न निष्फळ आहेत. नियतीच्या पुढं मानवाचं काहीही चालत नाही. याच कारणामुळं माझ्यावर प्रचंड संकट ओढवलं असून त्यातून मार्ग काढण्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे. माझ्या कर्मांना नियतीनं आडकाठी आणली आहे.’’

विश्वामित्रांनी मदतीचं आश्‍वासन दिलं. ‘‘ हे इक्ष्वाकु कुलोत्पन्ना ! तुझं स्वागत आहे. तू पूर्णपणानं धर्मपालक आहेस, याची मला कल्पना आहे. तुला भयभीत होण्याचं कारण नाही. मी तुला आश्रय देत आहे. अत्यंत पुण्यशील असलेल्या सर्व महर्षिंना मी आमंत्रित करेन, ते यज्ञात आपल्याला सहकार्य करतील.

हे राजा ! ज्यासाठी तुला नकार मिळाला होता, तो यज्ञ तू निश्‍चितपणानं करशील. तू सदेह, तुझ्या मूळ शरीराबरोबरच तुझ्या पुरोहितानं दिलेल्या शापामुळं प्राप्त झालेल्या शरीरासह स्वर्गात जाशील,’’ असं म्हणत विश्वामित्रांनी यज्ञाची तयारी करण्याची आज्ञा त्यांच्या पुत्रांना दिली.

विविध ऋषींना आमंत्रण देण्यासाठी ते सर्व जण सर्व दिशांना गेले. अनेक ऋषींचं यज्ञासाठी आगमन होण्यास सुरुवातही झाली. महोदय नावाचे ऋषी आणि वसिष्ठपुत्रांचा मात्र याला अपवाद होता.

एका चांडाळानं आयोजित केलेल्या आणि पूर्वी क्षत्रिय असलेल्या पुरोहिताकडून (विश्वामित्र) संपन्न होत असलेल्या यज्ञात सहभागी होण्यास त्यांनी नकार दिला. यामुळे विश्वामित्र संतप्त झाले आणि त्यांनी चिडून महोदय आणि वसिष्ठपुत्रांना शाप दिला. महोदय आणि वसिष्ठपुत्रांची हत्या करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.

दरम्यान, यज्ञ संपन्न झाला आणि विश्वामित्रांच्या कोपाच्या भयानं इतर सर्व महर्षिंनी त्यात सहभाग घेतला. यज्ञातील आपला वाटा स्वीकारण्यास देव मात्र प्रकट झाले नाहीत. तरीही, विश्वामित्रांनी यज्ञाची पळी उंचावली आणि ते त्रिशंकूला म्हणाले, ‘‘हे नरेंद्रा ! मी माझ्यासाठी कमाविलेलं तपस्येचं तेज तू धारण कर.

माझ्यामधील ऊर्जेच्या बळावर मी तुला तुझ्या शरीरासह स्वर्गात पाठवतो. सदेह स्वर्गात जाणं अत्यंत कठीण आहे. तू तिथं जा. हे राजा ! माझ्या तपस्येनं मी थोडं जरी पुण्य कमावलं असेल, तर त्या ऊर्जेच्या बळावर तू सदेह स्वर्गात जाशील.’’ विश्वामित्रांनी हे शब्द उच्चारताच त्रिशंकू आपल्या शरीरासह स्वर्गात गेला.

इंद्रानं हे पाहिलं आणि तो म्हणाला, ‘‘हे त्रिशंकू, तू इथून निघून जा. स्वर्गप्राप्ती करावीस, असं तू काहीही केलेलं नाहीस. अरे मूर्खा ! तुला तुझ्या पुरोहितानंच शापदग्ध केलंय. जमिनीच्या दिशेनं डोकं असलेल्या स्थितीत तू तत्काळ पृथ्वीच्या दिशेनं जाशील.’’

इंद्रानं असं म्हणताच त्रिशंकू खाली पडू लागला. त्यानं विश्वामित्रांना, ‘मला वाचवा’, अशा आर्त हाका मारण्यास सुरुवात केली. त्याचा हा आक्रोश ऐकताच विश्वामित्र अत्यंत संतप्त झाले आणि म्हणाले,‘‘तिथंच थांब, तिथंच थांब.’’ तेव्हा इंद्रानं दक्षिण दिशेला सप्तर्षींचा दुसरा एक समूह निर्माण केला.

संतापानं बेभान झालेल्या विश्वामित्रांनी दक्षिण दिशेतच नक्षत्रांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. (आकाशात दिसत असलेल्या सप्तर्षींना इंग्रजीत उर्सा मेजर म्हणून ओळखलं जातं. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून, त्रिशंकूला सदर्न क्रॉस म्हणतात. भारतातील भौगोलिक ठिकाणानुसार,

आपल्याला तो दक्षिण क्षितिजावर एप्रिल ते जून या कालावधीत पाहता येतो.) ‘‘मी इंद्रासह दुसरं नवं विश्व निर्माण करेन, किंवा कदाचित या विश्वाला इंद्राची गरजच नसेल.’’ संतापाच्या भरात विश्वामित्रांनी देवांची पुनर्निर्मिती करण्यास सुरुवात केली. यानंतर काय झाले, हे समजण्यासाठी तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष असून पुराणे आणि वेद तसेच भारतीय संस्कृतीचा त्यांचा अभ्यास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com