
इक्ष्वाकू कुळातील दानशूर राजा हरिश्चंद्र यांच्या दानप्रियतेबद्दल आणि त्याच्या सत्याला धरून राहण्याच्या वृत्तीबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. मीनाक्षी डफळ-पाटोळे यांनी या पुस्तकात त्यांच्या जीवनाचा वेध घेतलाय. राजा हरिश्चंद्र, राणी तारामती आणि मुनी विश्वामित्र यांच्या स्वगतामधून कथानक पुढे सरकत जाते. मुळात हरिश्चंद्राबद्दल मराठीत फारसे लेखन झालेले नाही. लेखिका डफळ-पाटोळे यांनी मेहनत घेऊन विविध संदर्भाचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. आपल्या मनातल्या व्यक्तिरेखा समर्थपणाने मांडता याव्यात म्हणून त्यांनी त्या व्यक्तिरेखा स्वतःच आपल्या आयुष्याबद्दल सांगत आहेत, असा फॉर्म निवडला आहे. प्रासादिक भाषा आणि प्रसंगाची ठळक मांडणी करताना त्यातली नाट्यमयता मरू दिलेली नाही.