सेटवर होतं हसत-खेळत काम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

जोडी पडद्यावरची - राजन भिसे आणि सविता प्रभुणे
काही कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या मनात इतकी परफेक्‍ट बसलेली असते, की त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा निर्माण होते. अशीच एक गोड, सुंदर आणि सर्वांची आवडती जोडी म्हणजे अभिनेते राजन भिसे आणि अभिनेत्री सविता प्रभुणे. या जोडीनं नाटक, मालिका आणि चित्रपटात एकत्र काम केलं आहे. लवकरच ते आगामी मराठी चित्रपट समीर जोशी दिग्दर्शित ‘मिस यू मिस्टर’मध्ये गिरीश आणि वेदा देवल या नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत झाली.

राजन म्हणतात, ‘‘आमची ओळख फार पूर्वीपासूनची आहे. ‘सासू हवी’ या मालिकेत आम्ही एकत्र काम केलं होतं. आधी आनंद अभ्यंकरनं या मालिकेत काम केलं होतं, त्याच्यानंतर मी त्यानं साकारलेली भूमिका केली. काही दिवसांनी आसावरी जोशीनं ही मालिका सोडल्यामुळं तिच्याजागी सविता प्रभुणेची निवड करण्यात आली. आमची ओळख खूप पूर्वीपासून आहे, कारण नाटकाच्या निमित्तानं आम्ही एकत्र यायचो. मी नाटकाचा सेट डिझायनर आणि सविता अभिनेत्री, असं खूप वेळा झालंय.’’

या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीविषयी सांगताना सविता यांनी सांगितले, ‘या चित्रपटात आम्ही दोघं सिद्धार्थ चांदेकरचे आई-बाबा आहोत. ते खूप हौशी, प्रसन्न आणि समंजस असं जोडपं आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप या संकल्पनेवर आधारित ही गोष्ट आहे.

माझी सून एकटी आहे आणि माझा मुलगा बाहेरगावी गेला आहे, त्यामुळं तिला एकटं तर वाटत नाही ना, कंटाळा तर येत नाही ना याची काळजी घेणारी अशी सासू आहे. सासू अतिउत्साही असल्यामुळं त्यातून उडणारे गोंधळ वेळोवेळी तिचा नवरा कसा सांभाळून घेतो किंवा तिला कसं समजावत असतो, याची ही गोष्ट. यात सासू-सासऱ्याची म्हणजेच माझी आणि राजन यांची केमिस्ट्री आहे. राजन यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव नेहमीच चांगला आहे. ‘फू बाई फू’मध्ये कॉमेडी स्किटदेखील एकत्र केलं आहे.

विनोदी भूमिका करायची असल्यास टायमिंग खूप परफेक्‍ट असावं लागतं आणि ते आमच्याबाबतीत अगदी योग्य जुळून आलं. त्यांच्यासोबत काम करताना मी रिलॅक्‍स असते. मला काय म्हणायचंय किंवा मला कुठं थांबायचंय हे त्यांना माहीत असतं.’’

सहकलाकार म्हणून सविता यांची आवडणारी गोष्ट कोणती हे सांगताना राजन म्हणतात, ‘‘अत्यंत सहज अभिनय ही तिची मजबूत बाजू आहे. ती खूप नॅचरल अभिनेत्री आहे. सीनमध्ये जे प्रसंग ती रंगवते, ते खरे वाटतात. हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला खरेपणा मला फार आवडतो.’ सविता या राजन यांच्याविषयी आवडती गोष्ट सांगताना म्हणाल्या, ‘‘समोरच्या अभिनेत्याला ते काम करताना कंफर्टेबल करतात, कोणतंही दडपण येऊ देत नाही. पण आवश्‍यक वाटेल तिथं ते सूचनाही देतात. काळजी घेतात. विशेष म्हणजे, त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर प्रचंड चांगला आहे आणि त्यामुळंच सेटवर काम करताना हसत-खेळत काम करत असतो.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajan Bhise Savita Prabhune Maitrin Supplement Sakal Pune Today