'रुपीन पास'चा रुपेरी प्रवास (राजेंद्र मुठे)

राजेंद्र मुठे
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो.

रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो.

गेल्या वर्षी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या "हम्प्टा पास' व चंद्रतालच्या यशस्वी गिर्यारोहणामुळे या वर्षीही हिमालयातल्या ट्रेकचे वेध लागायला सुरवात झाली आणि "युवाशक्ती'च्या रुपीन पासच्या ट्रेकमध्ये सहभागी झालो.
"रुपीन पास' हा भारतातल्या अत्यंत अवघड अशा पहिल्या दहा ट्रेकमध्ये समाविष्ट आहे. हा आंतरहिमालयीन ट्रेक असून त्याची सुरवात उत्तराखंड या राज्यातून होते व हिमाचल प्रदेशात तो समाप्त होतो. त्यामुळे या ट्रेकसाठी योग्य ती पूर्वतयारी करणं आवश्‍यक असतं. दर आठवड्याला दोन वेळी सिंहगडची चढाई आणि दरमहाचे ट्रेक्‍स! रुपीन पासच्या ट्रेकचा कालावधी होता 28 मे ते 8 जून. पुण्याहून विमानानं डेहराडूनला व तिथून धौला या ठिकाणापर्यंतचा पूर्ण दिवसाचा गाडीप्रवास.

नागमोडी घाटरस्त्यांमुळे या प्रवासात निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटायला मिळतो आणि त्याच वेळी तो जीव मुठीत धरण्यासही भाग पाडतो! धौला इथं मुक्काम असल्यानं रात्री बाजूनं वाहणाऱ्या रुपीन नदीच्या खळाळत्या आवाजात
सर्व सहकाऱ्यांचा परिचय झाला व मनसोक्त गप्पाही झाल्या. आम्ही एकूण बारा जण होतो व नेहमीचे आमचे मार्गदर्शक भवन पटेल.

दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष ट्रेकला सुरवात झाली. स्थानिक मार्गदर्शक व पोर्टर्सच्या (भारवाहक) सहकार्यानं आमचा ट्रेक सुरु झाला. पहिल्या दिवशीचा ट्रेक हा धौला ते सेवा हा 12 किलोमीटरचा टप्पा होता. खळाळती रुपीन नदी, सफरचंद-अक्रोडच्या बागा, देवदार वृक्षराजी असा हा टप्पा अत्यंत निसर्गरम्य आहे. मार्गातले छोटे-मोठे झरे पार करताना पाण्याला असणाऱ्या ओढीमुळे चांगलाच कस लागत होता. सहा ते सात तासांच्या या प्रवासात गरुड, गिधाडं या दुर्मिळ पक्ष्यांचं दर्शन वारंवार होत होतं. "गरुडभरारी' कशी असते ते प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. सेवा या गावी आमचा मुक्काम होता. "कॅम्प साईट'जवळच एक प्राचीन मंदिर असून, ते शेकडो वर्षांपूर्वी किन्नौर व टोन्स या प्रदेशावर राज्य करणाऱ्या राजानं कर्णाविषयीच्या आदरापोटी बांधलं असल्याचं सांगितलं जातं. या लाकडी मंदिरावरचं किन्नौरी पद्धतीचं कोरीवकाम, स्थानिक देवतांच्या प्राचीन प्रतिमा, मंदिराच्या भिंतीवर ठोकलेली जुनी नाणी हे सगळंच अप्रतिम आहे. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, इथले देव हे भ्रमंती करत असल्यानं, आम्ही गेलो त्या कालावधीत ते मंदिर बंद होतं. ते वर्षातून एकदा उघडण्यात येतं व त्या कालावधीत देव तिथं मुक्कामी असतात. रात्री स्थानिकांकडून त्यांच्या लोककथा, गाणी ऐकण्यात वेळ छान गेला.

दुसऱ्या दिवशी आम्ही उत्तराखंडमधून हिमाचल प्रदेशात प्रवेश करणार होतो आणि "जाका' या गावी आमचा मुक्काम असणार होतो. आतापर्यंतचं हवामान हे उन्हामुळं त्रासदायकच ठरत होतं. 14 किलोमीटरच्या या ट्रेकमध्ये काही ठिकाणी अत्यंत कठीण चढ अनुभवायला मिळाले. जाकाच्या मार्गावर आम्हाला स्थानिक भाविकांचे जथे वारंवार भेटत होते. त्यांचे कुणी गुरू येणार असल्यानं त्यांच्या दर्शनाला ते निघाले होते. त्यात अगदी लहान बालकांपासून ते 97 वर्षांच्या आजीबाईंचाही समावेश होता. त्यांचा भक्तिभाव आणि त्यासाठीचे परिश्रम पाहून कुणीही भारावून जावं. या प्रवासात आम्हाला गारांच्या पावसानं चांगलाच तडाखा दिला. संध्याकाळी जाका इथं पोचलो. तेव्हा मात्र समोरचं दृश्‍य पाहून दिवसभराचा शीण कुठल्या कुठं पळून गेला. एका दरीच्या टोकाला असणारं आमचं मुक्कामाचं घर, दरीतून वर येणारं धुकं, दूरवर दिसणारी हिमशिखरं, नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळं निर्माण झालेलं स्वच्छ वातावरण आणि घरमालकांनी आग्रहानं दिलेला मसालेदार गरमागरम चहा... सगळं काही मनासारखं जमून आलं होतं. जाका हे गाव "हॅंगिंग व्हिलेज' म्हणून प्रसिद्ध आहे. कारण, इथली काही घरं ही दरीच्या इतक्‍या कडेवर बांधलेली आहेत, की त्यांचे व्हरांडे हे दरीवर तरंगल्यासारखेच दिसतात. जाकानंतर मात्र "होम स्टे'ची सुविधा आम्हाला मिळणार नव्हती. यापुढचा प्रत्येक मुक्काम आम्हाला तंबूत करायचा होता.
जाका पार करताना रस्त्यात भेटणारी छोटी छोटी पहाडी मुलं नमस्ते म्हणून लाजून हसत होती. जाका गाव पार करताना एक मोठं पटांगण लागलं. तिथं उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांना काही वर्गणी दिली. ही वर्गणी अधिकृत असून त्या निधीतून विकास, पर्यावरणरक्षण, प्लास्टिक व कचरानिर्मूलन, काही दुर्घटना घडल्यास आवश्‍यक ते बचावकार्य अशी कामं करण्यात येतात. जाका सोडल्यानंतर आम्हीदेखील एका "हॅंगिंग हट'मधून दरीत डोकावण्याचा, पाय सोडून बसण्याचा व फोटो काढण्याचा थरारक अनुभव घेतला. जाका सोडल्यापासून बहरलेले रोरोड्रेंड्रन्स, घनदाट जंगल, अवखळ ओढे नाले यांची साथ होतीच. पाच ते सहा तासांच्या पायपिटीनंतर आम्ही आमच्या मुक्कामी बुऱ्हास कांडी इथं पोचलो. नदीच्या काठी उभारलेल्या तंबूत आमचा मुक्काम होता. रात्री पोर्टर्सनी त्यांचं स्थानिक लोकनृत्य, खेळ, कला यांचा परिचय करून दिला. घनदाट जंगलातल्या उत्तुंग पहाडांच्या संगतीतली, खळाळत्या नदीकाठावरची ही रात्र काजव्यांच्या प्रकाशात अजूनच उजळून निघाली.

चौथ्या दिवशीचा ट्रेक हा बुऱ्हास कांडी ते धांडेरास/लोअर वॉटर फॉल असा होता. हवामान चांगलं असल्यानं हा ट्रेक खूपच छान झाला. "कॅम्प साईट'वर पोचण्यासाठी लागणाऱ्या रानफुलांनी फुललेल्या प्रचंड मोठ्या मैदानात विविध खेळ, फोटोग्राफी करताना वय वगैरे बाबी विसरायला होतात. "कॅम्प साईट' ही एक यू आकाराची व्हॅली असून तिथून दिसणारा ट्रेकचा रस्ता वा दर्शन हे मनावर दडपण आणत होतं. पुढील टप्पा हा लोअर वॉटर फॉल ते अप्पर वॉटर फॉल असा होता. समोर दिसणारा रौद्र धबधबा पाहता हा टप्पा आपण कसा पार करू शकू, हा प्रश्‍न सर्वांच्याच मनात येत होता. हिमालयाचं रौद्र; पण मोहक सौंदर्य जे म्हणतात, त्याचं दर्शनच या वॉटर फॉलद्वारे होत होतं. आता आम्ही साधारणतः तेरा हजार फूट उंचीवर पोचलो होतो.
दुसऱ्या दिवशी आमची चढाई सुरू झाली. मार्गात जागोजागी खळाळून वाहणारे झरे आणि बर्फाचे ग्लेशिअर्स लागत होते. बर्फाच्या कड्यावरून एकमेकांना सावरत आमचा प्रवास सुरू होता. हवामान चांगलं असल्यानं अप्पर वॉटरफॉल इथं मुक्काम करण्याऐवजी आम्ही "राताफेरी' या त्याही पुढील ठिकाणी मुक्काम करण्याचं निश्‍चित केलं. साधारणतः दोन-तीन किलोमीटरची ही चढण पार करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. ही "खडी चढण' असल्यानं जागोजागी विश्रांतीसाठी थांबत थांबत राताफेरी या मुक्कामी पोचलो आणि आजूबाजूला पसरलेलं प्रचंड बर्फ, आमच्यापेक्षा कमी उंचीवर दिसणारी अन्य शिखरं आणि दूरवरून खुणावणारा बर्फाच्छादित रुपीन पास हे सगळं पाहून भान हरपायला होत होतं. या ठिकाणचा रात्रीचा मुक्काम अविस्मरणीय होता तो प्रचंड थंडी आणि तंबू फडफडवणारं प्रचंड वेगात वाहणारं वारं यामुळे. रात्री झोपण्यापूर्वी देण्यात येणारं गरम दूध पिण्यासाठी "किचन-तंबू'पर्यंत जाण्याचंही अवसान कुणात उरलं नव्हतं. मात्र, वातावरणाशी समरस होण्याकरिता पटेल सरांनी सर्वांनाच बाहेर काढलं.

आता मुख्य ट्रेक सुरू झाला होता. राताफेरी ते रुपीन पास. रुपीन पास हा साधारणतः 15 हजार 300 फुटांवर असून, गेल्या वर्षीची एक बॅच वगळता इतर बॅचेसना रुपीन पासवरच्या प्रचंड बर्फामुळं तिथं पोचणं अशक्‍य झालं होतं. या पार्श्‍वभूमीवर मनात संमिश्र भावना घेऊनच आम्ही पहाटे मार्गक्रमण सुरू केलं. जागोजागी दिसणारे ग्लेशिअर्स, निसरडे उतार, ते चुकवताना अचानक गुडघ्यापर्यंत पाय रुतवणारं बर्फ या सर्वांवर मात करत आम्ही हातातल्या काठ्यांच्या व एकमेकांच्या साथीनं पुढं निघालो होतो. इतर ग्रुपही आम्हाला रस्त्यात भेटत होते. सर्वात शेवटचा चढाचा अवघड टप्पा पार करून आम्ही रुपीन पासला पोचलो. कोळ्याच्या पायांप्रमाणे आजूबाजूला पसरलेल्या धौलाधार पर्वताच्या रांगा दिसून येत होत्या. खाली पसरलेला बर्फाचा प्रचंड सागर आणि उभं राहण्यासाठी चिंचोळी जागा! सर्वजण एका विलक्षण धुंदीतच होते. तिथंच उभे राहून सर्वांनी जोशात राष्ट्रगीत म्हटलं. सोबतच्या ब्रिटिश मुलींनी ग्रेट ब्रिटनचं राष्ट्रगीत म्हटलं. मन एका समाधानानं व अभिमानानं भरून आलं होतं. उतरताना मात्र रेनकोटची गाडी करून घसरगुंडी करून उतरण्याचा, बर्फाचे गोळे एकमेकांना फेकून मारताना बालपणाचा पुनःप्रत्यय सर्वांनीच घेतला. एक अनाहूत हुरहूर मनात दाटून आली होती. त्याच भावनेनं आम्ही रुपीन पासवरून पुढचं मार्गक्रमण सुरू केलं. आमचा पुढचा मुक्काम रोटिंगड इथं होता. राताफेरी ते रुपीन पास ते रोटिंगड हा सुमारे 10-11 तासांचा प्रवास शरीराबरोबरच मनाचाही कस पाहत होता. रोटिंगड या धौलादार पर्वररांगामधल्या मुक्कामावर पोचल्यावर कधी एकदा तंबूत जाऊन आराम करतोय असं झालं होतं. दूरवर "किन्नौर-कैलाश'चं प्रसन्न दर्शन होत होतं.

आता हुरहूर लावणारा ट्रेकचा शेवटचा दिवस उजाडला. रोटिंगड इथून आम्ही सांगला या गावी मुक्कामी जाणार होतो. संपूर्ण दिवस हा धौलाधार पर्वतरांगांच्या कड्यांचा व उतारावरचा असल्यानं सुखद वाटत होता. मात्र, डोक्‍यावर तळपणारा सूर्य आम्हाला निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेऊ देत नव्हता. दुपारी आम्ही सांगला येथे पोचलो. मात्र, हॉटेलवर पोचवणारा शेवटचा चढ पार करण्याचीदेखील शक्ती अंगात राहिली नव्हती.

सांगला हे छोटेसं हिल स्टेशन असून, हे हिमालयातल्या अन्य गजबजत्या हिल स्टेशनपेक्षा अत्यंत शांत व रम्य ठिकाण आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही सांगला इथून निघून सिमला इथं पोचलो व ट्रेकची समाप्ती झाली. सांगला ते सिमला हा एक निसर्गरम्य प्रवास असून रस्त्यात एका ठिकाणी पहाडाखालून जाणारी नैसर्गिक कमान तयार झाली आहे. ती पाहून "रारंगढांग' या कादंबरीतलं वर्णन आठवतं. रुपीन पासचा ट्रेक हा अत्यंत रम्य; परंतु अवघड ट्रेक असून, त्यामध्ये निसर्गाची विविध रूपं बदलणारं हवामान यांचं दर्शन होतं. कुणीतरी तुलना करताना या ट्रेकला बॉलिवूडच्या चटपटीत "मसाला फिल्म'ची उपमा दिलेली आहे. मात्र, काहीही असो, रुपीन पासचा ट्रेक हा शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक शक्तीचाही कस पाहणारा असतो. विशेष आश्‍चर्य आमच्यासोबत असणाऱ्या पोर्टर्सचं (भारवाहक) वाटतं. कारण, या ट्रेकमध्ये खेचरांमार्फत मालवाहतूक करणं अशक्‍य आहे. जिथं आपण सर्व जामानिमा केल्याशिवाय चालू शकत नाही तिथं हे स्थानिक लोक - ज्यांना गुज्जर म्हणतात ते लुंगी, पायजमा, रबरी बूट घालून पाठीवर 20-20 किलोंचं ओझं घेऊन सहजपणे चालतात.

गुज्जर हे भटके मेंढपाळ असून या हंगामात ते पोर्टर्सचं काम करतात. त्यांच्याकडूनही स्थानिक प्रश्‍न, राजकारण, प्रथा, परंपरा समजून घेण्यास मदत होते. अजूनही त्यांचे कधीतरी फोन येतात. या प्रवासात दिसून आलं ते म्हणजे उत्तरांचलमधल्या सेवा या अत्यंत दुर्गम गावी व हिमाचल प्रदेशातल्या झाका या शेवटच्या गावांपर्यंत सरकारनं वीज पोचवली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिमला इथलं पाणीटंचाईचं सावट. हिमालयाच्या कुशीतल्या या हिलस्टेशनवर पाणीटंचाई म्हणजे बदलता निसर्ग, मानवाचं निसर्गावर होणारं आक्रमण असून भावी संकटाची चाहूलच आहे, असं म्हणता येईल.

तर असा हा रुपीन पासचा ट्रेक आम्हा सर्वांच्या मनात रुंजी घालत असतो. पुन्हा पुढच्या ट्रेकचे वेध हा ट्रेक समाप्त होत असतानाच लागू लागले. आमच्या सोबतचे सगळे तरुण सहकारी खेळीमेळीनं वागणारे आणि सहकार्य करणारे होते. परस्परसहकार्य, एकमेकांच्या अडचणी समजून घेणं, एकमेकांना आधार देणं आदींद्वारे आपला मानसिक व सामाजिक विकास होत असतो आणि गिर्यारोहणाचा हाच फायदा व वैशिष्ट्य असतं.

शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारं, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकवणारं व मानवाला निसर्गासमोरचं त्याचं क्षुद्रत्व जाणवून देऊन त्याला निसर्गासमोर नतमस्तक होण्यास भाग पाडणारं गिर्यारोहण आपले पाय जमिनीवर ठेवण्याचं काम पार पाडत असतं. कॅमेऱ्यात काढलेल्या फोटोंपेक्षा मनात कायमस्वरूपी उमटलेल्या निसर्गखुणा, सहसंवेदना, सोबत्यांचं सहकार्य, विविध अनुभव हे आयुष्यभर साथसंगत करत असतात...गिर्यारोहणाकडून अजून काय हवं!

Web Title: rajendra muthe write rupin pass trek article in saptarang