जागते रहो...

Police patrol safety of people
Police patrol safety of peoplesakal

घरफोड्या, दरोडा, हाणामाऱ्या, खून यांसारखा एखादा प्रसंग घडतो. त्यावेळी पोलिस कुठे काय करतात, रात्रीची गस्त राहिलेलीच नाही... अशी टिप्पणी सहज केली जाते... जागते रहो... जागते रहो... असे ओरडत रात्रीचा खडा पहारा देणारा हाफ पँटमधील हातात काठी घेतलेला पोलिस जुन्या चित्रपटांत दिसायचा... आता त्यात बदल झाला आहे... पण, लोकांच्या सुरक्षेसाठी गस्त तेवढ्याच काळजीने आजही सुरूच आहे... पोलिस ठाण्यातील दैनंदिन काम, बंदोबस्त, गुन्ह्यांच्या तपासात व्यस्त असणाऱ्या पोलिसांवर रात्रीच्या गस्तीचीही जबाबदारी असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, थकलेल्या जीवांना रात्रीची निवांत झोप घेता यावी यासाठी पोलिस रात्रभर गस्त घालतात. गस्तीवेळी पोलिसांची चौकस नजर, चाणाक्ष बुद्धी, तत्परता आणि समयसूचकतेने काम करावे लागते... तीही माणसेच आहेत... त्यांनाही तणावाचे व्यवस्थापन करून... लोकांची सेवा बजावावी लागते, हे त्यांच्याबरोबर गस्तीवर असताना अनुभवताना आले...

पोलिसांची रात्रीची गस्त अनुभवण्याचे ठरले आणि सहकारी छायाचित्रकार बी. डी. चेचर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गस्तीला बाहेर पडलो... रात्री साडेदहाच्या सुमारास हुपरी (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्याकडे रवाना झालो. सव्वाअकराच्या सुमारास हुपरी पोलिस ठाण्यात पोचलो. पोलिस ठाण्याचे इन्चार्ज सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्याकडे हातकणंगले उपविभागीय गस्तीची त्या दिवशीची जबाबदारी होती. सहकाऱ्यांबरोबर गस्तीला बाहेर पडण्याची लगबग सुरू होती... त्यांच्यासोबत संवाद साधला... पोलिस ठाण्याची हद्द, तेथील लोकसंख्या, लोकांचे उपजीविकेचे साधन, चांदीची बाजारपेठ, परप्रांतियांची संख्या, भागातील संवेदनशील ठिकाणांसह विभागीय गस्तीअंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांसंबंधीची माहिती दिली, आणि आम्ही गस्तीसाठी पथकाबरोबर बाहेर पडलो...

हद्दीतून सुरुवात... अन्‌ पांगापांग...

हुपरीतून गस्तीला सुरुवात झाली... बाजारपेठ, मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात उभी... टोळकी पोलिसांची गाडी पाहून लगेच पांगू लागली... रस्त्याकडेला मोटारसायकलवर गप्पा मारत असलेल्या तरुणांना हटकले... ‘साहेब, जेवायला गेलो होतो. घरी चाललोय, हे बघा निघालोच’ म्हणत त्यांनी गाडीला कीक मारली...‘‘लेकाहो, आई-वडील घरी काळजी करतात, त्चींची कदर करा...’’ असा पोलिसी करड्या आवाजाला प्रतिसाद देत तरुण जिकडे-तिकडे निघून गेले...

नंबरप्लेटवर करडी नजर...

गस्तीपथकाने इचलकरंजीच्या दिशेने मार्ग बदलला. या मार्गावर दोन ते तीन किलोमीटरचा भाग कर्नाटकच्या हद्दीत येतो. रात्रीची साडेबाराची वेळ होती. दोघे मोटारसायकलस्वार एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीचा दरवाजा उघडून काही तरी करीत होते. पोलिसांना पाहून त्यांनी ‘काही नाही साहेब, गाडी बंद पडली होती. बॅटरी बदलली. आता चाललोय,’ असे सांगितले. पंकज गिरी यांनी, ‘गाडी कुठली,’ असे विचारले. त्यांनी गाडी आजऱ्याची असल्याचे सांगितले. पण, क्रमांकावरून गाडी रायगड पासिंग असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस व्हॅनला त्या मोटारीच्या मागेच ठेवण्याच्या सूचना दिल्या. इचलकरंजीची हद्द सुरू झाल्याबरोबर ती मोटार पोलिसांनी थांबवली. तपासणी केली. गाडीची खातरमजा करण्यासाठी पुन्हा गिरी यांनी, ‘गाडी आजऱ्यात कोठे असते’, असा सवाल केला. त्या वेळी चालकाने, ‘साहेब गाडी रायगडची आहे. तोंडी व्यवहाराने खरेदी केल्याचे सांगितले. पण, चालकाकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. पोलिसांनी चालक व त्याच्याबरोबर असणाऱ्यांचे मोटारीसह मोबाईलवर छायाचित्रे घेतली. सकाळी कागदपत्रे स्थानिक पोलिस ठाण्यात दाखविण्याच्या सूचना केल्या. केवळ नंबरप्लेटवरून काही आक्षेपार्ह नाही, याची खात्री करण्याचे कसब अनुभवता आले... आणि आम्ही पुढे निघालो...

ठाण्यासह लॉकअपची पाहणी...

रात्री एकच्या सुमारास इचलकरंजीतील गावभाग पोलिस ठाण्याजवळ पोचले... ठाण्यात पोचताच गिरी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. लॉकअपच्या पाहणीसाठी वळले. त्यांच्या आवाजाने लॉकअपमधील संशयितही उभे राहिले. किती संशयित आहेत, कोणत्या गुन्ह्यांतील आहेत, याची माहिती अंमलदाराकडून घेतली. संशयितांना त्यांची नावे विचारली... त्यांनी नावे सांगितली. नोंदीप्रमाणे संशयित सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्याची डायरीला नोंद करून व्हॉट्‍सॲपवरून वरिष्ठांना अहवालही पाठविला... आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो...

करंट लोकेशन...

पहाटे तीनच्या सुमारास गस्तीपथकाच्या वायरलेसवर हुपरी ते कंट्रोल करंट लोकेशनबाबतचा संदेश आला. त्यावर गिरी यांनी हुपरी ते कंट्रोल करंट लोकेशन इचलकरंजी येथे आहे, असा संदेश दिला. दर तासाला येणारा हा मेसेज हा जिल्ह्यात रात्री गस्त घालणाऱ्या सर्व पथकांचे सध्याचे लोकेशन जाणून घेण्यासाठी होता... वाहनात बसविण्यात आलेल्या जीपीएस सिस्टिमद्वारे त्याची खात्री कंट्रोल रूमकडून केली जात होती. सर्व गस्तीपथकांवरील हा डिजिटल वॉच कसा ठेवतात, हे आम्हाला समजले...

मोकाट फिरणारे धूम पळाले...

मुख्य चौकातून... सुनसान गल्लीबोळातून गस्तीपथक कबनूर चौकात मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास दाखल झाले. येथे पथकाने नाकाबंदी केली. चौकातून जाणाऱ्या ट्रकचालकाला थांबवून तपासणी केली... माहिती घेतली... अवजड वाहनातून चोरीच्या मालाची वाहतूक अगर तस्करीचा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी ही वाहन तपासणी... दरम्यान, एका मोपेडवरून तीन तरुण आले... पोलिस गाडी पाहताच पकडतील या भीतीने समोरच्या एका छोट्या गल्लीत मोपेड वळवून धूम ठोकली... पोलिस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधून अतिरिक्त कुमक मागून घेतली आणि रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली...

सुनसान भाग

तेथून पथकाने कुरुंदवाड पोलिस ठाण्याला भेट दिली. साडेतीनच्या सुमारास पथकाने पाच मैल भाग, कर्नाटकातील बोरगावमार्गे जंगमवाडी असा प्रवास सुरू झाला. निर्मनुष्य सुनसान रस्त्यावरून ही पायपीट कशासाठी असा प्रश्न मनात आला... पण, अशा रस्त्यावर पोलिसांची गस्त राहिल्याने वाटमारीसारख्या प्रकारांना आळा घालता येतो, हे स्पष्टपणे दिसले...

नव्वद किलोमीटर प्रवास...

तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास करून गस्तीपथक हुपरीत दाखल झाले. येथे महत्त्वाच्या ठिकाणांवर नजर टाकून सव्वापाचच्या सुमारास गस्त संपली. रात्रीची गस्त पोलिस डोळ्यांत तेल घालून कशी करतात, हे प्रत्यक्ष अनुभवलं. अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावरील कामाचा ताणही आम्ही जाणला. या गस्तीला सहायक पोलिस निरीक्षक गिरी यांना पोलिस हवालदार उत्तम सावरतकर, शंकर काशीद यांच्यासह उपनिरीक्षक जी. के. खराडे, विजय मस्कर, पोलिस हवालदार एस. एस. सावंत, अल्पेश पोटपुले, एकनाथ भांगरे, पोलिस नाईक प्रभाकर कांबळे आणि सहायक फौजदार एस. एस. सावंत यांची साथ मिळाली.

एटीएम, पुतळे आणि सायलेन्सरवर लक्ष

हद्दीतील एटीएम सेंटर, पुतळे, तेथील सुरक्षारक्षक, सुरक्षाव्यवस्था यावरही गस्तीपथकाची करडी नजर होती. आवश्यक तेथे पुतळे आणि एटीएम सेंटरची तपासणी करीत आम्ही पुढे निघालो... गल्लीबोळासह उच्चभ्रू वस्तीत रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांचे सायलेन्सरही हात लावून पाहिले जात होते. या मागचं कारण काय? विचारले... ‘वाहनांचे सायलेन्सर गरम असेल तर नुकतेच त्या गाडीवरून कोणीतरी आले आहे. व्यक्ती कोण? हे तपासून घेता यावे यातून संभाव्य गैरप्रकाराला आळा घालता यावा. यासाठी ही तपासणी’ असे त्यांनी सांगितले...

गुन्हेगारांची तपासणी

पुढे हद्दीतील घरफोडी... दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील संशयितांच्या घरी जाऊन ते घरात आहेत की नाहीत, याची तपासणीही केली...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com