प्रसादचक्र गतिमान करू पाहणारं नीतिशास्त्र

जगात दुष्टचक्र आणि प्रसादचक्र अशी दोन्ही स्व-वर्धक चक्र सुरु असतात. चांगल्यातून चांगलं घडत जाण्याच्या साखळीला म्हणजेच प्रसादचक्राला चालना देऊ पाहणारा नवा विचार राजीव साने यांनी मांडला.
rajiv sane spurtivadi nitishastra book
rajiv sane spurtivadi nitishastra booksakal

जगात दुष्टचक्र आणि प्रसादचक्र अशी दोन्ही स्व-वर्धक चक्र सुरु असतात. चांगल्यातून चांगलं घडत जाण्याच्या साखळीला म्हणजेच प्रसादचक्राला चालना देऊ पाहणारा नवा विचार राजीव साने यांनी मांडला असून त्यांचं ‘स्फूर्तिवादी नीतिशास्त्र’ हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशना’तर्फे प्रकाशित झालं आहे. ‘काय करू नका’ यापेक्षा ‘काय करा’ हे सांगणाऱ्या नीतिशास्त्रावरील या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीनं केलेली बातचीत..

प्रश्न - ‘युगांतर’ हे पुस्तक तुम्ही लिहिलंत, त्याकाळी खासगीकरण, विनियंत्रण, जागतिकीकरण या बदलांकडं संकट म्हणूनच पहिलं जात होतं; परंतु तुम्ही कामगारक्षेत्रात काम करीत असूनही ही संकटं नसून संधी आहे, याचं अर्थशास्त्र मांडलंत. त्यात अहिंसा-समृद्धी-न्याय हे नैतिक स्वरूपाचे त्रिकूटही आले होते.

उत्तर - पण त्या त्रिकुटामागचं तत्त्वज्ञान तशा परिभाषेत मांडण्यासाठी ‘युगांतर’मध्ये जागा नव्हती. आताचं पुस्तक मी तत्त्वज्ञानाच्या रिंगणात उतरून लिहिलं आहे. कामगार चळवळ व विधायक प्रस्ताव बनवणारं ‘ऑप्शन पॉझिटिव्ह’ या सक्रिय कार्यातून बाजूला होऊन पूर्ण वेळ वैचारिकतेलाच द्यायचा निर्णय घेतल्यानंतर वाईत मे. पुं. रेगे सर व श्रीनिवास दीक्षितसर यांच्याकडं तत्त्वज्ञान शिकलो. त्याचं एक फलित म्हणजे कर्तेपण न गमावता आत्मिकसाधना शक्य आहे हे सांगणारं ‘नवपार्थ हृद्‍गत’ हे पुस्तक.

या प्रवासात नीतिमीमांसेकडं वळावं असं का वाटलं?

- नीतिशास्त्रच मोक्याच्या ठिकाणी आहे. माणूस जगातच असतो; पण जगाचा नसतो. म्हणजेच माणसाचा कारणपरत्वे या जगात अंतर्भाव असतो आणि प्रयोजनाद्वारा तो जग ओलांडतही असतो. हे मूलभूत उभयांगित्वच नीतिशास्त्र निर्माण करतं. मानसशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र हे विषय आणि नीतिशास्त्र यात सामायिक अंश असतो. त्यामुळेही नीतिशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे.

सध्याच्या भारतातील राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळं हे लिहायला तुम्ही उद्युक्त झालात का?

- सध्याच्या काळात या विचाराची नितांत गरज आहे, हे मला जाणवतंय. सध्या आपल्याकडचं विचारविश्व अवरुद्ध झालं आहे. जणू गोठलं आहे. असं झालं तर बदल कसे होणार? सार्वजनिक चर्चाविश्वात जो काही कलगीतुरा चालू आहे, त्यात विधायकता कुठंच दिसत नाही. विशेषतः भारतातील विचारविश्वाला २०१४ मध्ये मोठा अपघात होऊन फ्रॅक्चर झाले. प्लॅस्टर बसल्यामुळं नॉर्मल हालचाली अधिकाधिक अशक्य होत गेल्या.

हाडातलं फ्रॅक्चर निसर्गतः भरून येतं; पण हाडवैर नवनव्या जोमानं स्वतःला टिकवून ठेवतं. दोन्ही बाजूंना ‘समन्वय’ म्हणजे ‘पराभव’च वाटू लागतो. सध्या तसं झालं आहे. त्यामुळं विज्ञानाप्रमाणंच मानव्यविद्या शाखेतही ज्या पॅरेडाईम शिफ्टची गरज आहे ती भागत नाही. पॅराडाइम शिफ्टसाठी जो खुला आणि ‘एकमेकांच्या म्हणण्यात तथ्यांशही असेल’ अशा भावनेने ‘ऐकून घेणारा’ संवाद असू शकला असता, तो होऊ शकत नाहीये.

विद्यापीठांत उपलब्ध नीतिशास्त्रं शिकविली जातात. पण नीतिशास्त्रांत नवशोधन होत नाही. राजकारणाचं सांस्कृतिक अवमूल्यन आपल्याला नको आहे. जास्त मानवीय व सुगुणसंपन्न असलेलं सार्वजनिक जीवन हवे आहे. व्यक्तीचे विविध सद्गुण ज्यात जोपासले जातील, असा सभ्य-समाज हवा आहे. त्यासाठी लागणाऱ्या वैचारिक समृद्धीची वानवा निर्माण झाली आहे. ती पुन्हा मिळवायला हवी.

युरोपातील प्रबोधनातून एक वैचारिक शिदोरी आपल्याला मिळाली आहे, असे वाटत होते...

- दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप अंतर्मुख झाला. प्रबोधनयुगाचे आदर्श का फसले, याचा शोध घेतला जाऊ लागला. त्या आदर्शांमध्ये मानवाने स्वयंनियंतात्व (ऑटोनॉमी), उत्तरदायित्व (रिस्पॉन्सिबिलिटी) आणि प्रगल्भता (मॅच्युरिटी) विवेकाद्वारे कमवायची आहे, असे अपेक्षित होते. ते का घडले नाही, या प्रश्नांचा शोध युरोपात घेतला जाऊ लागला. घनघोर विचारमंथन सुरु झाले. त्यातले निराशावादी मानू लागले की, मानव सत्तापिपासू व भोगवादीच रहाणार आणि जीवनाची निरर्थकता गोंजारत रहाणार.

उलट आशावादी गट, मानवी संबंध, संवाद, संस्थात्मक रचना, संघर्ष-विधायकता याद्वारे मानव्याची घसरण थांबू शकेल व यासाठी नीतिशास्त्राच्या फेररचना शोधू लागला. मी सत्संगतीमुळे आशावादी गटात टिकून राहिलो. मी एकीकडे चळवळींना मदत करत असतानाच सैद्धान्तिक वादविवादात भाग घेत व अभ्यास करत राहिलो. यामुळे मला अशा गोष्टी कळल्या की ज्यांची भारतात अजून चर्चाही सुरू झाली नाही. आत्ताचा हमरीतुमरीचा आवेग ओसरला की कदाचित सैद्धातिक चर्चा खुल्या व मित्रत्वाच्या वातावरणात सुरु होतील.

अशा काळासाठी एक साधन म्हणून उपयोगी ठरावे, यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे. त्यात आशावादी पाश्चात्य व पूरक भारतीय अशा परंपरांचा मिलाफ घडविणारे आणि मला सुचलेले नीतिशास्त्र या पुस्तकात आहे. ‘हे तरी’ बरोबर नाही, अन्यथा ‘ते तरी’ अशी एकमेकांना वगळणारी भूमिका न घेता द्वंद्वात्मक इष्टतमीकरणावर (optimization) आधारित समन्वयाची व पुढे काम करण्यासाठी खुली असलेली ही मांडणी आहे. कोणाला तरी ‘पापी’ ठरविण्याऐवजी ‘पुण्यप्रद’ काय ठरू शकेल, याचा शोध आहे व तो पुढं चालावा यासाठीच्या शक्यताही दिलेल्या आहेत.

नीतितत्त्वे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करण्यास पुरेशी ठरतील का? नीतिशास्त्राच्या कालसापेक्षतेविषयी काय सांगाल?

- सर्व अंगांना स्पर्श या प्रश्नासाठी मी मांडलेले आठ-पुरुषार्थ म्हणजेच सार्थक-साधना समजावून घ्याव्या लागतील. त्याआधी नीतिशास्त्रांतले ताण कळावेत यासाठी महत्त्वाच्या प्रवाहांची ओळख करून दिली आहे. व्यक्तीच कर्ता असते. एकदा ‘घटक आणि संघात’ ही कोटी समजून घेतली की व्यष्टीय(मायक्रो) आणि समष्टीय(मॅक्रो) पातळ्या जोडत जाता येतं. कालसापेक्षता ही नीतिशास्त्राला सबब म्हणून वापरता येत नाही. मानवी प्रश्न आणि नीतितत्त्वे यांचा उद्भव जरी कालसापेक्ष असला तरी त्या त्या वेळच्या कृतींबाबतचे निवाडे कालनिरपेक्षच असतात.

स्फूर्तिवादी या शब्दात तुम्हाला काय अभिप्रेत आहे?

- ‘काय करू नका’ हेच नीतिशास्त्रात सांगितलं जातं. ‘काय करा’ हे सांगणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. उदाहरणार्थ समृद्धी हेही नीतिमूल्य आहे आणि ते अंगीकारणं हे स्वतःसाठी आणि देशासाठीही माझं कर्तव्य आहे, हा विचार समजून घ्यायला हवा. साधनात होते ती प्रगती आणि साध्यांत होते ती उन्नती (नैतिक,आत्मिक). जसं नुसतीच प्रगती समाधान देऊ शकत नाही, तसं एखादी उन्नती शक्य होण्यासाठी आवश्यक ती प्रगती व्हावीच लागते. उन्नती पुरेशी नाही म्हणून प्रगतीच रोखा, असं करणं योग्यही नाही आणि शक्यही नाही. अधिकाधिक प्रसाद-विकल्प कसे खुले होतील, याचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न आहे.

तुमच्या सर्व मांडणीत `समता` कुठेच दिसत नाही...

- समता खरोखरच अवतरली तर मला आवडेलच. विषमता वाईटच. परंतु समता हे नीतिमूल्य नव्हे. त्याला कोणतेही तार्किक प्रामाण्य नाही. समता लादणं हे तर अतिशय घातक आहे. समतेच्या नावानं जगात प्रचंड हिंसक प्रकार झालेले आहेत. याविषयीची माझी भूमिका मी या पुस्तकात स्वतंत्र परिशिष्टात मांडली आहेच.

सर्वोन्नतीला तुम्ही `प्रवाही’ असे विशेषण लावता, ते का?

- व्यक्तीच्या जन्माबरोबरच, तिचे स्थान कायमचे ठरून जाणं हे ‘घनरूप’ आहे. प्रवाही म्हणजे द्रवरूप व हलती. त्याप्रमाणे खालून वर, वरून खाली; एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात जाणारी अशी सर्वोन्नती. ‘प्रवाही’ या शब्दामुळे व्यक्तीचे समाजात अधोर्ध्व अभिसरण (व्हर्टिकल मोबिलिटी) आणि विविध क्षेत्रातले अभिसरण होत राहील.अर्थात काय योग्य हे सांगताना ते जमेल का, हा प्रश्न बाजूला ठेवावा लागतो.

विज्ञानाच्या प्रकाशात आधुनिकतेकडे वाटचाल सुरू झाली, त्या प्रबोधनप्रकल्पाविषयी तुम्हाला आस्था वाटते, असं जाणवतं. त्यातील वैगुण्ये दुरुस्त होत असतात, असं तुमचं म्हणणं आहे. पर्यावरणाच्या बाबतीतही माणसानं ‘दुरुस्ती’ केली, असं तुमचं म्हणणं दिसतं. पण ही ‘दुरुस्ती’ केवळ वरवरची आहे, अपुरी आहे, अशी टीका जगातले अनेक पर्यावरणतज्ज्ञ करीत आहेत...

- ‘स्वतः विचार करण्याची हिम्मत ठेवा. प्रत्येकाने अधिक स्वयंनियंत्रित, उत्तरदायी आणि प्रगल्भ होत राहिले पाहिजे,’ अशी प्रबोधनप्रकल्पाची घोषणा आहे. यात उणीवा आहेत म्हणून तर हा सतत चालू राहणारा प्रकल्प आहे. कशातही वैगुण्ये येतात व ती काढून टाकावी लागतात. मानवाला सुफल मिळवून देणं हे तंत्राचं कर्तव्य आहे. अगोदर न अपेक्षिलेली दुष्फले उद्भवली तर तंत्रात अशी सुधारणा करावी लागते की अवांच्छित दुष्फले येणार नाहीत, असा माझा मानवकेंद्री पर्यावरणवाद आहे. जे लोक याला उथळ मानतात, त्यांच्यात अशी धारणा असते की निसर्गाची काहीएक (सम्यक बनण्याची) इच्छा आहे व तीही पुरवणं हे मानवाचं कर्तव्य आहे. पण ही इच्छा त्यांना कोठून समजते हे कळायला मार्ग नाही. मानवाला लाभ होत असेल तर निसर्गाला हानी होणारच, असं ते धरून चालतात. पण लाभ-हानी ही कोटीच न-नैसर्गिक आहे.

एकच एक मानवी नीतिशास्त्र असणारच नाही काय?

- एकच एक ही अपेक्षा अवघड आहे. पण नीतिशास्त्रीय वादविवाद आणि इतिहासात घडणारे बदल पाहता नीतिशास्त्रांचा प्रवास हळूहळू एकवटण्याकडे चालू आहे. अधिकच फाकत जाण्याकडे नाही. दुसरं असं की, तडजोडी करताना, कोणती तडजोड शक्यतो कमी कर्ष(स्ट्रेस)शीलतेची मिळवणे हे जवळच्या नीतिशास्त्रांमुळं सोपं होतं.

नीतीची चाडच नसेल तर शास्त्र बांधून काय उपयोग?

- हा प्रश्न कोणत्याही शास्त्राला विचारता येईल. ज्याला शास्त्रकारिता मागे पडून चालणार नाही, असं वाटतं, त्याला लोकात चाड असेल व ती वाढत जाईल अशी श्रद्धा ठेवावीच लागेल.

तुम्ही या पुस्तकात वाचकाला थेट तुमच्या सिद्धान्तांकडे नेता, त्याची पार्श्वभूमी फारशी विशद करीत नाही.

- वैचारिक इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. पण त्या इतिहासात फारसे न अडकता मी स्वतः विचार करणारा माणूस आहे. नीतिशास्त्र म्हणजे काय? कोणती नीतिशास्त्रे महत्त्वाची? आणि ती असताना हे नवे लिहिण्याची का गरज पडली? हे सगळे सांगत गेले असता हा मोठा ग्रंथ बनेल. तो सिद्ध करण्याइतकी शक्ती आणि वेळ माझ्याकडे नाही. प्रस्तुत पुस्तक म्हणजे त्या न लिहिलेल्या ग्रंथाचा सारांश-मात्र आहे. त्यामुळे विविध वाचकांना वेगवेगळ्या ठिकाणी अडखळायला होईल. पण अनेकदा तसेच पुढे वाचत गेले तरी आधी न कळलेलं कळतं. माझ्यासह इतरांशी संवाद करूनही तुम्ही हे अडथळे पार करू शकता. आपण सगळेच कमीअधिक प्रमाणात अंशज्ञच असतो. तरीही निर्णय घेऊन पुढं जावंच लागतं. तरीही मी एक आश्वासन देतो की, हे पुस्तक आत्ताच प्रकाशित होणे, (खरेतर पूर्वीच यायला हवे होते) याला कळीचे महत्त्व होते, हे आपणास हळूहळू लक्षात येत जाईल व आपण माझ्या सारांशकेंद्री ‘मती’ला क्षमा कराल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com