सुटी बनवू आनंददायी (राजीव तांबे)

राजीव तांबे rajcopper@gmail.com
रविवार, 6 मे 2018

सुटी हा विषय मुलांसाठी जितका आनंदाचा तितकाच पालकांसाठी चिंतेचा. सुटीत मिळणारा भरपूर वेळ सार्थकी कसा लावायचा, मुलांना गुंतवून कसं ठेवायचं, सतत नवीन काय करायचं असे अनेक प्रश्‍न पालकांना पडतात. मात्र, अगदी छोट्याछोट्या गोष्टींतून सुटी आनंददायी बनवता येते. ही सुटी आनंददायी कशी बनवायची, मुलांचं शाळेशी आणि पालकांशी असलेलं नातं घट्ट कसं करायचं आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

सुटी हा विषय मुलांसाठी जितका आनंदाचा तितकाच पालकांसाठी चिंतेचा. सुटीत मिळणारा भरपूर वेळ सार्थकी कसा लावायचा, मुलांना गुंतवून कसं ठेवायचं, सतत नवीन काय करायचं असे अनेक प्रश्‍न पालकांना पडतात. मात्र, अगदी छोट्याछोट्या गोष्टींतून सुटी आनंददायी बनवता येते. ही सुटी आनंददायी कशी बनवायची, मुलांचं शाळेशी आणि पालकांशी असलेलं नातं घट्ट कसं करायचं आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन.

मे हा एकमेव महिना आहे, ज्याची चाहूल लागताच सर्वच मुलांच्या मनात आनंदाची कारंजी उसळू लागतात. अर्थात त्यांच्या मनात आनंदाच्या लहरी पसरत असताना सर्व पालकांना मात्र आनंद होतच असतो, असं काही नाही. किंबहुना "आता हा एक महिना मुलांना कसं एंगेज ठेवावं,' याचा चिडचिड भुंगा अनेक पालकांच्या मागं लागतो. मग असे पालक मुलांना निरनिराळ्या शिबिरांना, कॅंप्सना, सहलींना, ट्रेकिंगला किंवा सक्तीनं काही तरी नवीन शिकायला तरी पाठवतात. हल्ली "संस्कारांचं आउटसोर्सिंग' सुरू झाल्यानं मुलांना संस्कार वर्गातही ढकलतात.

सुटीत मुलांना "एंगेज' ठेवण्यात गैर काहीच नाही; पण पालक म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं आवश्‍यक आहे. मुलांसाठी कुठल्याही गोष्टीची निवड करण्याअगोदर त्याची सखोल चौकशी तर करायला हवीच; पण त्याआधी आपल्या मुलाचा कल लक्षात घेणं आणि त्याचा आत्मसन्मान जपणंही तेवढंच गरजेचं आहे.
अगदी नेहमीचं उदाहरण. लहानपणी आवड होती; पण ऐपत नसल्यानं तबला शिकायचे राहून गेलेले पालक मोठेपणी दोन गोष्टी करतात. एक, ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा टेबलावर बोटांनी टकामटूकूम ठेका धरत असतात. दोन, आपलं मूल जरा मोठं झालं, की "त्यानं तबला शिकलाच पाहिजे.. त्यानं तबला शिकलाच पाहिजे...' असा ठेका घरी तोंडानं धरत असतात. खूप वेळा मुलाला मनापासून शिकायचं असते गिटार; पण केवळ "ठेके'दार पिताश्रींच्या इच्छेखातर त्याला सुटीत तबला बडवत बसावं लागतं. अशा वेळी मुलांचा आत्मसन्मान दुखावला गेल्यानं मुलं कायमची व्यथित होतात.

"आपल्याला लहानपणी जे जे मिळालं नाही ते ते आता आपल्या मुलाला मिळालं पाहिजे, कारण आता आपली ऐपत आहे,' अशी मानसिकता काही पालकांची असते. अशी धारणा असणाऱ्या पालाकांनी मुलांबाबत निर्णय घेताना "आपण नकळत आपल्या मुलांवर आपल्या अपुऱ्या इच्छा लादत तर नाही ना? सक्ती करत नाही ना?' याचा शंभर वेळा विचार करायला हवा. नाहीतर मुलांच्या आनंदावर विरजण तर पडतंच; पण मुलं आणि पालक यांच्यात एक कायमची दरी निर्माण होते.

अनौपचारिक, सहज शिक्षणासाठी
मुलांना इतकी मोठी सुटी कशासाठी असते? केवळ उन्हाळा आहे किंवा पावसाळा आहे म्हणून नसते. मुलांना शाळेत मिळतं ते औपचारिक शिक्षण. मात्र, जे शिक्षण मुलांना शाळेबाहेर मिळतं; पण त्याचं प्रमाणपत्र मिळत नाही ते अनौपचारिक शिक्षण आणि मुलं जे स्वत:हून शिकत असतात, आपल्या चुकांतून शिकत असतात ते सहज शिक्षण.

अकरा महिने सक्तीचं औपचारिक शिक्षण घेतल्यानं ही लहान मुलं पकून आणि थकून गेलेली असतात. त्यांना स्वत:हून शिकण्याची संधी हवी असते. आपल्या क्षमतांचा किंवा कौशल्यांचा आवाका समजून घेण्यासाठी त्यांना वेळ हवा असतो. जर कुणा मुलावर सतत बाराही महिने औपचारिक शिक्षणाचा मारा केला, तर त्याची सहज शिकण्याची ऊर्मीच नष्ट होईल आणि त्याचं आज्ञा पाळणाऱ्या यंत्रमानवात रूपांतर होईल.

"आता सुटीत काय करायचं आणि काय नाही, हे मुलांना कुठं कळतंय? त्यांच्या काहीतरी अचाटच कल्पना असतात. आम्हाला समजतं त्यांनी काय करायला पाहिजे ते,' असा भ्रम अनेक पालकांना असतो आणि असे भ्रमिष्ट पालक ही मुलांसाठी एक आपत्तीच असते. कारण असे पालक मुलांना चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वत:हून काही शोधण्याची संधीच देत नाहीत. पालकांच्या इशाऱ्यावर नाचतानाचता मुलं सुटीतला आनंद आणि स्वछंद हरवून बसतात. हे टाळण्यासाठी पालकांना आपलं मन मोठं करावं लागतं. मुलांचं ऐकून घ्यावं लागतं (ऐकावं लागतं असं नव्हे) आणि मुलांच्या मदतीनं त्यातून मार्गही काढावा लागतो. तेव्हा आणि तेव्हाच ही सुटी मुलांप्रमाणंच पालकांसाठीही आनंददायी होते. कारण मुलांवर निरपेक्ष प्रेम करणं हेच सुजाण पालकत्व आहे. या प्रेमात सहयोग आणि सहवासही आहे. ही सुटी मुलांच्या सहज शिक्षणाला वाव मिळावा म्हणून आहे. मुलांना स्वत:हून शिकत असताना चुका करण्याची संधी मिळावी आणि चुकांतून शिकण्याची हिंमत मिळावी यासाठी आहे.

नवमाध्यमांच्या ओळखीची संधी
खरं म्हणजे सुटी ही एक संधी आहे मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून देण्याची, त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करण्याची! पण सक्तीनं शिकवण्याची नव्हे! शाळा सुरू असताना जे जे करणं शक्‍य नाही ते ते करण्यासाठीच तर असते सुटी. शाळेतला राहिलेला अभ्यास पुरा करण्यासाठी नव्हे, तर स्वत:हून शिकण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी असते सुटी.
मुलांनी स्वत:हून शिकण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी त्यांना पालकांकडून तीन गोष्टींची मदत अपेक्षित असते.
- मुलं काही नवीन गोष्ट करत असताना किंवा स्वत:हून काही शिकत असताना मुलांना पालकांच्या "सहभागा'ची नव्हे, तर "सहवासा'ची अपेक्षा असते, हे लक्षात ठेवा.
- "तू हे करू नकोस आणि ते करू नकोस. तुला हे येणार नाही आणि तुला हे जमणार नाही,' ही वाक्‍यं मेहरबानी करून पालकांनी मुलांना ऐकवू नयेत. त्यापेक्षा "तुला कसं जमू शकेल, त्यासाठी मी काय मदत करू शकीन,' अशी सकारात्मक भूमिका घ्यावी.
- स्वत:हून शिकण्याचा प्रयत्न करत असताना मुलांच्या चुका होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी मुलाची चूक त्याला वारंवार न दाखवता आणि मुलाला (फार मौलिक) सल्ले न देता मुलावर विश्वास टाकला, तर त्यातूनच त्याला चुकातून शिकण्याची हिंमत मिळते.
या तीन गोष्टी जरी पालकांनी पाळल्या, तरी मुलांमध्ये आणि स्वत:मध्ये होणारा बदल हा विस्मयचकित करणारा असेल. मग पुढच्या "आनंद सुटी'ची वाट फक्त मुलंच नाही, तर अख्खं घरच पाहू लागेल. तुम्हाला काय वाटतं?

----------------------------------------------------------------------------------
"आपण नकळत आपल्या मुलांवर आपल्या अपुऱ्या इच्छा लादत तर नाही ना? सक्ती करत नाही ना?' याचा पालकांनी शंभर वेळा विचार करायला हवा. अन्यथा मुलांच्या आनंदावर विरजण तर पडतंच; पण मुलं आणि पालक यांच्यात एक कायमची दरी निर्माण होते.
----------------------------------------------------------------------------------
सुटी ही मुलांच्या सहज शिक्षणाला वाव मिळावा म्हणून असते. मुलांना स्वत:हून शिकत असताना चुका करण्याची संधी मिळावी आणि चुकांतून शिकण्याची हिंमत मिळावी यासाठी असते.
----------------------------------------------------------------------------------
शाळा सुरू असताना जे करणं शक्‍य नाही ते करण्यासाठीच सुटी असते. शाळेतला राहिलेला अभ्यास पुरा करण्यासाठी नव्हे, तर स्वत:हून शिकण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी ती महत्त्वाची.
----------------------------------------------------------------------------------
सुटीमध्ये मुलांसाठी कुठल्याही गोष्टीची निवड करण्याआधी त्याची सखोल चौकशी तर करायला हवीच; पण त्याआधी आपल्या मुलाचा कल लक्षात घेणं आणि त्याचा आत्मसन्मान जपणंही तेवढंच गरजेचं आहे.
----------------------------------------------------------------------------------

Web Title: rajiv tambe write school article in saptarang