चालण्याची सत्त्वधारा जोपासणारा कवी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yatri Book

नांदेड येथील ज्येष्ठ गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी ह्यांचं नाव रसिकांना सुपरिचित आहे. त्यांचा ‘यात्री’ हा गझल संग्रह नुकताच प्रकाशित झालाय.

चालण्याची सत्त्वधारा जोपासणारा कवी !

- रमण रणदिवे

नांदेड येथील ज्येष्ठ गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी ह्यांचं नाव रसिकांना सुपरिचित आहे. त्यांचा ‘यात्री’ हा गझल संग्रह नुकताच प्रकाशित झालाय. या संग्रहात गीतं, गझला, मुक्तछंद आदी प्रकारांतील एकूण ६७ रचना आहेत. प्रफुल्ल कुलकर्णी ८४-८५ पासून कविता-लेखन करताहेत. १९८६ पासून मात्र ते जाणीवपूर्वक गझल लेखनाकडे वळले. याखेरीज त्यांनी दोन एकांकिकांचं लेखन, एका नाटकाचं संवाद लेखन व दोन नाटकांसाठी गीतलेखनही केलं आहे, तरीही त्यांची खरी ओळख गझलकार म्हणूनच रसिकमान्य आहे.

‘यात्री’ या गीत-गझल संग्रहातील रचना दर्जेदार आहेत. सुमंदारमाला, उद्धव, आनंदकंद, अष्टाक्षरी आदी छंदांत त्यांनी लिहिलं आहे. बव्हंशी रचना निर्दोष आहेत.

काही रचना छोट्या वृत्तातही आहेत. कवितेचं मिताक्षरी वळण कवीच्या दीर्घ चिंतनाचा परीघ विस्तारत नेतं. साध्यासोप्या भाषेतील या कविता वाचकांच्या मनात लीलया संप्रेषित होतात. गझल या काव्यप्रकाराला उर्दू साहित्याची अब्रू मानलं जातं. तिची मूळ प्रकृती इष्कीया आहे. मानवी जीवनातील प्रेम या संज्ञेची विश्वव्यापकता, सखोलता सूत्ररूपात अभिव्यक्त करण्याची असामान्य क्षमता गझलमधील शेरात असते. शेर म्हणजे जीवनानुभवाचे छोटे छोटे तुकडे असतात. अशा बहुरंगी शेरांची सुगंधित माळ म्हणजे गझल असते. या निकषावर कुलकर्णींची गझल हमखास उतरते.

उदा. पुढील ओळी बघा

माझ्या घरात नसते, तुमच्या घरात नसते

अंधार पेटताना ही चांदरात नसते

किंवा

प्रेम अन् ओठी उमाळा पाहिला

काळ थोडासा निराळा पाहिला

किंवा

कागदी विमाने आणि कागदीच नावा

कागदी प्रवासी जाती कागदाच्या गावा

संग्रहातील गीत गझलांना शीर्षकं नाहीत. पृष्ठ ३२, ३५, ६६, ७७ यावरील रचनाही सुरेख आहेत. या रचना प्रेम, जीवनविषयक चिंतन, निसर्ग-लावण्य, त्याचं रौर्द्र रूप, ऊन-सावली तथा एकूणच निसर्गाचं केलेलं मानवीकरण, जीवनासक्ती, जीवनाची अशाश्वतता इत्यादी विषयांवर कवीने समरसून लिहिलं आहे.

हा अंधारयुगाचा यात्री, रात्री जोगवा मागत फिरतो. मुखात ‘गायत्री’ येताच त्याच्या वेदना थरथरतात. डोळ्यात ओल्या सावल्या दाटतात. त्याच्या हातात सत्पात्री दान पडल्यावर अश्रूत समीधा भिजतात. पाऊलवाटा थिजतात. काळोख कवीच्या जगण्याशी झिम्मा खेळतो, कशासाठी? तर नव्याने जन्म घेण्यासाठी.

कुलकर्णींच्या गझलेला जीवनाचा अंतर्नाद सतत साद घालतो. कवी प्रेयसीला म्हणतो, ‘‘तू माझ्या स्वप्नांचा संवाद आहेस. माझ्याकडे गुंजन करीत येणारे सूर, हे सूर नाहीतच. त्या तर तुझ्याच सुखद आठवणी आहेत.’’

अनामिकाची सांध्यवंदना कवितेचा जीव सोलून काढते. अन् ती असंही म्हणते

‘‘कुणाकुणाच्या भाळावर हे जीवघेणे दुःख रेखू?

उजाडण्याच्या सीमेवरच नेमकी अंधाराला नीज येते.

तेव्हा एक हुंदका आक्रोशाचे बीज पेरून जातो.’’

कुलकर्णींच्या गीत-गझलांचं संक्षिप्त स्वरूप असं आहे. कविता लिहिण्याआधी किंवा या घटितामागे कवीच्या अंतर्मनात बरंच काही साचलेलं असतं. प्रतिमा, प्रतीकांचा सुयोग्य वापर केल्यामुळे आशयघनता वाढते. आयुष्याने पदरात टाकलेल्या अनुभूतीला सत्यता लाभली की अर्थघनता दृग्गोचर होते.

शेवटी लेखन म्हणजे माणसाने माणसाचा घेतलेला डोळस शोध असतो. आयुष्याला भिडावे लागतं तेव्हा कुठे कविता प्राणाच्या पोहऱ्यात गवसते.

कवितेने घराचं गोकूळ व्हावं, अपूर्णास पूर्णत्व मिळावं, अशी कवीची मनोकामना आहे. कुलकर्णी म्हणूनच चालण्याची सत्त्वधारा जोपासत कलायात्रेला निघाले आहेत.

पुस्तकाचं नाव : यात्री (गीत-गझल संग्रह)

कवी : प्रफुल्ल कुलकर्णी

प्रकाशक : संगत प्रकाशन, नांदेड

(संपर्क क्रमांक : ८१४९८२६४५९)

पृष्ठं : ८०

मूल्य : १५० रु.

टॅग्स :Walkingpoetsaptarang