

Artistic Journey and Scraping Technique
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
रामेश्वर ब्रूटा वरवरच्या देखाव्यापलीकडे पाहत होते. त्यांच्या कलेची सुरुवात एक तांत्रिक प्रयोगाने झाली, तशीच अस्वस्थ करणाऱ्या दृश्यांनीही...
काही वेळा एखादे नवे तंत्र लक्षात येते ते काळजीपूर्वक, नियोजित संशोधनामुळे नव्हे, तर अगतिकतेतून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे. ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’मधील प्रदर्शनास जेमतेम चार-पाच दिवसच राहिले होते आणि रामेश्वर ब्रूटा यांचे एकही पेंटिंग तयार नव्हते. त्यांनी धडपड करायला सुरुवात केली. आधी रुपेरी रंग लावला, त्यावर निळा-काळा रंग चोपडला, त्या दाट थरांना चाकूच्या टोकाने खरवडण्याचा प्रयोग केला. रात्रभर ते काम करत होते. जाग आल्यावर त्यांना असा चमत्कारिक भास झाला, की ते स्वतःच्या शरीरावरच ओरखडे काढत आहेत. हा अनुभव त्यांच्या जाणिवेचा भाग बनला आणि त्याबरोबर हे कलातंत्रसुद्धा.
ब्रूटा यांची सर्वांत जुनी आठवण आहे ती त्यांच्या ज्येष्ठ बंधूंची. ते चित्र काढत असताना ब्रूटा कौतुकाने पाहत असायचे. त्यांनाही तसेच काही तरी करावेसे वाटायचे. त्यांनी उपाय शोधला तो वाटी किंवा ताटली घेऊन अंगणातल्या भिंतीवर गोलाकार काढायचा आणि त्यावर चेहरा, केस आणि मुकुट रंगवण्याचा. अशी चित्रे काढण्याचा त्यांना नादच लागला. काही वेळा ते गृहपाठदेखील करायला विसरत. वर्गात शेवटच्या बाकावर बसून शिक्षकांची व्यंगचित्रे काढत स्वतःची करमणूक करून घेत. ‘आपण कलावंत होणार’ असा काही मोठा, महत्त्वाकांक्षी निर्णय त्यामागे नव्हता. त्यांना चित्रे काढायला आवडायचे इतकेच!
मोठेपणी त्यांनी सैन्यात किंवा पोलिसात जावे असा प्रयत्न होता. ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’ची प्रवेश परीक्षा ते उत्तीर्ण झाले, पण इतर उमेदवारांइतकी आपली तयारी झालेली नाही असे त्यांना वाटू लागले. कुटुंबातील मंडळींनी त्यांना कलाशिक्षणासाठी उत्तेजन दिले. हळूहळू त्यांना स्वतःतील कलाकार सापडत गेला. अर्थात शिक्षणात करावा लागणारा संघर्ष त्यांनाही चुकला नाही.
आज मात्र ब्रूटा त्यांच्या आगळ्या कलातंत्रामुळे नावाजले आहेत. रंगांची एकमेकांवर पुटे चढवायची आणि त्यातून खरवडून काढून तेज:पुंज चित्रे तयार करायची. त्यांच्या कलाकृती जगभर प्रदर्शित झाल्या आहेत. २०२४ मध्ये लंडनच्या बार्बीकन सेंटर आणि फ्रीझ (Frieze) येथे. त्याआधी २०१४-१५ मध्ये ‘किरण नादर म्युझियम ऑफ आर्ट’ येथे त्यांच्या कलाप्रवासाची पाच वर्षे दाखवली गेली. याशिवाय दिल्लीतील ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ आणि ‘पीबॉडी एसेक्स म्युझियम’, जर्मनीत ‘कुन्स्ट म्युझियम’ (डुसेलडॉर्फ) यांच्या संग्रहालयात त्यांच्या कलाकृती आहेत. हे महत्त्वाचे टप्पे त्यांनी गाठले खरे, पण हा प्रवास घाईत झाला नाही आणि सरळसोपाही नव्हता.
स्टुडिओबाहेरील निरीक्षणाचा प्रभाव ब्रूटा यांच्या कलेवर पडला आहे. बंगाली मार्केटमधील एक प्रसंग त्यांना अजून स्मरतो. श्रीमंत मंडळी हॉटेलात बसून मेजवानी झोडत आहेत आणि मजूर लोक रस्त्यावर उभे आहेत. सुखवस्तू जीवन आणि अभावग्रस्तता दोन्ही एकाच नगरात. एक कुटुंब हॉटेलात जाऊन उपभोग घेत आहे, तर दुसरे रस्त्यावर कसेबसे जगते आहे. त्यातून त्यांनी ‘एप’ ही मालिका तयार केली. त्यात मर्कटांसारख्या आकृती आहेत. दृश्य कॅनव्हासवर उतरेपर्यंत ते त्यांना कुरतडत होते.