

New Marathi Books
esakal
दुर्मीळ अक्षरधन
मराठीतील दुर्मीळ पुस्तकांचा परिचय करून देणारे ‘दुर्मीळ अक्षरधन’ हे अविनाश सहस्रबुद्धे यांचे पुस्तक म्हणजे, ग्रंथइतिहासाची माहिती देणारे संदर्भात्मक लेखन आहे. या पुस्तकात विविध दुर्मीळ ग्रंथांच्या परिचयाबरोबरच त्यांच्या प्रकाशनाचा इतिहास, लेखक, त्या काळातील मुद्रणव्यवस्था आणि मराठी वाङ्मयाच्या विकासातील त्यांचे योगदान या बाबींचा आढावा घेतला आहे. मराठीतील पहिल्या छापील पुस्तकांपासून कोश, व्याकरण, गद्यवाङ्मय आणि आरंभीच्या प्रकाशनपरंपरेपर्यंतचा प्रवासही लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. दुर्मीळ ग्रंथांचे जतन, पुनर्मुद्रण व भावी पिढ्यांपर्यंत त्यांचा वारसा पोहोचवण्याची आवश्यकताही या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली आहे.
प्रकाशन : वरदा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २८६, मूल्य : ३०० रु.
प्रा. दिलीप फडके यांनी १८३० ते १९१० या काळातील दुर्मीळ पुस्तकांचा धांडोळा त्यांच्या ‘पुस्तकानुभव’ या पुस्तकातून घेतला आहे. या एकाच पुस्तकातून वाचकांना ५० पुस्तकांची माहिती मिळते. सुमारे १०० वर्षांपूर्वी कोणत्या प्रकारची पुस्तके प्रकाशित होत होती हे जाणून घेणे वाचकांसाठी औत्सुक्याचे ठरणारे आहे. नीतिदर्पण, कुटुंबप्रवर्तननीति, विधवाविवाह, अबलोन्नतिलेखमाला.... यांसारख्या ग्रंथापासून मुंबईचे वर्णन, वक्तृत्वकलाविवेचन, विचारसाधन, शुश्रूषा, जपान, नशीब आणि उद्योग... अशा विविध विषयांवरच्या पुस्तकांचा समावेश फडके यांनी त्यांच्या नोंदींमध्ये केला आहे. जुन्या पिढीला विस्मरणात गेलेल्या पुस्तकांना या निमित्ताने उजाळा देता येईल, तर नव्या पिढीसाठी हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणारे आहे.
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १९२, मूल्य : ३०० रु.