रक्षण नको; पण बंधन आवरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan

दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचा सण घराघरात दिमाखाने साजरा झाला असेल. भावा-बहिणीच्या भेटीचा हा गोड सण.

रक्षण नको; पण बंधन आवरा

सण, उत्सव साजरे करायला मलाही खूप आवडतं; पण हा अमुक एक सण साजरा करून जर मी पितृसत्तेच्याच खुणा उमटवणार असेन तर तो कशा प्रकारे साजरा करावा, याचा विचार झालाच पाहिजे. मला काही मित्र माहिती आहेत, जे बहिणींनाही राखी बांधतात. हा बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव आहे. भावाला ‘महान’ करण्याचा नाही...

दोन दिवसांपूर्वी रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचा सण घराघरात दिमाखाने साजरा झाला असेल. भावा-बहिणीच्या भेटीचा हा गोड सण. सख्खे, चुलत, मावस भाऊ-बहीण या निमित्ताने भेटतात, गोडधोड खातात. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ ‘गिफ्ट’ देतो. छान आहे सगळं. हे छोटे छोटे निरुपद्रवी वाटणारे सण पितृसत्तेची नाळ मात्र मजबूत करत जातात; पण उलट कधी होतं? म्हणजे बहीण आपली काळजी घेते, म्हणून भाऊ तिला ओवाळतात, वगैरे? भाऊ का बहिणीचं रक्षण करणार? तो पुरुष आहे म्हणून? आणि कुणापासून? जगातील इतर पुरुषांपासून. पुरुषांना आपण का हक्क दिलाय आपलं संरक्षण करण्याचा? यात स्त्रिया स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत; समाजात परिस्थिती इतकी भयंकर आहे, की आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची गरज आहे आणि रक्षण करण्यास अपयशी ठरल्यास तो पुरुष म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाहीये, असं सगळंच अधोरेखित होतं.

आपल्याकडे अजूनही, अनेक ठिकाणी, भावाच्या शिक्षणासाठी बहिणीचं शिक्षण थांबवलं जातं. घरात दोन भिन्नलिंगी मुले असतील, तर त्यांना दोन भिन्न पद्धतीने ‘वागवण्यात’ येते. हा भाऊ, दिवस आणि रात्रीच्याही कुठल्याही वेळी, ‘‘आलोच दोन मिनटात’’ म्हणून घराबाहेर पडू शकतो आणि बहीण मात्र ‘योग्य कारण’ दिल्याशिवाय घरातून बाहेर पडू शकत नाही.

सण, उत्सव साजरे करायला मलाही खूप आवडतं; पण हा अमुक सण साजरा करून जर मी पितृसत्तेच्याच खुणा उमटवणारा असेल, तर तो साजरा करावा किंवा नाही, कशा प्रकारे साजरा करावा याचा विचार झालाच पाहिजे. मला काही मित्र माहिती आहेत, जे बहिणींनाही राखी बांधतात. त्यांनाही ओवाळतात. हा बहीण-भावाच्या नात्याचा उत्सव आहे. भावाला ‘महान’ करण्याचा नाही.

या निमित्ताने मला भावांवर असणाऱ्या दबावाबद्दलही बोलावंसं वाटतं. आपली शारीरिक, आर्थिक बाजू कशीही असली, तरी भाऊ म्हणून, पुरुष म्हणून सतत संरक्षकाच्या भूमिकेत उभं राहणं हे त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या बरं नाहीये. नाही करता आलं ‘रक्षण’ तर तो सततचा ‘नामर्द!’

या निमित्तानं ‘रक्षाबंधन’ चित्रपटाबद्दलही बोलावंसं वाटतंय, म्हणजे मी हा लेख लिहिते, तेव्हा चित्रपट अजून आलेला नाही, पण ‘ट्रेलर’ पाहून चार बहिणींसाठी हुंड्याची काळजी करणारा एक भाऊ यात दिसतो. तो कष्ट करून हुंडा जमवत राहतो. असे अनेक भाऊ आणि बाप आपल्या आसपास असतील. यात त्यांच्या कष्टांचं गौरवीकरण न करता, ते हुंडा प्रथेला विरोध का करत नाहीत, हे मला आजतागायत कळलेलं नाही. म्हणजे यात असा भाऊ किती महान हे म्हणताना, हुंडा अपरिहार्य आहे, असं आपण मानतो आहोत का?

भाऊ रक्षण करणार म्हणजे कोणापासून तर त्या चार, दहा पुरुषांपासून, जे आपापल्या बहिणीकडून हातावर कोपऱ्यापर्यंत राख्या बांधून आले आहेत आणि इतरांच्या बहिणीला छेडणार आहेत. आपल्या बहिणीवर बंधन घालणार आहे, त्यांना कुठे होतीस, काय करत होतीस, ‘त्याच्या’बरोबर काय करत होतीस? पासून तिने कुणाबरोबर आयुष्य काढायचं ठरवलंय, यावरही बंधन घालणार आहेत! म्हणून अनेकदा वाटतं, रक्षण नका करू आमचं; पण आमच्यावर बंधन न घालता थोडं स्वतःवर घालून घ्या. मुलींना छेडू नका. त्या नाही म्हणाल्या तर त्याचा अर्थ नाही असाच असतो, हे लक्षात घ्या. समोरची नाही म्हणाली, तर तिच्यावर ॲसिड फेकणे, तिला मारून टाकणे, असे प्रकार करू नका.

जाता जाता राखीपासून पळणाऱ्या मुलांबाबत आणि ‘मानलेले’ भाऊ-बहीण यांच्याबद्दल. आपल्याला कुणी आवडतं, त्याच्याशी लग्न किंवा गेलाबाजार प्रेमप्रकरण करण्याचीही इच्छा नसते; पण नुसता मित्र म्हणवला तर त्याच्याबरोबर वेळ घालवता येत नाही. कारण सगळे ‘त्याच’ नजरेने पाहत असतात. मग एक पटकन राखी बांधून त्या नजरांतून सुटका करून घ्यायचा प्रयत्न होतो. हे मला असंख्य वर्षांपासून हताश करत आलं आहे... सगळी नाती सुंदर असतात, बांधून ठेवून नातं फुलत नाही, अगदी राखी बांधूनही! नव्या काळात नवीन पद्धतीने सण साजरे करण्याबाबत विचार केलाच पाहिजे.

Web Title: Rasika Agashe Writes Raksha Bandhan Festival Celebration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..