बलिदानी बायका

मूल वाढवून मोठं करणं, म्हणजे ते म्हातारपणी आपली काळजी घेईल! त्याबरोबर येणारे आनंदाचे, प्रेमाचे क्षण आहेतच! हा एक साधा व्यवहार..
बलिदानी बायका

मूल वाढवून मोठं करणं, म्हणजे ते म्हातारपणी आपली काळजी घेईल! त्याबरोबर येणारे आनंदाचे, प्रेमाचे क्षण आहेतच! हा एक साधा व्यवहार आहे; पण त्याचे उदात्तीकरण करून, आपण जे पॅटर्न सेट करत जातो त्यामुळे किती बायकांना त्रासातून जावं लागत असेल याची कल्पना तरी केली आहे का?

अनेकदा असं म्हटलं जातं की बायकांच्या खऱ्या शत्रू या बायकाच असतात. कोण असतात या बायका? घराघरांत असणाऱ्या सासवा? सतत माहेरी येऊन राहणाऱ्या नणंदा? ऑफिसमध्ये पीरियडच्या त्रासाला न समजणाऱ्या सहकर्मचारी? आपला प्रश्न घेऊन गेला की आम्हीही हे केलंच की सगळं? असं सांगणाऱ्या ज्येष्ठ भगिनी?

‘आम्हीही केलंच की सगळं’वाल्यांना मला नेहमी विचारावं वाटतं, की ‘का केलंत सगळं?’ अनेक महिला सांगतात की, आम्हीही केलं असतं करियर; पण मुलांकडे लक्ष द्यायचं म्हणून बलिदान दिलं! माझ्या आताच्या काळातील अनेक मैत्रिणी सांगतात की, आमच्या ‘यांना’ना माझ्याच हातचं लागतं. त्यामुळे कितीही काम असलं तरी संध्याकाळच्या आत घरी जावंच लागतं! आता एवढं ‘सॅक्रिफाईज’ तर करावंच लागणार ना... ‘संसार म्हणजे ॲड्जेस्टमेन्ट असते गं. जुळवून घ्यावंच लागतं. थोडं मन मारलं की सगळं होतंय ना...’

या सर्व बलिदानी बायकांना (आपल्या आया, सासवा, बहिणी, मैत्रिणी, अनेकदा आपण स्वतःही) काही मूलभूत प्रश्न विचारायचे आहेत. ‘‘मुळात तुम्ही का केलंत सगळं? का घरचं, बाहेरचं सगळं एकटीने केलंत? का नवऱ्याला, मुलाला, भावाला कामाचा वाटेकरी करून घेतलं नाहीत? आणि आता त्या ‘तेजस्वी’ बलिदानाच्या गुंत्यात तुमच्या मुलीला आणि सुनेला तर अडकवणार आहातच ना. कारण त्यांना प्रत्येक पावलाला ‘आम्ही केलंच की, तुला का जमत नाही’ असे सल्ले, टोमणे मिळणारच आहेत... पण त्यातून तुमच्या मुलांचीही सुटका नाही. कारण आम्ही खस्ता काढल्या, तुला मोठं करायचं होतं म्हणून... हे त्याला ऐकवणार आहोतच आपण.’’

लहानपणी (म्हणजे आईशी भांडण्याच्या वयात!) मी एकदा आईला विचारलं होतं, ‘‘मी सांगितलं होतं का तुला हे सगळं कर म्हणून? तू तुझ्या आईपणाच्या आनंदासाठी केलंस! तुला मिळालं ते ‘आईपणाचं’ सुख? मग आता माझ्याकडून वसुली का?’’ अर्थात माझ्या या प्रश्नाचं उत्तर हे एका धपाट्याने मिळालं आणि मी कशी कृतघ्न जन्माला आले, असं माझा उद्धार झालाच. पण तेव्हापासून आणि आसपास अगणित आया, भगिनी बघताना आणि मातृत्वाचा उदो उदो होत असताना हा प्रश्न सतत मनात येत राहिला.

हा एक साधा व्यवहार आहे. मूल वाढवून मोठं करणं, म्हणजे ते म्हातारपणी आपली काळजी घेईल! त्या बरोबर येणारे आनंदाचे, प्रेमाचे क्षण हे आहेतच! पण या व्यवहाराचे उदात्तीकरण करून, आपण जे पॅटर्न सेट करत जातो, त्यामुळे किती बायकांना त्रासातून जावं लागत असेल याची कल्पना तरी केली आहे का? अशीच आई योग्य असते! आता बाहेर काम करणार म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष होणारच ना? त्यांच्या घरात पसारा इतका असतो, तिला आवरायला वेळच नसणार ना! या आणि अशा प्रकारच्या अनेक उद्‍गारांतून आपण सतत, घर आणि मूल ही फक्त आणि फक्त बाईची जबाबदारी असते हे अधोरेखित करत राहतो. आणि ज्या बायकांनी हे सगळं केलं आहे, ज्यांना करावं लागलं आहे, त्या सूड उगवल्यासारख्या यात भाग घेत राहतात! कालच माझा एक बंगाली मित्र सांगत होता की, राखी पौर्णिमेला त्याच्या एका बहिणीला पाळी आली म्हणून, या वर्षी तू ओवाळायचं नाही, असं तिला सांगण्यात आलं. या भावाने समजावण्याचा प्रयत्न केला की काळ बदलला आहे. आता हे कसं फक्त सांस्कृतिक आहे इत्यादी... पण त्यांची मोठी आत्या विरोध करत राहली की आम्ही तर कधी नाही केलं!

अनेक बायकांनी अनेक गोष्टी केलेल्या नाहीयेत! मागच्या पिढीतल्या अनेक बायकांनी एकटीने प्रवास केला नाहीये, एकटीने कोपऱ्यावर जाऊन चहा, कॉफी प्यायली नाहीये, उंबरठ्याबरोबर पडून काम केलेलं नाहीये, मित्र-मैत्रिणींबरोबर सुट्टी साजरी केली नाहीये..! आत्ताच्या पिढीतल्या अनेकींना हे करायची संधी मिळतेय, तर त्यांना आपण का थांबवतोय? अज्ञान? आकस? हेवा? आता जर तुमचा मुलगा स्वयंपाकघरात भांडी घासायला, स्वयंपाक करायला मदत करत असेल तर त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणायचं की आपला मुलगा चांगला निपजला याचा अभिमान मानायचा हे ठरवूयात! कारण बायका बायकांच्या शत्रू हे विधान पुरुषसत्तेतूनच आलं आहे, त्याचा फायदा पितृसत्तेलाच आहे. ही वेळ एकमेकांसोबत उभी राहण्याची आहे. एकमेकींच्या समोर उभे करण्याचा प्रयत्न पितृसत्ता सतत करत राहणार आहेच!

beingrasika@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com