बाई आणि विस्थापन

सध्या एका चित्रपटामुळे विस्थापनाचा मुद्दा खूप चर्चेत आहे. भारतीयच नव्हे, तर जगाच्या इतिहासात विविध वेळी, विविध स्थळी, विविध कारणांमुळे जनसमुदायांचे विस्थापन झाले आहे.
Women
WomenSakal
Summary

सध्या एका चित्रपटामुळे विस्थापनाचा मुद्दा खूप चर्चेत आहे. भारतीयच नव्हे, तर जगाच्या इतिहासात विविध वेळी, विविध स्थळी, विविध कारणांमुळे जनसमुदायांचे विस्थापन झाले आहे.

सध्या एका चित्रपटामुळे विस्थापनाचा मुद्दा खूप चर्चेत आहे. भारतीयच नव्हे, तर जगाच्या इतिहासात विविध वेळी, विविध स्थळी, विविध कारणांमुळे जनसमुदायांचे विस्थापन झाले आहे. त्यातली क्रूरता, असहायता या गोष्टी त्यानंतर चवीचवीने चघळल्या जातात. या विस्थापन शब्दाने मला आतून-बाहेरून हलवलं, कारण बाई म्हणून सतत विस्थापित होत असणारी जमात आपली! याबद्दल कधी काही लिहिलं, बोललं जातं का? म्हणजे बाई म्हणून बरोबरीचा दर्जा, समान हक्क यावर खूप लिहिलं-बोललं जातं; पण अजूनही जगभरातल्या पितृसत्ताक समाजात लग्नानंतर बाईचं विस्थापित होणं गृहीतच धरलं आहे.

लहानपणी घरातल्या कुठल्या तरी गोष्टीत बदल करायचा म्हणून हट्ट करत होते. आई म्हणाली, ‘‘स्वतःच्या घरी करा काय हवं ते!’’ म्हणजे आई-बाबांचं घर हे माझं घर नव्हतं. ते आईचं तरी होतं का? का घर सजावट, घरातली आवराआवर, घरातली सगळीच कामं आईने करायची असल्याने तिला ते घर आपलं वाटत होतं. त्या घरावर तिचं नाव नव्हतं. घराच्या कागदपत्रांवर तिचं नाव नव्हतं. ही गोष्ट फक्त माझ्या आईची नाही... त्या पिढीतल्या असंख्य बायकांची हीच गोष्ट आहे. त्याच का, या पिढीतही फक्त टॅक्स वाचवायला सोयीचं पडतं म्हणून बाईचं नाव घराच्या कागदपत्रांवर ठेवणारे असंख्य महाभाग सापडतील. त्याव्यतिरिक्त किती बायकांची घरं त्यांच्या नावावर आहेत?

हे घर आमचंच आहे, कशाला हवीत कागदपत्रं, असा भावनिक सूर अनेक बायका लावतील; पण तो पुरुषांनी लावलेला माझ्या ऐकिवात नाही आणि मालकी हक्क हा पैसे कमावणाऱ्या पुरुषाकडे असेल, तर ते घर त्या बाईचं कसं होत असेल? माझ्या ओळखीतले अनेक जण ‘‘बाहेर मी बॉस आहे, पण घरात आमची हीच बॉस!’’ अशी टाळ्या घेणारी विधाने करताना मी लहानपणापासून बघितली आहेत. म्हणजे घरात काय स्वयंपाक करायचा, मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, घरात सत्यनारायण कधी करायचा आणि कीटकनाशक फवारणी कधी करायची हे निर्णय त्या बायका घेतात. आर्थिक निर्णय? सामाजिक निर्णय? याचं काय होतं?

आता दिवस बदलले आहेत. बायकाही कमावत्या आहेत. त्या अनेक निर्णयांमध्ये सहभाग घेतात, हे काहीअंशी सत्य असलं, तरी त्यांचं विस्थापन होणार आहे हे त्यांनी मान्य केलेलं असतंच. म्हणजे नवऱ्याची बदली झाली म्हणून स्वतःचं सगळं करियर सोडून दुसऱ्या शहरात, देशात जाणाऱ्या बायका. जास्त कमावत असल्या तरी नवऱ्याच्या भावना दुखावू नयेत म्हणून प्रमोशन नाकारणाऱ्या बायका. मूळात लग्न करतानाच आपलं घर सोडणाऱ्या बायका. अर्थात काही अपवाद असतील. काही एकटे-दुकटे पुरुष आता ‘हाऊस हस्बंड’ म्हणून राहू पाहताहेत; पण अजूनही घरजावई म्हटलं की नाक मुरडलं जातंच. त्याच्या पुरुषत्वावरच प्रश्न उपस्थित केला जातो आणि फक्त पुरुषांकडून नाही, तर बायकांकडूनही!

आमच्या घरातला एक किस्सा आठवतो. माझ्या सासूबाईंची, त्यांची दोन मुलं आणि दिल्लीतील ‘त्यांचं’ घर यात त्रिस्थळी यात्रा चाललेली असते. एकदा दिल्लीत त्या आजारी पडल्या आणि माझ्या नणंदेला म्हणजे त्यांच्या मुलीला त्यांचं करावं लागलं. माझी नणंद मला म्हणाली, की दोन्ही मुलांना काही वाटतं का याचं? सगळं मला करावं लागलं. मी हसत त्यांना म्हटलं, की मीही माझ्या आईचं करते. खरं तर हेच जास्त छान आहे ना! सुनेने करण्यापेक्षा मुलीने करावं. त्यांना जास्त अनुभव असतो आपापल्या आईचा. माझ्या नणंदेला हे पटलंही... अवघड गेलं, पण पटलं. त्याही त्याच संस्कारातून आल्या आहेत, आपलं घर म्हणजे आपल्या नवऱ्याचं घर!

विस्थापन काय असतं? नुसती जागा सोडणं नाही. आपलं घर, संस्कृती, जीवनमूल्य यांना एका जागेवरून उचकटून दुसऱ्या जागी रुजवायचं. वर्षानुवर्षे जोडलेली नाती, मैत्री, सोबती बदलायचे. स्वतःच्या जागेवरून शरणागतासारखं दुसऱ्या ठिकाणी जायचं. एका अपरिचित जगात स्वतःचं विश्‍व बनवायचं आणि ते ‘आपलं’ आहे असा अभिमान बाळगत राहायचा... सगळं बरं राहील तर ठीक, नाही पटलं तर त्या जागेचा मालक कधीही आपल्याला जा म्हणू शकतो आणि परत जायला जागा असतेच असं नाही!

लग्न करताना आणखी काय वेगळं होतं? आपल्या घरातून निघताना, ‘जमवून घे, परत येऊ नकोस, आता तेच तुझं घर!’ असंच मुलीला समजावण्यात येतं. हार-फुलं समारंभ झाला, की तिला अचानक एका दुसऱ्या घराला स्वतःचं मानायचं आहे. नवऱ्याच्या आईला आपली आई मानायचं, त्यांच्या वडिलांना आपले वडील... त्याच्या घरातल्या सामानाला आपलं मानायचं... हळूहळू जमेल तसं ते बदलून घ्यायचं. आपल्या चवीचं बनवायचं किंवा आपली चव बदलून टाकायची. कित्येक माहेरवाशिणी अजूनही ‘तिकडे असं वरण चालत नाही आणि तिकडे ही भाजी बनवतच नाही’ असं म्हणत अगदी मूलभूत खाण्यापिण्याच्या सवयींपासून सगळं बदलत राहतात. विस्थापित होत राहतात.

विस्थापित होणं फक्त जागेपासून नसतं... स्वतःच्या मुळापासून असतं... स्वतःपासून असतं... स्वत्वापासून असतं.. आणि एका अर्भकाला जेव्हा आपण तिच्या बाई होण्याची जाणीव करून देत असतो तेव्हा तिला एक विस्थपितांचं आयुष्य समोर आहे अशाच पद्धतीने तयार करत असतो. पोरगी मनी प्लांटसारखी असली पाहिजे! कुठूनही काढा, कुठेही रुजायला तयार आहे. त्यासाठी गरजेचं आहे, तिचं स्वत्व छाटून टाका. तिचं स्वतःचं काही असू शकतं- अगदी घर, मालमत्तेपासून तिच्या वेळेपर्यंत- याची तिला जाणीव होऊ देऊ नका. तिचं स्वतःचं कसं काहीच निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि मग बाई कशी परोपकारी असते, कसं ती दुसऱ्यांसाठी सगळं जीवन वाहून घेते असा त्यावर मुलामा लावून तिची मूर्ती केली जाते. याचा सखोल विचार करण्याची गरज आहे... बाईला तिच्या स्वत्वाची जाणीव जोवर होतं नाही, तोवर आपल्या वाट्याला विस्थापन लिहिलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे!

beingrasika@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com