यशस्वी पुरुषामागील स्त्री!

कस्तुरबांना गांधीजींची सावली न म्हणता मला नेहमी ‘मोठी तिची सावली’ म्हणावंसं वाटतं.
Rasika Agashe writes woman behind the successful man
Rasika Agashe writes woman behind the successful mansakal
Summary

महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची उद्या (११ एप्रिल) जयंती आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या वाट्यात पत्नीला दुय्यम स्थान दिले जाण्याच्या काळात गांधीजींसारखे महापुरुष ‘यशस्वी’ वाटतात, जे आपल्या कामातला, लढ्यातला आपल्या पत्नीचा बरोबरीचा वाटा ओळखतात. यश वाटून घेतात. म्हणूनच कस्तुरबांना गांधीजींची सावली न म्हणता मला नेहमी ‘मोठी तिची सावली’ म्हणावंसं वाटतं.

कस्तुरबा गांधी. कोण या कस्तुरबा, याचे हमखास उत्तर म्हणजे महात्मा गांधींची पत्नी. त्यांनी आपल्या पतीच्या महान कार्यात साथ दिली, पण स्वातंत्र्यसैनिकांची नावे सांगा, या प्रश्नाच्या उत्तरात कधी कस्तुरबा या नावाचा उल्लेख होतो का? त्या सविनय कायदेभंगासाठी किती सत्याग्रहात सामील होत्या? त्यांना तुरुंगवास कशामुळे पत्करावा लागला? आठवतंय का कुणाला? अर्थात, ज्या काळात महात्मा गांधींचे विचार पुसण्याचा प्रयत्न चालू आहे, त्या पितृसत्ताक समाजात कस्तुरबा यांच्या कार्याची किती दाखल घेतली जाणार!

लहानपणापासून सुविचारासारखं एक वाक्य मनात बिंबवलं होतं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि स्त्रीने त्यातच धन्यता मानायची असते. स्त्री कायम मागेच राहते. तो पुरुष तिच्याबरोबर ते यश वाटून घेतो का? म्हणजे त्याबरोबर येणारे मानसन्मान, हारतुरे, प्रसिद्धी सगळंच. ते कायम त्या पुरुषाचं असतं. हे सर्व ‘यशस्वी’ (म्हणजे आताच्या प्रसिद्ध अशा) पुरुषांबद्दल आहे. यात नेते, अभिनेते, खेळाडू, कलाकार, उद्योगपती सगळे आले.

अनेकांच्या आयांनी त्यांच्या शिक्षणासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. अर्धपोटी राहून पोरांना जेवायला घातलेलं असतं. ती पोरं पंख फुटल्यावर आपापल्या दिशांना निघून गेलेली असतात. या यशस्वी पुरुषांच्या आया घरी त्यांची वाट बघत थांबलेल्या असतात, कुठलीही कुरकुर न करता. कारण आईने हेच करायचं असतं. अनेकदा वडिलांचं नाव लागलेलं असतं. एकदा हा प्रश्न विचारून बघितला पाहिजे, की किती यशस्वी पुरुषांच्या आई किंवा पत्नी यांची ‘नावं’ आपल्याला माहीत आहेत?त्यांच्या ‘कर्तृत्वाबद्दल’ तर अजून आपण चर्चा सुरू केलीच नाहीय आणि हा यशस्वी पुरुष जितका निर्मळ, प्रामाणिक, प्रयोगशील, तितकाच या जगासाठी तऱ्हेवाईक असणार. सामान्यपणे जगात ज्या पद्धतीने वागले जाते, तसाच तो वागणार नाही, तो बंड पुकारणार. लढणार, झगडणार आणि या वेळी त्याची पत्नी त्याला साथ देत होती, अशा एका वाक्यात आपण तिच्या कामाची बोळवण करणार. साथ देत होती म्हणजे? रोजचा खर्च कसा चालवत होती? घरातल्यांच्या जेवणाचे कसे बघत होती? याच्या रंजक कथा सांगत राहतो, पण ती रात्री बिछान्यावर पाठ टेकल्यावर कसला विचार करत होती? तिच्या पोटात पोटभर अन्न होतं का? ती जेवली का, हे तिला कोणी विचारात होतं का? ती संसाराचा गाडा कसा ओढत होती? तिच्या ‘स्वत्वाचं’ काय? यशस्वी पुरुषच कशाला? सर्वसामान्य, कमी यशस्वी किंवा अगदी कुचकामी पुरुषांचे संसारही बाया रेटतातच. त्यातही त्यांच्या ‘अहं’वर फुंकर घालत आपल्या यशामुळे त्याचं अपयशही झाकोळलं जाऊ नये, अशा प्रयत्नात त्या राहतात. आपापल्या नवऱ्याचं ताऱ्हेवाईक वागणं झाकत राहतात, सांभाळत राहतात, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळत राहतात.

बायका तऱ्हेवाईक वागायला लागल्या तर? म्हणजे अमुक बाई यशस्वी झाली म्हणून कामात अशी रमली की रात्री घरी यायचंच विसरली किंवा ती गाडी चालवत होती आणि इतकी आत्ममग्न झाली, की आपल्याबरोबर आपला नवरा होता हे विसरून त्याला बाजारात सोडून निघून गेली, अशा कथा कधी ऐकल्यात आपण?

मुळात लग्न हे स्त्रियांनी पुरुषाच्या घरातली कामं करून देण्यासाठी आणि हक्काचे यौनसंबंध ठेवण्याची सोय आहे, असं ज्या समाजात वाटतं तिथे बाईनी आत्ममग्न होऊन, सगळं विसरून आपल्या आवडत्या कामाला, कलेला, वाहून घेतलंय हे चित्र आजही दुर्मिळच आहे! (प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे कामवाल्या मावशी असतात, असा माझा एक सिद्धांत आहे.)

वाद्यसंचात प्रत्येक वाद्याची स्वतःची एक जागा असते आणि तरीही उत्तम संगीत निर्माण होण्यासाठी जर दुसऱ्या वाद्याला प्रकाशझोतात येणं महत्त्वाचं असेल तर स्वतःच्या अस्तित्वाचा, अहंचा बाऊ न करता ती साथ देत राहणं महत्त्वाचं असतं आणि ही जागा अवघड आहे, कारण जेव्हा आपण कस्तुरबांसारख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करत आहोत, तेव्हा त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची, कर्तृत्वाची जाणीव नव्हती असं म्हणता येणार नाही किंवा त्या आंधळेपणाने आपल्या नवऱ्याच्या मागे चालत होत्या असंही नाही. या यशस्वी पुरुषांच्या देदीप्यमान तेजोवलयात, आपली पणती पेटवून ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा साथ देताना, मागे उभं राहताना झाकोळून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच मला गांधीजींसारखे तेच महापुरुष ‘यशस्वी’ वाटतात जे आपल्या कामातला, लढ्यातला आपल्या पत्नीचा बरोबरीचा वाटा ओळखतात आणि यश वाटून घेतात. कस्तुरबांना गांधीजींची सावली न म्हणता मला नेहमी ‘मोठी तिची सावली’ म्हणावंसं वाटतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com