बाईपणाचं कार्ड

‘बाई’ हीसुद्धा माणूसच आहे आणि सत्ता, क्रौर्य, राजकारण या सर्व बाबतीत कुठल्याही पुरुषाइतकेच डावपेच तीही खेळू शकते.
women
womensakal
Summary

‘बाई’ हीसुद्धा माणूसच आहे आणि सत्ता, क्रौर्य, राजकारण या सर्व बाबतीत कुठल्याही पुरुषाइतकेच डावपेच तीही खेळू शकते.

‘बाई’ हीसुद्धा माणूसच आहे आणि सत्ता, क्रौर्य, राजकारण या सर्व बाबतीत कुठल्याही पुरुषाइतकेच डावपेच तीही खेळू शकते. एक बाई जेव्हा ‘पुरुषी गैरवर्तनाबद्दल खोटं बोलते’ तेव्हा खरंच त्याच त्रासात जगणाऱ्या असंख्य बायका पाच पावलं मागे खेचल्या जातात. त्यांची विश्वासार्हता कमी होते आणि याचा बाई म्हणून तुमच्यावर काहीच फरक पडत नसेल, तर बाईपणाचं कार्ड वापरू नका.

मध्यंतरी वाचनात आलं की एका अभिनेत्याने एका सहअभिनेत्रीबरोबर ‘गैरवर्तन’ केलं. जेव्हा त्या स्त्रीची मुलाखत पाहिली तेव्हा लक्षात आलं की, त्यांना ज्या वर्तणुकीस सामोरं जावं लागलं (असा त्यांचा दावा आहे) ते ‘व्यक्ती’ म्हणून, ‘बाई’ म्हणून नाही. ‘बाईबरोबर गैरवर्तन’ असं वाचलं की सगळ्यांच्याच नजरा चाळवतात. या आधीही, एका प्रोजेक्टसाठी रिसर्च करताना वाचलं होतं, की पुरुषांवर दाखल होणाऱ्या स्त्रीविषयक गुन्ह्यांपैकी ४८ टक्के खोट्या केसेस असतात. भारतात दर अर्ध्या तासात एक बलात्कार होतो. विनयभंग, छेडछाड याची मोजदादच नाहीये. अर्ध्यापेक्षा जास्त केस ‘बाईची’, तिच्या घराची, बदनामी होईल म्हणून नोंदवल्याच जात नाहीत.

एका नाटकासाठी स्त्री कलाकारांबरोबर काम करताना मी हा प्रश्न पहिल्यांदा विचारला होता, की तुम्ही हे बाईपणाचं कार्ड कधी वापरलं आहे का? असेल तर का? अनेकींचं उत्तर ‘नाही’ असं होतं; पण एक-दोघींनी सांगितलं की सिनेमाची तिकिटं मिळवताना, कष्टाचं काम असेल आणि करायचं नसेल तर आम्ही हे वापरलं आहे. आणि लैंगिक गुन्ह्यासंदर्भात? तेव्हा एक नटी मैत्रीण म्हणाली होती, ‘‘स्त्री-पुरुष समानता यावी असं वाटतं, लैंगिक तटस्थता यावी असं वाटतं, म्हणून अनेकदा लपवावेसं वाटतं आपलं बाईपणाचं कार्ड. त्याचा गैरवापर करून घ्यावा असं का वाटत असेल?’’ एक मत असंही असतं, की बायका का खोट्या केसेस करतील? बदनामी तर त्यांचीच होणार आहे ना? हा प्रश्न सगळ्यांनीच विचारून बघितला पाहिजे स्वतःला. हे बाईपणाचं कार्ड आपणही कळत-नकळत कुठे वापरतो आहोत का? आमच्याकडे एक आहे, जिला कधीही काही काम सांगितलं की ती म्हणते, पिरियड चालू आहेत गं, खूप त्रास होतोय. एकदा तिला मी विचारलंच, एका महिन्यात चारदा कसे ग पिरियड येताहेत? चल, डॉक्टरकडे घेऊन जाते. मग सुतासारखी सरळ आली. यात काम करण्याचा आळस इतका साधा मुद्दा असला, तरी जे कारण ती पुढे करत आहे, ते असंख्य बायका बोलूही शकत नाहीत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे किंवा यात ज्या बायकांना खरंच त्रास होतो पीरिअड्सचा, त्याचा कुणी गंभीरपणे विचार करणार नाहीये, हे का लक्षात येत नसावं?

माझ्या परिचयातली एक स्त्री आहे, जी सर्व संभाषणात लैंगिक गोष्टी बोलत राहते. इशारे नाही, जवळपास स्पष्टपणे समोरच्या पुरुषाला एकांतात बोलवते आणि मग नंतर तो पुरुष किंवा सगळेच पुरुष कसे तिच्या ‘मागे’ लागले आहेत, याची ओरड करत राहते आणि सगळे बाई म्हणून कसा तिचा वापर करून घेतात, यासाठी रडत राहते. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करावं, हा ज्याचा त्याचा किंवा जिचा तिचा प्रश्न असला, तरी आपण व्यक्तीसापेक्ष कारणे वापरत नाही आहोत. ‘स्त्री’ जातीमध्ये ओढून आपण हे कसे सर्व स्त्रियांसाठी लागू आहे, अशी विधाने करत आहोत, ज्याची किंमत स्त्रिया म्हणून इतरांना भरावी लागणार आहे.

हे खूप गुंतागुंतीचं वाटत असलं, तरी तितकंच सहज सोप्प आहे. ‘बाई’ हीसुद्धा माणूसच आहे आणि सत्ता, क्रौर्य, राजकारण या सर्व बाबतीत कुठल्याही पुरुषाइतकेच डावपेच तीही खेळू शकते. तुम्ही म्हणाल की इतर वेळी बायकांच्या बाजूने बोलणारी मी, आज त्यांच्या विरोधात का गेले आहे? मी अजूनही बायकांचीच बाजू घेत आहे. कारण बाईपणाचं कार्ड वापरून तुम्ही स्त्रियांच्या विरोधात काम करत आहात. एक बाई जेव्हा ‘पुरुषी गैरवर्तनाबद्दल खोटं बोलते’ तेव्हा खरंच त्याच त्रासात जगणाऱ्या असंख्य बायका पाच पावलं मागे खेचल्या जातात. त्यांची विश्वासार्हता कमी होते आणि याचा बाई म्हणून तुमच्यावर काहीच फरक पडत नसेल, तर बाईपणाचं कार्ड वापरू नका. आपल्या आसपासच्या स्त्रियांना वापरू देऊ नका.

आपल्याला कुणी त्रास देत असेल, तर तो केवळ स्त्री म्हणून देत आहे की व्यक्ती म्हणून, याची शहानिशा करा. कारण स्त्री-पुरुष समानतेची ही चळवळ भारतात आत्ता कुठे रुजण्यास सुरुवात होत आहे. अनेक भागांत स्त्रियांना अमानुष अत्याचारांना सामोरं जावं लागतंय. मोकळेपणाने बोलता येत नाहीये, स्त्री असण्याची लाज वाटत आहे. स्त्री म्हणून जगातल्या सर्व स्त्रियांशी माझं एक नातं आहे, आपण एकमेकींसाठी आहोत, हा विश्वास आहे. तिथे या पद्धतीने ‘बाईपण’ वापरणं हे त्या सर्व स्त्रियांसाठी अन्यायकारक आहे, हे लक्षात ठेवू या!

beingrasika@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com