प्रयोगशील व अष्टपैलू व्यक्तिमत्व

Ratnakar-Matkari
Ratnakar-Matkari

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी साहित्य, नाट्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबईत झाला. शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. अर्थशास्त्रात पदवीधर झाले. त्यानंतर त्यांनी १९७८ पर्यंत बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. १९७८ नंतर त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रात काम केले. १६ व्या वर्षापासून लेखनास सुरुवात केली. १४ फेब्रुवारी १९५५ मध्ये ‘वेडी माणसं’ ही त्यांची पहिली एकांकिका आकाशवाणी मुंबई केंद्रावर प्रसारित झाली. त्यातून रत्नाकर मतकरी हे नाव प्रेक्षकांसमोर आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मतकरी यांनी ३५ नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये १७ प्रौढांसाठी व १७ लहान मुलांसाठी होती. १४ एकांकिका, २ लघुपट, ४ चित्रमालिका आणि एका चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. मराठी रंगभूमीच्या व्यावसायिक, प्रायोगिक, बालनाट्य या तिन्ही दालनांमध्ये त्यांनी मुक्‍तसंचार केला. मराठी रंगभूमीच्या नव्या पर्वाच्या जडणघडणीचे ते एक शिल्पकार आणि साक्षीदार होते. मतकरी यांची ३९ नाटके, १३ एकांकिका संग्रह, २० कथासंग्रह (२५० कथा), ३ कादंबऱ्या, ९ ललितलेखन संग्रह, १६ बाल नाटके, ५ बालनाटिका संग्रह, १ बालकथा संग्रह, १ बालगीत संग्रह, आत्मचरित्र, १ काव्यसंग्रह अशी साहित्यसंपदा आहे.

मतकरी यांनी १९७६ ते १९७८ या दोन वर्षांत मुंबई दूरदर्शनवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘गजरा’चे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे अंशतः लेखनही केले. शरदाचे चांदणे साहित्यिक मुलाखतींच्या कार्यक्रमात संचालन व मुलाखतकार म्हणून १३ भागांचे काम पाहिले. त्यांची पत्नी प्रतिभा यांच्यासोबत त्यांनी ‘सांगाती’ या अभिवाचनाचे प्रयोग भारतभर व परदेशात केले. आकाशवाणी मुंबई केंद्रावर ‘मध्यरात्रीचे पडघम’ या स्वतःच्या गूढकथांवर आधारित १७ भागांच्या मालिकेत कथावाचन केले.

मतकरी यांनी ‘प्रेमकहाणी’, ‘विनाशाकडून विनाशाकडे’, ‘लोककथा ७८’, ‘साटंलोटं’ या नाटकांतून तसेच बालनाट्य आणि एकांकिकांमधून अभिनय केला. नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीताचे संकलन, वेषभूषा, अभिनय, निर्मिती अशा नाट्यक्षेत्रात मुक्तपणे वावरले. ते उत्कृष्ट चित्रकारही होते. 
रत्नाकर मतकरी यांचे बालरंगभूमीवरील योगदान अत्यंत मोलाचे आहे.

बालरंगभूमी सुरू राहावी यासाठी चळवळ सुरू केली होती. ठाण्यात गरीब, झोपडपट्टीमध्ये कचरा वेचक मुलांसाठी रंगभूमीचे दालन खुले व्हावे यासाठी त्यांनी वंचितांचा रंगमंच उपक्रम सुरू केला, तो आजपर्यंत कार्यरत आहे.
मतकरी यांनी साहित्य क्षेत्रात गूढकथांना वेगळे स्थान निर्माण केले. गूढकथा लिहिताना त्यांनी त्याचा संदर्भ मानसशास्त्राशी जोडला आहे. ‘गहिरे पाणी’ या गूढकथेवर मालिकेची निर्मिती करण्यात आली. ती लोकप्रिय झाली. रत्नाकर मतकरी यांनी ‘माझे रंगप्रयोग’ आत्मचरित्रात्मक ग्रंथ प्रकाशित केला आहे. ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मतकरी यांनी केले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. संगीत नाटक अकदमी व साहित्य अकादमी अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांच्या कलाप्रवासाचा सन्मान झाला. २००१ मध्ये पुणे येथे झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे मतकरी यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.

रत्नाकर मतकरी यांनी सातत्याने लेखन केले. त्या लेखनात कधीच साचलेपणा येऊ दिला नाही, नवीन प्रयोग केले. कथा, गूढकथा, नाटक, बालनाट्य, प्रायोगिक, राज्य नाट्य स्पर्धा अशा सर्वच प्रकारांत त्यांनी लेखन केले. बालरंगभूमी आणि प्रायोगिक नाट्य चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या काळात त्यांच्या अंत्यदर्शनाला कोणालाही उपस्थित राहता न येणे याची खूप खंत वाटते. 
- चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक

रत्नाकर मतकरी आणि मी १९६९ पासून एकत्रित काम करतो. खूप चांगला मित्र होता. ‘आरण्यक’ नाटकात ४४ वर्षांपूर्वी काम केले आणि आता नव्या संचातही काम केले. ‘आरण्यक’ हे माईक शिवाय रंगमंचावर सादर झालेले नाटक होते. हा वेगळा प्रयोग मतकरी यांनी पहिल्यांदा केला.  
- रवी पटवर्धन, ज्येष्ठ अभिनेते.

रत्नाकर मतकरी यांनी वैविध्यपूर्ण बालनाट्यांचे लेखन करून बालरंगभूमीचा पाया पक्का केला. समाजातील दुर्बल घटकांसाठी काही वस्त्यांमधून पाड्यांमधून बालनाट्य पोचवण्याचे सामाजिक जाणिवेचे काम केले. आमचा आधारवड हरपला आहे.   
- कांचन सोनटक्के, ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या.

रत्नाकर मतकरी यांनी गूढकथा हा वेगळा वाङ्‌मय प्रकार मराठीत रुजवला. बालरंगभूमीसाठीचे त्यांचे योगदान फार मोठे आहे. इतके विपुल लेखन करणारा अलीकडच्या काळात दुसरा लेखक नसावा. माझ्या ‘देवनवरी’ नाटकाच्या पुस्तक प्रकाशनावेळी ते आले होते. त्यावेळी माझ्यासारख्या नव्या लेखकाला त्यांचे मत प्रोत्साहन देणारे होते. 
- प्रेमानंद गज्वी, नाटककार. 

सुदैवाने माझ्या वाट्याला रत्नाकर मतकरी यांची चार नाटके आली. ‘प्रियतमा’ त्यांच्यासोबत मी केले होते. त्यांना ते पात्र जसे हवे होते तसे मी ते साकारू शकलो. त्यांना मी कधीही कोणावर रागावलेले किंवा चिडलेले पाहिलेले नाही. 
- प्रशांत दामले, अभिनेते.

मतकरी यांनी ४५ वर्षांपूर्वी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक लिहिले. ते आम्ही दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर पुन्हा आणले. त्याला जो प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व होता. बालरंगभूमीच्या इतिहासात त्यांच्याइतका उत्तम काम केलेला नाटककार दिग्दर्शक नाही. 
- वैभव मांगले, अभिनेता.

मतकरी माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या लेखनावरील समीक्षेच्या पुस्तकाचे कामही सुरू झाले आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘विविध आणि विपुल’ असे ठरले आहे. लॉकडाउनंतर ते काम पुन्हा सुरू होऊन ते प्रकाशित केले जाणार आहे.  
- अशोक कोठावळे, प्रकाशक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com