esakal | गप्पा ‘पोष्टी’: ‘नऊ अकरा’चं स्मारक आणि आपण भारतीय
sakal

बोलून बातमी शोधा

गप्पा ‘पोष्टी’: ‘नऊ अकरा’चं स्मारक आणि आपण भारतीय

गप्पा ‘पोष्टी’: ‘नऊ अकरा’चं स्मारक आणि आपण भारतीय

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

माझ्या मागच्या न्यूयॉर्कच्या धावत्या भेटीमध्ये ‘नऊ-अकराचं’ स्मारक बघायला आवर्जून गेलो होतो. हे स्मारक म्हणजे ११ सप्टेंबर २००१ला अतिरेक्यांनी उडवलेल्या वल्ड ट्रेड सेंटरच्या दोन इमारतींच्या ठिकाणी उभारलेलं स्मारक. बरोबर वीस वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी अमेरिकन भांडवलशाहीच्या यशाचं उत्तुंग प्रतीक असलेल्या वल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर हल्ला केला. अमेरिकेचीच दोन विमानं अपहरण करून त्यातल्या प्रवाशांसकट ती विमानं या इमारतींवर धडकवली. काही क्षणांत पत्त्याच्या बंगल्यासारख्या या इमारती कोसळल्या आणि त्यात असलेली देशोदेशीची हजारो माणसं बळी पडली.

आधुनिक जगाचा सामाजिक आणि राजकीय इतिहास बदलून टाकणारी ही घटना. नऊ-अकरा आधीचं जग आणि नंतरचं जग ही अक्षरशः दोन वेगळी जगं झाली आहेत. त्या मूळच्या इमारतींच्या ठिकाणी तिथल्या निरपराध बळींचं स्मारक म्हणून दोन भव्य जलकुंड उभारले आहेत. प्रचंड मोठे चौकोनी कुंड, त्या कुंडांच्या चारही भिंतीवरून सतत कोसळत असलेलं पाणी आणि त्या कुंडांच्या मध्यभागी एक छोटंसं कुंड. हे असं अगदी साधं स्वरूप आहे या स्मारकाचं. कुंडांच्या कठड्यांवर त्या हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांची नावं कोरून ठेवली आहेत.

हे स्मारक बघून सुन्न व्हायला होतं. अस्वस्थ वाटायला लागतं. आपलं जग किती विचित्र झालं आहे, असा विचार मनात येतो. अर्थात, या स्मारकाच्या भव्यतेतून बाहेर पडताना नऊ-अकराचा सूड म्हणून अमेरिकेनं काय केलं तेही आठवलं. नऊ-अकराच्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेनं महिन्याभरात अफगाणिस्तानवर आणि वर्षा-दोन वर्षांत इराकवर हल्ला केला. ते दोन कमजोर देश आपल्या पोलादी टाचेखाली चिरडून टाकले. तिथल्या हजारोंचा जीव घेतला, लाखोंना देशोधडीला लावलं. कोसळलेल्या दोन इमारतींच्या बदल्यात अमेरिकेनं दोन देश बेचिराख केले. आणि वीसेक वर्षं तिथं राहून, अफगाणिस्तानला अंतर्गत यादवीच्या गर्तेत लोटून आता ते तिथून बाहेर पडलेत. त्यांनी केलं ते बरोबर केलं का चूक, हे माहित नाही. पण त्या घटनांनंतर अमेरिकेतल्या कोणत्याही शहरात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही, हेही सत्य आहे.

जाता जाता : अमेरिकेला जसं न्यूयॉर्क, तसं भारताला मुंबई. न्यूयॉर्कवर हल्ला करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेनं दोन देश बेचिराख केले. पण मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट करून शेकडोंचे प्राण घेणाऱ्या नराधम याकूबला फाशी देण्यासाठी आपण २२ वर्षं वाट पाहिली. आणि शेवटपर्यंत त्यावर चर्चा आणि घोळ सुरूच होते. आणि मुंबईत बळी पडलेल्या सर्वसामान्य माणसांचं स्मारक? कम ऑन. इथं आपल्या महापुरुषांच्या स्मारकांचे घोळही वर्षानुवर्षं सुटत नाहीत, सर्वसामान्य माणसांच्या स्मारकाचं काय घेऊन बसलात!!!

loading image
go to top